YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 3:1-10

उत्पत्ती 3:1-10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

परमेश्वर देवाने निर्माण केलेल्या सर्व वनपशूंमध्ये सर्प हा अतिशय धूर्त होता. तो स्त्रीला म्हणाला, “‘बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नका’ असे देवाने तुम्हास खरोखरच सांगितले आहे काय?” स्त्रीने सर्पाला उत्तर दिले, “बागेतल्या झाडांची फळे आम्ही खाऊ शकतो. परंतु बागेच्या मधोमध जे झाड आहे, त्याच्या फळाविषयी देवाने म्हटले, ते खाऊ नका. त्या झाडाला स्पर्शही करू नका, नाहीतर तुम्ही मराल.” सर्प त्या स्त्रीला म्हणाला, “तुम्ही खरोखर मरणार नाही. कारण देवास हे माहीत आहे की, जर तुम्ही त्या झाडाचे फळ खाल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील, व तुम्ही देवांसारखे बरेवाईट जाणणारे व्हाल.” आणि स्त्रीने पाहिले की, त्या झाडाचे फळ खाण्यास चांगले व डोळ्यांना आनंद देणारे व शहाणे करण्यासाठी इष्ट आहे, तेव्हा तिने त्याचे काही फळ घेऊन खाल्ले. आणि तिने आपल्याबरोबर आपल्या पतीसही त्या फळातून थोडे दिले व त्याने ते खाल्ले. तेव्हा त्या दोघांचे डोळे उघडले व आपण नग्न आहोत असे त्यांना समजले; तेव्हा त्यांनी अंजिराची पाने एकत्र जोडून आपणाला झाकण्यासाठी वस्त्रे तयार केली. दिवसाचा थंड वारा सुटला असता परमेश्वर देव बागेत आला. त्या वेळी त्यांनी त्याचा आवाज ऐकला. आणि परमेश्वर देवाच्या समक्षतेपासून दृष्टीआड व्हावे म्हणून मनुष्य व त्याची पत्नी बागेच्या झाडांमध्ये लपली. तेव्हा परमेश्वर देवाने मनुष्यास हाक मारुन म्हटले, “तू कोठे आहेस?” मनुष्य म्हणाला, “बागेत मी तुझा आवाज ऐकला व मला भीती वाटली, कारण मी नग्न होतो. म्हणून मी लपलो.”

सामायिक करा
उत्पत्ती 3 वाचा

उत्पत्ती 3:1-10 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

परमेश्वर देवाने केलेल्या सर्व वनचरांत सर्प फार धूर्त होता. तो स्त्रीला म्हणाला, “तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हांला सांगितले हे खरे काय?” स्त्रीने सर्पाला म्हटले, “बागेतल्या झाडांची फळे खाण्याची आम्हांला मोकळीक आहे: पण बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाच्या फळाविषयी देवाने सांगितले आहे की ते खाऊ नका; त्याला स्पर्शही करू नका, कराल तर मराल.” सर्प स्त्रीला म्हणाला, “तुम्ही खरोखर मरणार नाही; कारण देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील. आणि तुम्ही देवासारखे बरेवाईट जाणणारे व्हाल.” त्या झाडाचे फळ खायला चांगले, दिसायला मनोहर आणि शहाणे करायला इष्ट आहे असे त्या स्त्रीला दिसून आले; तेव्हा तिने त्याचे फळ काढून खाल्ले, आणि आपल्याबरोबर आपल्या पतीलाही ते दिले व त्याने ते खाल्ले. तेव्हा त्या उभयतांचे डोळे उघडले आणि ‘आपण नग्न आहोत’ असे त्यांना कळून आले; तेव्हा त्यांनी अंजिराची पाने शिवून आपणासाठी कटिवेष्टने केली. ह्यानंतर शिळोप्याचा वारा सुटला असता परमेश्वर देव बागेत फिरत होता, त्याचा आवाज त्यांना ऐकू आला, तेव्हा परमेश्वर देवाच्या दृष्टीपुढून आदाम व त्याची स्त्री बागेतील झाडांमध्ये लपली. तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला हाक मारून म्हटले, “तू कोठे आहेस?” तो म्हणाला, “मी बागेत तुझा आवाज ऐकला, तेव्हा मी नग्न आहे म्हणून भिऊन लपलो.”

सामायिक करा
उत्पत्ती 3 वाचा