YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 42:1-17

उत्पत्ती 42:1-17 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

याकोबाने ऐकले की, मिसर देशात धान्य आहे; तेव्हा तो आपल्या मुलांना म्हणाला, “तुम्ही एकमेकांच्या तोंडाकडे का पाहत राहिला आहात?” मग तो म्हणाला, “पाहा, मिसरात धान्य आहे असे मी ऐकतो; तुम्ही तेथे जाऊन आपल्यासाठी धान्य विकत आणा, म्हणजे आपण जगू, मरणार नाही.” मग योसेफाचे दहा भाऊ धान्य खरेदी करण्यासाठी खाली मिसर देशात गेले. तथापि योसेफाचा भाऊ बन्यामीन ह्याला याकोबाने त्याच्या भावांबरोबर पाठवले नाही; “कारण” तो म्हणाला, “कदाचित त्याला एखादा अपाय व्हायचा.” ह्याप्रमाणे इस्राएलाचे मुलगे इतर लोकांबरोबर धान्य खरेदी करण्यास आले; कारण कनान देशात दुष्काळ पडला होता. योसेफ त्या देशाचा मुख्य अधिकारी होता, आणि देशातल्या सर्व लोकांना तोच धान्य विकत असे. योसेफाच्या भावांनी येऊन जमिनीपर्यंत लवून त्याला मुजरा केला. योसेफाने आपल्या भावांना पाहताच ओळखले, तथापि त्यांच्याशी अनोळख्यासारखे वागून त्याने कठोरपणाने त्यांना विचारले की, “तुम्ही कोठून आलात?” त्यांनी म्हटले, “कनान देशातून धान्य खरेदी करायला आम्ही आलो आहोत.” योसेफाने आपल्या भावांना ओळखले, पण त्यांनी त्याला ओळखले नाही. मग त्यांच्याविषयी जी स्वप्ने पडली होती त्यांचे योसेफाला स्मरण होऊन तो त्यांना म्हणाला, “तुम्ही हेर आहात, देशाची मर्मस्थाने पाहण्यासाठी तुम्ही आला आहात.” ते म्हणाले, “महाराज, नाही, आपले दास अन्नसामग्री खरेदी करायला आले आहेत. आम्ही सर्व एकाच पुरुषाचे मुलगे असून सरळ माणसे आहोत. आपले दास, हेर नव्हेत.” तो त्यांना म्हणाला, “नाही; तुम्ही देशाची मर्मस्थाने पाहण्यास आला आहात.” ते म्हणाले, “आम्ही आपले दास, बारा भाऊ असून, कनान देशातल्या एका पुरुषाचे मुलगे आहोत; सर्वांत धाकटा आजमितीस बापाजवळ आहे व एक नाहीसा झाला आहे.” मग योसेफ त्यांना म्हणाला, “तर मग मी तुम्हांला म्हटले तेच खरे आहे, तुम्ही हेरच आहात. आता तुमची कसोटी पाहतो; फारोच्या जीविताची शपथ, तुमचा धाकटा भाऊ येथे आल्याशिवाय तुमची सुटका होणार नाही. तुमच्यापैकी एकाला त्या भावाला आणायला पाठवा; तुम्ही येथे अटकेत राहा; म्हणजे जे तुम्ही म्हणता ते खरे आहे किंवा नाही ह्याची परीक्षा होईल; नाहीतर फारोच्या जीविताची शपथ, तुम्ही हेर ठराल.” मग त्याने त्यांना तीन दिवस एकत्र अटकेत ठेवले.

सामायिक करा
उत्पत्ती 42 वाचा

उत्पत्ती 42:1-17 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

मिसरमध्ये धान्य असल्याचे याकोबाला समजले. तेव्हा याकोब आपल्या मुलांना म्हणाला, “तुम्ही एकमेकांकडे असे का बघत बसलात?” “इकडे पाहा, मिसर देशात धान्य आहे असे मी ऐकले आहे. तुम्ही खाली जाऊन आपणासाठी तिकडून धान्य विकत आणा म्हणजे आपण जगू, मरणार नाही.” तेव्हा योसेफाचे दहा भाऊ धान्य विकत घेण्यासाठी मिसरला गेले. याकोबाने, योसेफाचा भाऊ बन्यामीन याला त्याच्या भावाबरोबर पाठवले नाही, कारण तो म्हणाला, “कदाचित त्यास काही अपाय होईल.” कनान देशात फारच तीव्र दुष्काळ पडला होता, पुष्कळ लोक धान्य विकत घ्यावयास मिसराला गेले त्या लोकात इस्राएलाचे पुत्रही होते. त्या वेळी योसेफ मिसरचा अधिपती होता. तो देशातल्या सर्व लोकांस धान्य विकत असे. योसेफाचे भाऊ त्याच्याकडे आले आणि त्यांनी आपली तोंडे भूमीकडे करून खाली वाकून नमन केले. योसेफाने आपल्या भावांना पाहिल्याबरोबर ओळखले, परंतु ते कोण आहेत हे माहीत नसल्यासारखे दाखवून तो त्यांच्याशी कठोरपणाने बोलला. त्याने त्यांना विचारले, “तुम्ही कोठून आला?” त्याच्या भावांनी उत्तर दिले, “महाराज, आम्ही कनान देशातून धान्य विकत घेण्यासाठी आलो आहो.” योसेफाने आपल्या भावांना ओळखले, परंतु त्यांनी त्यास ओळखले नाही. आणि मग योसेफाला आपल्या भावांविषयी पडलेली स्वप्ने आठवली. तो त्यांना म्हणाला, “तुम्ही हेर आहात. तुम्ही धान्य खरेदी करण्यास नव्हे तर आमच्या देशाचा कमजोर भाग हेरण्यास आला आहात.” परंतु त्याचे भाऊ म्हणाले, “आमचे धनी, तसे नाही. आम्ही आपले दास अन्नधान्य विकत घ्यावयास आलो आहोत. आम्ही सर्व भाऊ एका पुरुषाचे पुत्र आहोत. आम्ही प्रामाणिक माणसे आहोत. आम्ही तुमचे दास हेर नाही.” नंतर तो त्यांना म्हणाला, “नाही, तुम्ही आमच्या देशाचा कमकुवत भाग पाहण्यास आलेले आहात.” ते म्हणाले, “आम्ही तुमचे दास, बारा भाऊ, कनान देशातील एकाच मनुष्याचे बारा पुत्र आहोत. पाहा, आमचा सर्वांत धाकटा भाऊ घरी बापाजवळ आहे आणि आमच्यातला एक जिवंत नाही.” परंतु योसेफ त्यांना म्हणाला, “मी तुम्हास म्हणालो तसेच आहे; तुम्ही हेरच आहात. यावरुन तुमची पारख होईल. फारोच्या जीविताची शपथ, तुमचा धाकटा भाऊ येथे आल्याशिवाय तुम्हास येथून जाता येणार नाही. तुमच्यातील एकाने मागे घरी जाऊन तुमच्या धाकट्या भावाला येथे घेऊन यावे, आणि तोपर्यंत तुम्ही येथे तुरुंगात रहावे. मग तुम्ही कितपत खरे बोलता हे आम्हांला कळेल. नाही तर फारोच्या जिवीताची शपथ खात्रीने तुम्ही हेर आहात.” मग त्याने त्या सर्वांना तीन दिवस तुरुंगात अटकेत ठेवले.

सामायिक करा
उत्पत्ती 42 वाचा

उत्पत्ती 42:1-17 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

इजिप्त देशामध्ये धान्य मिळते, हे जेव्हा याकोबाच्या कानी गेले, तेव्हा तो आपल्या पुत्रांना म्हणाला, “एकमेकांच्या तोंडाकडे नुसते पाहत का उभे राहिलात?” मग त्याने पुढे म्हटले, “इजिप्तमध्ये धान्य मिळत आहे, असे मी ऐकले आहे. तुम्ही तिथे जा आणि आपल्यासाठी थोडे धान्य विकत घेऊन या, म्हणजे आपण जगू, मरणार नाही.” मग योसेफाचे दहा भाऊ, धान्य विकत घेण्यासाठी इजिप्तमध्ये गेले. परंतु याकोबाने योसेफाचा भाऊ बिन्यामीन याला, त्यांच्याबरोबर पाठविले नाही, कारण त्याला काही अपाय होईल अशी त्याला भीती वाटत होती. अशा रीतीने इस्राएलचे पुत्र इतर लोकांबरोबर इजिप्तमध्ये धान्य खरेदीसाठी आले, कारण दुष्काळ कनान देशातही पडला होता. योसेफ हा इजिप्त देशाचा अधिकारी असल्यामुळे तो सर्व लोकांना धान्यविक्री करीत असे. जेव्हा त्याचे भाऊ तिथे आले, त्यांनी त्याच्यापुढे जमिनीपर्यंत लवून त्याला मुजरा केला. योसेफाने त्यांना बघताच ओळखले तरी अपरिचितासारखे वागून दरडावून विचारले, “तुम्ही कुठून आला आहात?” त्यांनी त्याला उत्तर दिले, “कनान देशाहून आम्ही धान्य विकत घेण्यासाठी आलो आहोत.” योसेफाने तर त्याच्या भावांना ओळखले, पण त्या भावांनी त्याला ओळखले नाही. यावेळी योसेफाला आपल्याला पूर्वी पडलेल्या स्वप्नांची आठवण झाली, आणि त्यांना म्हणाला, “तुम्ही हेर आहात! आणि आमचा देश कुठे असुरक्षित आहे हे पाहण्यासाठी आला आहात.” ते म्हणाले, “नाही, नाही महाराज, आपले सेवक फक्त धान्य खरेदीसाठी आले आहेत. आम्ही भाऊ एकाच पित्याचे पुत्र आहोत, तुमचे सेवक प्रामाणिक पुरुष आहेत, आम्ही हेर नाही.” “नाही,” तो त्यांना म्हणाला, “आमचा देश कुठे असुरक्षित आहे हे पाहण्यासाठीच तुम्ही आला आहात.” परंतु ते म्हणाले, “महाराज, आपले हे सेवक बारा भाऊ आहेत; एकाच पित्याचे पुत्र आहोत, जे कनान देशात आहेत; आमचा धाकटा भाऊ आमच्या पित्यासोबत आहे आणि आमचा एक भाऊ आता जीवित नाही.” योसेफ म्हणाला, “म्हणूनच मी म्हणतो: तुम्ही हेर आहात! आणि अशा प्रकारे तुम्हाला पडताळून पाहू: फारोहच्या जिवाची शपथ, तुमचा धाकटा भाऊ इकडे येईपर्यंत तुम्हाला येथून जाता येणार नाही. तुमच्यापैकी एकाला भावास आणण्यास पाठवा; तोपर्यंत बाकीच्यांना तुरुंगात ठेवण्यात येईल, म्हणजे तुम्ही सत्य बोललात ते कळून येईल. जर नाही तर फारोहची शपथ तुम्ही हेर आहात!” आणि त्याने त्या सर्वांना तीन दिवस तुरुंगात ठेवले.

सामायिक करा
उत्पत्ती 42 वाचा