उत्पत्ती 33:4-11
उत्पत्ती 33:4-11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
एसावाने जेव्हा याकोबाला पाहिले तेव्हा त्यास भेटण्यास तो धावत गेला आणि त्यास आलिंगन दिले. त्याने गळ्यात गळा घालून याकोबाला मिठी मारली. त्याचे चुंबन घेतले, आणि ते दोघे रडले. एसावाने आपल्या समोरील स्त्रिया व मुले पाहून विचारले, “तुझ्याबरोबर ही कोण मंडळी आहे?” याकोबाने उत्तर दिले, “तुझ्या सेवकाला ही मुले देऊन देवाने माझे कल्याण केले आहे.” मग दोन दासी आपल्या मुलांबरोबर पुढे आल्या आणि त्यांनी एसावाला खाली वाकून नमन केले. त्यानंतर लेआ व तिची मुले, मग राहेल व योसेफ एसावापुढे गेले आणि त्यांनी त्यास खाली वाकून नमन केले. एसावाने विचारले, “इकडे येताना मला भेटलेल्या सर्व टोळ्यांचा अर्थ काय आहे?” याकोबाने उत्तर दिले, “माझ्या धन्याच्या दृष्टीने मला कृपा मिळावी म्हणून.” एसाव म्हणाला, “माझ्या बंधू मला भरपूर आहे, तुझे तुला असू दे.” याकोब म्हणाला, “मी आपणाला विनंती करतो, असे नको, आता जर मी तुमच्या दृष्टीने खरोखर कृपा पावलो तर माझ्या हातून या भेटीचा स्विकार करा, कारण मी आपले तोंड पाहिले, आणि जणू काय देवाचे मुख पाहावे तसे मी तुमचे मुख पाहिले आहे आणि आपण माझा स्विकार केला. मी विनंती करतो की, मी आणलेल्या भेटीचा स्विकार करा. कारण देवाने माझे कल्याण केले आहे, आणि माझ्यापाशी भरपूर आहे.” याप्रमाणे याकोबाने एसावास आग्रहाची विनवणी केली आणि मग एसावाने त्यांचा स्विकार केला.
उत्पत्ती 33:4-11 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तेव्हा एसाव त्याला भेटण्यासाठी धावत आला, त्याने त्याला आलिंगन दिले; त्याच्या गळ्यात गळा घालून त्याचे चुंबन घेतले, आणि ते दोघे रडले. एसावाने दृष्टी वर करून बायका व मुले पाहिली तेव्हा तो म्हणाला, “तुझ्याबरोबर हे कोण आहेत?” तो म्हणाला, “आपल्या दासावर देवाने कृपा करून दिलेली ही मुले आहेत.” तेव्हा त्या दासींनी मुलांसह जवळ येऊन त्याला नमन केले. मग लेआ व तिची मुले ह्यांनीही जवळ येऊन त्याला नमन केले, आणि त्यांच्यामागून योसेफ व राहेल ह्यांनी जवळ येऊन त्याला नमन केले. मग त्याने म्हटले, “मला तुझा हा सर्व तांडा भेटला तो कशाला?” तो म्हणाला, “माझ्या स्वामीची कृपादृष्टी व्हावी म्हणून.” एसाव म्हणाला, “माझ्याजवळ भरपूर आहे, माझ्या बंधू, तुझे तुलाच राहू दे.” याकोब म्हणाला, “नाही, नाही; आपली माझ्यावर कृपादृष्टी झाली असेल तर माझ्या हातची एवढी भेट घ्याच, कारण आपले दर्शन मला झाले हे जणू काय देवाच्या दर्शनासारखे आहे आणि आपण माझ्यावर संतुष्ट झाला आहात, तर आपल्यासाठी आणलेली ही माझी भेट घ्याच; कारण देवाने माझ्यावर कृपादृष्टी केल्यामुळे मला सर्वकाही आहे.” याकोबाने त्याला आग्रह केल्यावर त्याने ती भेट घेतली.