उत्पत्ती 33:1-11
उत्पत्ती 33:1-11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
याकोबाने वर पाहिले आणि पाहा, त्यास एसाव येताना दिसला आणि त्याच्या बरोबर चारशे माणसे होती. तेव्हा याकोबाने लेआ व राहेल व दोघी दासी यांच्याजवळ मुले वाटून दिली. याकोबाने त्याच्या दासी व त्यांची मुले यांना आघाडीस त्यानंतर त्याच्यामागे लेआ व तिची मुले आणि राहेल व योसेफ यांना सर्वांत शेवटी ठेवले. याकोब स्वतः पुढे गेला. आपल्या भावापर्यंत पोहचेपर्यंत त्याने सात वेळा भूमीपर्यंत लवून त्यास नमन केले. एसावाने जेव्हा याकोबाला पाहिले तेव्हा त्यास भेटण्यास तो धावत गेला आणि त्यास आलिंगन दिले. त्याने गळ्यात गळा घालून याकोबाला मिठी मारली. त्याचे चुंबन घेतले, आणि ते दोघे रडले. एसावाने आपल्या समोरील स्त्रिया व मुले पाहून विचारले, “तुझ्याबरोबर ही कोण मंडळी आहे?” याकोबाने उत्तर दिले, “तुझ्या सेवकाला ही मुले देऊन देवाने माझे कल्याण केले आहे.” मग दोन दासी आपल्या मुलांबरोबर पुढे आल्या आणि त्यांनी एसावाला खाली वाकून नमन केले. त्यानंतर लेआ व तिची मुले, मग राहेल व योसेफ एसावापुढे गेले आणि त्यांनी त्यास खाली वाकून नमन केले. एसावाने विचारले, “इकडे येताना मला भेटलेल्या सर्व टोळ्यांचा अर्थ काय आहे?” याकोबाने उत्तर दिले, “माझ्या धन्याच्या दृष्टीने मला कृपा मिळावी म्हणून.” एसाव म्हणाला, “माझ्या बंधू मला भरपूर आहे, तुझे तुला असू दे.” याकोब म्हणाला, “मी आपणाला विनंती करतो, असे नको, आता जर मी तुमच्या दृष्टीने खरोखर कृपा पावलो तर माझ्या हातून या भेटीचा स्विकार करा, कारण मी आपले तोंड पाहिले, आणि जणू काय देवाचे मुख पाहावे तसे मी तुमचे मुख पाहिले आहे आणि आपण माझा स्विकार केला. मी विनंती करतो की, मी आणलेल्या भेटीचा स्विकार करा. कारण देवाने माझे कल्याण केले आहे, आणि माझ्यापाशी भरपूर आहे.” याप्रमाणे याकोबाने एसावास आग्रहाची विनवणी केली आणि मग एसावाने त्यांचा स्विकार केला.
उत्पत्ती 33:1-11 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
नंतर दूर अंतरावरून एसाव आपल्या चारशे माणसांबरोबर येत आहे असे याकोबाने पाहिले, तेव्हा त्याने लेआ व राहेल व दोघी दासी यांच्याजवळ मुले वाटून दिली. सर्वात पुढे त्याने आपल्या दासी आणि त्यांची मुले; त्यांच्यामागे लेआ व तिची मुले आणि त्यांच्यानंतर राहेल व योसेफ अशा रीतीने त्यांना ठेवले. तो स्वतः सर्वांच्या पुढे चालला आणि आपल्या भावाजवळ जाऊन पोहोचेपर्यंत त्याने त्याला भूमीपर्यंत लवून सात वेळा मुजरा केला. एसाव हा याकोबास भेटण्यास धावत आला; त्याने त्याला आलिंगन दिले; त्याला कवेत घेऊन त्याचे चुंबन घेतले आणि ते दोघे रडले. एसावाने दृष्टी वर करून त्या स्त्रिया व मुलांकडे पाहिले तेव्हा त्याने विचारले, “तुजबरोबर हे लोक कोण आहेत?” याकोब म्हणाला, “परमेश्वराने कृपा करून तुमच्या दासाला दिलेली ही माझी मुले आहेत.” तेव्हा याकोबाच्या दासी आणि त्यांची मुले पुढे आली आणि त्यांनीही त्याला लवून नमस्कार केला. त्यानंतर लेआ व तिची मुले आली, शेवटी राहेल आणि योसेफ पुढे आली. त्यांनीही त्याला लवून नमस्कार केला. एसावाने विचारले, “जी गुरे व कळप मला भेटले त्याचा उद्देश काय आहे?” याकोब म्हणाला, “माझ्या धन्या, तुझ्या दृष्टीत मी कृपा पावावे म्हणून.” यावर एसाव म्हणाला, “भाऊ, माझ्याजवळ भरपूर आहे; तुझे आहे ते तुलाच राहू दे.” “नाही, नाही!” याकोब म्हणाला, “जर तुमची माझ्यावर कृपा झाली असल्यास या भेटींचा तुम्ही स्वीकार करा. कारण तुम्ही आता मला स्वीकारले आहे म्हणून तुमचे मुख बघून परमेश्वराचे मुख बघितल्यासारखे वाटते. माझ्या देणग्यांचा कृपया स्वीकार करा, कारण परमेश्वराने माझ्यावर दया केली आहे आणि त्यांनी मला सर्वकाही भरपूर दिले आहे.” याकोबाने फारच आग्रह केल्यामुळे एसावाने शेवटी त्या भेटींचा स्वीकार केला.
उत्पत्ती 33:1-11 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ह्यानंतर याकोबाने दृष्टी वर करून पाहिले तर एसाव चारशे माणसे बरोबर घेऊन येत आहे असे त्याला दिसले; तेव्हा त्याने लेआ व राहेल आणि त्या दोन दासी ह्यांच्याकडे आपापली मुले दिली. त्याने दासी व त्यांची मुले सर्वांत पुढे, त्यांच्यानंतर लेआ व तिची मुले आणि सर्वांच्या मागे राहेल व योसेफ ह्यांना ठेवले. तो स्वत: त्या सर्वांच्या पुढे चालत गेला, आणि भावाजवळ जाऊन पोहचेपर्यंत त्याने सात वेळा भूमीपर्यंत लवून नमन केले. तेव्हा एसाव त्याला भेटण्यासाठी धावत आला, त्याने त्याला आलिंगन दिले; त्याच्या गळ्यात गळा घालून त्याचे चुंबन घेतले, आणि ते दोघे रडले. एसावाने दृष्टी वर करून बायका व मुले पाहिली तेव्हा तो म्हणाला, “तुझ्याबरोबर हे कोण आहेत?” तो म्हणाला, “आपल्या दासावर देवाने कृपा करून दिलेली ही मुले आहेत.” तेव्हा त्या दासींनी मुलांसह जवळ येऊन त्याला नमन केले. मग लेआ व तिची मुले ह्यांनीही जवळ येऊन त्याला नमन केले, आणि त्यांच्यामागून योसेफ व राहेल ह्यांनी जवळ येऊन त्याला नमन केले. मग त्याने म्हटले, “मला तुझा हा सर्व तांडा भेटला तो कशाला?” तो म्हणाला, “माझ्या स्वामीची कृपादृष्टी व्हावी म्हणून.” एसाव म्हणाला, “माझ्याजवळ भरपूर आहे, माझ्या बंधू, तुझे तुलाच राहू दे.” याकोब म्हणाला, “नाही, नाही; आपली माझ्यावर कृपादृष्टी झाली असेल तर माझ्या हातची एवढी भेट घ्याच, कारण आपले दर्शन मला झाले हे जणू काय देवाच्या दर्शनासारखे आहे आणि आपण माझ्यावर संतुष्ट झाला आहात, तर आपल्यासाठी आणलेली ही माझी भेट घ्याच; कारण देवाने माझ्यावर कृपादृष्टी केल्यामुळे मला सर्वकाही आहे.” याकोबाने त्याला आग्रह केल्यावर त्याने ती भेट घेतली.