उत्पत्ती 42:14-20
उत्पत्ती 42:14-20 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परंतु योसेफ त्यांना म्हणाला, “मी तुम्हास म्हणालो तसेच आहे; तुम्ही हेरच आहात. यावरुन तुमची पारख होईल. फारोच्या जीविताची शपथ, तुमचा धाकटा भाऊ येथे आल्याशिवाय तुम्हास येथून जाता येणार नाही. तुमच्यातील एकाने मागे घरी जाऊन तुमच्या धाकट्या भावाला येथे घेऊन यावे, आणि तोपर्यंत तुम्ही येथे तुरुंगात रहावे. मग तुम्ही कितपत खरे बोलता हे आम्हांला कळेल. नाही तर फारोच्या जिवीताची शपथ खात्रीने तुम्ही हेर आहात.” मग त्याने त्या सर्वांना तीन दिवस तुरुंगात अटकेत ठेवले. तीन दिवसानंतर योसेफ त्यांना म्हणाला, “मी देवाला भितो, म्हणून मी सांगतो तसे करा आणि जिवंत राहा. तुम्ही जर खरेच प्रामाणिक असाल तर मग तुम्हातील एका भावाला येथे तुरुंगात ठेवा व बाकीचे तुम्ही तुमच्या घरच्या मनुष्यांकरिता धान्य घेऊन जा. मग तुमच्या धाकट्या भावाला येथे माझ्याकडे घेऊन या. यावरुन तुम्ही माझ्याशी खरे बोलता किंवा नाही याची मला खात्री पटेल आणि तुम्हास मरावे लागणार नाही.” तेव्हा त्यांनी तसे केले.
उत्पत्ती 42:14-20 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग योसेफ त्यांना म्हणाला, “तर मग मी तुम्हांला म्हटले तेच खरे आहे, तुम्ही हेरच आहात. आता तुमची कसोटी पाहतो; फारोच्या जीविताची शपथ, तुमचा धाकटा भाऊ येथे आल्याशिवाय तुमची सुटका होणार नाही. तुमच्यापैकी एकाला त्या भावाला आणायला पाठवा; तुम्ही येथे अटकेत राहा; म्हणजे जे तुम्ही म्हणता ते खरे आहे किंवा नाही ह्याची परीक्षा होईल; नाहीतर फारोच्या जीविताची शपथ, तुम्ही हेर ठराल.” मग त्याने त्यांना तीन दिवस एकत्र अटकेत ठेवले. योसेफ त्यांना तिसर्या दिवशी म्हणाला, “मी देवाचे भय बाळगणारा आहे, म्हणून हेच करा म्हणजे तुमचा जीव वाचेल; तुम्ही सरळ माणसे असाल तर तुम्हा भावांतल्या एकाला तुमच्या ह्या बंदिगृहात राहू द्या आणि तुमच्या घरच्यांची उपासमार निवारण्यासाठी तुम्ही धान्य घेऊन जा; आणि तुमच्या धाकट्या भावाला माझ्याकडे घेऊन या, म्हणजे तुमचे म्हणणे खरे ठरेल व तुमचे मरण टळेल.” त्यांनी तसे केले.