उत्पत्ती 3:4-10
उत्पत्ती 3:4-10 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
सर्प स्त्रीला म्हणाला, “तुम्ही खरोखर मरणार नाही; कारण देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील. आणि तुम्ही देवासारखे बरेवाईट जाणणारे व्हाल.” त्या झाडाचे फळ खायला चांगले, दिसायला मनोहर आणि शहाणे करायला इष्ट आहे असे त्या स्त्रीला दिसून आले; तेव्हा तिने त्याचे फळ काढून खाल्ले, आणि आपल्याबरोबर आपल्या पतीलाही ते दिले व त्याने ते खाल्ले. तेव्हा त्या उभयतांचे डोळे उघडले आणि ‘आपण नग्न आहोत’ असे त्यांना कळून आले; तेव्हा त्यांनी अंजिराची पाने शिवून आपणासाठी कटिवेष्टने केली. ह्यानंतर शिळोप्याचा वारा सुटला असता परमेश्वर देव बागेत फिरत होता, त्याचा आवाज त्यांना ऐकू आला, तेव्हा परमेश्वर देवाच्या दृष्टीपुढून आदाम व त्याची स्त्री बागेतील झाडांमध्ये लपली. तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला हाक मारून म्हटले, “तू कोठे आहेस?” तो म्हणाला, “मी बागेत तुझा आवाज ऐकला, तेव्हा मी नग्न आहे म्हणून भिऊन लपलो.”
उत्पत्ती 3:4-10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
सर्प त्या स्त्रीला म्हणाला, “तुम्ही खरोखर मरणार नाही. कारण देवास हे माहीत आहे की, जर तुम्ही त्या झाडाचे फळ खाल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील, व तुम्ही देवांसारखे बरेवाईट जाणणारे व्हाल.” आणि स्त्रीने पाहिले की, त्या झाडाचे फळ खाण्यास चांगले व डोळ्यांना आनंद देणारे व शहाणे करण्यासाठी इष्ट आहे, तेव्हा तिने त्याचे काही फळ घेऊन खाल्ले. आणि तिने आपल्याबरोबर आपल्या पतीसही त्या फळातून थोडे दिले व त्याने ते खाल्ले. तेव्हा त्या दोघांचे डोळे उघडले व आपण नग्न आहोत असे त्यांना समजले; तेव्हा त्यांनी अंजिराची पाने एकत्र जोडून आपणाला झाकण्यासाठी वस्त्रे तयार केली. दिवसाचा थंड वारा सुटला असता परमेश्वर देव बागेत आला. त्या वेळी त्यांनी त्याचा आवाज ऐकला. आणि परमेश्वर देवाच्या समक्षतेपासून दृष्टीआड व्हावे म्हणून मनुष्य व त्याची पत्नी बागेच्या झाडांमध्ये लपली. तेव्हा परमेश्वर देवाने मनुष्यास हाक मारुन म्हटले, “तू कोठे आहेस?” मनुष्य म्हणाला, “बागेत मी तुझा आवाज ऐकला व मला भीती वाटली, कारण मी नग्न होतो. म्हणून मी लपलो.”
उत्पत्ती 3:4-10 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
पण सर्प त्या स्त्रीला म्हणाला, “तुम्ही निश्चितच मरणार नाही, कारण परमेश्वराला हे माहीत आहे की ज्या दिवशी ते फळ तुम्ही खाल, त्या दिवशी तुमचे डोळे उघडतील आणि चांगले व वाईट यातील फरक तुम्हाला समजेल आणि तुम्ही परमेश्वरासारखे व्हाल.” जेव्हा स्त्रीने पाहिले की खाण्यास योग्य, दिसण्यास सुंदर आणि सुज्ञ करणारे ते झाड आहे, तेव्हा तिने त्याच्या फळातील काही तोडून घेतले आणि खाल्ले आणि आपला पती, जो तिच्यासोबत होता, त्यालाही दिले आणि त्याने ते खाल्ले. पण मग त्यांचे डोळे उघडले आणि आपण नग्न असल्याचे त्यांना समजले; नंतर त्यांनी स्वतःसाठी अंजिराच्या पानांची कटिवेष्टने केली. सायंकाळी याहवेह परमेश्वर बागेतून फिरत असल्याचा आवाज त्यांनी ऐकला आणि आदाम व त्याची पत्नी, याहवेह परमेश्वरापासून बागेतील झाडामागे लपली. परंतु याहवेह परमेश्वराने आदामाला हाक मारून म्हटले, “तू कुठे आहेस?” आदाम म्हणाला, “बागेत मी तुमचा आवाज ऐकला आणि मला भीती वाटली, कारण मी नग्न होतो; त्यामुळे लपून बसलो.”