उत्पत्ती 29:18-28
उत्पत्ती 29:18-28 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
याकोबाचे राहेलीवर प्रेम होते, म्हणून तो लाबानास म्हणाला, “तुझी धाकटी मुलगी राहेल हिच्यासाठी मी सात वर्षे तुमची सेवाचाकरी करीन.” लाबान म्हणाला, “परक्या मनुष्यास देण्यापेक्षा, ती मी तुला द्यावी हे बरे आहे. माझ्यापाशी राहा.” म्हणून याकोबाने सात वर्षे राहेलसाठी सेवाचाकरी केली; आणि राहेलीवरील प्रेमामुळे ती वर्षे त्यास फार थोड्या दिवसांसारखी वाटली. नंतर याकोब लाबानास म्हणाला, “आता माझी मुदत भरली आहे, माझी पत्नी मला द्या म्हणजे मी तिच्याशी लग्न करीन.” तेव्हा लाबानाने तेथील सर्व लोकांस एकत्र केले आणि मेजवानी दिली. त्या संध्याकाळी लाबानाने आपली मुलगी लेआ हिला घेतले आणि याकोबाकडे आणले; तो तिच्यापाशी गेला लाबानाने आपली दासी जिल्पा आपल्या मुलीची दासी म्हणून तिला दिली. सकाळी याकोबाने पाहिले तो पाहा, ती लेआ होती. मग याकोब लाबानाला म्हणाला, “तुम्ही मला हे काय केले आहे? मी राहेलीसाठी तुमची चाकरी केली नाही काय? तुम्ही मला का फसवले?” लाबान म्हणाला, “आमच्या रीतीरीवाजाप्रमाणे थोरल्या मुलीच्या आधी आम्ही धाकट्या मुलीला देत नाही. या मुलीचा लग्न विधीचा सप्ताह पूर्ण होऊ दे, म्हणजे मग मी तुला लग्न करण्यासाठी दुसरीही देतो, परंतु त्यासाठी तू आणखी सात वर्षे माझी सेवाचाकरी केली पाहिजेस.” त्याप्रमाणे याकोबाने केले, लेआचे सप्तक पूर्ण केले. मग लाबानाने त्याची धाकटी कन्या राहेल त्यास पत्नी करून दिली
उत्पत्ती 29:18-28 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
याकोबाचे राहेलवर प्रेम बसले होते, म्हणून तो म्हणाला, “मला तुमची धाकटी मुलगी राहेल पत्नी म्हणून द्याल, तर मी तुमच्यासाठी सात वर्षे काम करेन.” लाबान म्हणाला, “परकीय मनुष्याला तिला देण्यापेक्षा ती तुला देणेच उत्तम आहे. माझ्यासोबत इथे राहा.” याप्रमाणे याकोबाने राहेलकरिता पुढील सात वर्षे काम केले. परंतु त्याचे तिच्यावर इतके प्रेम होते की, ही वर्षे त्याला काही दिवसांप्रमाणे भासली. तेव्हा याकोब लाबानाला म्हणाला, “माझी पत्नी मला द्या. माझी मुदत संपली आहे, आता मला तिचा स्वीकार करता येईल.” तेव्हा लाबानाने वस्तीतील सर्व लोकांना बोलाविले आणि मेजवानी दिली. परंतु संध्याकाळी लाबानाने आपली कन्या लेआला याकोबाकडे पाठविले आणि याकोबाने तिच्याबरोबर रात्र घालविली. आणि लाबानाने आपली दासी जिल्पा, त्याची कन्या लेआ हिला दासी म्हणून दिली. पण याकोब सकाळी उठून पाहतो, तर ती लेआ होती! याकोब लाबानाला म्हणाला, “हे तुम्ही काय केले? मी राहेलसाठी सात वर्षे काम केले आणि तुम्ही माझी अशी फसवणूक का केली?” लाबानाने उत्तर दिले, “मोठ्या बहिणीचे लग्न झाल्याशिवाय धाकट्या बहिणीचे लग्न करून देण्याची आमच्यात प्रथा नाही. लग्नाचा सप्ताह पूर्ण होऊ दे, मग माझ्यासाठी आणखी सात वर्षे काम करण्याचे तू वचन देत असशील तर राहेलही तुला मिळेल.” याकोबाने त्याप्रमाणे केले. त्याने लेआसोबत संपूर्ण एक आठवडा घालविला, मग लाबानाने त्याला त्याची कन्या राहेल ही पत्नी म्हणून दिली.
उत्पत्ती 29:18-28 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
याकोबाची राहेलवर प्रीती बसली होती म्हणून तो म्हणाला, “आपली धाकटी मुलगी राहेल हिच्यासाठी मी सात वर्षे आपली चाकरी करीन.” ह्यावर लाबान म्हणाला, “ती परक्या माणसाला देण्यापेक्षा तुला द्यावी हे बरे; तू माझ्याकडे राहा.” तेव्हा याकोबाने राहेलीसाठी सात वर्षे चाकरी केली; तिच्यावर त्याची प्रीती असल्यामुळे ती वर्षे त्याला केवळ थोड्या दिवसांसारखी भासली. नंतर याकोब लाबानास म्हणाला, “आता माझी मुदत भरली आहे, माझी बायको मला द्या म्हणजे मी तिच्यापाशी जाईन.” मग लाबानाने तेथल्या सर्व लोकांना जमवून मेजवानी दिली. संध्याकाळी असे झाले की त्याने आपली मुलगी लेआ हिला त्याच्याकडे आणले, तेव्हा तो तिच्यापाशी गेला. लाबानाने आपली दासी जिल्पा ही आपली मुलगी लेआ हिची दासी म्हणून तिला दिली. सकाळ झाली तेव्हा पाहतो तर ती लेआ; मग तो लाबानास म्हणाला, “आपण माझ्याशी हे काय केले? मी राहेलीसाठी आपली चाकरी केली ना? मला का फसवले?” त्याला लाबान म्हणाला, “वडील मुलीच्या आधी धाकटीला द्यावे अशी आमच्याकडे चाल नाही. हिचे सप्तक भरून दे, मग आम्ही तीही तुला देऊ. त्याबद्दल तुला आणखी सात वर्षे माझी चाकरी करावी लागेल.” याकोबाने तसे केले; आणि तिचे सप्तक पुरे केल्यावर त्याने त्याला आपली मुलगी राहेल बायको करून दिली.