YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 37:26-36

उत्पत्ती 37:26-36 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

तेव्हा यहूदा आपल्या भावांना म्हणाला, “आपण आपल्या भावाला ठार मारून त्याचा खून लपवला तर काय लाभ? चला, आपण त्याला ह्या इश्माएली लोकांना विकून टाकू; आपण त्याच्यावर हात टाकू नये; कारण तो आपला भाऊ आहे, आपल्या हाडामांसाचा आहे.” हे त्याच्या भावांना पसंत पडले. ते मिद्यानी व्यापारी जवळून चालले तेव्हा त्यांनी योसेफाला त्या खड्ड्यातून ओढून बाहेर काढले आणि त्या इश्माएली लोकांना वीस रुपयांना विकून टाकले. ते योसेफाला मिसर देशात घेऊन गेले. रऊबेन खड्ड्याकडे परत येऊन पाहतो तर योसेफ खाड्ड्यात नाही, म्हणून त्याने आपली वस्त्रे फाडली. तो आपल्या भावांकडे परत येऊन म्हणाला, “मुलगा तर नाही; आता मी कोठे जाऊ?” मग त्यांनी योसेफाचा झगा घेतला व एक बकरा मारून तो झगा त्याच्या रक्तात भिजवला; आणि त्यांनी तो पायघोळ झगा पाठवून दिला; तो त्यांनी आपल्या बापाकडे आणून म्हटले की, “हा आम्हांला सापडला; हा आपल्या मुलाचा झगा आहे काय ते ओळखा.” त्याने तो ओळखून म्हटले, “हा माझ्या मुलाचाच झगा! हिंस्र पशूने त्याला खाल्ले, योसेफाला फाडून टाकले ह्यात संशय नाही.” तेव्हा याकोबाने आपली वस्त्रे फाडून कंबरेस गोणपाट गुंडाळले आणि आपल्या मुलासाठी पुष्कळ दिवस शोक केला. त्याचे मुलगे व मुली हे सर्व त्याचे सांत्वन करायला त्याच्याजवळ गेले, पण तो काही केल्या समाधान न पावता म्हणाला, “मी शोक करत करत अधोलोकी आपल्या मुलाकडे जाईन.” असा त्याच्या बापाने त्याच्यासाठी शोक केला. मिद्यानी लोकांनी योसेफाला मिसरात नेऊन पोटीफर नावाचा फारोचा एक अंमलदार गारद्यांचा सरदार होता, त्याला विकून टाकले.

सामायिक करा
उत्पत्ती 37 वाचा

उत्पत्ती 37:26-36 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

तेव्हा यहूदा त्याच्या भावांना म्हणाला, “आपल्या भावाला ठार मारून आणि त्याचा खून लपवून ठेवून आपल्याला काय फायदा? चला, आपण त्यास या इश्माएली लोकांस विकून टाकू, आपण आपल्या भावावर हात टाकू नये. कारण तो आपला भाऊ आहे, आपल्याच हाडामांसाचा आहे.” त्याच्या भावांनी त्याचे ऐकले. ते मिद्यानी व्यापारी जवळ आल्यावर त्या भावांनी योसेफाला खड्ड्यातून बाहेर काढले व त्या इश्माएली व्यापाऱ्यांना वीस चांदीची नाणी घेऊन विकून टाकले. ते व्यापारी योसेफाला मिसर देशास घेऊन गेले. रऊबेन त्या खड्ड्याकडे परत गेला, तेव्हा पाहा, त्यामध्ये त्यास योसेफ दिसला नाही. त्याने आपली वस्त्रे फाडली. तो भावांकडे येऊन म्हणाला, “मुलगा कोठे आहे? आणि मी, आता मी कोठे जाऊ?” त्यांनी एक बकरा मारला आणि योसेफाचा झगा त्या रक्तात बुडवला. नंतर तो झगा आणून, आपल्या बापाला दाखवून ते म्हणाले, “आम्हांला हा सापडला. हा झगा तुमच्या मुलाचा आहे की काय तो पाहा.” याकोबाने तो ओळखला आणि तो म्हणाला, “हा माझ्याच मुलाचा झगा आहे. हिंस्र पशूने त्यास खाऊन टाकले असावे. माझा मुलगा योसेफ याला हिंस्त्र पशूने खाऊन टाकले आहे यामध्ये संशय नाही.” याकोबाला आपल्या मुलाबद्दल अतिशय दुःख झाले, एवढे की, त्याने आपली वस्त्रे फाडली आणि कंबरेस गोणताट गुंडाळले आणि त्याने पुष्कळ दिवस आपल्या मुलासाठी शोक केला. याकोबाच्या सर्व मुलांनी व मुलींनी त्याचे सांत्वन करण्याचा खूप प्रयत्न केला परंतु तो समाधान पावला नाही. तो म्हणाला, “मी मरेपर्यंत माझ्या मुलासाठी शोक करीत राहीन व अधोलोकात माझ्या मुलाकडे जाईन.” असा त्याचा बाप त्याच्याकरता रडला. त्या मिद्यानी व्यापाऱ्यांनी योसेफाला मिसर देशात पोटीफर नावाचा फारो राजाचा अधिकारी, अंगरक्षकाचा सरदार याला विकून टाकले.

सामायिक करा
उत्पत्ती 37 वाचा

उत्पत्ती 37:26-36 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

तेव्हा यहूदाह आपल्या भावांना म्हणाला, “आपल्या भावाला मारून त्याचा रक्तपात झाकून आपल्याला काय फायदा? चला आपण योसेफाला इश्माएली लोकांना विकून टाकू या, त्याला हात लावू नका, तो आपला भाऊच आहे, आपल्याच रक्तमांसाचा आहे.” त्या सर्व भावांना त्याचे म्हणणे पटले. मिद्यानी व्यापार्‍यांचा काफिला म्हणजे इश्माएली लोक जवळ आले, तेव्हा त्यांनी योसेफाला त्या विहिरीतून बाहेर काढले आणि वीस शेकेल चांदी घेऊन भावांनी योसेफाला विकून टाकले; आणि व्यापार्‍यांनी योसेफाला आपल्याबरोबर इजिप्त देशाला नेले. जेव्हा रऊबेन त्या विहिरीजवळ परत आला आणि योसेफ विहिरीत नाही हे पाहून त्याने आपली वस्त्रे फाडली. तो रडत आपल्या भावांना म्हणाला, “मुलगा विहिरीत नाही; आता मी कुठे जाऊ?” मग त्यांनी योसेफाचा झगा घेतला, एक बोकड मारला आणि त्याच्या रक्तात तो झगा बुडवला. तो झगा त्यांनी आपल्या वडिलांकडे आणून म्हटले, “हा झगा आम्हास सापडला आहे; हा तुमच्या मुलाचा झगा आहे की नाही ते पाहा!” त्याने तो झगा ओळखला आणि म्हणाला, “होय, हा माझ्या मुलाचाच झगा आहे; त्याला वनपशूने खाऊन टाकले असावे. योसेफाचे त्याने फाडून तुकडे केले आहे यात शंका नाही.” यानंतर याकोबाने आपली वस्त्रे फाडली आणि गोणपाट नेसून त्याने मुलासाठी पुष्कळ दिवस शोक केला. त्याचे सर्व पुत्र आणि कन्या आले आणि त्याचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. तो म्हणत असे, “मी पुत्र शोकानेच मरेन आणि अधोलोकी आपल्या मुलाकडे जाईन.” अशा रीतीने तो त्याच्यासाठी दुःखाने रडत असे. दरम्यान, मिद्यानी लोकांनी योसेफाला इजिप्तमधील पोटीफर, फारोहच्या सरदारांपैकी एका सुरक्षादलाच्या प्रमुखास विकले.

सामायिक करा
उत्पत्ती 37 वाचा