उत्पत्ती 24:1-67
उत्पत्ती 24:1-67 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आता अब्राहाम बऱ्याच वयाचा म्हातारा झाला होता आणि परमेश्वराने अब्राहामाला सर्व गोष्टींत आशीर्वादित केले होते. अब्राहामाने त्याच्या सर्व मालमत्तेचा व घरादाराचा कारभार पाहणाऱ्या आणि त्याच्या घरातील सर्वांत जुन्या सेवकाला म्हटले, “तू आपला हात माझ्या मांडीखाली ठेव, आणि आकाशाचा देव व पृथ्वीचा देव जो परमेश्वर, याची शपथ मी तुला घ्यायला लावतो की, ज्या कनानी लोकांमध्ये मी राहत आहे, त्यांच्या मुलींतून तू माझ्या मुलांसाठी पत्नी पाहणार नाहीस. परंतु, तू माझ्या देशाला माझ्या नातेवाइकांकडे जाशील, आणि तेथून माझा मुलगा इसहाक याच्यासाठी पत्नी मिळवून आणशील.” सेवक त्यास म्हणाला, “ती स्त्री जर माझ्याबरोबर या देशात येण्यास तयार झाली नाही तर? ज्या देशातून तुम्ही आला त्या देशात मी मुलाला घेऊन जावे काय?” अब्राहाम त्यास म्हणाला, “तू माझ्या मुलाला तिकडे परत घेऊन न जाण्याची खबरदारी घे! आकाशाचा देव परमेश्वर, ज्याने मला माझ्या वडिलाच्या घरातून व माझ्या नातेवाइकांच्या देशातून मला आणले व ज्याने बोलून, ‘मी हा देश तुझ्या संततीला देईन,’ असे शपथपूर्वक अभिवचन दिले, तो परमेश्वर आपल्या दूताला तुझ्या पुढे पाठवील, आणि तू तेथून माझ्या मुलासाठी पत्नी आणशील. परंतु ती स्त्री तुझ्याबरोबर येथे येण्यास कबूल झाली नाही, तर मग तू माझ्या शपथेतून मोकळा होशील. परंतु माझ्या मुलाला तू तिकडे घेऊन जाऊ नकोस.” तेव्हा त्या सेवकाने आपला धनी अब्राहाम याच्या मांडीखाली हात ठेवला आणि त्या बाबीसंबंधाने त्याच्याशी शपथ घेतली. मग त्या सेवकाने धन्याच्या उंटांपैकी दहा उंट घेतले आणि निघाला (त्याच्या धन्याची सर्व मालमत्ता त्याच्या हाती होती). त्याने आपल्या धन्याकडून सर्व प्रकारच्या भेटवस्तू आपल्याबरोबर देण्यासाठी घेतल्या. तो अराम-नहराईम प्रदेशातील नाहोराच्या नगरात गेला. त्याने नगराबाहेरच्या विहिरीजवळ आपले उंट खाली बसवले. ती संध्याकाळ होती, त्या वेळी पाणी काढायला स्त्रिया तेथे येत असत. नंतर तो म्हणाला, “हे परमेश्वरा, तू माझा धनी अब्राहाम याचा देव आहेस, आज मला यश मिळण्यास मदत कर आणि तू प्रामाणिकपणाने करार पाळणारा आहेस हे माझा धनी अब्राहाम ह्याला दाखवून दे. पाहा, मी पाण्याच्या झऱ्याजवळ उभा आहे. आणि नगरातील लोकांच्या मुली पाणी काढण्यास बाहेर येत आहेत. तर असे घडू दे की, मी ज्या मुलीस म्हणेन, ‘मुली तुझी पाण्याची घागर उतरून मला प्यायला पाणी दे,’ आणि ती जर ‘तुम्ही प्या, आणि मी तुमच्या उंटांनाही पाणी पाजते,’ तर मग तीच तुझा सेवक इसहाक ह्याच्यासाठी तू नेमलेली असू दे. त्यावरून मी असे समजेन की, तू माझ्या धन्यासोबत करार पाळण्याचा प्रामाणिकपणा दाखवला आहे.” मग असे झाले की, त्याचे बोलणे संपले नाही तोच, पाहा, रिबका तिची मातीची घागर तिच्या खांद्यावर घेऊन बाहेर आली. रिबका ही अब्राहामाचा भाऊ नाहोर याच्यापासून मिल्केला झालेल्या बथुवेलाची कन्या होती. ती तरुण स्त्री फार सुंदर आणि कुमारी होती. तिचा कोणाही पुरुषाबरोबर संबंध आलेला नव्हता. ती विहिरीत खाली उतरून गेली आणि तिची घागर भरून घेऊन वर आली. तेव्हा तो सेवक धावत जाऊन तिला म्हणाला, “कृपा करून तुझ्या घागरीतून मला थोडे पाणी पाज.” ती म्हणाली, “प्या माझ्या प्रभू,” आणि तिने लगेच आपली घागर आपल्या हातावर उतरून घेऊन घेतली, आणि त्यास पाणी पाजले. त्यास पुरे इतके पाणी पाजल्यानंतर ती म्हणाली, “मी तुमच्या उंटांसाठीसुद्धा, त्यांना पुरेल इतके पाणी पिण्यास काढते.” म्हणून तिने घाईघाईने उंटांसाठी घागर कुंडात ओतली, आणि आणखी पाणी काढण्याकरिता ती धावत विहिरीकडे गेली, आणि याप्रमाणे तिने त्याच्या सगळ्या उंटांना पाणी पाजले. तेव्हा, परमेश्वर देवाने आपला प्रवास यशस्वी केला की नाही, हे समजावे म्हणून तो मनुष्य तिच्याकडे शांतपणे पाहत राहिला. उंटांचे पाणी पिणे संपल्यावर त्या मनुष्याने अर्धा शेकेल वजनाची सोन्याची नथ आणि तिच्या हातासाठी दहा शेकेल वजनाच्या दोन सोन्याच्या बांगड्या काढल्या, आणि विचारले, “तू कोणाची मुलगी आहेस? तसेच तुझ्या वडिलाच्या घरी आम्हा सर्वांना रात्री मुक्काम करावयास जागा आहे का ते कृपा करून सांग.” ती त्यास म्हणाली, “मी बथुवेलाची, म्हणजे नाहोरापासून मिल्केला जो मुलगा झाला त्याची मुलगी आहे.” ती आणखी त्यास म्हणाली, “आमच्याकडे तुमच्या उंटांसाठी भरपूर गवत व पेंढा आहे आणि तुमच्या सर्वांसाठी मुक्काम करण्यासाठी आमच्याकडे भरपूर जागा आहे.” तेव्हा त्या मनुष्याने लवून परमेश्वराची उपासना केली. तो म्हणाला, “माझा धनी, अब्राहाम ह्याचा देव परमेश्वर धन्यवादित असो, त्याने माझ्या धन्यासंबंधीचा कराराचा प्रामाणिकपणा आणि विश्वसनीयता सोडली नाही, माझ्याबाबत सांगायचे तर, परमेश्वराने मला माझ्या धन्याच्या नातेवाइकाकडेच सरळ मार्ग दाखवून आणले.” नंतर ती तरुण स्त्री पळत गेली आणि तिने या सर्व गोष्टींबद्दल आपल्या आईला व घरच्या सर्वांना सांगितले. रिबकेला एक भाऊ होता, आणि त्याचे नाव लाबान होते. लाबान बाहेर विहिरीजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या त्या मनुष्याकडे पळत गेला. जेव्हा त्याने आपल्या बहिणीच्या नाकातील नथ व हातातील सोन्याच्या बांगड्या पाहिल्या, आणि “तो मनुष्य मला असे म्हणाला,” असे आपल्या बहिणीचे, म्हणजे रिबकेचे शब्द ऐकले, तेव्हा तो त्या मनुष्याकडे आला, आणि पाहतो तो, तो उंटांपाशी विहिरीजवळ उभा होता. आणि लाबान त्यास म्हणाला, “परमेश्वराचा आशीर्वाद लाभलेले तुम्ही, आत या. तुम्ही बाहेर का उभे आहात? मी तुमच्यासाठी घर तयार केले आहे आणि उंटासाठीही जागा केली आहे.” तो मनुष्य घरी आला आणि त्याने उंट सोडले. उंटांना गवत व पेंढा दिला आणि त्याचे पाय व त्याच्या बरोबरच्या लोकांचे पाय धुण्यासाठी पाणी देण्यात आले. त्यांनी त्याच्या पुढे जेवण वाढले, परंतु तो म्हणाला, “मला जे काही सांगायचे ते सांगेपर्यंत मी जेवणार नाही.” तेव्हा लाबान म्हणाला, “सांगा.” तो म्हणाला, “मी अब्राहामाचा सेवक आहे. परमेश्वर देवाने माझ्या धन्याला फार आशीर्वादित केले आहे आणि तो महान बनला आहे. त्याने त्यास मेंढरांचे कळप, गुरेढोरे, तसेच सोने, चांदी, दासदासी, उंट व गाढवे दिली आहेत. सारा, ही माझ्या धन्याची पत्नी वृद्ध झाली तेव्हा तिच्यापासून माझ्या धन्याला मुलगा झाला, आणि त्यास त्याने आपले सर्वकाही दिले आहे. माझ्या धन्याने माझ्याकडून वचन घेतले, तो म्हणाला, ‘ज्यांच्या राज्यात मी माझे घर केले आहे त्या कनानी लोकांतून माझ्या मुलासाठी कोणी मुलगी पत्नी करून घेऊ नकोस. त्याऐवजी माझ्या वडिलाच्या परिवाराकडे जा, आणि माझ्या नातलगांकडे जा व तेथून माझ्या मुलासाठी तू पत्नी मिळवून आण.’ मी माझ्या धन्याला म्हणालो, ‘यदाकदाचित मुलगी माझ्याबरोबर येणार नाही?’ परंतु तो मला म्हणाला, ‘ज्या परमेश्वरासमोर मी चालत आहे, तो त्याच्या दूताला तुझ्याबरोबर पाठवील व तो तुझा मार्ग यशस्वी करील, आणि तू माझ्या नातलगांतून व माझ्या वडिलाच्या घराण्यातून माझ्या मुलासाठी पत्नी आणशील. परंतु जेव्हा तू माझ्या नातलगांमध्ये जाशील आणि जर त्यांनी तुला ती दिली नाही, तर मग तू माझ्या शपथेतून मोकळा होशील.’ आणि आज मी या झऱ्याजवळ आलो आणि म्हणालो, ‘हे परमेश्वरा, माझा धनी अब्राहाम याच्या देवा, कृपा करून जर खरोखर माझ्या प्रवासाचा हेतू यशस्वी करीत असलास तर, मी येथे या झऱ्याजवळ उभा आहे, आणि असे होऊ दे की, जी मुलगी पाणी काढण्यास येईल आणि जिला मी म्हणेन, “मी तुला विनंती करतो, तू आपल्या घागरीतले थोडे पाणी मला प्यायला दे,” तेव्हा जी मला म्हणेल, “तुम्ही प्या, आणि मी तुमच्या उंटासाठी ही पाणी काढते” तीच मुलगी माझ्या धन्याच्या मुलासाठी परमेश्वराने निवडलेली आहे असे मी समजेन. मी माझ्या मनात बोलणे संपण्याच्या आत पाहा रिबका खांद्यावर घागर घेऊन बाहेर आली. ती विहिरीत खाली उतरली आणि पाणी काढले. मग मी तिला म्हणालो, “मुली, कृपा करून मला थोडे पाणी प्यायला दे.” तेव्हा तिने लगेच खांद्यावरून घागर उतरली आणि म्हणाली, “प्या आणि मी तुमच्या उंटांनाही पाणी पाजते.” मग मी प्यालो आणि तिने उंटांनाही पाणी पाजले. मग मी तिला विचारले, “तू कोणाची मुलगी आहेस?” ती म्हणाली, “नाहोरापासून मिल्केला झालेल्या बथुवेलाची मी मुलगी,” तेव्हा मग मी तिला सोन्याची नथ आणि हातात घालण्यासाठी सोन्याच्या दोन बांगडया दिल्या. नंतर मी मस्तक लववून माझा धनी अब्राहाम याचा देव परमेश्वर याची स्तुती केली, कारण त्याने मला माझ्या धन्याच्या भावाच्या मुलीला त्याच्या मुलाकडे नेण्याचा योग्य मार्ग दाखवला. “आता तुम्ही माझ्या धन्याशी प्रामाणिकपणाने आणि सत्याने वागण्यास तयार असाल तर मला सांगा. परंतु जर नाही तर तसे मला सांगा; यासाठी की मी उजवीकडे किंवा डावीकडे वळेन.” मग लाबान व बथुवेल यांनी उत्तर दिले, “ही गोष्ट परमेश्वराकडून आली आहे. आम्ही तुम्हास बरे किंवा वाईट काही बोलू शकत नाही. पाहा, रिबका तुमच्यासमोर आहे. तिला तुम्ही घेऊन जा आणि परमेश्वर बोलल्याप्रमाणे ती तुमच्या धन्याच्या मुलाची पत्नी व्हावी.” जेव्हा अब्राहामाच्या सेवकाने हे त्यांचे शब्द ऐकले, तेव्हा त्याने भूमीपर्यंत वाकून परमेश्वर देवाला नमन केले. सेवकाने सोन्याचे दागिने व चांदीचे दागिने व वस्त्रे रिबकेला दिली. त्याने तिचा भाऊ व तिची आई यांनाही मोलवान देणग्या दिल्या. मग त्याने व त्याच्या बरोबरच्या माणसांनी त्यांचे खाणे व पिणे झाल्यावर रात्री तेथेच मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर ते म्हणाले, “आता मला माझ्या धन्याकडे पाठवा.” तेव्हा तिची आई व भाऊ म्हणाले, “रिबकेला आमच्याजवळ थोडे दिवस म्हणजे निदान दहा दिवस तरी राहू द्या. मग तिने जावे.” परंतु तो त्यांना म्हणाला, “मला थांबवून घेऊ नका, कारण परमेश्वराने माझा मार्ग यशस्वी केला आहे, मला माझ्या मार्गाने पाठवा जेणेकरून मी माझ्या धन्याकडे जाईन.” ते म्हणाले, “आम्ही मुलीला बोलावून तिला विचारतो.” मग त्यांनी रिबकेला बोलावून तिला विचारले, “या मनुष्याबरोबर तू जातेस काय?” तिने उत्तर दिले, “मी जाते.” मग त्यांची बहीण रिबका, तिच्या दाईसोबत अब्राहामाचा सेवक व त्याची माणसे यांच्या बरोबर प्रवासास निघाली. त्यांनी रिबकेला आशीर्वाद दिला आणि तिला म्हटले, “आमच्या बहिणी, तू हजारो लाखांची आई हो, आणि तुझे वंशज त्यांचा द्वेष करणाऱ्यांच्या वेशीचा ताबा घेवोत.” मग रिबका उठली व ती व तिच्या दासी उंटावर बसल्या आणि त्या मनुष्याच्या मागे गेल्या. अशा रीतीने सेवकाने रिबकेला घेतले आणि त्याच्या मार्गाने गेला. इकडे इसहाक नेगेब येथे राहत होता आणि नुकताच बैर-लहाय-रोई विहिरीपासून परत आला होता. इसहाक संध्याकाळी मनन करण्यास शेतात गेला होता. त्याने आपली नजर वर केली व पाहिले तेव्हा त्यास उंट येताना दिसले. रिबकेने नजर वर करून जेव्हा इसहाकाला पाहिले तेव्हा ती उंटावरून उडी मारून खाली उतरली. ती सेवकाला म्हणाली, “शेतातून आपल्याला भेटावयास सामोरा येत असलेला पुरुष कोण आहे?” सेवकाने उत्तर दिले, “तो माझा धनी आहे.” तेव्हा तिने बुरखा घेतला आणि स्वतःला झाकून घेतले. सेवकाने इसहाकाला सर्व गोष्टी, त्याने काय केले त्याविषयी सविस्तर सांगितले. मग इसहाकाने मुलीला आपली आई सारा हिच्या तंबूत आणले. आणि त्याने रिबकेला स्विकारले, आणि ती त्याची पत्नी झाली, आणि त्याने तिच्यावर प्रेम केले. अशा रीतीने आपल्या आईच्या मरणानंतर इसहाक सांत्वन पावला.
उत्पत्ती 24:1-67 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
अब्राहाम आता खूप वृद्ध झाला होता. याहवेहने त्याला सर्व बाबतीत आशीर्वादित केले होते. अब्राहाम आपल्या घरादाराचा कारभार पाहणार्या सर्वात जुन्या सेवकाला म्हणाला, “तू आपला हात माझ्या मांडीखाली ठेव. स्वर्ग व पृथ्वीचे परमेश्वर याहवेह यांच्या नावाने मला वचन दे की, माझ्या मुलाचा मी राहत असलेल्या स्थानिक कनानी मुलीबरोबर विवाह करून देणार नाहीस, याऐवजी तू माझ्या मायदेशात माझ्या नातेवाईकांकडे जाशील आणि माझा पुत्र इसहाकासाठी एक वधू शोधून आणशील.” सेवकाने अब्राहामाला विचारले, “पण समजा, आपले घर सोडून इतक्या दूर येण्यास ती स्त्री तयार नसेल तर मी इसहाकाला जो देश तुम्ही सोडून आला त्या देशात घेऊन जावे काय?” “माझ्या मुलाला तिकडे कधीही नेऊ नको,” अब्राहाम त्याला म्हणाला. “कारण याहवेह जे स्वर्गाचे परमेश्वर आहेत, त्यांनी माझ्या पित्याच्या घरातून व माझ्या जन्मभूमीतून काढून मला आणि माझ्या मुलाबाळांना हा देश देण्याचे वचन दिले आहे, तेच परमेश्वर तुझ्यापुढे आपला दूत पाठवतील आणि माझ्या मुलासाठी योग्य वधू तुला मिळेल. पण स्त्री येथे येण्यास तयार झाली नाही, तर तू आपल्या वचनातून मुक्त होशील. फक्त माझ्या मुलाला तिकडे नेऊ नकोस.” तेव्हा सेवकाने त्याचा धनी अब्राहामाच्या मांडीखाली हात ठेऊन ही बाब शपथपूर्वक मान्य केली. मग त्या सेवकाने अब्राहामाचे दहा उंट घेऊन, आपल्या धन्याच्या मालमत्तेतील उत्तमोत्तम वस्तू निवडून त्या सर्व उंटांवर लादल्या. मग तो प्रवास करीत अराम-नहराईम मधील नाहोराच्या नगरास गेला. तिथे नगराच्या बाहेर त्याने विहिरीजवळ उंटांना बसविले; ती संध्याकाळची वेळ होती. स्त्रिया विहिरीतून पाणी नेण्यासाठी तिथे येत होत्या. त्यावेळी त्या सेवकाने प्रार्थना केली, “हे याहवेह, माझ्या धन्याच्या परमेश्वरा, माझा धनी अब्राहाम याच्यावर दया करा आणि ज्या उद्देशाने मी हा प्रवास केला तो सफल करा. पाहा, मी येथे विहिरीजवळ उभा आहे व पाणी नेण्याकरिता नगरातील कन्या येत आहेत. माझी तुम्हाला अशी विनंती आहे की, त्या तरुणींपैकी एकीला ‘तुझी पाण्याची घागर वाकवून मला प्यायला पाणी दे’ असा ज्यावेळी मी म्हणेन त्यावेळी, ‘होय निश्चितच, मी तुझ्या उंटांनाही पाणी पाजते’ असे जी म्हणेल तीच इसहाकासाठी तुम्ही निवडलेली वधू आहे, यावरून मला समजेल की तुम्ही माझ्या धन्याला कृपा दाखविली आहे.” त्याची प्रार्थना समाप्त होण्यापूर्वी रिबेकाह खांद्यावर घागर घेऊन तिथे आली. ती नाहोर आणि मिल्का यांचा पुत्र बेथुएल याची कन्या होती. नाहोर हा अब्राहामाचा भाऊ होता. ती अतिशय देखणी असून कुमारिका होती; आतापर्यंत कोणत्याही पुरुषाने तिला स्पर्श केला नव्हता. तिने खाली जाऊन विहिरीच्या पाण्याने घागर भरली आणि ती वर आली. अब्राहामाचा सेवक तिच्याकडे धावत गेला आणि तो तिला म्हणाला, “कृपया मला तुझ्या घागरीतील थोडे पाणी दे.” “प्या, माझ्या स्वामी,” असे म्हणून तिने लगेच आपली घागर वाकवून त्याला प्यायला पाणी दिले. त्यास पुरेसे पाणी पाजल्यानंतर ती त्याला म्हणाली, “मी तुमच्या उंटांसाठीही त्यांना पुरेल इतके पाणी काढते.” तिने आपल्या घागरीतील पाणी कुंडात ओतले आणि ती पुन्हा पाणी काढण्याकरिता विहिरीकडे धावत गेली आणि त्याच्या सर्व उंटांना पुरेल इतके पाणी तिने काढले. ती पाणी काढीत असताना, तो सेवक एक शब्दही न बोलता, तिचे बारकाईने निरीक्षण करीत होता की याहवेहने त्याचा प्रवास सफल केला की नाही. शेवटी उंटांचे पाणी पिणे संपल्यावर, त्याने तिला एक बेका वजनाची सोन्याची नथ आणि दहा शेकेल वजनाच्या दोन सोन्याच्या बांगड्या दिल्या. नंतर त्याने तिला विचारले, “तू कोणाची कन्या आहेस? कृपया मला सांग की रात्री मुक्काम करण्यासाठी आम्हाला तुझ्या वडिलांच्या घरी जागा मिळू शकेल काय?” तिने उत्तर दिले, “मी नाहोर व मिल्का, यांचा पुत्र बेथुएल यांची कन्या आहे.” आणि ती पुढे हे म्हणाली, “आमच्या घरी रात्री मुक्काम करण्यासाठी खोली आणि उंटांसाठीही भरपूर गवत व चारा आहे.” तेव्हा त्या मनुष्याने आपले डोके लवविले आणि याहवेहची आराधना केली. तो म्हणाला, “माझा धनी अब्राहामाचे परमेश्वर याहवेहची स्तुती असो, माझ्या धन्याबरोबर तुम्ही इतक्या प्रेमाने आणि विश्वासूपणाने वागता म्हणून मी तुमचे आभार मानतो. माझ्या धन्याच्या नातेवाईकांच्या कुटुंबात तुम्ही मला सरळ घेऊन आला म्हणूनही मी तुमचे आभार मानतो.” तेव्हा ती मुलगी आपल्या आईच्या कुटुंबातील लोकांना ही बातमी सांगण्यासाठी धावतच घरी गेली. रिबेकाहला एक भाऊ होता, त्याचे नाव लाबान होते. तो धावतच त्या मनुष्याला भेटण्यासाठी विहिरीकडे गेला; त्याने तिची नथ व तिच्या हातातील बांगड्या पाहिल्या आणि रिबेकाहच्या तोंडची हकिकत ऐकली, तेव्हा तो विहिरीकडे गेला आणि पाहिले की तो मनुष्य अद्यापही आपल्या उंटांपाशी विहिरीजवळच उभा आहे. त्याने म्हटले, “या, तुम्ही जे याहवेहद्वारे आशीर्वादित आहात, बाहेर का उभे आहात? तुम्हाला राहण्यास खोली आणि उंटांकरिता मी जागा तयार केली आहे.” मग तो मनुष्य त्यांच्या घरी गेला. उंटांवरून सामान उतरून त्यांना गवत आणि खाण्याकरिता चाराही देण्यात आला. त्यास व त्याच्या बरोबरीच्या लोकांस पाय धुण्याकरिता त्याने पाणीही दिले. यानंतर भोजन वाढण्यात आले; परंतु तो म्हणाला, “मला जे काही सांगायचे ते सांगेपर्यंत मी भोजन करणार नाही.” लाबान म्हणाला, “ठीक आहे, आम्हाला सांग.” तेव्हा तो म्हणाला, “मी अब्राहामाचा सेवक आहे. याहवेहने माझ्या धन्याला फार आशीर्वाद दिले आहेत आणि तो थोर पुरुष झाला आहे. त्यांनी त्याला मेंढरांचे कळप, गुरांची खिल्लारे, सोने चांदी, पुष्कळ दास आणि दासी, उंट आणि गाढवे दिली आहेत. माझ्या धन्याला त्याची पत्नी साराह हिच्यापासून वृद्धापकाळात एक पुत्र झाला. माझ्या धन्याने त्याचे सर्वस्व त्याला दिले आहे. त्या पुत्रासाठी, मी जिथे राहत आहे तेथील स्थानिक कनानी मुलींमधून पत्नी निवडू नये, असे वचन माझ्या धन्याने माझ्यापासून घेतले आहे. माझ्या वडिलांच्या कुटुंबात जावे आणि माझ्या स्वतःच्या घराण्यातील लोकांकडे जाऊन माझ्या मुलासाठी येथील मुलगी निवडून मी आणावी, असे त्याने मला बजावले आहे. “मग मी माझ्या धन्यास विचारले, ती मुलगी माझ्याबरोबर परत आली नाही तर? “यावर त्याने उत्तर दिले, ‘ती खात्रीने येईल, कारण ज्या याहवेहच्या समक्षतेत मी चालतो ते त्यांचा दूत तुझ्याबरोबर पाठवतील आणि तुझी यात्रा सिद्धीस नेतील. माझ्या नातेवाईकांकडे जाऊन माझ्या वडिलाच्या घराण्यातील एक मुलगी शोधून आण. याप्रमाणे करण्यास तू वचनबद्ध आहेस. जेव्हा तू माझ्या घराण्याकडे जाशील आणि त्यांनी मुलगी पाठविण्याचे नाकारले, तर तू तुझ्या शपथेतून मुक्त होशील.’ “आज मी विहिरीजवळ आलो तेव्हा मी अशी प्रार्थना केली की, माझा धनी अब्राहामाचे परमेश्वर याहवेह, कृपया माझी यात्रा तुम्ही यशस्वी करा. पाहा, मी येथे या विहिरीजवळ उभा असताना पाणी भरण्यास आलेल्या एखाद्या मुलीला म्हणेन, ‘तुझ्या घागरीतील थोडे पाणी मला प्यावयास दे,’ आणि यावर ती मला म्हणेल, ‘अवश्य महाराज, आणि मी तुम्हाला आणि तुमच्या उंटांनाही पाणी पाजीन,’ तीच मुलगी माझ्या धन्याच्या पुत्राची पत्नी होण्यासाठी याहवेहने निवडलेली आहे असे होऊ द्या. “माझ्या मनातल्या मनात माझे हे बोलणे संपले नाही तोच रिबेकाह आपल्या खांद्यावर घागर घेऊन पाणी भरण्यास आली आणि तिने विहिरीत उतरून पाणी भरले. मग मी तिला म्हणालो, ‘मला थोडे पाणी प्यावयाला दे.’ “मला पाणी पिता यावे म्हणून तिने आपल्या खांद्यावरील घागर झटकन खाली उतरविली आणि ती मला म्हणाली, ‘अवश्य महाराज, मी तुम्हाला आणि तुमच्या उंटांनाही पाणी पाजते.’ मग मी प्यालो आणि तिने उंटांनाही पाणी पाजले. “मी तिला विचारले, ‘तू कोणाची मुलगी आहेस?’ “ती म्हणाली, ‘मी नाहोराचे पुत्र बेथुएलाची, ज्यांची माता मिल्का आहे, त्यांची कन्या आहे.’ “हे ऐकून मी तिच्या नाकात नथ आणि हातात पाटल्या घातल्या. माझ्या धन्याच्या भावाची नात शोधून काढण्यास मला योग्य मार्गदर्शन केल्याबद्दल मी माझे मस्तक लवविले आणि माझा धनी अब्राहामाचे परमेश्वर याहवेहचे मी स्तवन केले. तर आता माझ्या धन्यावर दया आणि विश्वासूपणा दाखवून जे योग्य ते करण्याची तुमची तयारी आहे की नाही हे मला नक्की सांगा, म्हणजे पुढे काय करावयाचे ते मला ठरविता येईल.” यावर लाबान आणि बेथुएल यांनी उत्तर दिले, “हे याहवेहकडूनच आहे; हे अगदी उघड आहे. तेव्हा आम्ही तुम्हास बरे किंवा वाईट कसे काय बोलावे? ही रिबेकाह तुमच्यापुढे आहे, तिला घेऊन जा. याहवेह परमेश्वराने मार्गदर्शन केल्याप्रमाणे तिला तुमच्या धन्याच्या पुत्राची पत्नी होऊ द्या.” जेव्हा अब्राहामाच्या सेवकाने हे ऐकले, त्याने याहवेहपुढे गुडघे टेकले. मग त्या सेवकाने रिबेकाहला सोने आणि चांदीचे दागिने आणि कपडे दिले; तसेच त्याने तिच्या आईसाठी आणि भावासाठीही पुष्कळ मौल्यवान वस्तू दिल्या. यानंतर त्यांनी संध्याकाळचे भोजन केले आणि तो सेवक व त्याच्या बरोबरच्या माणसांनी खाणेपिणे करून रात्री तिथेच मुक्काम केला. दुसर्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तो म्हणाला, “माझ्या धन्याकडे परत जाण्यास मला निरोप द्या.” परंतु तिची आई व भाऊही म्हणाला, “मुलीने आमच्याजवळ कमीतकमी दहा दिवस राहावे अशी आमची इच्छा आहे; नंतर तुम्ही जावे.” पण विनंती करीत तो म्हणाला, “कृपा करून माझ्या परतण्यात अडथळा आणू नका. कारण याहवेहने माझी यात्रा यशस्वी केली आहे; मला माझ्या मार्गावर पाठवा म्हणजे मी माझ्या धन्याकडे परत जाईन.” तेव्हा ते म्हणाले, “आम्ही मुलीला बोलावून विचारतो” त्याप्रमाणे त्यांनी रिबेकाहला बोलावून विचारले, “तू या मनुष्यासोबत जाशील का?” तिने उत्तर दिले, “होय, मी जाईन.” तेव्हा त्यांनी तिला निरोप दिला. म्हणून त्यांनी आपली बहीण रिबेकाह हिला, तिची दाई, अब्राहामाचा सेवक व त्याची माणसे यांच्यासह तिची रवानगी केली. एकमेकांपासून दूर होण्यापूर्वी त्यांनी रिबेकाहला आशीर्वाद दिला: “आमच्या भगिनी, तू लक्षावधींची माता हो; तुझी संतती त्यांच्या शत्रूंच्या शहरांचा ताबा घेवोत.” नंतर रिबेकाह व तिच्या दासी तयार होऊन उंटावर आरूढ झाल्या आणि त्या मनुष्याबरोबर गेल्या, त्या सेवकाने रिबेकाहला घेतले आणि निघाला. दरम्यानच्या काळात इसहाक नेगेव-दक्षिण-प्रांतातील आपल्या घरून बएर-लहाई-रोई येथे आला होता. एके दिवशी संध्याकाळी तो मनन करीत शेतातून फिरावयास निघाला असताना, त्याने नजर वर करून पाहिले, तो त्याला काही उंट येताना दिसले. रिबेकाहने दृष्टी वर करून इसहाकाला पाहिले, तेव्हा ती उंटावरून खाली उतरली आणि सेवकाला विचारले, “शेतातून आपल्याला भेटावयास येत असलेला तो पुरुष कोण आहे?” “ते माझे स्वामी आहेत.” सेवकाने उत्तर दिले. तेव्हा तिने आपले मुख बुरख्याने झाकून घेतले. आपण काय काय केले याचा सर्व वृतांत सेवकाने इसहाकाला सांगितला. मग इसहाकाने रिबेकाहला आपली आई साराहच्या तंबूमध्ये आणले. त्याने रिबेकाहशी विवाह केला आणि ती त्याची पत्नी झाली. त्याचे तिच्यावर प्रेम बसले; आणि आपल्या आईच्या मृत्यूनंतर तिच्यामुळे त्याला सांत्वन मिळाले.
उत्पत्ती 24:1-67 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
अब्राहाम आता वृद्ध होऊन अगदी वयातीत झाला; परमेश्वराने अब्राहामाला सर्व बाबतींत आशीर्वादित केले होते. अब्राहामाच्या सर्वस्वाचा कारभार पाहणारा एक सर्वांत जुना सेवक होता, त्याला त्याने म्हटले, “तू आपला हात माझ्या मांडीखाली ठेव. मी तुला परमेश्वराची, आकाश व पृथ्वी ह्यांच्या देवाची शपथ घेण्यास सांगतो की ज्या कनानी लोकांत मी राहत आहे त्यांच्या मुलींपैकी कोणतीही नवरी माझ्या मुलासाठी तू पाहणार नाहीस. तर माझ्या देशाला माझ्या आप्तांकडे जाऊन तेथून माझा मुलगा इसहाक ह्याच्यासाठी नवरी पाहून आणशील.” त्याचा सेवक त्याला म्हणाला, “यदाकदाचित नवरी माझ्याबरोबर ह्या देशात येण्यास कबूल झाली नाही तर ज्या देशातून तुम्ही आला त्यात तुमच्या मुलास मी परत घेऊन जावे काय?” तेव्हा अब्राहाम त्याला म्हणाला, “खबरदार! माझ्या मुलाला तिकडे न्यायचे नाही. स्वर्गीच्या ज्या परमेश्वर देवाने मला माझ्या बापाच्या घरातून, माझ्या जन्मभूमीतून आणले आणि मला शपथपूर्वक सांगितले की हा देश मी तुझ्या संततीला देईन. तो तुझ्यापुढे आपला दूत पाठवील आणि तू तेथूनच माझ्या मुलासाठी नवरी आण. पण ती नवरी तुझ्याबरोबर येण्यास कबूल झाली नाही तर तू ह्या माझ्या शपथेतून मोकळा होशील; मात्र माझ्या मुलाला तिकडे परत नेऊ नकोस.” तेव्हा त्या सेवकाने आपला धनी अब्राहाम ह्याच्या मांडीखाली हात ठेवून त्या बाबतीत शपथ वाहिली. मग तो सेवक आपल्या धन्याच्या उंटांपैकी दहा उंट घेऊन निघाला; त्याच्याजवळ त्याच्या धन्याच्या सर्व प्रकारच्या मौल्यवान वस्तू होत्या; तो अराम-नहराईम ह्यातील नाहोराच्या नगरात गेला. संध्याकाळी स्त्रिया पाणी भरायला बाहेर पडतात त्या सुमारास त्याने नगराबाहेरील विहिरीजवळ आपले उंट बसवले, आणि तो म्हणाला, “हे परमेश्वरा, माझा धनी अब्राहाम ह्याच्या देवा, तू आज कृपा करून माझी कार्यसिद्धी कर; माझा धनी अब्राहाम ह्याच्यावर दया कर. पाहा, मी ह्या पाण्याच्या विहिरीजवळ उभा आहे, आणि गावातल्या कन्या पाणी भरायला बाहेर येत आहेत. तर असे घडून येऊ दे की ज्या मुलीला मी म्हणेन, मला पाणी पाजण्यासाठी आपली घागर उतर, आणि ती मला म्हणेल, तू पी आणि तुझ्या उंटांनाही मी पाजते, तीच तुझा सेवक इसहाक ह्याच्यासाठी तू नेमलेली असो; ह्यावरून मला कळेल की तू माझ्या धन्यावर दया केली आहेस.” त्याचे बोलणे संपले नाही तोच अब्राहामाचा बंधू नाहोर ह्याची बायको मिल्का हिचा पुत्र बथुवेल ह्याला झालेली रिबका खांद्यावर घागर घेऊन पुढे आली. ती मुलगी दिसायला फार सुंदर होती; ती कुमारी होती; तिने पुरुष पाहिला नव्हता. ती विहिरीत उतरली व घागर भरून वर आली. तेव्हा तो सेवक धावत जाऊन तिला गाठून म्हणाला, “तुझ्या घागरीतले थोडे पाणी मला पाज.” ती म्हणाली, “प्या, बाबा;” आणि तिने ताबडतोब आपल्या हातावर घागर उतरवून घेऊन त्याला पाणी पाजले. त्याला पुरेसे पाणी पाजल्यावर ती म्हणाली, “मी तुमच्या उंटांसाठी पाणी आणून त्यांना पोटभर पाजते.” मग तिने त्वरा करून घागर डोणीत रिचवली व पुन: पाणी आणायला ती विहिरीकडे धावत गेली; असे तिने त्याच्या सर्व उंटांसाठी पाणी काढले. तेव्हा तो मनुष्य अचंबा करून तिच्याकडे पाहत राहिला; परमेश्वराने आपला प्रवास सफळ केला किंवा कसे ह्याचा विचार करत तो स्तब्ध राहिला. उंटांचे पाणी पिणे झाल्यावर त्या मनुष्याने अर्धा शेकेल भार सोन्याची एक नथ व तिच्या हातांत घालण्यासाठी दहा शेकेल भार सोन्याच्या दोन बांगड्या काढल्या, आणि तो म्हणाला, “तू कोणाची मुलगी आहेस हे मला सांग; तुझ्या बापाच्या घरी आम्हांला उतरायला जागा आहे काय?” ती त्याला म्हणाली, “नाहोरापासून मिल्केला झालेल्या बथुवेलाची मी कन्या.” ती आणखी त्याला म्हणाली, “आमच्या येथे पेंढा व वैरण हवी तितकी आहे, आणि उतरायला जागाही आहे.” तेव्हा त्या मनुष्याने नमून परमेश्वराचे स्तवन केले. तो म्हणाला, “माझा धनी अब्राहाम ह्याचा देव परमेश्वर धन्यावादित आहे; त्याने माझ्या धन्यावर दया करण्याचे व त्याच्याशी सत्यतेने वर्तण्याचे सोडले नाही; परमेश्वराने मला नीट वाट दाखवून माझ्या धन्याच्या भाऊबंदांच्या घरी पोचवले आहे.” तेव्हा त्या मुलीने धावत जाऊन आपल्या आईच्या घरच्यांना ही हकिकत कळवली. रिबकेला एक भाऊ होता, त्याचे नाव लाबान होते; तो विहिरीजवळ त्या मनुष्याकडे धावत गेला. त्याने नथ व आपल्या बहिणीच्या हातांतल्या बांगड्या पाहिल्या आणि, ‘मला तो मनुष्य असे असे म्हणाला,’ हे रिबकेच्या तोंडचे शब्द ऐकले, तेव्हा तो त्या मनुष्याकडे आला आणि पाहतो तर उंटांपाशी विहिरीजवळ तो उभा आहे. तेव्हा त्याने म्हटले, “अहो, या; परमेश्वराचा आशीर्वाद आपणावर आहे. आपण बाहेर का उभे आहात? मी आपणा-साठी घर व आपल्या उंटांसाठी जागा तयार केली आहे.” मग तो मनुष्य घरी आला; आणि लाबानाने उंटांच्या कंठाळी सोडून त्यांना पेंढावैरण दिली, आणि त्याला व त्याच्या बरोबरच्या माणसांना पाय धुण्यास पाणी दिले. त्याच्यापुढे अन्न वाढले तेव्हा तो म्हणाला, “मी आपले येण्याचे प्रयोजन सांगण्याच्या आधी जेवणार नाही.” तेव्हा त्याने म्हटले, “सांगा.” तो म्हणाला, “मी अब्राहामाचा सेवक आहे. परमेश्वराने माझ्या धन्याचे फार कल्याण केले आहे; तो थोर झाला आहे; त्याने त्याला गुरे, मेंढरे, सोने, रुपे, दासदासी, उंट व गाढवे दिली आहेत. माझ्या धन्याची बायको सारा हिला वृद्धापकाळी त्याच्यापासून मुलगा झाला, त्याला त्याने आपले सर्वस्व दिले आहे. आणि माझ्या धन्याने मला शपथ घ्यायला लावून सांगितले आहे की, ज्या कनान्यांच्या देशात मी राहत आहे त्यांच्या मुलींतली नवरी माझ्या मुलासाठी पाहू नकोस; तर माझ्या बापाच्या घरी माझ्या आप्तांकडे जा आणि तेथून माझ्या मुलासाठी नवरी पाहून आण. तेव्हा मी आपल्या धन्यास म्हटले, नवरी माझ्याबरोबर कदाचित येणार नाही. तेव्हा तो मला म्हणाला, ज्या परमेश्वरासमोर मी चालतो, तो आपला दूत तुझ्याबरोबर पाठवील व तुझा प्रवास सफळ करील, आणि तू माझ्या आप्तांतून, माझ्या पित्याच्या घराण्यातून माझ्या मुलासाठी नवरी आण; तू माझ्या आप्तांकडे गेलास म्हणजे माझ्या शपथेतून मोकळा होशील; मुलगी देण्यास ते कबूल झाले नाहीत तर तू माझ्या शपथेतून मोकळा होशील. मी आज विहिरीजवळ आलो तेव्हा म्हणालो, माझा धनी अब्राहाम ह्याच्या देवा, परमेश्वरा, मी जो प्रवास केला आहे तो सफळ करणार असलास तर, पाहा, मी ह्या पाण्याच्या विहिरीजवळ उभा आहे; तर असे घडून येवो की, पाणी भरायला जी मुलगी येईल तिला मी म्हणेन, तुझ्या घागरीतील थोडे पाणी मला पाज; आणि ती मला म्हणेल, “तू पी व मी तुझ्या उंटांसाठीही पाणी काढते,” तीच स्त्री परमेश्वराने माझ्या धन्याच्या मुलासाठी नेमलेली आहे असे ठरो. माझ्या मनातल्या मनात हे बोलणे संपले नाही तोच रिबका खांद्यावर घागर घेऊन तेथे आली आणि तिने विहिरीत उतरून पाणी भरले; मग मी तिला म्हणालो, मला थोडे पाणी पिऊ दे. तिने लागलीच आपल्या खांद्यावरून घागर उतरवून म्हटले, तू पी व तुझ्या उंटांनाही मी पाजते. तेव्हा मी पाणी प्यालो व तिने उंटांनाही पाणी पाजले. मग मी तिला विचारले, तू कोणाची मुलगी? ती म्हणाली, नाहोरापासून मिल्केस झालेल्या बथुवेलाची मी मुलगी; तेव्हा मी तिच्या नाकात नथ व हातांत बांगड्या घातल्या. मी नमून परमेश्वराचे स्तवन केले आणि माझ्या धन्याच्या भावाची मुलगी त्याच्या मुलासाठी न्यावी म्हणून माझा धनी अब्राहाम ह्याचा देव परमेश्वर ह्याने मला नीट वाट दाखवली म्हणून मी त्याचे स्तवन केले. तर आता माझ्या धन्याशी स्नेहाने व सत्याने वागणार असलात तर तसे सांगा, नसल्यास तसे सांगा; म्हणजे मी उजवीडावी वाट धरीन.” ह्यावर लाबान व बथुवेल ह्यांनी उत्तर केले. “ही परमेश्वराची योजना आहे; तुम्हांला आमच्याने बरेवाईट काही बोलवत नाही. पाहा, रिबका तुमच्यापुढे आहे; तिला घेऊन जा; परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे ती तुमच्या धन्याच्या मुलाची बायको होऊ द्या.” अब्राहामाच्या सेवकाने त्यांचे हे शब्द ऐकले तेव्हा त्याने भूमीपर्यंत लवून परमेश्वरास नमन केले. मग त्या सेवकाने सोन्यारुप्याचे दागिने व वस्त्रे काढून रिबकेला दिली आणि तिचा भाऊ व तिची आई ह्यांना बहुमोल वस्तू दिल्या. मग त्याने व त्याच्याबरोबरच्या मनुष्यांनी खाणेपिणे करून ती रात्र तेथे घालवली; सकाळी उठल्यावर तो म्हणाला, “माझ्या धन्याकडे जायला मला निरोप द्या. हे ऐकून तिची आई व भाऊ म्हणाले, “मुलीला आमच्याजवळ थोडे दिवस, निदान दहा दिवस तरी राहू द्या; मग ती येईल,” पण तो त्यांना म्हणाला, “परमेश्वराने माझा प्रवास सफळ केला आहे, तर मला ठेवून घेऊ नका; मला निरोप द्या, मला आपल्या धन्याकडे जाऊ द्या.” तेव्हा ते म्हणाले, “आम्ही मुलीला बोलावून ती काय म्हणते ते विचारू.” त्यांनी रिबकेस बोलावून विचारले, “तू ह्या मनुष्याबरोबर जातेस काय?” ती म्हणाली, “जाते.” मग त्यांनी त्यांची बहीण रिबका, तिची दाई, अब्राहामाचा सेवक व त्याची माणसे ह्यांची रवानगी केली. त्यांनी रिबकेला आशीर्वाद देऊन म्हटले, “बाई ग, तू सहस्रावधींची, लक्षावधींची जननी हो व तुझी संतती आपल्या वैर्यांच्या नगरांची सत्ता पावो.” मग रिबका व तिच्या सख्या उठल्या आणि उंटांवर बसून त्या मनुष्याच्या मागे गेल्या; ह्याप्रमाणे तो रिबकेस घेऊन गेला. इकडे इसहाक लहाय-रोई विहिरीकडून आला होता; तो नेगेबात राहत असे. इसहाक संध्याकाळच्या वेळी ध्यान करायला रानात गेला असता त्याने नजर वर करून पाहिले तर त्याला उंट येताना दिसले. रिबकेने दृष्टी वर करून इसहाकाला पाहिले तेव्हा ती उंटावरून उतरली. तिने त्या सेवकाला विचारले, “हा रानात आपल्याला सामोरा येत आहे तो कोण?” सेवक म्हणाला, “हा माझा धनी.” तेव्हा तिने बुरखा घेऊन आपले अंग झाकले. मग आपण काय काय केले ते सर्व त्या सेवकाने इसहाकाला सांगितले. मग इसहाकाने तिला आपली आई सारा हिच्या डेर्यात आणले, त्याने रिबकेचा स्वीकार केला. ती त्याची पत्नी झाली. आणि तिच्यावर त्याचे प्रेम होते; आपल्या आईच्या पश्चात इसहाक सांत्वन पावला.