उत्पत्ती 37:19-28
उत्पत्ती 37:19-28 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्याचे भाऊ एकमेकांना म्हणाले, “हा पाहा, स्वप्ने पाहणारा इकडे येत आहे. आता चला, आपण त्यास ठार मारून टाकू आणि त्यास एका खड्ड्यात टाकून देऊ. आणि त्यास कोणा एका हिंस्र पशूने खाऊन टाकले असे आपल्या बापाला सांगू. मग त्याच्या स्वप्नांचे काय होईल ते आपण पाहू.” रऊबेनाने ते ऐकले आणि त्यास त्यांच्या हातातून सोडवले. तो म्हणाला, “आपण त्यास ठार मारू नये.” रऊबेन त्यांना म्हणाला, “रक्त पाडू नका. त्यास रानातल्या या खड्ड्यात टाका, परंतु त्याच्यावर हात टाकू नका.” आपल्या भावांच्या हातातून सोडवून त्यास त्याच्या बापाकडे परत पाठवून द्यावयाचे असा त्याचा बेत होता. योसेफ त्याच्या भावांजवळ येऊन पोहचला तेव्हा त्यांनी त्याचा सुंदर झगा काढून घेतला. नंतर त्यांनी त्यास एका खोल खड्ड्यात टाकून दिले. तो खड्डा रिकामा होता, त्यामध्ये पाणी नव्हते. ते भाकरी खाण्यास खाली बसले. त्यांनी वर नजर करून पाहिले, तो पाहा, इश्माएली लोकांचा तांडा मसाल्याचे पदार्थ व सुगंधी डिंक व बोळ लादलेल्या उंटांसहीत गिलाद प्रदेशाहून येत होता. ते खाली मिसर देशाकडे चालले होते. तेव्हा यहूदा त्याच्या भावांना म्हणाला, “आपल्या भावाला ठार मारून आणि त्याचा खून लपवून ठेवून आपल्याला काय फायदा? चला, आपण त्यास या इश्माएली लोकांस विकून टाकू, आपण आपल्या भावावर हात टाकू नये. कारण तो आपला भाऊ आहे, आपल्याच हाडामांसाचा आहे.” त्याच्या भावांनी त्याचे ऐकले. ते मिद्यानी व्यापारी जवळ आल्यावर त्या भावांनी योसेफाला खड्ड्यातून बाहेर काढले व त्या इश्माएली व्यापाऱ्यांना वीस चांदीची नाणी घेऊन विकून टाकले. ते व्यापारी योसेफाला मिसर देशास घेऊन गेले.
उत्पत्ती 37:19-28 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ते एकमेकांना म्हणाले, “पाहा, तो स्वप्नदर्शी येत आहे. तर आता चला, आपण त्याला ठार करून एका खड्ड्यात टाकून देऊ आणि मग सांगू की कोणा हिंस्र पशूने त्याला खाऊन टाकले; मग पाहू त्याच्या स्वप्नांचे काय होते ते!” हे रऊबेनाच्या कानी आले, तेव्हा त्याने त्यांच्या हातांतून त्याला सोडवले; तो त्यांना म्हणाला, “आपण त्याला जिवे मारू नये.” रऊबेन त्यांना म्हणाला, “रक्तपात करू नका; तर ह्या रानातल्या खड्ड्यात त्याला टाका, पण त्याच्यावर हात टाकू नका.” त्यांच्या हातांतून सोडवून त्याला त्याच्या बापाकडे परत पाठवून द्यावे म्हणून तो असे म्हणाला. योसेफ आपल्या भावांजवळ पोहचला, तेव्हा त्याच्या अंगात पायघोळ झगा होता. तो त्यांनी काढून घेतला, आणि त्याला धरून खड्ड्यात टाकून दिले; तो खड्डा कोरडा होता, त्यात पाणी नव्हते. मग ते शिदोरी खायला बसले असता, त्यांनी वर नजर करून पाहिले तेव्हा इश्माएली लोकांचा एक काफला उंटांवर मसाला, ऊद व गंधरस लादून गिलादाहून मिसरास जात आहे असे त्यांना दिसले. तेव्हा यहूदा आपल्या भावांना म्हणाला, “आपण आपल्या भावाला ठार मारून त्याचा खून लपवला तर काय लाभ? चला, आपण त्याला ह्या इश्माएली लोकांना विकून टाकू; आपण त्याच्यावर हात टाकू नये; कारण तो आपला भाऊ आहे, आपल्या हाडामांसाचा आहे.” हे त्याच्या भावांना पसंत पडले. ते मिद्यानी व्यापारी जवळून चालले तेव्हा त्यांनी योसेफाला त्या खड्ड्यातून ओढून बाहेर काढले आणि त्या इश्माएली लोकांना वीस रुपयांना विकून टाकले. ते योसेफाला मिसर देशात घेऊन गेले.