उत्पत्ती 29:31-34
उत्पत्ती 29:31-34 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परमेश्वराने पाहिले की याकोबाचे लेआपेक्षा राहेलीवर अधिक प्रेम आहे, म्हणून परमेश्वराने लेआला मुले होऊ दिली परंतु राहेल निःसंतान होती. लेआला मुलगा झाला, तिने त्याचे नाव रऊबेन ठेवले. कारण ती म्हणाली, “परमेश्वराने माझे दुःख पाहिले आहे; कारण माझा पती माझ्यावर प्रेम करीत नाही; परंतु आता कदाचित तो माझ्यावर प्रेम करील.” लेआ पुन्हा गरोदर राहिली आणि तिला आणखी एक मुलगा झाला. ती म्हणाली, “माझ्या नवऱ्याचे माझ्यावर प्रेम नाही हे परमेश्वराने ऐकले आहे, म्हणून त्याने मला हा सुद्धा मुलगा दिला आहे,” आणि या मुलाचे नाव तिने शिमोन ठेवले. लेआ पुन्हा गर्भवती झाली व तिला मुलगा झाला. ती म्हणाली, “आता मात्र माझा पती माझ्यावर नक्की प्रेम करील कारण मी त्यांना तीन पुत्र दिले आहेत.” त्यामुळे तिने त्याचे नाव लेवी असे ठेवले.
उत्पत्ती 29:31-34 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
याकोब लेआला कमी प्रीती करीत आहे, म्हणून याहवेहने तिला गर्भधारणा करण्याचे सामर्थ्य दिले, पण राहेल वांझच राहिली. लेआ गर्भवती झाली व तिला एक पुत्र झाला आणि तिने त्याचे नाव रऊबेन असे ठेवले. कारण लेआ म्हणाली, “याहवेहने माझे दुःख पाहिले आहे. आता माझे पती माझ्यावर प्रेम करतील.” लवकरच ती पुन्हा गर्भवती झाली आणि तिला दुसरा पुत्र झाला. तिने त्याचे नाव शिमओन असे ठेवले, कारण ती म्हणाली, “याहवेहने माझे ऐकले आहे, मी नावडती आहे म्हणून त्यांनी मला आणखी एक पुत्र दिला.” मग ती पुन्हा गर्भवती झाली आणि तिला पुत्र झाला; आणि ती म्हणाली, “यावेळी माझे पती माझ्याशी पुन्हा जोडले जातील, कारण मी त्यांना तीन पुत्र दिले.” म्हणून त्याचे नाव लेवी असे ठेवण्यात आले.
उत्पत्ती 29:31-34 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
परमेश्वराने पाहिले की, लेआ नावडती आहे; म्हणून त्याने तिची कूस वाहती केली आणि राहेल वांझ राहिली. लेआ गर्भवती होऊन तिला मुलगा झाला, त्याचे नाव तिने ‘रऊबेन’ ठेवले; ती म्हणाली, “परमेश्वराने माझ्या दु:खाकडे पाहिले आहे, कारण आता माझा नवरा माझ्यावर प्रीती करील.” ती पुन: गर्भवती होऊन तिला मुलगा झाला, तेव्हा ती म्हणाली, “मी नावडती आहे हे देवाने ऐकले म्हणून त्याने मला हाही दिला;” आणि तिने त्याचे नाव ‘शिमोन’ ठेवले. ती पुन: गर्भवती होऊन तिला मुलगा झाला; तेव्हा ती म्हणाली, “मला आता तीन मुलगे झाले, आता तरी माझा नवरा माझ्याशी मिळून राहील;” म्हणून तिने त्याचे नाव ‘लेवी’ ठेवले.