उत्पत्ती 26:1-16
उत्पत्ती 26:1-16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
अब्राहामाच्या दिवसात जो पहिला दुष्काळ पडला होता त्यासारखा दुसरा दुष्काळ त्या देशात पडला. तेव्हा इसहाक पलिष्ट्यांचा राजा अबीमलेख याजकडे गरार नगरामध्ये गेला. परमेश्वराने त्यास दर्शन देऊन म्हटले, “तू मिसर देशात खाली जाऊ नकोस; जो देश मी तुला सांगेन त्यामध्येच राहा. या देशात उपरी म्हणून राहा आणि मी तुझ्याबरोबर असेन आणि मी तुला आशीर्वाद देईन; कारण हे सर्व देश मी तुझ्या वंशजाला देईन, आणि तुझ्या बाप अब्राहाम याला शपथ घेऊन जे वचन दिले आहे ते सर्व मी पूर्ण करीन. मी तुझे वंशज आकाशातील ताऱ्यांइतके बहुगुणित करीन आणि हे सर्व देश मी तुझ्या वंशजांना देईन. तुझ्या वंशजांद्वारे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे आशीर्वादित होतील. मी हे करीन कारण अब्राहामाने माझा शब्द पाळला आणि माझे विधी, माझ्या आज्ञा, माझे नियम व माझे कायदे पाळले.” म्हणून मग इसहाक गरारातच राहिला. जेव्हा तेथील लोकांनी त्याच्या पत्नीविषयी त्यास विचारले, तेव्हा तो म्हणाला, “ती माझी बहीण आहे.” “ती माझी पत्नी आहे,” असे म्हणण्यास तो घाबरला. कारण त्याने विचार केला की, “रिबकेला मिळविण्यासाठी या ठिकाणचे लोक माझा घात करतील, कारण ती दिसायला इतकी सुंदर आहे.” इसहाक बराच काळ तेथे राहिल्यावर, पलिष्ट्यांचा राजा अबीमलेख ह्याने एकदा खिडकीतून बाहेर पाहताना पाहिले की, इसहाक त्याच्या पत्नीला रिबकेला प्रेमाने कुरवाळत आहे. अबीमलेखाने इसहाकाला बोलावले आणि म्हणाला, “पाहा नक्कीच ही तुझी पत्नी आहे. मग, ‘ती तुझी बहीण आहे’ असे तू का सांगितलेस?” इसहाक त्यास म्हणाला, “कारण मला वाटले की, तिला मिळविण्यासाठी कोणीही मला मारून टाकेल.” अबीमलेख म्हणाला, “तू आम्हांला हे काय केलेस? कारण आमच्या लोकांतून कोणीही तुझ्या पत्नीबरोबर सहज लैंगिक संबंध केला असता, आणि त्यामुळे तू आमच्यावर दोष आणला असतास.” म्हणून अबीमलेखाने सर्व लोकांस ताकीद दिली आणि म्हणाला, “जो कोणी या मनुष्यास किंवा याच्या पत्नीला हात लावेल त्यास खचित जिवे मारण्यात येईल.” इसहाकाने त्या देशात धान्य पेरले आणि त्याच वर्षी त्यास शंभरपट पीक मिळाले, कारण परमेश्वराने त्यास आशीर्वाद दिला. इसहाक धनवान झाला, तो अधिकाधिक वाढत गेला आणि खूप महान होईपर्यंत वाढत गेला. त्याच्याकडे पुष्कळ मेंढरे व गुरेढोरे, मोठा कुटुंबकबिला होता. त्यावरून पलिष्टी त्याचा हेवा करू लागले; म्हणून त्याच्या वडिलाच्या हयातीत पूर्वी त्याच्या नोकरांनी खणलेल्या सर्व विहिरी पलिष्ट्यांनी मातीने बुजवल्या होत्या. तेव्हा अबीमलेख इसहाकास म्हणाला, “तू आमचा देश सोडून निघून जा कारण आमच्यापेक्षा तू अधिक शक्तीमान झाला आहेस.”
उत्पत्ती 26:1-16 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्या देशात दुष्काळ पडला—अब्राहामाच्या काळात पडला त्या खेरीज हा दुसरा दुष्काळ होता—म्हणून इसहाक गरार या शहरात पलिष्ट्यांचा राजा अबीमेलेख याजकडे गेला. याहवेहने तिथे इसहाकाला दर्शन देऊन म्हटले, “खाली इजिप्त देशात जाऊ नकोस; मी तुला सांगतो त्या देशात राहा. या प्रांतात काही काळ राहा आणि मी तुझ्यासह असेन व तुला आशीर्वादित करेन. तुझा पिता अब्राहाम याला मी दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी हा सर्व प्रदेश तुला आणि तुझ्या वंशजाला देईन. मी तुझ्या वंशजांची संख्या असंख्य तार्यांसारखी करेन. मी हा सर्व प्रदेश तुझ्या वंशजांना देईन आणि पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे तुझ्या संततीद्वारे आशीर्वादित होतील. कारण अब्राहामाने माझे आज्ञापालन केले आणि मी सांगितलेला प्रत्येक नियम, विधी व प्रत्येक सूचनेचे पालन केले.” म्हणून इसहाक गरारातच राहिला. जेव्हा तेथील लोकांनी त्याला त्याच्या पत्नीबद्दल विचारले, तेव्हा तो म्हणाला, “ती माझी बहीण आहे.” कारण “ती माझी पत्नी आहे” असे सांगण्याची त्याला भीती वाटली; त्याने विचार केला, “या ठिकाणचे लोक रिबेकाहमुळे कदाचित मला मारून टाकतील, कारण ती फार सुंदर आहे.” तो तिथे बराच काळ राहिल्यानंतर एके दिवशी पलिष्ट्यांचा राजा अबीमेलेख याने खिडकीतून बाहेर पाहिले की तो इसहाक आपली पत्नी रिबेकाह हिच्याशी प्रेम करीत आहे. अबीमेलेखाने इसहाकाला बोलाविणे पाठविले आणि त्याला म्हणाला, “निश्चितच ही तुझी पत्नी आहे, ‘तर ती माझी बहीण आहे’ असे तू का सांगितलेस?” इसहाकाने उत्तर दिले, “तिच्यामुळे माझा कोणी वध करेल अशी मला भीती वाटली.” अबीमेलेखाने उद्गार काढले, “तू आमच्यासोबत असे का केले? माझ्या लोकांपैकी कोणीही तिच्यासोबत निजला असता आणि तू आमच्यावर दोष आणला असतास.” यानंतर अबीमेलेखाने जाहीर फर्मान काढले: “या मनुष्याला किंवा याच्या पत्नीला कोणी त्रास दिल्यास त्याला मृत्यूची शिक्षा दिली जाईल.” इसहाकाने त्या देशात धान्य पेरले व त्याच वर्षी त्याला शंभरपट पीक मिळाले, कारण याहवेहने इसहाकाला आशीर्वादित केले. तो श्रीमंत होत गेला आणि त्याचे धन असे वाढत गेले की पुढे तो खूप धनाढ्य झाला. त्याच्याकडे इतके मेंढ्या, गुरे आणि नोकर होते की पलिष्ट्यांनी त्याचा हेवा केला. म्हणून ज्या विहिरी त्याचा पिता अब्राहाम याच्या नोकरांनी खणल्या होत्या त्या सर्व पलिष्ट्यांनी मातीने बुजवून टाकल्या. तेव्हा अबीमेलेखाने इसहाकाला म्हटले, “तू आमच्यापासून दूर निघून जा; तू आमच्यापेक्षा अधिक शक्तिशाली झाला आहेस.”
उत्पत्ती 26:1-16 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
पूर्वी अब्राहामाच्या दिवसांत दुष्काळ पडला होता तसा दुसरा दुष्काळ आता देशात पडला, तेव्हा इसहाक हा पलिष्ट्यांचा राजा अबीमलेख ह्याच्याकडे गरार येथे गेला. तेव्हा परमेश्वराने त्याला दर्शन देऊन म्हटले, “खाली मिसरात जाऊ नकोस; मी सांगेन त्या देशात राहा. त्या देशात उपरा असा राहा; मी तुझ्याबरोबर असेन, आणि तुला आशीर्वादित करीन; कारण हे सर्व देश मी तुला व तुझ्या संततीला देईन आणि मी तुझा बाप अब्राहाम ह्याच्याशी वाहिलेली शपथ खरी करीन. मी आकाशातील तार्यांइतकी तुझी संतती वाढवीन, हे सर्व देश तुझ्या संततीला देईन, आणि पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्या द्वारे आशीर्वादित होतील; कारण अब्राहामाने माझा शब्द मानला, माझे सांगणे ऐकले, माझ्या आज्ञा, माझे नियम व माझे कायदे पाळले.” तेव्हा इसहाक गरारात वस्ती करून राहिला. तेथल्या लोकांनी त्याच्या बायकोसंबंधाने त्याच्याकडे चौकशी केली; तेव्हा तो म्हणाला, “ही माझी बहीण;” कारण “ही माझी बायको आहे” असे म्हणण्याची त्याला भीती वाटली; तो मनात म्हणाला, “रिबका देखणी आहे. तेव्हा येथले लोक तिच्यासाठी मला जिवे मारतील.” तो तेथे बराच काळ राहिल्यावर एके दिवशी पलिष्ट्यांचा राजा अबीमलेख ह्याने खिडकीतून पाहिले तर इसहाक आपली बायको रिबका हिच्याशी प्रणयलीला करताना त्याच्या दृष्टीस पडला. तेव्हा अबीमलेखाने त्याला बोलावून म्हटले, “खचीत ही तुझी बायको आहे, तर ही माझी बहीण आहे असे तू कसे सांगितलेस?” इसहाक त्याला म्हणाला, “मी विचार केला की, तिच्यामुळे माझ्या जिवाला अपाय होईल.” अबीमलेख म्हणाला, “तू आमच्याशी असे का केलेस? बरे झाले, नाहीतर ह्या लोकांपैकी कोणी तुझ्या बायकोपाशी सहज गेला असता आणि तू आम्हांला दोष लावला असतास.” मग अबीमलेखाने लोकांना ताकीद दिली की, “जो कोणी ह्या मनुष्याला किंवा ह्याच्या बायकोला हात लावील त्याला खरोखर देहान्त शासन होईल.” इसहाकाने त्या देशात धान्याची पेरणी केली आणि त्याला त्याच वर्षी शंभरपट पीक मिळाले, आणि परमेश्वराने त्याचे कल्याण केले; तो थोर झाला आणि उत्तरोत्तर उत्कर्ष पावून मोठा संपन्न झाला. तो कळप, खिल्लारे व पुष्कळ दासदासी ह्यांचा धनी झाला; तेव्हा पलिष्टी लोक त्याचा हेवा करू लागले. त्याचा बाप अब्राहाम ह्याच्या हयातीत त्याच्या चाकरांनी ज्या विहिरी खणल्या होत्या त्या सर्व पलिष्ट्यांनी मातीने बुजवल्या. अबीमलेख इसहाकाला म्हणाला, “तू आमच्यातून निघून जा, कारण तू आमच्याहून फारच सामर्थ्यवान झाला आहेस.”