उत्पत्ती 31:1-42
उत्पत्ती 31:1-42 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
लाबानाचे पुत्र आपसात बोलत असताना याकोबाने ऐकले ते म्हणाले, “जे आपल्या बापाचे त्यातून सर्वकाही याकोबाने घेतले आहे आणि जे आमच्या वडिलाच्या त्या मालमत्तेतून तो संपन्न झाला आहे.” याकोबाने लाबानाचा चेहरा पाहिला. त्याच्या वागण्यात बदल झाल्याचे त्याच्या लक्षात आले. परमेश्वर याकोबाला म्हणाला, “तुझ्या वडिलाच्या देशात आपल्या नातलगांकडे तू परत जा, आणि मी तुझ्याबरोबर असेन.” तेव्हा याकोबाने राहेल व लेआ यांना, तो आपले शेरडामेंढरांचे कळप राखीत होता, तेथे शेतात बोलावले, आणि त्यांना म्हणाला, “तुमच्या वडिलाच्या वागण्यात मला बदल झालेला जाणवला आहे. परंतु माझ्या बापाचा देव माझ्याबरोबर आहे. तुम्हास माहीत आहे की, मी आपल्या सर्व शक्तीने तुमच्या बापाची सेवा केली आहे. तुमच्या वडिलाने मला फसवले आणि त्याने माझ्या वेतनात दहा वेळा बदल केलेला आहे. परंतु देवाने माझे नुकसान करण्याची परवानगी त्यास दिली नाही. जेव्हा तो म्हणाला, सर्व ठिपकेदार शेळ्यामेंढ्या तुझे वेतन होतील, सर्व शेळ्यामेंढ्यांना ठिपकेदार करडे होऊ लागली. परंतु मग लाबान म्हणाला, तू बांड्या बकऱ्या घे; त्या तुला वेतनादाखल होतील. त्याने असे म्हटल्यानंतर सर्व बकऱ्यांना बांडी करडे होऊ लागली, तेव्हा अशा रीतीने देवाने तुमच्या वडिलाच्या कळपातून गुरेढोरे काढून घेऊन ती मला दिलेली आहेत. एकदा शेळ्यामेंढ्यांचा कळप निपजण्याच्या वेळेस मी आपली दृष्टी वर करून स्वप्नात पाहिले, तो पाहा, कळपातल्या माद्यांवर नर उडत होते ते फक्त ठिपकेदार व बांडे, करडे होते.” देवाचा दूत मला स्वप्नात म्हणाला, “याकोबा,” मी म्हणालो, “काय आज्ञा आहे?” तो म्हणाला, “आपले डोळे वर करून पाहा, ‘फक्त ठिपकेदार व बांडे, करडे असलेलेच नर माद्यांवर उडत आहेत. लाबान तुला काय करीत आहे ते सर्व मी पाहिले आहे. बेथेलचा मी देव आहे. जेथे तू एका स्मारकस्तंभास अभिषेक केलास, जेथे नवस करून तू मला वचन दिले, आणि आता तू हा देश सोड आणि आपल्या जन्मभूमीस परत जा.’” राहेल व लेआ यांनी त्यास उत्तर दिले आणि त्यास म्हणाल्या, “आमच्या वडिलाच्या घरी आम्हांला वारसा किंवा तेथे काही भाग नाही. आम्ही परक्या असल्यासारखे त्याने आम्हांला वागवले नाही काय? त्याने आम्हास तुम्हास विकून टाकले, आणि आमचे पूर्ण पैसे खाऊन टाकले आहेत. देवाने ही सर्व संपत्ती आमच्या पित्याकडून घेतली आणि आता ती आपली व आपल्या मुळाबाळांची संपत्ती झाली आहे. तेव्हा देवाने तुम्हास जे करावयास सांगितले आहे ते करा.” तेव्हा याकोब उठला आणि त्याने आपल्या स्त्रिया व मुलांना उंटांवर बसवले. तो आपली सर्व गुरेढोरे आणि आपण मिळवलेले सर्व धन, म्हणजे जे गुरांढोरांचे कळप त्याने पदन-अरामात मिळवले होते, ते घेऊन आपला बाप इसहाक याच्याकडे कनान देशास जाण्यास निघाला. त्याच वेळी लाबान आपल्या मेंढरांची लोकर कातरण्यास गेला होता. तेव्हा राहेलने आपल्या वडिलाच्या कुलदेवतांच्या मूर्ती चोरल्या. याकोबानेही अरामी लाबानाला फसवले. आपण येथून सोडून जात आहो हे त्यास सांगितले नाही. याकोब आपली बायकामुले व सर्व चीजवस्तू घेऊन ताबडतोब पळाला. त्यांनी फरात नदी ओलांडली आणि ते गिलाद डोंगराळ प्रदेशाकडे निघाले. तीन दिवसानंतर याकोब पळून गेल्याचे लाबानास कळाले. तेव्हा त्याने आपले नातलग एकत्र जमवले आणि याकोबाचा पाठलाग सुरू केला. सात दिवसानंतर गिलादाच्या डोंगराळ प्रदेशाजवळ त्यास याकोब सापडला. त्या रात्री देव अरामी लाबानाच्या स्वप्नात येऊन म्हणाला, “तू याकोबाला बरे किंवा वाईट बोलू नये म्हणून काळजी घे.” लाबानाने याकोबाला गाठले. याकोबाने डोंगराळ प्रदेशात तळ दिला होता. लाबानानेही आपल्या बरोबरच्या नातलगासह गिलादाच्या डोंगराळ भागात तळ दिला. लाबान याकोबाला म्हणाला, “तू मला हे काय केले? तू मला फसवलेस. आणि युद्धकैदी केलेल्या स्त्रियांप्रमाणे तू माझ्या मुलींना का घेऊन आलास? तू मला न सांगता का पळून गेलास? मला का फसवले? तू मला सांगितले नाही. मी तर उत्सव करून आणि गाणी, डफ व वीणा वाजवून तुला पाठवले असते. तू मला माझ्या नातवांचा व माझ्या मुलींचा निरोप घेण्याची किंवा त्यांची चुंबने घेण्याची संधी दिली नाहीस. आता हा तू मूर्खपणा केला आहे. खरे तर अपाय करण्याची माझ्यात ताकद आहे, परंतु काल रात्री तुझ्या बापाचा देव माझ्या स्वप्नात बोलला आणि म्हणाला, ‘तू याकोबाला बरे किंवा वाईट बोलू नको म्हणून काळजी घे.’ तुला तुझ्या वडिलाच्या घरी जायचे आहे हे मला माहीत आहे आणि म्हणूनच तू जाण्यास निघालास, परंतु तू माझ्या घरातील कुलदेवता का चोरल्यास?” याकोबाने उत्तर दिले आणि लाबानास म्हणाला, “मी गुप्तपणे निघालो कारण मला भीती वाटली, आणि मी विचार केला की, तुम्ही तुमच्या मुली माझ्यापासून हिसकावून घ्याल. ज्या कोणी तुमच्या कुलदेवता चोरल्या आहेत तर तो जगणार नाही. तुमच्या नातलगासमोर माझ्याबरोबर जे काही तुमचे आहे ते तुम्ही आपले ओळखा आणि ते घ्या.” राहेलीने त्या मूर्ती चोरल्या होत्या ते याकोबास माहीत नव्हते. लाबान याकोबाच्या तंबूत गेला, लेआच्या तंबूत गेला आणि दासींच्या तंबूत गेला परंतु त्यास त्या सापडल्या नाहीत. त्यानंतर तो राहेलीच्या तंबूत गेला. राहेलीने त्या कुलदेवता उंटाच्या खोगिरात लपवून ठेवल्या होत्या आणि ती त्यांच्यावर बसली होती. लाबानाने सगळा तंबू शोधला परंतु त्या सापडल्या नाहीत. ती आपल्या पित्यास म्हणाली, “मी आपल्यासमोर उभी राहू शकत नाही म्हणून माझ्यावर रागावू नका, कारण माझी मासिकपाळी आली आहे.” अशा रीतीने त्याने शोध केला परंतु त्यास कुलदेवता सापडल्या नाहीत. मग याकोबाला राग आला आणि त्याने लाबानाशी वाद केला, तो त्यास म्हणाला, “माझा गुन्हा काय आहे? माझे पाप कोणते आहे, म्हणून तुम्ही माझा रागाने पाठलाग केलात? माझ्या मालकीच्या सर्व चीजवस्तू तुम्ही शोधून पाहिल्या आहेत. तुम्हास तुमच्या मालकीची एकतरी चीजवस्तू आढळली का? जर तुम्हास तुमचे काही मिळाले असेल तर ते आपल्या नातलगासमोर ठेवा. यासाठी की ते आपल्या दोघांचा न्याय करतील. मी वीस वर्षे तुमच्याबरोबर होतो. त्या सर्व काळात एकही करडू किंवा कोकरू मरण पावलेले जन्मले नाही आणि तुमच्या कळपातील एकही बकरा मी खाल्ला नाही. जनावरांनी फाडलेले ते मी तुमच्याकडे आणले नाही. त्याऐवजी ते नुकसान मी भरून दिले. दिवसा किंवा रात्री चोरी गेलेले, प्रत्येक हरवलेले जनावर ते तुम्ही नेहमी माझ्या हातून भरून घेत होता. दिवसा उन्हाच्या तापाने व रात्री गारठ्यामुळे मला त्रास होई. आणि माझ्या डोळ्यावरून झोप उडून जाई, अशी माझी स्थिती होती. वीस वर्षे मी तुमच्या घरी राहिलो; पहिली चौदा वर्षे तुमच्या दोन मुलींसाठी आणि सहा वर्षे तुमच्या कळपांसाठी. दहा वेळा तुम्ही माझ्या वेतनात फेरबदल केला. परंतु माझ्या पूर्वजांचा देव; अब्राहामाचा देव आणि इसहाकाचा देव ज्याचे मी भय धरतो, तो माझ्या बरोबर होता. तो जर माझ्याबरोबर नसता तर तुम्ही मला नक्कीच रिकामे पाठवले असते. देवाने माझ्यावर झालेला जुलूम पाहिला आणि मी कष्टाने केलेले काम पाहिले आणि काल रात्री त्याने तुम्हास धमकावले.”
उत्पत्ती 31:1-42 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
याकोबाने लाबानाच्या पुत्रांचे म्हणणे ऐकले, “आमच्या वडिलांचे जे सर्वकाही होते ते याकोबाने घेतले आहे आणि ही सर्व संपत्ती त्याला जी मिळाली आहे ती आमच्या वडिलांची होती.” आणि याकोबाला दिसून आले की लाबानची त्याच्याबद्दलची वृत्ती आता पूर्वीसारखी राहिली नाही. तेव्हा याहवेह याकोबाशी बोलले आणि म्हणाले, “तू आता आपल्या वडिलांच्या व नातलगांच्या देशात परत जा आणि मी तुझ्याबरोबर असेन.” तेव्हा याकोबाने राहेल व लेआ यांना ज्या शेतात तो कळप राखीत होता तिथे बोलावून घेतले. तो त्यांना म्हणाला, “मी पाहतो की तुमच्या वडिलांची वृत्ती माझ्याशी पूर्वीसारखी राहिलेली नाही, पण माझ्या वडिलांचे परमेश्वर माझ्याबरोबर आहेत. मी तुमच्या वडिलांची आपल्या सर्व शक्तिनिशी सेवा केली हे तुम्हाला माहीत आहे; तरीपण तुमच्या वडिलांनी माझ्या वेतनाबाबत केलेला करार दहा वेळा बदलून मला फसविले आहे, तरी परमेश्वराने त्यांना माझे काही वाईट करू दिले नाही. कारण ज्यावेळी त्यांनी म्हटले की, डाग असलेल्या शेळ्यामेंढ्या तुझ्या, त्यावेळी सर्व कळपांना डाग असलेली करडे होत. जेव्हा ते आपले मन बदलून म्हणत, पट्टेदार शेळ्यामेंढ्या तुझ्या, तेव्हा त्यांना सर्व पट्टेदार करडे होत. अशा रीतीने तुमच्या वडिलांच्या शेळ्यामेंढ्या त्यांच्यापासून काढून परमेश्वराने ती मला दिली आहेत. “कळप फळावयाच्या ॠतूत मला स्वप्नात दिसले की, कळप फळविणारे बोकड पट्टेदार, डाग असलेले व ठिपकेदार आहेत. मग स्वप्नामध्ये परमेश्वराच्या दूताने मला बोलावून म्हटले, ‘याकोबा,’ मी उत्तर दिले, ‘हा मी इथे आहे.’ आणि त्यांनी मला सांगितले, ‘तुझी नजर वर कर आणि पाहा की, फळविणारे बोकड पट्टेदार, डाग असलेले व ठिपकेदार आहेत. कारण लाबानाने तुझ्याशी कसा व्यवहार केला हे सर्व मी पाहिले आहे. मीच तुला बेथेलमध्ये भेटलेला परमेश्वर आहे. त्या ठिकाणी तू स्तंभाला तैलाभ्यंग करून शपथ वाहिली होती. आता तू हा देश सोडून आपल्या मायदेशी परत जा.’ ” तेव्हा राहेल आणि लेआ यांनी उत्तर दिले, “आता आमच्या वडिलांच्या संपत्तीत आमचा काही वाटा राहिला आहे काय? ते आम्हाला परकियांसारखी वागणूक देत नाहीत काय? त्यांनी आम्हाला केवळ विकलेच नाही, तर आमच्याबद्दल मिळालेला सर्व मोबदला वापरून संपविला आहे. आमच्या वडिलांकडून परमेश्वराने हे धन काढून घेतले आहे, ते निश्चितच आमचे आणि आमच्या मुलाबाळांचे धन आहे. म्हणून परमेश्वराने तुम्हाला सांगितले आहे तसे करा.” मग याकोबाने आपल्या पत्नी व मुलांना उंटांवर बसविले आणि त्याने आपल्यापुढे कळप हाकीत, पद्दन-अराम येथे मिळालेली सर्व मालमत्ता घेऊन त्याचे वडील इसहाक याचा देश कनान इथे जाण्यास निघाला. जेव्हा लाबान आपल्या मेंढरांची लोकर कातरण्यास गेला असताना, राहेलने आपल्या वडिलांच्या कुलदैवतांच्या मूर्ती चोरल्या. याकोब अरामी लाबानाला काहीही न सांगता त्याला फसवून पळाला. अशा रीतीने आपली सर्व चीजवस्तू घेऊन, फरात नदी ओलांडून ते सर्वजण गिलआद डोंगराळ प्रदेशाच्या वाटेला लागले. याकोब पळून गेला आहे, हे लाबानाला तिसर्या दिवशी सांगण्यात आले. तेव्हा आपले नातलग बरोबर घेऊन त्याने त्यांचा पाठलाग केला आणि त्यांना सातव्या दिवशी गिलआद डोंगरावर गाठले. पण रात्रीच्या स्वप्नात परमेश्वर अरामी लाबानकडे आले आणि म्हणाले, “सावध राहा, तू याकोबाला चांगले किंवा वाईट असे काहीही म्हणू नकोस.” लाबानाने याकोबास गाठले तेव्हा याकोब गिलआद डोंगरमाथ्यावर तळ देऊन राहिला होता. मध्यंतरीच्या काळात लाबानानेदेखील आपला तळ डोंगराच्या पायथ्याशी दिला. लाबानाने याकोबाला विचारले, “हे तू काय केलेस? तू मला फसविले आणि माझ्या मुली युद्धबंदिसारख्या पळवून नेत आहेस? असे गुप्तपणे पळून तू मला का फसविले? तू मला का सांगितले नाही, जेणेकरून झांज व वीणेचे गायन-वादन करून समारंभाने आनंदाने निरोप देण्याची मला संधी मिळाली असती? माझ्या नातवंडाचा निरोप घेण्यापूर्वी, तू मला त्यांची चुंबने देखील घेऊ दिली नाहीस. ही मूर्खपणाची वागणूक आहे. मी तुझे नुकसान करू शकलो असतो, पण तुझ्या पूर्वजांचे परमेश्वर काल रात्री मला म्हणाले, ‘सावध राहा, तू याकोबला चांगले किंवा वाईट असे काहीही म्हणू नकोस.’ आता तुला जावेसे वाटते कारण तुझ्या नातलगांमध्ये परतण्याची तुला आतुरता आहे. पण तू माझी कुलदैवते का चोरलीस?” याकोबाने लाबानास उत्तर दिले, “मला भीती वाटत होती की तुम्ही आपल्या मुली माझ्यापासून बळजबरीने काढून घ्याल. पण ज्याच्याकडून तुम्हाला तुमची कुलदैवते मिळतील, तो जिवंत राहणार नाही. आपल्या नातेवाईकांच्या उपस्थितीत, माझ्याबरोबर येथे तुमचे काही आहे की नाही ते स्वतःच पाहा; आणि असल्यास, ते घ्या.” राहेलने त्या मूर्ती चोरल्या होत्या हे याकोबाला माहीत नव्हते. लाबान याकोबाच्या तंबूमध्ये गेला. लेआच्या तंबूमध्ये आणि मग दोन दासींच्या तंबूंमध्ये गेला, पण त्याला काही सापडले नाही. नंतर तो लेआच्या तंबूमधून निघून राहेलच्या तंबूमध्ये गेला. आता राहेलने त्या कुलदैवतांच्या मूर्ती चोरून आपल्या उंटाच्या खोगिरामध्ये लपवून ठेवल्या होत्या आणि ती त्या खोगिरावर बसली होती. लाबानाने तिच्या तंबूमध्ये कसून शोध केला तरी त्याला त्या सापडल्या नाहीत. राहेल त्याला म्हणाली, “बाबा मी तुमच्यापुढे उभी राहू शकत नाही कारण मी ॠतुमती आहे.” अशाप्रकारे त्याने शोध केला, परंतु त्याला कुलदैवतांच्या मूर्ती आढळल्या नाही. तेव्हा याकोबाला लाबानाचा खूप संताप आला. त्याने रागाने विचारणा केली, “माझा काय अपराध आहे? मी कोणता गुन्हा केला आहे, की तुम्ही माझा पाठलाग करीत आहात? माझ्या सर्व सामानाची झडती घेतलीत. आता मी तुमचे जे काही चोरले असेल, ते तुमच्या आणि माझ्या लोकांच्या पुढे ठेवा. त्यांनाच ते पाहू द्या आणि ते कोणाचे आहे हे ठरवू द्या. “वीस वर्षे मी तुमच्याबरोबर राहिलो. त्या काळात तुमच्या मेंढ्या व शेळ्या यांचा कधीही गर्भपात झाला नाही किंवा मी तुमच्या कळपातील एकाही एडक्याला खाल्ले नाही. मी तुमच्याकडे वनपशूंनी फाडलेले प्राणी आणले नाहीत; मी स्वतः नुकसान सहन केले आणि दिवसा किंवा रात्री जे काही चोरीला गेले त्याबद्दल तुम्ही माझ्याकडून भरून घेतले. माझी परिस्थिती अशी होती: दिवसभर उन्हाचा आणि रात्री थंडीच्या कहराचा त्रास होत असे आणि झोप माझ्या डोळ्यावरून उडून जात असे. अशा स्थितीत मी वीस वर्षे काढली. चौदा वर्षे तुमच्या दोन मुली मिळविण्याकरिता आणि सहा वर्षे कळप मिळविण्याकरिता आणि तेवढ्या काळात तुम्ही दहा वेळेस माझ्या वेतनात फेरबदल केला. जर माझे पिता इसहाकाचे परमेश्वर, अब्राहामाचे परमेश्वर आणि इसहाकास ज्यांचे भय वाटते, ते माझ्यासह नसते, तर तुम्ही मला रिकामी हाताने पाठवून दिले असते. पण परमेश्वराने माझे परिश्रम व माझ्या हातांनी केलेले कष्ट पाहिले आणि म्हणूनच त्यांनी तुम्हाला काल रात्री दर्शन देऊन धमकाविले.”
उत्पत्ती 31:1-42 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
नंतर याकोबाच्या कानावर लाबानाच्या मुलांचे असे म्हणणे आले की, आमच्या बापाचे होते नव्हते ते सर्व याकोबाने लुबाडले आहे, आणि आमच्या बापाच्या सर्वस्वातून त्याने ही सर्व धनदौलत मिळवली आहे. लाबान पूर्वीप्रमाणे आपल्यावर प्रसन्न नाही असे याकोबाने ताडले. परमेश्वराने याकोबाला सांगितले की, “तू आपल्या पूर्वजांच्या देशी, आपल्या आप्तांकडे परत जा, मी तुझ्याबरोबर असेन.” तेव्हा याकोबाने राहेल व लेआ ह्यांना निरोप पाठवून शेतात आपल्या कळपाकडे बोलावले. त्या आल्यावर तो त्यांना म्हणाला, “तुमच्या बापाच्या चर्येवरून मी ताडले की, तो पूर्वीप्रमाणे माझ्यावर प्रसन्न नाही, तथापि माझ्या वाडवडिलांचा देव माझ्याबरोबर आहे. मी सर्व बळ खर्चून तुमच्या बापाची चाकरी केली हे तुम्हांला ठाऊक आहे; तरी तुमच्या बापाने मला फसवून दहादा माझ्या वेतनात फेरबदल केला, पण देवाने त्याला माझी काही हानी करू दिली नाही. त्याने जेव्हा म्हटले की, ‘ठिपकेदार शेळ्यामेंढ्या तुला वेतनादाखल मिळतील,’ तेव्हा सर्व कळपांना ठिपकेदार पोरे होऊ लागली; त्याने जेव्हा म्हटले की, ‘बांड्या तुझ्या,’ तेव्हा सर्व कळपांना बांडी पोरे होऊ लागली. ह्या प्रकारे देवाने तुमच्या बापाची जनावरे हिरावून मला दिली आहेत. कळप फळायच्या ऋतूत मी स्वप्नात आपली दृष्टी वर करून पाहिले तो मेंढ्यांवर उडणारे एडके बांडे, ठिपकेदार व करडे होते. तेव्हा स्वप्नात देवदूताने मला म्हटले, “याकोबा”; मी म्हणालो, “काय आज्ञा आहे?” तो म्हणाला, “आपली दृष्टी वर करून पाहा; मेंढ्यांवर उडणारे सर्व एडके बांडे, ठिपकेदार व करडे आहेत; लाबान तुझ्याशी कसा वागत आहे हे मी पाहिले आहे. बेथेल येथे तू एका स्तंभाला अभ्यंग करून मला नवस केला तेथला मी देव आहे; आता ह्या देशातून निघून तू आपल्या जन्मभूमीस परत जा.” तेव्हा राहेल व लेआ त्याला म्हणाल्या, “आता आमच्या बापाच्या घरी आणखी काही वेगळा वाटा किंवा वतन आमच्यासाठी थोडेच ठेवले आहे? त्याच्या दृष्टीने आम्ही परक्याच की नाही? त्याने तर आम्हांला विकून टाकले आहे, आणि आमचे धनही खाऊन टाकले आहे. ह्यास्तव देवाने आमच्या बापापासून जे सर्व धन हिरावून घेतले आहे ते आमचे व आमच्या मुलाबाळांचे आहे; तर आता देवाने आपल्याला सांगितले आहे तसे करा.” मग याकोबाने उठून आपले मुलगे व बायका ह्यांना उंटांवर बसवले; आणि आपली सर्व जनावरे, धन, पदन-अरामात मिळवलेली सर्व मालमत्ता घेऊन तो आपला बाप इसहाक ह्याच्याकडे कनान देशास जायला निघाला. लाबान आपल्या मेंढरांची कातरणी करायला गेला असता राहेलीने आपल्या बापाच्या तेराफीम (गृहदेवता) चोरल्या. ह्याप्रमाणे याकोबाने अरामी लाबानास फसवले; कारण आपण पळून जात आहोत हे त्याने त्याला कळू दिले नाही. मग तो आपले सर्वकाही घेऊन पळून गेला; तो उठून फरात नदीपलीकडे गेल्यावर त्याने गिलाद डोंगराकडे जाण्याचा रोख दाखवला. याकोब पळून गेला हे तिसर्या दिवशी कोणीतरी लाबानास सांगितले. तेव्हा त्याने आपले भाऊबंद बरोबर घेऊन त्याचा सात दिवसपर्यंत पाठलाग केला आणि त्याला गिलाद डोंगरात गाठले. देवाने अरामी लाबानाला रात्री स्वप्नात येऊन सांगितले की, “सांभाळ, याकोबाला बरेवाईट काही बोलू नकोस.” लाबानाने याकोबाला गाठले तेव्हा याकोबाने डोंगरात आपला डेरा दिला होता; लाबानानेही आपल्या भाऊबंदांसह गिलाद डोंगरात डेरा दिला. मग लाबान याकोबाला म्हणाला, “तू हे काय केलेस? तू मला फसवून माझ्या मुली युद्धात पाडाव केल्याप्रमाणे घेऊन आलास. तू चोरून पळालास, मला फसवलेस, काही कळू दिले नाहीस, असे का केलेस? तू मला कळवले असतेस तर मी आनंदाने गाणेबजावणे करून, डफ, चंग वगैरे वाद्ये लावून तुला रवाना केले असते. तू मला आपल्या मुलाबाळांचे चुंबन घेण्याचीही सवड दिली नाहीस; हा सर्व तू मूर्खपणा केलास. तुला अपाय करण्याचे सामर्थ्य मला आहे, पण काल रात्री तुझ्या वडिलांच्या देवाने मला सांगितले की, सांभाळ, याकोबाला बरेवाईट काही बोलू नकोस. बरे, तुला आपल्या बापाच्या घराची ओढ लागून तू आलास तर आलास, पण माझ्या देवता का चोरल्यास?” तेव्हा याकोबाने लाबानास उत्तर दिले, “मला भीती वाटली; मी म्हणालो, कोण जाणे आपण माझ्याकडून आपल्या मुली हिरावून घ्याल. आपल्या देवता ज्याच्याजवळ सापडतील तो जिवंत राहायचा नाही; आपण आपल्या भाऊबंदांदेखत माझी झडती घेऊन आपले काही सापडेल तर ओळखून खुशाल घ्या.” कारण राहेलीने देवता चोरून आणल्या होत्या हे याकोबाला माहीत नव्हते. तेव्हा लाबान याकोबाच्या डेर्यात, लेआच्या डेर्यात आणि त्या दोन दासींच्या डेर्यात गेला, परंतु त्याला काही सापडले नाही. मग तो लेआच्या डेर्यातून राहेलीच्या डेर्यात गेला. राहेल त्या गृहदेवता घेऊन व उंटाच्या कंठाळीत ठेवून त्यांवर बसली होती. लाबानाने सर्व डेरा शोधून पाहिला पण त्याला काही सापडले नाही. ती बापाला म्हणाली, “स्वामी, मला आपल्यापुढे उठून उभे राहवत नाही म्हणून रागावू नका, कारण मला स्त्रीधर्म प्राप्त झाला आहे.” अशा प्रकारे त्याने शोध केला; पण त्याला त्या गृहदेवता सापडल्या नाहीत. तेव्हा याकोब रागावला. लाबानाशी तक्रार करू लागला; याकोबाने लाबानाला म्हटले, “आपण माझा पाठलाग करावा असा कोणता अपराध, कोणते पातक मी केले? आपण माझ्या सर्व सामानाची झडती घेतली त्यांत आपल्या घरच्या काही वस्तू सापडल्या काय? सापडल्या असल्यास त्या ह्या माझ्या व आपल्या भाऊबंदांसमोर ठेवा; म्हणजे त्यांना आपल्या दोघांचा निवाडा करता येईल. आज वीस वर्षें मी आपल्याजवळ राहिलो; इतक्या काळात आपल्या शेळ्यामेंढ्या गाभटल्या नाहीत व आपल्या कळपातले एडके मी खाल्ले नाहीत. वनपशूंनी जी फाडून खाल्ली ती तशीच आपल्याकडे न आणता मी त्यांच्याऐवजी दुसरी भरून दिली; दिवसा-रात्री चोरीस गेलेली आपण माझ्यापासून भरून घेतलीत. दिवसा उन्हाचा ताप व रात्री गारठा ह्यांनी मी जर्जर होई; माझ्या डोळ्यांची झोप उडे, अशी माझी दशा होती. गेली वीस वर्षे मी आपल्या घरी काढली; चौदा वर्षे आपल्या दोन्ही मुलींसाठी आणि सहा वर्षे आपल्या शेरडामेंढरांसाठी मी आपली चाकरी केली. आणि दहादा आपण माझ्या वेतनात फेरबदल केला. माझ्या पित्याचा देव, अब्राहामाचा देव आणि इसहाकाचा ‘धाक’ (देव) माझा पाठीराखा नसता तर आताही आपण मला रिकामे लावून दिले असते. माझे दु:ख व माझ्या हातांनी केलेले कष्ट देवाने पाहून काल रात्री आपल्याला धमकावले.”