YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 46:28-34

उत्पत्ती 46:28-34 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

याकोबाने प्रथम यहूदाला योसेफाकडे पाठवले; यहूदा गोशेन प्रांतात योसेफाकडे गेला त्यानंतर याकोब व त्याच्या परिवारातील सर्व मंडळी यहूदाच्या मागे गोशेन प्रांतात गेली. योसेफास आपला रथ तयार करून आपला बाप इस्राएल याच्या भेटीस गोशेन प्रांतात त्यास सामोरा गेला. योसेफाने आपल्या पित्यास पाहिले तेव्हा त्याने त्याच्या गळ्यास मिठी मारली व त्याच्या गळ्यात गळा घालून तो बराच वेळ रडला. मग इस्राएल योसेफाला म्हणाला, “आता मात्र मला शांतीने मरण येवो, मी तुझे तोंड पाहिले आहे, आणि तू जिवंत आहेस हे मला समजले आहे.” मग योसेफ आपल्या भावांना व आपल्या वडिलाच्या घरच्या सर्वांना म्हणाला, “मी जाऊन फारोला सांगतो की, ‘माझे भाऊ व माझ्या वडिलाच्या घरातील सर्व मंडळी हे कनान देश सोडून येथे माझ्याकडे आले आहेत. माझ्या वडिलाच्या घरचे सर्वजण मेंढपाळ आहेत, ते त्यांची शेरडेमेंढरे व गुरेढोरे पाळत आले आहेत. ते त्यांची शेरडेमेंढरे, गुरेढोरे व त्यांचे तेथे जे काही होते ते सर्व घेऊन आले आहेत.’ जेव्हा फारो राजा तुम्हास बोलावून विचारील, ‘तुम्ही काय काम धंदा करता?’ तेव्हा तुम्ही असे सांगा, ‘आम्ही सर्व मेंढपाळ आहोत. हा आमचा पिढीजात धंदा आहे. आमच्या आधी आमचे वाडवडील हाच धंदा करीत होते.’ मग फारो तुम्हास गोशेन प्रांतात राहू देईल. मिसरी लोकांस मेंढपाळ आवडत नाहीत.”

सामायिक करा
उत्पत्ती 46 वाचा

उत्पत्ती 46:28-34 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

योसेफाने गोशेन प्रांताची वाट दाखवावी म्हणून याकोबाने यहूदाला आपल्यापुढे त्याच्याकडे पाठवले; ह्याप्रमाणे ते गोशेन प्रांतात आले. योसेफ आपला रथ सिद्ध करून आपला बाप इस्राएल ह्याला भेटायला गोशेन प्रांतास गेला; त्याला भेटून त्याच्या गळ्यास त्याने मिठी मारली आणि त्याच्या गळ्यात गळा घालून तो फार वेळ रडला. तेव्हा इस्राएल योसेफाला म्हणाला, “तू अजून जिवंत असून तुझे मुख मी पाहिले, आता मला खुशाल मरण येवो.” योसेफ आपल्या भावांना आणि आपल्या बापाच्या घरच्यांना म्हणाला, “मी जाऊन फारोला खबर देतो की, कनान देशात असलेले माझे भाऊ व माझ्या बापाच्या घरची माणसे माझ्याकडे आली आहेत; हे मेंढरे पाळणारे, गुरेढोरे पाळणारे आहेत म्हणून ते आपली शेरडेमेंढरे, गुरेढोरे व आपले सर्वस्व घेऊन आले आहेत. फारो तुम्हांला बोलावून विचारील की, ‘तुमचा धंदा काय आहे?’ तेव्हा तुम्ही सांगा की, ‘बाळपणापासून आजवर आम्ही आपले दास गुरेढोरे बाळगून आहोत, आमचा व आमच्या वाडवडिलांचाही हाच धंदा आहे.’ अशाने तुम्हांला गोशेन प्रांतात राहायला मिळेल; कारण जेवढा म्हणून मेंढपाळ आहे तेवढ्याची मिसरी लोकांना किळस वाटते.”

सामायिक करा
उत्पत्ती 46 वाचा