उत्पत्ती 24:1-10
उत्पत्ती 24:1-10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आता अब्राहाम बऱ्याच वयाचा म्हातारा झाला होता आणि परमेश्वराने अब्राहामाला सर्व गोष्टींत आशीर्वादित केले होते. अब्राहामाने त्याच्या सर्व मालमत्तेचा व घरादाराचा कारभार पाहणाऱ्या आणि त्याच्या घरातील सर्वांत जुन्या सेवकाला म्हटले, “तू आपला हात माझ्या मांडीखाली ठेव, आणि आकाशाचा देव व पृथ्वीचा देव जो परमेश्वर, याची शपथ मी तुला घ्यायला लावतो की, ज्या कनानी लोकांमध्ये मी राहत आहे, त्यांच्या मुलींतून तू माझ्या मुलांसाठी पत्नी पाहणार नाहीस. परंतु, तू माझ्या देशाला माझ्या नातेवाइकांकडे जाशील, आणि तेथून माझा मुलगा इसहाक याच्यासाठी पत्नी मिळवून आणशील.” सेवक त्यास म्हणाला, “ती स्त्री जर माझ्याबरोबर या देशात येण्यास तयार झाली नाही तर? ज्या देशातून तुम्ही आला त्या देशात मी मुलाला घेऊन जावे काय?” अब्राहाम त्यास म्हणाला, “तू माझ्या मुलाला तिकडे परत घेऊन न जाण्याची खबरदारी घे! आकाशाचा देव परमेश्वर, ज्याने मला माझ्या वडिलाच्या घरातून व माझ्या नातेवाइकांच्या देशातून मला आणले व ज्याने बोलून, ‘मी हा देश तुझ्या संततीला देईन,’ असे शपथपूर्वक अभिवचन दिले, तो परमेश्वर आपल्या दूताला तुझ्या पुढे पाठवील, आणि तू तेथून माझ्या मुलासाठी पत्नी आणशील. परंतु ती स्त्री तुझ्याबरोबर येथे येण्यास कबूल झाली नाही, तर मग तू माझ्या शपथेतून मोकळा होशील. परंतु माझ्या मुलाला तू तिकडे घेऊन जाऊ नकोस.” तेव्हा त्या सेवकाने आपला धनी अब्राहाम याच्या मांडीखाली हात ठेवला आणि त्या बाबीसंबंधाने त्याच्याशी शपथ घेतली. मग त्या सेवकाने धन्याच्या उंटांपैकी दहा उंट घेतले आणि निघाला (त्याच्या धन्याची सर्व मालमत्ता त्याच्या हाती होती). त्याने आपल्या धन्याकडून सर्व प्रकारच्या भेटवस्तू आपल्याबरोबर देण्यासाठी घेतल्या. तो अराम-नहराईम प्रदेशातील नाहोराच्या नगरात गेला.
उत्पत्ती 24:1-10 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
अब्राहाम आता खूप वृद्ध झाला होता. याहवेहने त्याला सर्व बाबतीत आशीर्वादित केले होते. अब्राहाम आपल्या घरादाराचा कारभार पाहणार्या सर्वात जुन्या सेवकाला म्हणाला, “तू आपला हात माझ्या मांडीखाली ठेव. स्वर्ग व पृथ्वीचे परमेश्वर याहवेह यांच्या नावाने मला वचन दे की, माझ्या मुलाचा मी राहत असलेल्या स्थानिक कनानी मुलीबरोबर विवाह करून देणार नाहीस, याऐवजी तू माझ्या मायदेशात माझ्या नातेवाईकांकडे जाशील आणि माझा पुत्र इसहाकासाठी एक वधू शोधून आणशील.” सेवकाने अब्राहामाला विचारले, “पण समजा, आपले घर सोडून इतक्या दूर येण्यास ती स्त्री तयार नसेल तर मी इसहाकाला जो देश तुम्ही सोडून आला त्या देशात घेऊन जावे काय?” “माझ्या मुलाला तिकडे कधीही नेऊ नको,” अब्राहाम त्याला म्हणाला. “कारण याहवेह जे स्वर्गाचे परमेश्वर आहेत, त्यांनी माझ्या पित्याच्या घरातून व माझ्या जन्मभूमीतून काढून मला आणि माझ्या मुलाबाळांना हा देश देण्याचे वचन दिले आहे, तेच परमेश्वर तुझ्यापुढे आपला दूत पाठवतील आणि माझ्या मुलासाठी योग्य वधू तुला मिळेल. पण स्त्री येथे येण्यास तयार झाली नाही, तर तू आपल्या वचनातून मुक्त होशील. फक्त माझ्या मुलाला तिकडे नेऊ नकोस.” तेव्हा सेवकाने त्याचा धनी अब्राहामाच्या मांडीखाली हात ठेऊन ही बाब शपथपूर्वक मान्य केली. मग त्या सेवकाने अब्राहामाचे दहा उंट घेऊन, आपल्या धन्याच्या मालमत्तेतील उत्तमोत्तम वस्तू निवडून त्या सर्व उंटांवर लादल्या. मग तो प्रवास करीत अराम-नहराईम मधील नाहोराच्या नगरास गेला.
उत्पत्ती 24:1-10 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
अब्राहाम आता वृद्ध होऊन अगदी वयातीत झाला; परमेश्वराने अब्राहामाला सर्व बाबतींत आशीर्वादित केले होते. अब्राहामाच्या सर्वस्वाचा कारभार पाहणारा एक सर्वांत जुना सेवक होता, त्याला त्याने म्हटले, “तू आपला हात माझ्या मांडीखाली ठेव. मी तुला परमेश्वराची, आकाश व पृथ्वी ह्यांच्या देवाची शपथ घेण्यास सांगतो की ज्या कनानी लोकांत मी राहत आहे त्यांच्या मुलींपैकी कोणतीही नवरी माझ्या मुलासाठी तू पाहणार नाहीस. तर माझ्या देशाला माझ्या आप्तांकडे जाऊन तेथून माझा मुलगा इसहाक ह्याच्यासाठी नवरी पाहून आणशील.” त्याचा सेवक त्याला म्हणाला, “यदाकदाचित नवरी माझ्याबरोबर ह्या देशात येण्यास कबूल झाली नाही तर ज्या देशातून तुम्ही आला त्यात तुमच्या मुलास मी परत घेऊन जावे काय?” तेव्हा अब्राहाम त्याला म्हणाला, “खबरदार! माझ्या मुलाला तिकडे न्यायचे नाही. स्वर्गीच्या ज्या परमेश्वर देवाने मला माझ्या बापाच्या घरातून, माझ्या जन्मभूमीतून आणले आणि मला शपथपूर्वक सांगितले की हा देश मी तुझ्या संततीला देईन. तो तुझ्यापुढे आपला दूत पाठवील आणि तू तेथूनच माझ्या मुलासाठी नवरी आण. पण ती नवरी तुझ्याबरोबर येण्यास कबूल झाली नाही तर तू ह्या माझ्या शपथेतून मोकळा होशील; मात्र माझ्या मुलाला तिकडे परत नेऊ नकोस.” तेव्हा त्या सेवकाने आपला धनी अब्राहाम ह्याच्या मांडीखाली हात ठेवून त्या बाबतीत शपथ वाहिली. मग तो सेवक आपल्या धन्याच्या उंटांपैकी दहा उंट घेऊन निघाला; त्याच्याजवळ त्याच्या धन्याच्या सर्व प्रकारच्या मौल्यवान वस्तू होत्या; तो अराम-नहराईम ह्यातील नाहोराच्या नगरात गेला.