YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 29:25-35

उत्पत्ती 29:25-35 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

सकाळी याकोबाने पाहिले तो पाहा, ती लेआ होती. मग याकोब लाबानाला म्हणाला, “तुम्ही मला हे काय केले आहे? मी राहेलीसाठी तुमची चाकरी केली नाही काय? तुम्ही मला का फसवले?” लाबान म्हणाला, “आमच्या रीतीरीवाजाप्रमाणे थोरल्या मुलीच्या आधी आम्ही धाकट्या मुलीला देत नाही. या मुलीचा लग्न विधीचा सप्ताह पूर्ण होऊ दे, म्हणजे मग मी तुला लग्न करण्यासाठी दुसरीही देतो, परंतु त्यासाठी तू आणखी सात वर्षे माझी सेवाचाकरी केली पाहिजेस.” त्याप्रमाणे याकोबाने केले, लेआचे सप्तक पूर्ण केले. मग लाबानाने त्याची धाकटी कन्या राहेल त्यास पत्नी करून दिली; लाबानाने आपली दासी बिल्हा, आपली कन्या राहेल हिला दासी म्हणून दिली. तेव्हा मग याकोबाने राहेलीशीही लग्न केले; आणि याकोबाचे लेआपेक्षा राहेलीवर अधिक प्रेम होते, म्हणून लाबानाकडे याकोबाने राहेलीसाठी आणखी सात वर्षे सेवाचाकरी केली. परमेश्वराने पाहिले की याकोबाचे लेआपेक्षा राहेलीवर अधिक प्रेम आहे, म्हणून परमेश्वराने लेआला मुले होऊ दिली परंतु राहेल निःसंतान होती. लेआला मुलगा झाला, तिने त्याचे नाव रऊबेन ठेवले. कारण ती म्हणाली, “परमेश्वराने माझे दुःख पाहिले आहे; कारण माझा पती माझ्यावर प्रेम करीत नाही; परंतु आता कदाचित तो माझ्यावर प्रेम करील.” लेआ पुन्हा गरोदर राहिली आणि तिला आणखी एक मुलगा झाला. ती म्हणाली, “माझ्या नवऱ्याचे माझ्यावर प्रेम नाही हे परमेश्वराने ऐकले आहे, म्हणून त्याने मला हा सुद्धा मुलगा दिला आहे,” आणि या मुलाचे नाव तिने शिमोन ठेवले. लेआ पुन्हा गर्भवती झाली व तिला मुलगा झाला. ती म्हणाली, “आता मात्र माझा पती माझ्यावर नक्की प्रेम करील कारण मी त्यांना तीन पुत्र दिले आहेत.” त्यामुळे तिने त्याचे नाव लेवी असे ठेवले. त्यानंतर लेआ पुन्हा गर्भवती झाली आणि तिला आणखी एक मुलगा झाला. ती म्हणाली, “आता मी परमेश्वराची स्तुती करीन.” त्यामुळे तिने त्याचे नाव यहूदा ठेवले; नंतर तिला मुल होण्याचे थांबले.

सामायिक करा
उत्पत्ती 29 वाचा

उत्पत्ती 29:25-35 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

पण याकोब सकाळी उठून पाहतो, तर ती लेआ होती! याकोब लाबानाला म्हणाला, “हे तुम्ही काय केले? मी राहेलसाठी सात वर्षे काम केले आणि तुम्ही माझी अशी फसवणूक का केली?” लाबानाने उत्तर दिले, “मोठ्या बहिणीचे लग्न झाल्याशिवाय धाकट्या बहिणीचे लग्न करून देण्याची आमच्यात प्रथा नाही. लग्नाचा सप्ताह पूर्ण होऊ दे, मग माझ्यासाठी आणखी सात वर्षे काम करण्याचे तू वचन देत असशील तर राहेलही तुला मिळेल.” याकोबाने त्याप्रमाणे केले. त्याने लेआसोबत संपूर्ण एक आठवडा घालविला, मग लाबानाने त्याला त्याची कन्या राहेल ही पत्नी म्हणून दिली. लाबानाने आपली दासी बिल्हा, त्याची कन्या राहेलला दासी म्हणून दिली. मग याकोबाने राहेलचाही पत्नी म्हणून स्वीकार केला. तो तिच्यावर लेआपेक्षा अधिक प्रेम करी आणि तिच्यासाठी आणखी सात वर्षे तिथे राहून त्याने काम केले. याकोब लेआला कमी प्रीती करीत आहे, म्हणून याहवेहने तिला गर्भधारणा करण्याचे सामर्थ्य दिले, पण राहेल वांझच राहिली. लेआ गर्भवती झाली व तिला एक पुत्र झाला आणि तिने त्याचे नाव रऊबेन असे ठेवले. कारण लेआ म्हणाली, “याहवेहने माझे दुःख पाहिले आहे. आता माझे पती माझ्यावर प्रेम करतील.” लवकरच ती पुन्हा गर्भवती झाली आणि तिला दुसरा पुत्र झाला. तिने त्याचे नाव शिमओन असे ठेवले, कारण ती म्हणाली, “याहवेहने माझे ऐकले आहे, मी नावडती आहे म्हणून त्यांनी मला आणखी एक पुत्र दिला.” मग ती पुन्हा गर्भवती झाली आणि तिला पुत्र झाला; आणि ती म्हणाली, “यावेळी माझे पती माझ्याशी पुन्हा जोडले जातील, कारण मी त्यांना तीन पुत्र दिले.” म्हणून त्याचे नाव लेवी असे ठेवण्यात आले. ती पुन्हा एकदा गर्भवती झाली आणि तिला आणखी एक पुत्र झाला तिने त्याचे नाव यहूदाह असे ठेवले, कारण ती म्हणाली, “आता मी याहवेहची स्तुती करेन.” यानंतर तिला मूल होण्याचे थांबले.

सामायिक करा
उत्पत्ती 29 वाचा

उत्पत्ती 29:25-35 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

सकाळ झाली तेव्हा पाहतो तर ती लेआ; मग तो लाबानास म्हणाला, “आपण माझ्याशी हे काय केले? मी राहेलीसाठी आपली चाकरी केली ना? मला का फसवले?” त्याला लाबान म्हणाला, “वडील मुलीच्या आधी धाकटीला द्यावे अशी आमच्याकडे चाल नाही. हिचे सप्तक भरून दे, मग आम्ही तीही तुला देऊ. त्याबद्दल तुला आणखी सात वर्षे माझी चाकरी करावी लागेल.” याकोबाने तसे केले; आणि तिचे सप्तक पुरे केल्यावर त्याने त्याला आपली मुलगी राहेल बायको करून दिली. लाबानाने आपली दासी बिल्हा ही आपली मुलगी राहेल हिची दासी म्हणून तिला दिली. तो राहेलीपाशीही गेला; लेआपेक्षा राहेलीवर त्याची प्रीती अधिक होती म्हणून त्याने आणखी सात वर्षे त्याच्याकडे राहून त्याची चाकरी केली. परमेश्वराने पाहिले की, लेआ नावडती आहे; म्हणून त्याने तिची कूस वाहती केली आणि राहेल वांझ राहिली. लेआ गर्भवती होऊन तिला मुलगा झाला, त्याचे नाव तिने ‘रऊबेन’ ठेवले; ती म्हणाली, “परमेश्वराने माझ्या दु:खाकडे पाहिले आहे, कारण आता माझा नवरा माझ्यावर प्रीती करील.” ती पुन: गर्भवती होऊन तिला मुलगा झाला, तेव्हा ती म्हणाली, “मी नावडती आहे हे देवाने ऐकले म्हणून त्याने मला हाही दिला;” आणि तिने त्याचे नाव ‘शिमोन’ ठेवले. ती पुन: गर्भवती होऊन तिला मुलगा झाला; तेव्हा ती म्हणाली, “मला आता तीन मुलगे झाले, आता तरी माझा नवरा माझ्याशी मिळून राहील;” म्हणून तिने त्याचे नाव ‘लेवी’ ठेवले. ती पुन: गर्भवती होऊन तिला मुलगा झाला तेव्हा ती म्हणाली, “आता मी परमेश्वराचे स्तवन करीन;” ह्यावरून तिने त्याचे नाव ‘यहूदा’ ठेवले, पुढे तिचे जनन थांबले.

सामायिक करा
उत्पत्ती 29 वाचा