उत्पत्ती 45:3-13
उत्पत्ती 45:3-13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग योसेफ आपल्या भावांना म्हणाला, “मी योसेफ आहे. माझा बाप अजून जिवंत आहे काय?” परंतु त्याचे भाऊ त्यास काही उत्तर देऊ शकले नाहीत. त्याच्या समोर ते फार घाबरले होते. तेव्हा योसेफ आपल्या भावांना म्हणाला, “मी विनंती करतो जरा इकडे माझ्याजवळ या.” तेव्हा ते त्याच्या जवळ गेले. आणि तो त्यांना म्हणाला, “तुमचा भाऊ योसेफ मीच आहे. ज्याला तुम्ही मिसरी लोकांस विकले. आता त्यासाठी काही खिन्न होऊ नका किंवा आपल्या स्वतःवर संताप करून घेऊ नका. मी येथे यावे व त्यामुळे आपणा सर्वांचे प्राण वाचावेत ही देवाचीच योजना होती. हा दुष्काळ आता दोन वर्षे पडला आहे आणि आणखी पाच वर्षे पेरणी किंवा कापणी होणार नाही. देवाने मला तुमच्या आधी येथे पाठवले आहे, यासाठी की, तुमचा पृथ्वीवर बचाव होऊन तुम्ही शेष रहावे आणि तुम्हास जिवंत ठेवून तुमची वंशवृद्धी होऊ द्यावी. मला येथे पाठवण्यात तुमचा दोष नव्हता तर ही देवाची योजना होती. देवाने मला फारोच्या वडिलासमान केले आहे. त्यामुळे मी फारोच्या घरादाराचा धनी आणि सर्व मिसर देशाचा अधिकारी झालो आहे.” योसेफ म्हणाला, “तर आता ताबडतोब माझ्या बापाकडे जाण्यास निघा. त्यास सांगा की, तुमचा मुलगा योसेफ याने तुम्हास संदेश पाठवला आहे. देवाने मला अवघ्या मिसर देशाचा धनी केले आहे. तर माझ्याकडे खाली निघून या. उशीर करू नका. तुम्ही माझ्याजवळ गोशेन प्रांतात राहा. आणि तुम्ही, तुमची मुले, नातवंडे तसेच तुमची शेरडेमेंढरे, गुरेढोरे आणि जे काही तुमचे आहे ते माझ्याजवळ राहील. येणाऱ्या दुष्काळाच्या पाच वर्षात मी तुम्हास सर्व प्रकारचा पुरवठा करीन त्यामुळे तुम्हावर व तुमच्या कुटुंबावर सर्व काही गमावून गरीब होण्याची वेळ येणार नाही. पाहा, माझे तोंड तुम्हाशी बोलत आहे हे तुमचे डोळे, व माझा भाऊ बन्यामीन याचे डोळे पाहत आहेत. मिसर देशातील माझे वैभव आणि तुम्ही येथे जे जे पाहिले आहे त्यासंबंधी माझ्या बापाला सांगा. आता लवकर जाऊन माझ्या बापाला माझ्याकडे खाली घेऊन या.”
उत्पत्ती 45:3-13 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तेव्हा योसेफ आपल्या भावांना म्हणाला, “मी योसेफ आहे! माझे वडील अद्याप जिवंत आहेत काय?” परंतु त्याचे भाऊ इतके घाबरले होते की त्यांच्या मुखातून एकही शब्द बाहेर पडेना. तेव्हा योसेफाने आपल्या भावांना म्हटले, “माझ्याजवळ या!” ते जवळ आल्यावर तो त्यांना म्हणाला, “ज्या भावाला विकून तुम्ही इजिप्त देशात पाठवून दिले होते, तो मी तुमचा भाऊ योसेफ आहे! तुम्ही मला अशा रीतीने वागविले म्हणून वाईट वाटून घेऊ नका व त्रागा करून घेऊ नका, कारण तुमचे जीव वाचविण्याकरिता परमेश्वरानेच मला तुमच्यापुढे इकडे पाठविले. दुष्काळ पडून आता दोनच वर्षे झाली आणि अद्यापही पाच वर्षे आहेत. त्या काळात नांगरणी व कापणी अजिबात होणार नाही. परंतु पृथ्वीवर जे उरले आहेत, त्या तुम्हाला वाचवण्यासाठी आणि मोठ्या मुक्तिद्वारे तुमचे जीवन सुरक्षित करण्यासाठी परमेश्वराने मला तुमच्या आधी इथे पाठवले आहे. “म्हणजे आता तुम्ही नव्हे तर खुद्द परमेश्वरानेच मला इकडे पाठविले. त्यांनीच मला फारोहचा सल्लागार, त्याच्या घराण्याचा व्यवस्थापक आणि संपूर्ण इजिप्त देशाचा अधिपती केले आहे. आता त्वरा करा आणि माझ्या वडिलांकडे जाऊन त्यांना सांगा की, तुमचा पुत्र योसेफ असे म्हणतो: ‘परमेश्वराने मला संपूर्ण इजिप्त देशाचा प्रमुख केले आहे, म्हणून आता क्षणाचाही विलंब न लावता माझ्याकडे येथे या. म्हणजे तुम्ही, तुमची मुले व तुमची नातवंडे, गुरे, शेरडेमेंढरे आणि जे सर्वकाही तुमचे आहे, त्यासह तुम्हाला येथे गोशेन प्रांतात राहता येईल. मी तुमची या ठिकाणी काळजी घेईन, कारण आपल्यापुढे दुष्काळाची अजून पाच वर्षे आहेत आणि तुम्ही इकडे आला नाही तर, तुम्ही तुमच्या सर्व कुटुंबासह निराधार व्हाल.’ “तुम्ही हे स्वतः बघत आहात व माझा भाऊ बिन्यामीनही बघत आहे, की खरोखर मीच तुमच्याशी बोलत आहे. आपल्या वडिलांना इजिप्तमध्ये मला देण्यात आलेला आदर आणि जे सर्वकाही तुम्ही पाहिले ते सांगा आणि त्यांना माझ्याकडे तत्परतेने घेऊन या.”
उत्पत्ती 45:3-13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
योसेफ आपल्या भावांना म्हणाला, “मी योसेफ आहे; माझा बाप अजून जिवंत आहे काय?” त्याच्या भावांच्या तोंडून काही उत्तर निघेना, कारण ते त्याच्यापुढे अतिशय घाबरले. योसेफ आपल्या भावांना म्हणाला, “अंमळ जवळ या.” आणि ते जवळ गेले. तेव्हा तो म्हणाला, “तुमचा भाऊ योसेफ ज्याला तुम्ही मिसर देशात विकून टाकले तो मीच. तुम्ही मला ह्या देशात विकून टाकले ह्याबद्दल आता काही दु:ख करू नका; आणि संताप करून घेऊ नका, कारण तुमचे प्राण वाचवावे म्हणून देवाने मला तुमच्यापुढे पाठवले. ह्या देशात आज दोन वर्षे दुष्काळ आहे; आणखी पाच वर्षे अशी येणार आहेत की त्यांत नांगरणी-कापणी काही व्हायची नाही. देवाने मला तुमच्यापुढे ह्यासाठी पाठवले की तुमचा पृथ्वीवर अवशेष ठेवावा; महान सुटकेद्वारे तुम्हांला वाचवावे आणि तुमची वंशवृद्धी होऊ द्यावी. तर आता तुम्ही नव्हे तर देवाने मला येथे पाठवले; मला त्याने फारोच्या बापासमान करून त्याच्या सर्व घरादाराचा स्वामी व सर्व मिसर देशाचा शास्ता करून ठेवले आहे. तुम्ही त्वरा करून माझ्या बापाकडे जा आणि त्याला सांगा, तुमचा मुलगा योसेफ असे म्हणतो की, देवाने मला अवघ्या मिसर देशाचा सत्ताधीश केले आहे तर माझ्याकडे निघून या, विलंब करू नका; तुम्ही गोशेन प्रांतात वस्ती करून राहावे; तुम्ही, तुमची मुले, नातवंडे, शेरडेमेंढरे, गुरेढोरे व तुमचे सर्वकाही घेऊन माझ्याजवळ राहावे. कारण पाच वर्षे दुष्काळ पडायचा आहे, तर येथे मी तुमचे संगोपन करीन; अशाने तुम्ही, तुमच्या घरचे लोक व तुमचा सर्व परिवार दरिद्री होणार नाही. पाहा, मी योसेफ तुमच्याशी प्रत्यक्ष बोलत आहे हे तुमच्या डोळ्यांना आणि माझा भाऊ बन्यामीन ह्याच्या डोळ्यांना दिसतच आहे. मिसरातले माझे सर्व वैभव आणि तुम्ही डोळ्यांनी पाहिलेले सगळे माझ्या बापास जाऊन सांगा आणि त्वरा करा व माझ्या बापास इकडे घेऊन या.”