उत्पत्ती 3:1-15
उत्पत्ती 3:1-15 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परमेश्वर देवाने निर्माण केलेल्या सर्व वनपशूंमध्ये सर्प हा अतिशय धूर्त होता. तो स्त्रीला म्हणाला, “‘बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नका’ असे देवाने तुम्हास खरोखरच सांगितले आहे काय?” स्त्रीने सर्पाला उत्तर दिले, “बागेतल्या झाडांची फळे आम्ही खाऊ शकतो. परंतु बागेच्या मधोमध जे झाड आहे, त्याच्या फळाविषयी देवाने म्हटले, ते खाऊ नका. त्या झाडाला स्पर्शही करू नका, नाहीतर तुम्ही मराल.” सर्प त्या स्त्रीला म्हणाला, “तुम्ही खरोखर मरणार नाही. कारण देवास हे माहीत आहे की, जर तुम्ही त्या झाडाचे फळ खाल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील, व तुम्ही देवांसारखे बरेवाईट जाणणारे व्हाल.” आणि स्त्रीने पाहिले की, त्या झाडाचे फळ खाण्यास चांगले व डोळ्यांना आनंद देणारे व शहाणे करण्यासाठी इष्ट आहे, तेव्हा तिने त्याचे काही फळ घेऊन खाल्ले. आणि तिने आपल्याबरोबर आपल्या पतीसही त्या फळातून थोडे दिले व त्याने ते खाल्ले. तेव्हा त्या दोघांचे डोळे उघडले व आपण नग्न आहोत असे त्यांना समजले; तेव्हा त्यांनी अंजिराची पाने एकत्र जोडून आपणाला झाकण्यासाठी वस्त्रे तयार केली. दिवसाचा थंड वारा सुटला असता परमेश्वर देव बागेत आला. त्या वेळी त्यांनी त्याचा आवाज ऐकला. आणि परमेश्वर देवाच्या समक्षतेपासून दृष्टीआड व्हावे म्हणून मनुष्य व त्याची पत्नी बागेच्या झाडांमध्ये लपली. तेव्हा परमेश्वर देवाने मनुष्यास हाक मारुन म्हटले, “तू कोठे आहेस?” मनुष्य म्हणाला, “बागेत मी तुझा आवाज ऐकला व मला भीती वाटली, कारण मी नग्न होतो. म्हणून मी लपलो.” परमेश्वर त्यास म्हणाला, “तू नग्न आहेस हे तुला कोणी सांगितले? ज्या झाडाचे फळ तू खाऊ नकोस अशी मी तुला आज्ञा दिली होती त्या झाडाचे फळ तू खाल्लेस काय?” मनुष्य म्हणाला, “तू ही स्त्री माझ्या सोबतीस म्हणून दिलीस, तिने त्या झाडाचे फळ मला दिले आणि म्हणून मी ते खाल्ले.” मग परमेश्वर देव त्या स्त्रीस म्हणाला, “तू हे काय केलेस?” ती स्त्री म्हणाली, “सर्पाने मला फसवले व म्हणून मी ते फळ खाल्ले.” परमेश्वर देव सर्पास म्हणाला, “तू हे केल्यामुळे सर्व गुरेढोरांमध्ये व सर्व वन्यपशूंमध्ये तू शापित आहेस. तू पोटाने सरपटत चालशील आणि आयुष्यभर तू माती खाशील. तुझ्यामध्ये व स्त्रीमध्ये आणि तुझ्या बीजामध्ये व स्त्रीच्या बीजामध्ये मी शत्रूत्व ठेवीन. तो तुझे डोके ठेचील आणि तू त्याची टाच फोडशील.”
उत्पत्ती 3:1-15 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
परमेश्वर देवाने केलेल्या सर्व वनचरांत सर्प फार धूर्त होता. तो स्त्रीला म्हणाला, “तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हांला सांगितले हे खरे काय?” स्त्रीने सर्पाला म्हटले, “बागेतल्या झाडांची फळे खाण्याची आम्हांला मोकळीक आहे: पण बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाच्या फळाविषयी देवाने सांगितले आहे की ते खाऊ नका; त्याला स्पर्शही करू नका, कराल तर मराल.” सर्प स्त्रीला म्हणाला, “तुम्ही खरोखर मरणार नाही; कारण देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील. आणि तुम्ही देवासारखे बरेवाईट जाणणारे व्हाल.” त्या झाडाचे फळ खायला चांगले, दिसायला मनोहर आणि शहाणे करायला इष्ट आहे असे त्या स्त्रीला दिसून आले; तेव्हा तिने त्याचे फळ काढून खाल्ले, आणि आपल्याबरोबर आपल्या पतीलाही ते दिले व त्याने ते खाल्ले. तेव्हा त्या उभयतांचे डोळे उघडले आणि ‘आपण नग्न आहोत’ असे त्यांना कळून आले; तेव्हा त्यांनी अंजिराची पाने शिवून आपणासाठी कटिवेष्टने केली. ह्यानंतर शिळोप्याचा वारा सुटला असता परमेश्वर देव बागेत फिरत होता, त्याचा आवाज त्यांना ऐकू आला, तेव्हा परमेश्वर देवाच्या दृष्टीपुढून आदाम व त्याची स्त्री बागेतील झाडांमध्ये लपली. तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला हाक मारून म्हटले, “तू कोठे आहेस?” तो म्हणाला, “मी बागेत तुझा आवाज ऐकला, तेव्हा मी नग्न आहे म्हणून भिऊन लपलो.” देवाने म्हटले, “तू नग्न आहेस हे तुला कोणी सांगितले? ज्या झाडाचे फळ तू खाऊ नकोस अशी मी तुला आज्ञा केली होती त्याचे फळ तू खाल्लेस काय?” आदाम म्हणाला, “जी स्त्री तू मला सोबतीला दिलीस तिने त्या झाडाचे फळ मला दिले आणि ते मी खाल्ले.” परमेश्वर देव त्या स्त्रीला म्हणाला, “हे तू काय केलेस?” स्त्री म्हणाली, “सर्पाने मला भुरळ घातली म्हणून मी ते खाल्ले.” तेव्हा परमेश्वर देव सर्पाला म्हणाला, “तू हे केलेस म्हणून सर्व ग्रामपशू व वनचर ह्यांच्यापेक्षा तू शापग्रस्त हो; तू पोटाने चालशील आणि आयुष्यभर माती खाशील; आणि तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती ह्यांच्यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन; ती तुझे डोके फोडील, व तू तिची टाच फोडशील.”