उत्पत्ती 42:9-38
उत्पत्ती 42:9-38 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग त्यांच्याविषयी जी स्वप्ने पडली होती त्यांचे योसेफाला स्मरण होऊन तो त्यांना म्हणाला, “तुम्ही हेर आहात, देशाची मर्मस्थाने पाहण्यासाठी तुम्ही आला आहात.” ते म्हणाले, “महाराज, नाही, आपले दास अन्नसामग्री खरेदी करायला आले आहेत. आम्ही सर्व एकाच पुरुषाचे मुलगे असून सरळ माणसे आहोत. आपले दास, हेर नव्हेत.” तो त्यांना म्हणाला, “नाही; तुम्ही देशाची मर्मस्थाने पाहण्यास आला आहात.” ते म्हणाले, “आम्ही आपले दास, बारा भाऊ असून, कनान देशातल्या एका पुरुषाचे मुलगे आहोत; सर्वांत धाकटा आजमितीस बापाजवळ आहे व एक नाहीसा झाला आहे.” मग योसेफ त्यांना म्हणाला, “तर मग मी तुम्हांला म्हटले तेच खरे आहे, तुम्ही हेरच आहात. आता तुमची कसोटी पाहतो; फारोच्या जीविताची शपथ, तुमचा धाकटा भाऊ येथे आल्याशिवाय तुमची सुटका होणार नाही. तुमच्यापैकी एकाला त्या भावाला आणायला पाठवा; तुम्ही येथे अटकेत राहा; म्हणजे जे तुम्ही म्हणता ते खरे आहे किंवा नाही ह्याची परीक्षा होईल; नाहीतर फारोच्या जीविताची शपथ, तुम्ही हेर ठराल.” मग त्याने त्यांना तीन दिवस एकत्र अटकेत ठेवले. योसेफ त्यांना तिसर्या दिवशी म्हणाला, “मी देवाचे भय बाळगणारा आहे, म्हणून हेच करा म्हणजे तुमचा जीव वाचेल; तुम्ही सरळ माणसे असाल तर तुम्हा भावांतल्या एकाला तुमच्या ह्या बंदिगृहात राहू द्या आणि तुमच्या घरच्यांची उपासमार निवारण्यासाठी तुम्ही धान्य घेऊन जा; आणि तुमच्या धाकट्या भावाला माझ्याकडे घेऊन या, म्हणजे तुमचे म्हणणे खरे ठरेल व तुमचे मरण टळेल.” त्यांनी तसे केले. मग ते एकमेकांना म्हणाले, “आपण आपल्या भावाच्या बाबतीत खरोखर अपराधी असता व आपण त्याचे दु:ख पाहिले असताही त्याचे ऐकले नाही म्हणून हे दु:ख आपल्यावर आले आहे.” रऊबेन त्यांना म्हणाला, “मुलाला काही अपाय करू नका असे मी तुम्हांला सांगितले नव्हते काय? पण तुम्ही माझे ऐकले नाही; पाहा, आता त्याच्या रक्ताचा बदला द्यावा लागत आहे.” योसेफाचे व त्यांचे भाषण दुभाष्यातर्फे चालले होते म्हणून आपण बोललो ते त्याला समजले असेल असे त्यांना वाटले नाही. तो त्यांच्यापासून एका बाजूला जाऊन रडला; मग परत येऊन तो त्यांच्याशी बोलू लागला; त्याने त्यांच्यातून शिमोनाला काढून त्यांच्यादेखत बांधले. मग योसेफाने आज्ञा दिली की, “त्यांच्या गोण्यांत धान्य भरा; प्रत्येकाचा पैसा ज्याच्या-त्याच्या गोणीत टाका, वाटेसाठी शिधासामग्री द्या.” आणि त्याप्रमाणे त्यांची व्यवस्था झाली. ते गाढवांवर धान्य लादून तेथून निघाले. त्यांच्यातल्या एकाने वाटेत उतारशाळेत आपल्या गाढवाला दाणा देण्यासाठी आपली गोणी उघडली, तेव्हा आपला पैसा गोणीच्या तोंडाशी असलेला त्याने पाहिला; आणि तो आपल्या भावांना म्हणाला, “माझा पैसा परत केला आहे; पाहा, हा माझ्या गोणीत आहे.” तेव्हा त्यांच्या काळजाने ठाव सोडला. ते थरथर कापत एकमेकांकडे वळून म्हणाले, “देवाने आपल्याला हे काय केले?” मग ते कनान देशात आपला बाप याकोब ह्याच्याकडे जाऊन पोहचले आणि आपला सर्व वृत्तान्त त्यांनी त्याला सांगितला तो असा : त्या देशाचा अधिपती आमच्याशी कठोरपणे बोलला व त्याने आम्हांला देश हेरणारे ठरवले. आम्ही त्याला म्हणालो, ‘आम्ही सरळ माणसे आहोत, आम्ही हेर नाही, आम्ही बारा भाऊ आमच्या बापाचे मुलगे आहोत, एक नाहीसा झाला आणि सर्वांत धाकटा आजमितीस कनान देशात आमच्या बापाजवळ आहे.’ ह्यावर तो मनुष्य म्हणजे देशाचा अधिपती आम्हांला म्हणाला, ‘तुम्ही सरळ माणसे आहात, अशी माझी खात्री होण्यास एवढे करा की, तुम्हा भावांतल्या एकाला माझ्याजवळ राहू द्या, आणि आपल्या घरच्यांची उपासमार निवारण्यासाठी तुम्ही धान्य घेऊन परत जा. तुम्ही आपल्या धाकट्या भावाला घेऊन या म्हणजे मला खात्री पटेल की तुम्ही हेर नाही, तर सरळ माणसे आहात; मग तुमचा भाऊ मी तुम्हांला परत देईन आणि तुम्हांला ह्या देशात येजा करता येईल.’ ते आपल्या गोण्या रिकाम्या करत असता प्रत्येकाची पैशाची थैली ज्याच्या-त्याच्या गोणीत आढळली; त्यांनी व त्यांच्या बापाने त्या पैशांच्या थैल्या पाहिल्या तेव्हा ते फार घाबरले. त्यांचा बाप याकोब त्यांना म्हणाला, “तुम्ही माझी व माझ्या मुलांची ताटातूट केली आहे; योसेफ नाहीसा झाला, शिमोन नाही आणि तुम्ही बन्यामिनालाही घेऊन जाऊ पाहता; माझ्यावर ही सर्व अरिष्टे आली आहेत.” मग रऊबेन आपल्या पित्याला म्हणाला, “मी जर त्याला तुमच्याकडे घेऊन आलो नाही तर माझे दोन मुलगे मारून टाका; त्याला माझ्या हवाली करा, मी त्याला परत तुमच्याकडे आणीन.” तो म्हणाला, “माझ्या मुलाला मी तुमच्याबरोबर पाठवणार नाही, कारण त्याचा भाऊ मेला आहे आणि तो एकटाच राहिला आहे; ज्या मार्गाने तुम्ही जात आहात त्यात त्याच्यावर काही अरिष्ट आले तर तुम्ही मला दु:खी करून हे माझे पिकलेले केस अधोलोकी उतरवायला कारण व्हाल.”
उत्पत्ती 42:9-38 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि मग योसेफाला आपल्या भावांविषयी पडलेली स्वप्ने आठवली. तो त्यांना म्हणाला, “तुम्ही हेर आहात. तुम्ही धान्य खरेदी करण्यास नव्हे तर आमच्या देशाचा कमजोर भाग हेरण्यास आला आहात.” परंतु त्याचे भाऊ म्हणाले, “आमचे धनी, तसे नाही. आम्ही आपले दास अन्नधान्य विकत घ्यावयास आलो आहोत. आम्ही सर्व भाऊ एका पुरुषाचे पुत्र आहोत. आम्ही प्रामाणिक माणसे आहोत. आम्ही तुमचे दास हेर नाही.” नंतर तो त्यांना म्हणाला, “नाही, तुम्ही आमच्या देशाचा कमकुवत भाग पाहण्यास आलेले आहात.” ते म्हणाले, “आम्ही तुमचे दास, बारा भाऊ, कनान देशातील एकाच मनुष्याचे बारा पुत्र आहोत. पाहा, आमचा सर्वांत धाकटा भाऊ घरी बापाजवळ आहे आणि आमच्यातला एक जिवंत नाही.” परंतु योसेफ त्यांना म्हणाला, “मी तुम्हास म्हणालो तसेच आहे; तुम्ही हेरच आहात. यावरुन तुमची पारख होईल. फारोच्या जीविताची शपथ, तुमचा धाकटा भाऊ येथे आल्याशिवाय तुम्हास येथून जाता येणार नाही. तुमच्यातील एकाने मागे घरी जाऊन तुमच्या धाकट्या भावाला येथे घेऊन यावे, आणि तोपर्यंत तुम्ही येथे तुरुंगात रहावे. मग तुम्ही कितपत खरे बोलता हे आम्हांला कळेल. नाही तर फारोच्या जिवीताची शपथ खात्रीने तुम्ही हेर आहात.” मग त्याने त्या सर्वांना तीन दिवस तुरुंगात अटकेत ठेवले. तीन दिवसानंतर योसेफ त्यांना म्हणाला, “मी देवाला भितो, म्हणून मी सांगतो तसे करा आणि जिवंत राहा. तुम्ही जर खरेच प्रामाणिक असाल तर मग तुम्हातील एका भावाला येथे तुरुंगात ठेवा व बाकीचे तुम्ही तुमच्या घरच्या मनुष्यांकरिता धान्य घेऊन जा. मग तुमच्या धाकट्या भावाला येथे माझ्याकडे घेऊन या. यावरुन तुम्ही माझ्याशी खरे बोलता किंवा नाही याची मला खात्री पटेल आणि तुम्हास मरावे लागणार नाही.” तेव्हा त्यांनी तसे केले. ते एकमेकांना म्हणाले, “खरोखर आपण आपल्या भावाविषयी अपराधी आहोत. कारण आपण त्याच्या जिवाचे दुःख पाहिले तेव्हा त्याने काकुळतीने रडून आपणास विनंती केली, परंतु आपण त्याचे ऐकले नाही. त्यामुळेच आता आपणांस हे भोगावे लागत आहे.” मग रऊबेन त्यांना म्हणाला, “मी तुम्हास म्हणत नव्हतो का की, ‘मुलाविरूद्ध पाप करू नका,’ परंतु तुम्ही ते ऐकले नाही. आता पाहा, त्याचे रक्त तुमच्यापासून मागितले जात आहे.” योसेफ दुर्भाष्यामार्फत आपल्या भावांशी बोलत असल्यामुळे, योसेफाला आपल्या भाषेतील बोलणे कळत असेल असे त्यांना वाटले नाही. म्हणून तो त्यांच्यापासून बाजूला जाऊन रडला. थोड्या वेळाने तो परत त्यांच्याकडे आला आणि त्यांच्याशी बोलला. त्याने शिमोनाला त्यांच्यातून काढून घेतले आणि त्यांच्या नजरेसमोरच त्यास बांधले. मग आपल्या भावांच्या पोत्यात धान्य भरण्यास सांगितले, तसेच त्या धान्याबद्दल त्याच्या भावांनी दिलेला पैसा ज्याच्या त्याच्या पोत्यात भरण्यास सांगितले, आणि त्यांच्या परतीच्या प्रवासात वाटेत खाण्यासाठी अन्नसामग्री देण्यास सेवकांना सांगतिले. त्यांच्यासाठी तसे करण्यात आले. तेव्हा त्या भावांनी ते धान्य आपापल्या गाढवावर लादले व तेथून ते माघारी जाण्यास निघाले. ते भाऊ रात्रीच्या मुक्कामासाठी एका ठिकाणी थांबले. तेव्हा त्यांच्यापैकी एकाने त्याच्या गाढवाला थोडेसे धान्य देण्यासाठी आपली गोणी उघडली, तेव्हा त्याने धान्यासाठी दिलेले पैसे त्यास त्या गोणीत आढळले. तेव्हा तो आपल्या इतर भावांना म्हणाला, “पाहा! धान्यासाठी मी दिलेले हे पैसे कोणीतरी पुन्हा माझ्या गोणीत ठेवले आहेत!” तेव्हा ते भाऊ अतिशय घाबरले, ते एकमेकांस म्हणाले, “देव आपल्याला काय करत आहे.” ते भाऊ कनान देशास आपला बाप याकोब याजकडे गेले आणि त्यांनी घडलेल्या सर्व गोष्टी त्यास सांगितल्या. ते म्हणाले, “त्या देशाचा अधिकारी आमच्याशी कठोरपणाने बोलला. आम्ही हेर आहोत असे त्यास वाटले. परंतु आम्ही हेर नसून प्रामाणिक माणसे आहोत असे त्यास सांगितले. आम्ही त्यास सांगितले की, ‘आम्ही बारा भाऊ एका मनुष्याचे पुत्र आहोत. आमच्यातला एक जिवंत नाही, आणि तसेच धाकटा भाऊ कनान देशात आज आमच्या पित्याजवळ असतो.’ तेव्हा त्या देशाचा अधिकारी आम्हांला म्हणाला, ‘तुम्ही प्रामाणिक लोक आहात हे पटवून देण्याचा एक मार्ग आहे. तो असा की तुम्हातील एका भावास येथे माझ्यापाशी ठेवा. तुम्ही तुमच्या कुटुंबातील मनुष्यांसाठी धान्य घेऊन जा. आणि नंतर तुम्ही तुमच्या धाकट्या भावाला येथे माझ्याकडे घेऊन या. मग तुम्ही खरेच प्रामाणिक माणसे आहात हे मला पटेल. तुम्ही जर खरे बोलत असाल तर मग मी तुमचा भाऊ परत तुमच्या हवाली करीन आणि तुम्ही देशात व्यापार कराल.’” मग ते भाऊ आपापल्या पोत्यातून धान्य काढावयास गेले. तेव्हा प्रत्येकाच्या पोत्यात पैशाची पिशवी मिळाली. त्या पैशाच्या पिशव्या पाहून ते भाऊ व त्यांचा बाप हे अतिशय घाबरले. याकोब त्यांना म्हणाला, “मी माझ्या सर्व मुलांना मुकावे अशी तुमची इच्छा आहे काय? योसेफ नाही. शिमोनही गेला. आणि आता बन्यामिनालाही माझ्यापासून घेऊन जाण्याची तुमची इच्छा आहे.” मग रऊबेन आपल्या पित्यास म्हणाला, “मी जर बन्यामिनाला मागे आणले नाही तर माझे दोन पुत्र तुम्ही मारून टाका. माझ्यावर विश्वास ठेवा. मी खरोखर बन्यामिनाला परत तुमच्याकडे घेऊन येईन.” परंतु याकोब म्हणाला, “मी बन्यामिनाला तुमच्याबरोबर पाठविणार नाही. त्याचा भाऊ मरण पावला आणि तो एकटाच राहिला आहे. ज्या वाटेने तुम्ही जाता तेथे त्यास काही अपाय झाला तर माझे पिकलेले केस अतिशय दुःखाने कबरेत पाठवाल.”
उत्पत्ती 42:9-38 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
यावेळी योसेफाला आपल्याला पूर्वी पडलेल्या स्वप्नांची आठवण झाली, आणि त्यांना म्हणाला, “तुम्ही हेर आहात! आणि आमचा देश कुठे असुरक्षित आहे हे पाहण्यासाठी आला आहात.” ते म्हणाले, “नाही, नाही महाराज, आपले सेवक फक्त धान्य खरेदीसाठी आले आहेत. आम्ही भाऊ एकाच पित्याचे पुत्र आहोत, तुमचे सेवक प्रामाणिक पुरुष आहेत, आम्ही हेर नाही.” “नाही,” तो त्यांना म्हणाला, “आमचा देश कुठे असुरक्षित आहे हे पाहण्यासाठीच तुम्ही आला आहात.” परंतु ते म्हणाले, “महाराज, आपले हे सेवक बारा भाऊ आहेत; एकाच पित्याचे पुत्र आहोत, जे कनान देशात आहेत; आमचा धाकटा भाऊ आमच्या पित्यासोबत आहे आणि आमचा एक भाऊ आता जीवित नाही.” योसेफ म्हणाला, “म्हणूनच मी म्हणतो: तुम्ही हेर आहात! आणि अशा प्रकारे तुम्हाला पडताळून पाहू: फारोहच्या जिवाची शपथ, तुमचा धाकटा भाऊ इकडे येईपर्यंत तुम्हाला येथून जाता येणार नाही. तुमच्यापैकी एकाला भावास आणण्यास पाठवा; तोपर्यंत बाकीच्यांना तुरुंगात ठेवण्यात येईल, म्हणजे तुम्ही सत्य बोललात ते कळून येईल. जर नाही तर फारोहची शपथ तुम्ही हेर आहात!” आणि त्याने त्या सर्वांना तीन दिवस तुरुंगात ठेवले. तिसर्या दिवशी योसेफ त्यांना म्हणाला, “जर जीवित राहवयाचे असेल तर तुम्ही हे करा, कारण मी परमेश्वराचे भय धरणारा आहे. तुम्ही प्रामाणिक लोक आहात तर तुमच्या एका भावाला तुरुंगात राहू द्या, बाकीच्यांना कुटुंबीयांची उपासमार निवारण्यासाठी धान्य घेऊन जाऊ द्या. परंतु तुम्ही तुमच्या धाकट्या भावाला माझ्याकडे घेऊन या. अशा रीतीने तुमचे शब्द खरे होतील आणि तुमचा मृत्यू टळेल.” मग त्यांनी तेच केले. ते एकमेकांना म्हणाले, “आम्ही आमच्या भावाविषयी दोषी आहोत. जेव्हा त्याने आपल्या जिवाची विनवणी केली तेव्हा तो किती व्यथित होता हे आम्ही पाहिले, पण आम्ही ऐकले नाही; त्यामुळेच हे संकट आमच्यावर आले आहे.” रऊबेन म्हणाला, “त्या मुलाविरुद्ध असे पाप करू नका, हे मी तुम्हाला सांगत नव्हतो का? पण तुम्ही माझे ऐकले नाही! आम्हाला त्याच्या रक्तपाताचा हिशोब द्यावा लागेल.” योसेफाला आपले बोलणे समजत असेल असे त्यांना वाटले नाही, कारण तो दुभाषी वापरत होता. तो तिथून बाहेर पडला व रडू लागला, थोड्या वेळाने तो परत आला आणि त्याने शिमओनाची निवड करून त्याला त्यांच्या डोळ्यांसमक्ष बांधून घेतले. नंतर योसेफाने आपल्या नोकरांना त्यांची पोती धान्याने भरण्यास सांगितले; पण त्याचवेळी त्याने प्रत्येक भावाने दिलेले पैसे ज्याच्या त्याच्या पोत्यात ठेवून द्यावे अशी सूचना दिली. त्याने आपल्या भावांना प्रवासासाठी अन्नसामुग्री देण्याचा आदेश दिला. शेवटी त्यांनी धान्याची पोती गाढवांवर लादली आणि ते घरी जाण्यास निघाले. परंतु ते रात्रीच्या मुक्कामासाठी थांबले असताना त्यांच्यापैकी एकाने गाढवांना देण्यासाठी थोडे धान्य काढले. धान्य काढीत असताना आपले पैसे पोत्याच्या तोंडाशी असलेले त्याला दिसले. तो आपल्या भावांना म्हणाला, “अरे हे काय? माझे पैसे माझ्या पोत्यातच आहेत!” ते सर्वजण भयभीत झाले. भयाने थरथर कापत ते एकमेकास म्हणाले, “परमेश्वराने आपल्याशी हे काय केले?” कनान देशात ते आपले पिता याकोबाकडे आले आणि इजिप्तमध्ये जे काही घडले त्याची सर्व हकिकत त्यांनी त्याला सांगितली. ते म्हणाले, “त्या देशाचा अधिकारी आमच्याशी अत्यंत कठोरतेने बोलला, त्याने आम्हाला हेर असल्यासारखे वागविले.” आम्ही त्याला म्हटले, “आम्ही हेर नाहीत; आम्ही प्रामाणिक माणसे आहोत. आम्ही बारा भाऊ असून एकाच पित्याचे पुत्र आहोत. आमचा एक भाऊ मरण पावला आहे, आणि धाकटा भाऊ कनान देशामध्ये आमच्याच पित्याजवळ राहिला आहे.” तेव्हा त्या देशाचा अधिपती आम्हाला म्हणाला, “तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही प्रामाणिक माणसे आहात की नाही, याची खात्री करून घेण्यासाठी मी असे ठरविले आहे: तुमच्यापैकी एका भावाला येथे तुरुंगात ठेवावे; बाकीच्यांनी तुमच्या कुटुंबीयांसाठी धान्य घेऊन घरी जावे. पण तुमच्या धाकट्या भावाला माझ्याकडे घेऊन या; मगच तुम्ही हेर नाहीत, तर प्रामाणिक माणसे आहात हे मला समजेल. तर मी तुमचा भाऊ तुम्हाला परत देईन व तुम्ही या देशात व्यापार करू शकाल.” त्यांनी त्यांची धान्याची पोती रिकामी केली तो, प्रत्येकाच्या पोत्याच्या तोंडाशी त्यांनी दिलेले पैसे होते असे त्यांना दिसून आले! भयाने त्यांचा व त्यांच्या वडिलांचाही थरकाप उडाला. मग याकोब त्यांना म्हणाला, “तुम्ही माझ्या मुलांना हिरावून घेतले आहे. योसेफ राहिला नाही, शिमओन गेला; आता तुम्ही बिन्यामीनालाही नेणार; सर्वकाही माझ्या विरुद्धच घडत आहे.” तेव्हा रऊबेन आपल्या वडिलांस म्हणाला, “मी बिन्यामीनाला तुमच्याकडे परत आणले नाही तर तुम्ही माझ्या दोन मुलांना मारून टाका; बिन्यामीनाला माझ्या हवाली करा, मी त्याला परत तुमच्याकडे आणेन.” पण याकोबाने उत्तर दिले, “माझा मुलगा तुमच्याबरोबर तिथे जाणार नाही; त्याचा भाऊ योसेफ मरण पावला आणि आता तो एकटाच राहिला आहे; त्याला काही कमीजास्त झाले तर या म्हातारपणात दुःखाने माझा प्राण जाईल!”