उत्पत्ती 25:19-28
उत्पत्ती 25:19-28 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
अब्राहामाचा मुलगा इसहाक ह्याच्यासंबंधीच्या घटना या आहेत. अब्राहाम इसहाकाचा बाप झाला. इसहाक चाळीस वर्षांचा झाला तेव्हा त्याने पदन-अरामातील अरामी बथुवेलाची मुलगी व अरामी लाबानाची बहीण रिबका हिला पत्नी करून घेतले. इसहाकाने आपल्या पत्नीसाठी परमेश्वराकडे प्रार्थना केली कारण ती निःसंतान होती, आणि परमेश्वराने त्याची प्रार्थना ऐकली, आणि रिबका त्याची पत्नी गरोदर राहिली. मुले तिच्या उदरात एकमेकांशी झगडू लागली, तेव्हा ती म्हणाली, “मला हे काय होत आहे?” ती परमेश्वरास याबद्दल विचारायला गेली. परमेश्वर तिला म्हणाला, “दोन राष्ट्रे तुझ्या गर्भाशयात आहेत आणि तुझ्यामधून दोन वंश निघतील. एक वंश दुसऱ्यापेक्षा बलवान असेल आणि थोरला धाकट्याची सेवा करील.” जेव्हा तिची बाळंतपणाची वेळ आली तेव्हा तिच्या गर्भशयात जुळी होती. आणि पहिला मुलगा बाहेर आला तो तांबूस वर्णाचा असून, त्याचे सर्व अंग केसांच्या वस्त्रासारखे होते. त्यांनी त्याचे नाव एसाव असे ठेवले. त्याच्यानंतर त्याचा भाऊ बाहेर आला. त्याच्या हाताने त्याने एसावाची टाच हाताने धरली होती म्हणून त्याचे नाव याकोब असे ठेवले. जेव्हा त्याच्या पत्नीने त्यांना जन्म दिला तेव्हा इसहाक साठ वर्षांचा होता. ही मुले मोठी झाली, आणि एसाव तरबेज शिकारी झाला, तो रानातून फिरणारा मनुष्य होता; पण याकोब शांत मनुष्य होता, तो त्याचा वेळ तंबूत घालवीत असे. एसावावर इसहाकाची प्रीती होती, कारण त्याने शिकार करून आणलेल्या प्राण्यांचे मांस तो खात असे, परंतु रिबकेने याकोबावर प्रीती केली.
उत्पत्ती 25:19-28 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
अब्राहामाचा मुलगा इसहाक याची वंशावळ अशी आहे: अब्राहाम हा इसहाकाचा पिता झाला, जेव्हा इसहाकाने रिबेकाहशी विवाह केला तेव्हा तो चाळीस वर्षांचा होता. रिबेकाह पद्दन-अराम येथील अरामी बेथुएलाची कन्या आणि लाबानाची बहीण होती. इसहाकाने याहवेहची प्रार्थना करून रिबेकाहला मूल देण्याची विनंती केली, कारण तिला मूल नव्हते. याहवेहने त्याची विनवणी ऐकली आणि त्याची पत्नी रिबेकाह गर्भवती झाली. तिच्या उदरात मुले एकमेकांशी भांडू लागली. तेव्हा ती म्हणाली, “मला हे काय होत आहे?” आणि याबाबत तिने याहवेहकडे विचारणा केली. याहवेहने तिला सांगितले, “तुझ्या उदरात दोन राष्ट्रे आहेत, तुझ्या उदरातील हे दोन वंश वेगळे होतील; एकजण दुसर्यापेक्षा बलवान होईल, मोठा लहान्याची सेवा करेल.” तिचे दिवस भरून प्रसूतिसमय आला तेव्हा पाहा, तिला जुळे पुत्र झाले. पहिल्यांदा जन्मलेला तांबूस रंगाच्या केसांनी इतका व्यापलेला होता की, त्याने केसांचा झगाच घातला आहे असे वाटत होते; म्हणून त्यांनी त्याचे नाव एसाव असे ठेवले. मग जुळ्यातील दुसरा पुत्र जन्मला. त्याचा हात एसावाच्या टाचेवर होता म्हणून त्यांनी त्याचे नाव याकोब असे ठेवले. जेव्हा रिबेकाहने यांना जन्म दिला, तेव्हा इसहाक साठ वर्षांचा होता. हळूहळू ती मुले वाढली. एसाव एक तरबेज शिकारी झाला, खुल्या मैदानातील फिरणारा मनुष्य होता, पण याकोब तसा शांत स्वभावाचा असून त्याला तंबूतच राहण्यास आवडे. इसहाकास वन्यप्राण्यांचे मांस खाण्याची आवड होती, एसाव त्याचा आवडता होता, तर याकोब रिबेकाहचा आवडता होता.
उत्पत्ती 25:19-28 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
अब्राहामाचा मुलगा इसहाक ह्याची ही वंशावळ : अब्राहामाने इसहाकास जन्म दिला. इसहाक चाळीस वर्षांचा झाला तेव्हा त्याने अरामी लाबान ह्याची बहीण पदन-अरामातील अरामी बथुवेल ह्याची कन्या रिबका ही बायको केली. इसहाकाने आपल्या बायकोसाठी परमेश्वराची विनवणी केली, कारण ती वांझ होती; परमेश्वराने त्याची विनवणी ऐकली आणि त्याची स्त्री रिबका गर्भवती झाली. तिच्या उदरात मुले एकमेकांशी झगडू लागली. तेव्हा ती म्हणाली, “हे असे मला काय होत आहे?” हे काय असेल ते परमेश्वराला विचारण्यास ती गेली. परमेश्वर तिला म्हणाला, “तुझ्या गर्भाशयात दोन राष्ट्रे आहेत; तुझ्या उदरातून दोन वंश निघतील; एक वंश दुसर्या वंशाहून प्रबळ होईल; आणि वडील धाकट्याची सेवा करील.” तिचे दिवस भरून प्रसूतिसमय आला; तेव्हा पाहा, तिच्या उदरात जुळे मुलगे होते. पहिला तांबूस वर्णाचा असून त्याचे सर्व अंग केशवस्त्रासारखे होते; त्याचे नाव एसाव ठेवले. त्यानंतर त्याचा भाऊ बाहेर आला; एसावाची टाच त्याच्या हाती होती; आणि त्याचे नाव याकोब (टाच धरणारा किंवा युक्तीने हिरावून घेणारा) असे ठेवले. तिने त्यांना जन्म दिला तेव्हा इसहाक साठ वर्षांचा होता. ते मुलगे मोठे झाले; एसाव हा रानात फिरणारा हुशार पारधी झाला; तर याकोब हा साधा मनुष्य असून तंबूत राहत असे. एसाव हरणाचे मांस आणत असे ते इसहाक खाई म्हणून तो त्याचा आवडता होता, आणि याकोब रिबकेचा आवडता होता.