उत्पत्ती 47:28-31
उत्पत्ती 47:28-31 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
याकोब मिसरमध्ये सतरा वर्षे राहिला, तो एकशे सत्तेचाळीस वर्षांचा झाला. इस्राएलाच्या मरणाचा काळ जवळ आला, म्हणून मग त्याने आपला मुलगा योसेफ याला आपणाजवळ बोलावले आणि तो त्यास म्हणाला, “तू जर माझ्यावर प्रेम करतोस तर माझ्या मांडीखाली तुझा हात ठेवून मला वचन दे की, मी जे सांगतो ते तू करशील आणि तू माझ्याशी खरेपणाने वागशील. मला मिसरामध्ये पुरू नको. जेव्हा मी माझ्या वाडवडिलांसोबत झोपी जाईन, तेव्हा मला मिसरमधून बाहेर घेऊन जा आणि माझ्या पूर्वजांना जेथे पुरले आहे तेथे म्हणजे आपल्या वंशजांसाठी घेतलेल्या पुरण्याच्या जागेत मला मूठमाती दे.” योसेफाने उत्तर दिले, “तुम्ही मला जे करावयास सांगितले ते मी नक्की करीन.” मग याकोब म्हणाला, “तू माझ्याशी तशी शपथ वाहा.” तेव्हा तसे करण्याबद्दल योसेफाने शपथ वाहिली. मग इस्राएलाने आपले डोके मागे पलंगाच्या उशावर नम्रतेने खाली वाकून नमन केले.
उत्पत्ती 47:28-31 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
इजिप्त देशात याकोब सतरा वर्षे जगला आणि त्याच्या जीवनाची वर्षे एकशे सत्तेचाळीस होती. इस्राएलाची मृत्युघटका भरत आली त्यावेळी त्याने आपला पुत्र योसेफ याला बोलाविले आणि म्हटले, “जर तुझी माझ्यावर कृपादृष्टी असेल तर माझ्या मांडीखाली हात ठेऊन अशी शपथ घे की तू मला करुणेने व विश्वासाने वागवशील. इजिप्त देशात मला मूठमाती देऊ नकोस, परंतु जेव्हा मी माझ्या पूर्वजांसोबत झोपी जाईन, मला इजिप्तमधून बाहेर ने आणि त्यांना जिथे पुरले आहे, तिथे मला मूठमाती दे.” त्याने म्हटले, “तुम्ही जसे सांगितले आहे तसेच मी करेन.” “मला शपथ दे.” त्याने म्हटले, मग योसेफाने त्याला शपथ दिली आणि मग इस्राएलने आपल्या काठीच्या टोकावर टेकून उपासना केली.
उत्पत्ती 47:28-31 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
याकोब मिसर देशात सतरा वर्षे जगला; ह्याप्रमाणे याकोबाचे सगळे वय एकशे सत्तेचाळीस वर्षांचे झाले. इस्राएलाचा अंतकाळ समीप आला तेव्हा त्याने आपला मुलगा योसेफ ह्याला बोलावून आणून म्हटले, “तुझी माझ्यावर कृपादृष्टी असेल तर माझ्याशी तू ममतेने व सत्यतेने वागून मला मिसर देशात पुरणार नाहीस अशी शपथ माझ्या मांडीखाली हात ठेवून वाहा; मी आपल्या वाडवडिलांबरोबर निद्रा घेण्यास गेलो म्हणजे मला मिसर देशाबाहेर घेऊन जा आणि माझ्या वाडवडिलांच्या कबरस्तानात ठेव.” तो म्हणाला, “आपल्या सांगण्याप्रमाणे मी करीन. तो म्हणाला, “माझ्याशी शपथ वाहा”; तेव्हा त्याने शपथ वाहिली; आणि इस्राएलाने पलंगाच्या उशावर आपले शरीर लववून नमन केले.