YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 22:1-8

उत्पत्ती 22:1-8 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

ह्या गोष्टी घडल्यावर असे झाले की देवाने अब्राहामाला कसोटीस लावले; त्याने ‘अब्राहामा’, अशी हाक मारली, तेव्हा अब्राहाम म्हणाला, “काय आज्ञा?” देव म्हणाला, “तुझा पुत्र, तुझा एकुलता एक प्रिय इसहाक ह्याला घेऊन मोरिया देशात जा आणि मी तुला सांगेन त्या डोंगरावर त्याचे होमार्पण कर.” तेव्हा अब्राहामाने मोठ्या पहाटेस उठून आपल्या गाढवावर खोगीर घातले, आपल्याबरोबर दोघे सेवक व आपला मुलगा इसहाक ह्यांना घेतले, आणि होमार्पणासाठी लाकडे फोडून घेतली. मग देवाने सांगितलेल्या ठिकाणाकडे तो निघाला. तिसर्‍या दिवशी अब्राहामाने दृष्टी वर करून ती जागा दुरून पाहिली. अब्राहाम आपल्या सेवकांना म्हणाला, “इथे गाढवाजवळ थांबा, मुलगा व मी पलीकडे जातो आणि देवाची उपासना करून तुमच्याकडे परत येतो.” तेव्हा अब्राहामाने होमार्पणासाठी लाकडे घेऊन आपला पुत्र इसहाक ह्याच्या पाठीवर ठेवली आणि आपल्या हाती विस्तव व सुरा घेतला, आणि ते दोघे बरोबर चालले. तेव्हा इसहाकाने आपला बाप अब्राहाम ह्याला म्हटले, “बाबा!” तो म्हणाला, “काय म्हणतोस बाळा?” त्याने म्हटले, “पाहा, विस्तव व लाकडे आहेत, पण होमार्पणासाठी कोकरू कोठे आहे?” अब्राहाम म्हणाला, “बाळा, देव स्वत: होमार्पणासाठी कोकरू पाहून देईल.” आणि ते दोघे बरोबर चालले.

सामायिक करा
उत्पत्ती 22 वाचा

उत्पत्ती 22:1-8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

या गोष्टी झाल्यानंतर देवाने अब्राहामाची परीक्षा घेतली. तो अब्राहामाला म्हणाला, “अब्राहामा!” अब्राहाम म्हणाला, “हा मी येथे आहे.” नंतर देव म्हणाला, “तुझा एकुलता एक प्रिय पुत्र, ज्याच्यावर तू प्रीती करतोस त्या इसहाकाला घेऊन तू मोरिया देशात जा आणि तेथे मी तुला सांगेन त्या डोंगरावर माझ्यासाठी त्याचे होमार्पण कर.” तेव्हा अब्राहाम पहाटेस लवकर उठला, त्याने खोगीर घालून आपले गाढव तयार केले, आपला मुलगा इसहाक व त्याच्यासोबत दोन तरुण सेवकांना आपल्याबरोबर घेतले. त्याने होमार्पणाकरिता लाकडे फोडून घेतली आणि मग ते सर्व देवाने सांगितलेल्या ठिकाणी प्रवासास निघाले. तिसऱ्या दिवशी अब्राहामाने वर पाहिले आणि दूर अंतरावर ती जागा पाहिली. मग अब्राहाम आपल्या तरुण सेवकांना म्हणाला, “तुम्ही येथे गाढवाजवळ थांबा, आणि मी व मुलगा तिकडे जातो. आम्ही देवाची आराधना करू आणि तुम्हाकडे परत येऊ.” अब्राहामाने होमार्पणासाठी लाकडे घेऊन इसहाकाच्या खांद्यावर ठेवली; त्याने स्वतःच्या हातात अग्नी व एक सुरा घेतला. आणि ते दोघे बरोबर निघाले. इसहाक आपल्या पित्याला म्हणाला, “माझ्या बाबा.” अब्राहामाने उत्तर दिले, “मी येथे आहे, माझ्या मुला.” इसहाक म्हणाला, “मला लाकडे व अग्नी दिसतात, परंतु होमार्पणासाठी कोकरू कोठे आहे?” अब्राहाम म्हणाला, “माझ्या मुला, होमार्पणासाठी कोकरू देव स्वतः आपल्याला पुरवेल.” तेव्हा अब्राहाम व त्याचा मुलगा बरोबर निघाले.

सामायिक करा
उत्पत्ती 22 वाचा