उत्पत्ती 39:6-15
उत्पत्ती 39:6-15 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
त्याने आपले सर्वकाही योसेफाच्या हवाली केले होते, म्हणून तो अन्न खाई त्यापलीकडे आपले काय आहे ह्याचे त्याला भान नसे. योसेफ हा बांधेसूद व देखणा होता. त्यानंतर असे झाले की, योसेफाच्या धन्याची पत्नी त्याच्यावर नजर ठेवून त्याला म्हणाली, “माझ्यापाशी नीज.” पण तो राजी झाला नाही. तो आपल्या धन्याच्या पत्नीस म्हणाला, “हे पाहा, घरात माझ्या ताब्यात काय आहे ह्याचे माझ्या धन्याला भानसुद्धा नाही; आपले सर्वकाही त्याने माझ्या हाती दिले आहे. ह्या घरात माझ्यापेक्षा ते मोठे नाहीत; आणि तुम्ही त्यांची पत्नी आहात म्हणून तुमच्याखेरीज त्यांनी माझ्यापासून काही दूर ठेवलेले नाही, असे असता एवढी मोठी वाईट गोष्ट करून मी देवाच्या विरुद्ध पाप कसे करू?” तरी ती रोज रोज योसेफाशी बोलत असताही तिच्यापाशी निजायला किंवा तिच्याजवळ जायला तो तिचे ऐकेना. एके दिवशी असे झाले की तो आपले काही कामकाज करायला घरात गेला, त्या वेळी घरातल्या माणसांपैकी कोणीही माणूस तेथे घरात नव्हता. तेव्हा तिने त्याचे वस्त्र धरून म्हटले, “माझ्यापाशी नीज.” पण तो आपले वस्त्र तिच्या हाती सोडून बाहेर पळून गेला. ते वस्त्र आपल्या हाती सोडून तो बाहेर पळाला असे तिने पाहिले, तेव्हा तिने घरातल्या माणसांना बोलावून सांगितले, “पाहा, आमची अब्रू घेण्यासाठी त्यांनी हा इब्री मनुष्य घरात आणला आहे; तो माझ्यापाशी निजण्याच्या हेतूने माझ्याजवळ आला तेव्हा मी मोठ्याने ओरडले. मी मोठ्याने ओरडले हे पाहून तो आपले वस्त्र माझ्याजवळ टाकून बाहेर पळून गेला.”
उत्पत्ती 39:6-15 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पोटीफराने आपल्या घरादाराचा सर्व कारभार योसेफाच्या हवाली केला. तो जे अन्न खात असे, त्या पलीकडे कशाचाही तो विचार करत नव्हता. योसेफ फार देखणा व आकर्षक होता. काही काळानंतर त्याच्या धन्याच्या पत्नीला योसेफाविषयी वासना निर्माण झाली. ती म्हणाली, “माझ्याबरोबर प्रेम कर.” परंतु त्याने नकार दिला. तो त्याच्या धन्याच्या पत्नीला म्हणाला, “पाहा, घरात मी काय करतो याकडे माझा धनी लक्ष देत नाही आणि जे काही त्याचे आहे ते सर्व त्याने माझ्या ताब्यात सोपवले आहे. या घरात माझ्यापेक्षा कोणीही मोठा नाही. तू त्याची पत्नी आहेस म्हणून तुझ्यावाचून त्याने माझ्यापासून काहीही राखून ठेवले नाही. असे असताना, देवाच्याविरूद्ध हे घोर पाप व मोठी दुष्टाई मी कशी करू?” ती दररोज योसेफाबरोबर तेच बोलत असे, परंतु त्याने तिच्याबरोबर निजण्यास व प्रेम करण्यास नकार दिला. एके दिवशी योसेफ आपले काही काम करण्याकरता आतल्या घरात गेला. तो तेथे अगदी एकटाच होता व घरात दुसरे कोणीही नव्हते. तिने त्याचे वस्त्र धरून त्यास म्हटले “तू माझ्यापाशी नीज.” परंतु तो ते वस्त्र तिच्या हातात सोडून आतल्या घरातून बाहेर पळून गेला. तेव्हा तो त्याचे वस्त्र आपल्या हाती सोडून आणि बाहेर पळून गेला हे तिने पाहिले. आणि तिने हाक मारून तिच्या घरातील मनुष्यांना बोलावले. आणि ती म्हणाली, “पाहा, पोटीफराने या इब्र्याला आमच्या घरच्या मनुष्यांची अब्रू घेण्यासाठी आणून ठेवले आहे. त्याने आत येऊन माझ्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. परंतु मी मोठ्याने ओरडले. मी मोठ्याने ओरडले त्यामुळे त्याचे वस्त्र माइयापाशी टाकून तो पळाला आणि बाहेर गेला.”