उत्पत्ती 37:5-11
उत्पत्ती 37:5-11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
योसेफास एक स्वप्न पडले. त्याने ते स्वप्न आपल्या भावांना सांगितले. त्यानंतर तर त्याचे भाऊ त्याचा अधिकच द्वेष करू लागले. तो त्यांना म्हणाला, “मला पडलेले स्वप्न कृपा करून ऐका: पाहा, आपण सर्वजण शेतात गव्हाच्या पेंढ्या बांधण्याचे काम करीत होतो, तेव्हा माझी पेंढी उठून उभी राहिली आणि तुम्हा सर्वांच्या पेंढ्या तिच्या भोवती गोलाकार उभ्या राहिल्या व त्यांनी माझ्या पेंढीला खाली वाकून नमन केले.” हे ऐकून त्याचे भाऊ त्यास म्हणाले, “तू आमचा राजा होऊन आमच्यावर राज्य करणार काय? आणि खरोखर तू आम्हावर अधिकार करशील काय?” त्याच्या या स्वप्नामुळे व त्याच्या बोलण्यामुळे तर त्याचे भाऊ त्याचा अधिकच द्वेष करू लागले. नंतर योसेफाला आणखी एक स्वप्न पडले. तेही त्याने आपल्या भावांना सांगितले. तो म्हणाला, “पाहा, मला आणखी एक स्वप्न पडले: सूर्य, चंद्र व अकरा तारे यांनी मला खाली वाकून नमन केले.” त्याने आपल्या पित्यासही या स्वप्नाविषयी सांगितले. परंतु त्याच्या वडिलाने त्यास दोष देऊन म्हटले, “असले कसले हे स्वप्न आहे? तुझी आई, तुझे भाऊ व मी आम्ही भूमीपर्यंत लवून तुला नमन करू काय?” योसेफाचे भाऊ त्याचा हेवा करीत राहिले. परंतु त्याच्या वडिलाने ही गोष्ट आपल्या मनात ठेवली.
उत्पत्ती 37:5-11 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
योसेफाला एक स्वप्न पडले, ते त्याने त्यांना सांगितले तेव्हा तर ते त्याचा अधिकच द्वेष करू लागले. तो त्यांना म्हणाला, “मला पडलेले स्वप्न ऐका : पाहा, आपण शेतात पेंढ्या बांधत होतो तेव्हा माझी पेंढी उठून उभी राहिली; तेव्हा तुमच्या पेंढ्या माझ्या पेंढीसभोवती येऊन उभ्या राहिल्या व त्यांनी तिला नमन केले.” हे ऐकून त्याचे भाऊ त्याला म्हणाले, “काय, तू आमच्यावर राज्य करणार? तू आमच्यावर सत्ता चालवणार?” आणि त्याच्या स्वप्नांमुळे व भाषणामुळे तर ते त्याचा अधिकच द्वेष करू लागले. पुढे त्याला आणखी एक स्वप्न पडले, तेही त्याने आपल्या भावांना सांगितले, तो म्हणाला, “पाहा, मला आणखी एक स्वप्न पडले, ते असे की, सूर्य, चंद्र व अकरा तारे ह्यांनी मला नमन केले.” त्याने हे स्वप्न आपल्या बापाला व भावांना सांगितले. तेव्हा त्याचा बाप त्याला धमकावून म्हणाला, “हे कसले स्वप्न तुला पडले? काय, मी, तुझी आई व तुझे भाऊ हे भूमीपर्यंत लवून तुला नमन करण्यासाठी तुझ्यापुढे येणार?” त्याचे भाऊ त्याचा हेवा करू लागले, पण त्याचे म्हणणे बापाने मनात ठेवले. योसेफाला मिसर देशात विकून टाकतात