YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 22:9-19

उत्पत्ती 22:9-19 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

देवाने सांगितलेल्या ठिकाणी जेव्हा ते जाऊन पोहचले, तेथे अब्राहामाने एक वेदी बांधली, त्याने वेदीवर लाकडे रचली. नंतर त्याने आपला पुत्र इसहाक याला बांधले, आणि वेदीवरील लाकडावर ठेवले. मग अब्राहामाने आपला हात पुढे करून आपल्या मुलाला मारण्यासाठी सुरा हातात घेतला. परंतु तेवढ्यात, परमेश्वराच्या दूताने स्वर्गातून हाक मारून त्यास म्हटले, “अब्राहामा, अब्राहामा!” अब्राहामाने उत्तर दिले, “मी येथे आहे.” तो म्हणाला, “तू आपल्या मुलावर हात टाकू नकोस, किंवा त्यास कोणत्याही प्रकारची इजा करू नकोस, कारण आता मला खात्रीने समजले की, तू देवाचे भय बाळगतोस, कारण तू माझ्यासाठी आपल्या एकुलत्या एका पुत्राला ही राखून ठेवले नाही.” आणि मग अब्राहामाने वर पाहिले आणि पाहा, त्याच्यामागे एका झुडपात शिंगे अडकलेला असा एक एडका होता. मग त्याने जाऊन तो घेतला व आपल्या मुलाच्या ऐवजी त्या एडक्याचे होमार्पण म्हणून अर्पण केले. तेव्हा अब्राहामाने त्या जागेला, “परमेश्वर पुरवठा करेल,” असे नाव दिले, आणि आजवर देखील, “परमेश्वराच्या डोंगरावर तो पुरवठा केला जाईल,” असे बोलले जाते. नंतर स्वर्गातून परमेश्वराच्या दूताने अब्राहामास दुसऱ्यांदा हाक मारली आणि म्हटले, हे परमेश्वराचे शब्द आहेत, “मी परमेश्वर आपलीच शपथ वाहून म्हणतो की, तू ही जी गोष्ट केली आहे, म्हणजे तू आपल्या एकुलत्या एका मुलाला राखून ठेवले नाही, मी खरोखर तुला आशीर्वाद देईन व तुझे वंशज आकाशातल्या ताऱ्यांसारखे व समुद्र किनाऱ्यावरील वाळू इतके बहुतपट वाढवीनच वाढवीन; आणि तुझे वंशज आपल्या शत्रूच्या वेशीचा ताबा मिळवतील. पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे तुझ्या संततीद्वारे आशीर्वादित होतील, कारण तू माझा शब्द पाळला आहेस.” मग अब्राहाम आपल्या तरुण सेवकाकडे परत आला आणि अब्राहाम, इसहाक व त्याचे सेवक असे सर्व मिळून बैर-शेबाला गेले, आणि तो बैर-शेबा येथे राहिला.

सामायिक करा
उत्पत्ती 22 वाचा

उत्पत्ती 22:9-19 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

परमेश्वराने ज्या ठिकाणी जाण्यास सांगितले होते त्या जागी आल्यावर अब्राहामाने एक वेदी बांधली आणि त्यावर त्याने लाकडे रचून ठेवली. त्याने आपला पुत्र इसहाकाला बांधले आणि वेदीवरील लाकडांवर ठेवले; मग अब्राहामाने आपल्या मुलाचा बळी देण्याकरिता आपल्या हातातील सुरा उंचाविला. त्याच क्षणाला याहवेहचा दूत स्वर्गातून ओरडून म्हणाला, “अब्राहामा, अब्राहामा!” “हा मी इथे आहे,” तो उत्तरला. “मुलावर आपला हात उगारू नको.” तो म्हणाला, “त्याला काहीही करू नकोस. तुला परमेश्वराचे भय आहे हे मला समजले आहे, कारण तुझा पुत्र, एकुलता एक पुत्र मला अर्पिण्याचे तू नाकारले नाहीस.” अब्राहामाची नजर झुडूपात शिंगे अडकलेल्या एका एडक्याकडे गेली. त्याने तो एडका धरला आणि आपल्या पुत्राच्या जागी त्याने त्या एडक्याचा होमार्पण म्हणून बळी दिला. म्हणून अब्राहामाने त्या जागेचे नाव “याहवेह यिरेह” आजपर्यंत “याहवेहच्या डोंगरावर पुरवठा केला जाईल,” असे बोलले जाते. नंतर याहवेहच्या दूताने अब्राहामाला स्वर्गातून दुसर्‍यांदा हाक मारली. ते म्हणाले, “मी याहवेह, स्वतःचीच शपथ घेऊन तुला सांगतो की, कारण तू हे केलेस आणि स्वतःच्या पुत्राला, एकुलत्या एक पुत्राला अर्पण करण्यास तू नाकारले नाहीस, म्हणून मी तुला निश्चितच आशीर्वादित करेन आणि वृद्धिंगत करून तुझी संतती आकाशातील तार्‍यांइतकी आणि समुद्रतीरावरील वाळू इतकी करेन. तुझी संतती आपल्या सर्व शत्रूंची शहरे हस्तगत करेल, आणि तू माझ्या आज्ञा पाळल्या आहेस, म्हणून पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे तुझ्या वंशजापासून आशीर्वादित होतील.” यानंतर अब्राहाम आपल्या सेवकांकडे परत आला आणि ते सर्वजण बेअर-शेबा येथे आपल्या घरी परतले आणि अब्राहाम बेअर-शेबा येथे राहिला.

सामायिक करा
उत्पत्ती 22 वाचा

उत्पत्ती 22:9-19 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

देवाने त्याला सांगितलेल्या ठिकाणी ते आले तेव्हा अब्राहामाने तेथे वेदी उभारली, तिच्यावर लाकडे रचली आणि आपला पुत्र इसहाक ह्याला बांधून वेदीवरच्या लाकडांवर ठेवले. मग अब्राहामाने आपला मुलगा वधण्यासाठी हात पुढे करून सुरा घेतला. तेव्हा परमेश्वराच्या दूताने त्याला आकाशातून हाक मारून म्हटले, “अब्राहामा! अब्राहामा!” तो म्हणाला, “काय आज्ञा?” मग तो बोलला, “तू मुलावर आपला हात चालवू नकोस, त्याला काही करू नकोस; कारण तू आपल्या मुलाला, आपल्या एकुलत्या एका मुलालाही माझ्यापासून राखून ठेवले नाहीस, ह्यावरून तू देवाला भिऊन चालणारा आहेस हे मला कळले.” तेव्हा अब्राहामाने दृष्टी वर करून पाहिले तेव्हा आपल्यामागे झुडपात शिंगे गुंतलेला एक एडका त्याला दिसला. मग अब्राहामाने तो एडका घेऊन आपल्या पुत्राच्या ऐवजी अर्पण केला. म्हणून अब्राहामाने त्या ठिकाणाचे नाव याव्हे-यिरे (परमेश्वर पाहून देईल) असे ठेवले; त्यावरून परमेश्वराच्या गिरीवर पाहून देण्यात येईल असे आजवर बोलतात. परमेश्वराच्या दूताने आकाशातून अब्राहामाला दुसर्‍यांदा हाक मारून म्हटले, “परमेश्वर म्हणतो, मी स्वत:ची शपथ घेऊन सांगतो की तू हे कृत्य केलेस; आपल्या मुलाला, आपल्या एकुलत्या एका मुलाला माझ्यापासून राखून ठेवले नाहीस; ह्यास्तव मी तुला आशीर्वादित करीन व वृद्धीच वृद्धी करून तुझी संतती आकाशातील तार्‍यांइतकी, समुद्रतीरीच्या वाळूइतकी होईल असे करीन. तुझी संतती आपल्या शत्रूंची नगरे हस्तगत करील. तू माझा शब्द ऐकला म्हणून पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्या द्वारे आशीवार्र्दित होतील.” मग अब्राहाम आपल्या सेवकांकडे परत आला, आणि ते उठून त्याच्याबरोबर बैर-शेबा येथे गेले; आणि अब्राहाम बैर-शेबा येथे राहिला.

सामायिक करा
उत्पत्ती 22 वाचा