YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 37:13-28

उत्पत्ती 37:13-28 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

इस्राएल योसेफाला म्हणाला, “तुझे भाऊ शखेम येथे आपली मेंढरे चारावयास गेले आहेत ना? चल, मी तुला तेथे पाठवत आहे.” योसेफ त्यास म्हणाला, “मी तयार आहे.” तो त्यास म्हणाला, “आता जा आणि तुझे भाऊ व माझी मेंढरे ठीक आहेत सुखरुप आहेत का? ते पाहा व मला त्यांच्यासंबंधी बातमी घेऊन ये.” अशा रीतीने याकोबाने त्यास हेब्रोनातून शखेमास पाठवले आणि योसेफ शखेमास गेला. योसेफ शेतात भटकत होता. पाहा, तो कोणा मनुष्यास दिसला. त्या मनुष्याने त्यास विचारले, “तू काय शोधत आहेस?” योसेफ म्हणाला, “मी माझ्या भावांना शोधत आहे, ते कोठे कळप चारीत आहेत, हे कृपा करून मला सांगता का?” तो मनुष्य म्हणाला, “ते येथून गेले आहेत. आपण दोथान गावामध्ये जाऊ असे त्यांना बोलताना मी ऐकले.” म्हणून मग योसेफ आपल्या भावांच्या मागे गेला व ते त्यास दोथानात सापडले. त्याच्या भावांनी योसेफाला दुरून येताना पाहिले आणि कट करून त्यास ठार मारण्याचे ठरवले. त्याचे भाऊ एकमेकांना म्हणाले, “हा पाहा, स्वप्ने पाहणारा इकडे येत आहे. आता चला, आपण त्यास ठार मारून टाकू आणि त्यास एका खड्ड्यात टाकून देऊ. आणि त्यास कोणा एका हिंस्र पशूने खाऊन टाकले असे आपल्या बापाला सांगू. मग त्याच्या स्वप्नांचे काय होईल ते आपण पाहू.” रऊबेनाने ते ऐकले आणि त्यास त्यांच्या हातातून सोडवले. तो म्हणाला, “आपण त्यास ठार मारू नये.” रऊबेन त्यांना म्हणाला, “रक्त पाडू नका. त्यास रानातल्या या खड्ड्यात टाका, परंतु त्याच्यावर हात टाकू नका.” आपल्या भावांच्या हातातून सोडवून त्यास त्याच्या बापाकडे परत पाठवून द्यावयाचे असा त्याचा बेत होता. योसेफ त्याच्या भावांजवळ येऊन पोहचला तेव्हा त्यांनी त्याचा सुंदर झगा काढून घेतला. नंतर त्यांनी त्यास एका खोल खड्ड्यात टाकून दिले. तो खड्डा रिकामा होता, त्यामध्ये पाणी नव्हते. ते भाकरी खाण्यास खाली बसले. त्यांनी वर नजर करून पाहिले, तो पाहा, इश्माएली लोकांचा तांडा मसाल्याचे पदार्थ व सुगंधी डिंक व बोळ लादलेल्या उंटांसहीत गिलाद प्रदेशाहून येत होता. ते खाली मिसर देशाकडे चालले होते. तेव्हा यहूदा त्याच्या भावांना म्हणाला, “आपल्या भावाला ठार मारून आणि त्याचा खून लपवून ठेवून आपल्याला काय फायदा? चला, आपण त्यास या इश्माएली लोकांस विकून टाकू, आपण आपल्या भावावर हात टाकू नये. कारण तो आपला भाऊ आहे, आपल्याच हाडामांसाचा आहे.” त्याच्या भावांनी त्याचे ऐकले. ते मिद्यानी व्यापारी जवळ आल्यावर त्या भावांनी योसेफाला खड्ड्यातून बाहेर काढले व त्या इश्माएली व्यापाऱ्यांना वीस चांदीची नाणी घेऊन विकून टाकले. ते व्यापारी योसेफाला मिसर देशास घेऊन गेले.

सामायिक करा
उत्पत्ती 37 वाचा

उत्पत्ती 37:13-28 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

इस्राएलने योसेफाला म्हटले, “तुझे भाऊ शेखेम येथे मेंढरे चारावयास गेले आहेत; मी तुला त्यांच्याकडे पाठवित आहे.” योसेफ म्हणाला, “ठीक आहे.” याकोबाने योसेफास म्हटले, “तू शेखेमला जा आणि तुझ्या भावांचे सर्वकाही ठीक आहे का व कळपांची स्थिती कशी आहे, हे पाहून मला येऊन सांग.” नंतर याकोबाने त्याला हेब्रोन खोर्‍यातून पाठवले. आणि तो शेखेमास पोहोचला. तो शेतातून फिरत असता त्याला एका मनुष्याने पाहिले आणि त्याने योसेफाला विचारले, “तू काय शोधीत आहेस?” योसेफाने उत्तर दिले, “मी माझ्या भावांना शोधीत आहे. ते कुठे कळप चारीत आहे, हे मला सांगाल का?” तेव्हा तो मनुष्य म्हणाला, “होय, पण आता ते येथे नाहीत, ‘आपण दोथानला जाऊ’ तुझ्या भावांना असे बोलताना मी ऐकले.” तेव्हा योसेफ भावांच्या मागे दोथानला गेला आणि ते त्याला तिथे आढळले. त्याच्या भावांनी त्याला दुरून येताना पाहिले आणि तो पोहोचण्या आधी त्याला जिवे मारण्याचा कट रचला. ते एकमेकांना म्हणाले, “अरे हा स्वप्नदर्शी येत आहे. चला आपण याला ठार करू. त्याला एखाद्या विहिरीत फेकून देऊ आणि आपल्या वडिलांना सांगू की त्याला हिंस्र पशूने खाऊन टाकले आहे; मग त्याच्या स्वप्नांचे काय होते ते आपण पाहू.” जेव्हा रऊबेनने हे ऐकले तेव्हा त्याने योसेफाचा जीव वाचविण्याचा प्रयत्न केला; तो म्हणाला, “आपण त्याला जिवे मारणार नाही; आपण रक्तपात करणार नाही; तर आपण त्याला या रानातल्या विहिरीत फेकून देऊ; परंतु त्याला हात लावू नका.” रऊबेनने असा बेत केला होता की नंतर योसेफाला विहिरीतून काढावे आणि आपल्या वडिलांकडे परत पाठवून द्यावे. योसेफ त्यांच्याजवळ आला तेव्हा त्यांनी त्याचा झगा—जो गडद रंगाचा, सुशोभित होता—ओढून काढला, आणि त्याला एका कोरड्या विहिरीत फेकून दिले, ती विहीर रिकामी होती, तिच्यात पाणी नव्हते. मग ते भोजन करण्यास बसले असता त्यांना दूर अंतरावरून उंटांचा एक काफिला त्यांच्याकडे येताना दिसला. ते इश्माएली व्यापारी असून गिलआदहून इजिप्तला डिंक, मसाले व गंधरस घेऊन चालले होते. तेव्हा यहूदाह आपल्या भावांना म्हणाला, “आपल्या भावाला मारून त्याचा रक्तपात झाकून आपल्याला काय फायदा? चला आपण योसेफाला इश्माएली लोकांना विकून टाकू या, त्याला हात लावू नका, तो आपला भाऊच आहे, आपल्याच रक्तमांसाचा आहे.” त्या सर्व भावांना त्याचे म्हणणे पटले. मिद्यानी व्यापार्‍यांचा काफिला म्हणजे इश्माएली लोक जवळ आले, तेव्हा त्यांनी योसेफाला त्या विहिरीतून बाहेर काढले आणि वीस शेकेल चांदी घेऊन भावांनी योसेफाला विकून टाकले; आणि व्यापार्‍यांनी योसेफाला आपल्याबरोबर इजिप्त देशाला नेले.

सामायिक करा
उत्पत्ती 37 वाचा

उत्पत्ती 37:13-28 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मग इस्राएल योसेफास म्हणाला, “तुझे भाऊ शखेमास कळप चारत आहेत ना? तर चल, मी तुला त्यांच्याकडे पाठवतो.” तो म्हणाला, “हा मी तयार आहे.” तेव्हा त्याने त्याला सांगितले, “जा. तुझे भाऊ बरे आहेत काय आणि कळपही ठीक आहेत काय ते पाहा आणि मला येऊन सांग.” ह्याप्रमाणे त्याने त्याला हेब्रोन खोर्‍यातून रवाना केले व तो शखेमास जाऊन पोहचला. तो तेथे रानात इकडेतिकडे भटकत असता एका मनुष्याला आढळला, तेव्हा त्याने त्याला विचारले, “तू काय शोधत आहेस?” तो म्हणाला, “मी आपल्या भावांना शोधत आहे. ते कोठे कळप चारत आहेत तेवढे मला सांगा.” तो मनुष्य म्हणाला, “ते येथून निघून गेले आहेत; आपण दोथानास जाऊ असे त्यांना बोलताना मी ऐकले.” मग योसेफ आपल्या भावांच्या मागे गेला आणि ते त्याला दोथानात सापडले. त्यांनी त्याला दुरून पाहिले तेव्हा तो त्यांच्याजवळ येऊन पोहचण्यापूर्वी, त्याला मारून टाकण्याचा त्यांनी कट केला. ते एकमेकांना म्हणाले, “पाहा, तो स्वप्नदर्शी येत आहे. तर आता चला, आपण त्याला ठार करून एका खड्ड्यात टाकून देऊ आणि मग सांगू की कोणा हिंस्र पशूने त्याला खाऊन टाकले; मग पाहू त्याच्या स्वप्नांचे काय होते ते!” हे रऊबेनाच्या कानी आले, तेव्हा त्याने त्यांच्या हातांतून त्याला सोडवले; तो त्यांना म्हणाला, “आपण त्याला जिवे मारू नये.” रऊबेन त्यांना म्हणाला, “रक्तपात करू नका; तर ह्या रानातल्या खड्ड्यात त्याला टाका, पण त्याच्यावर हात टाकू नका.” त्यांच्या हातांतून सोडवून त्याला त्याच्या बापाकडे परत पाठवून द्यावे म्हणून तो असे म्हणाला. योसेफ आपल्या भावांजवळ पोहचला, तेव्हा त्याच्या अंगात पायघोळ झगा होता. तो त्यांनी काढून घेतला, आणि त्याला धरून खड्ड्यात टाकून दिले; तो खड्डा कोरडा होता, त्यात पाणी नव्हते. मग ते शिदोरी खायला बसले असता, त्यांनी वर नजर करून पाहिले तेव्हा इश्माएली लोकांचा एक काफला उंटांवर मसाला, ऊद व गंधरस लादून गिलादाहून मिसरास जात आहे असे त्यांना दिसले. तेव्हा यहूदा आपल्या भावांना म्हणाला, “आपण आपल्या भावाला ठार मारून त्याचा खून लपवला तर काय लाभ? चला, आपण त्याला ह्या इश्माएली लोकांना विकून टाकू; आपण त्याच्यावर हात टाकू नये; कारण तो आपला भाऊ आहे, आपल्या हाडामांसाचा आहे.” हे त्याच्या भावांना पसंत पडले. ते मिद्यानी व्यापारी जवळून चालले तेव्हा त्यांनी योसेफाला त्या खड्ड्यातून ओढून बाहेर काढले आणि त्या इश्माएली लोकांना वीस रुपयांना विकून टाकले. ते योसेफाला मिसर देशात घेऊन गेले.

सामायिक करा
उत्पत्ती 37 वाचा