YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 22:1-24

उत्पत्ती 22:1-24 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

या गोष्टी झाल्यानंतर देवाने अब्राहामाची परीक्षा घेतली. तो अब्राहामाला म्हणाला, “अब्राहामा!” अब्राहाम म्हणाला, “हा मी येथे आहे.” नंतर देव म्हणाला, “तुझा एकुलता एक प्रिय पुत्र, ज्याच्यावर तू प्रीती करतोस त्या इसहाकाला घेऊन तू मोरिया देशात जा आणि तेथे मी तुला सांगेन त्या डोंगरावर माझ्यासाठी त्याचे होमार्पण कर.” तेव्हा अब्राहाम पहाटेस लवकर उठला, त्याने खोगीर घालून आपले गाढव तयार केले, आपला मुलगा इसहाक व त्याच्यासोबत दोन तरुण सेवकांना आपल्याबरोबर घेतले. त्याने होमार्पणाकरिता लाकडे फोडून घेतली आणि मग ते सर्व देवाने सांगितलेल्या ठिकाणी प्रवासास निघाले. तिसऱ्या दिवशी अब्राहामाने वर पाहिले आणि दूर अंतरावर ती जागा पाहिली. मग अब्राहाम आपल्या तरुण सेवकांना म्हणाला, “तुम्ही येथे गाढवाजवळ थांबा, आणि मी व मुलगा तिकडे जातो. आम्ही देवाची आराधना करू आणि तुम्हाकडे परत येऊ.” अब्राहामाने होमार्पणासाठी लाकडे घेऊन इसहाकाच्या खांद्यावर ठेवली; त्याने स्वतःच्या हातात अग्नी व एक सुरा घेतला. आणि ते दोघे बरोबर निघाले. इसहाक आपल्या पित्याला म्हणाला, “माझ्या बाबा.” अब्राहामाने उत्तर दिले, “मी येथे आहे, माझ्या मुला.” इसहाक म्हणाला, “मला लाकडे व अग्नी दिसतात, परंतु होमार्पणासाठी कोकरू कोठे आहे?” अब्राहाम म्हणाला, “माझ्या मुला, होमार्पणासाठी कोकरू देव स्वतः आपल्याला पुरवेल.” तेव्हा अब्राहाम व त्याचा मुलगा बरोबर निघाले. देवाने सांगितलेल्या ठिकाणी जेव्हा ते जाऊन पोहचले, तेथे अब्राहामाने एक वेदी बांधली, त्याने वेदीवर लाकडे रचली. नंतर त्याने आपला पुत्र इसहाक याला बांधले, आणि वेदीवरील लाकडावर ठेवले. मग अब्राहामाने आपला हात पुढे करून आपल्या मुलाला मारण्यासाठी सुरा हातात घेतला. परंतु तेवढ्यात, परमेश्वराच्या दूताने स्वर्गातून हाक मारून त्यास म्हटले, “अब्राहामा, अब्राहामा!” अब्राहामाने उत्तर दिले, “मी येथे आहे.” तो म्हणाला, “तू आपल्या मुलावर हात टाकू नकोस, किंवा त्यास कोणत्याही प्रकारची इजा करू नकोस, कारण आता मला खात्रीने समजले की, तू देवाचे भय बाळगतोस, कारण तू माझ्यासाठी आपल्या एकुलत्या एका पुत्राला ही राखून ठेवले नाही.” आणि मग अब्राहामाने वर पाहिले आणि पाहा, त्याच्यामागे एका झुडपात शिंगे अडकलेला असा एक एडका होता. मग त्याने जाऊन तो घेतला व आपल्या मुलाच्या ऐवजी त्या एडक्याचे होमार्पण म्हणून अर्पण केले. तेव्हा अब्राहामाने त्या जागेला, “परमेश्वर पुरवठा करेल,” असे नाव दिले, आणि आजवर देखील, “परमेश्वराच्या डोंगरावर तो पुरवठा केला जाईल,” असे बोलले जाते. नंतर स्वर्गातून परमेश्वराच्या दूताने अब्राहामास दुसऱ्यांदा हाक मारली आणि म्हटले, हे परमेश्वराचे शब्द आहेत, “मी परमेश्वर आपलीच शपथ वाहून म्हणतो की, तू ही जी गोष्ट केली आहे, म्हणजे तू आपल्या एकुलत्या एका मुलाला राखून ठेवले नाही, मी खरोखर तुला आशीर्वाद देईन व तुझे वंशज आकाशातल्या ताऱ्यांसारखे व समुद्र किनाऱ्यावरील वाळू इतके बहुतपट वाढवीनच वाढवीन; आणि तुझे वंशज आपल्या शत्रूच्या वेशीचा ताबा मिळवतील. पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे तुझ्या संततीद्वारे आशीर्वादित होतील, कारण तू माझा शब्द पाळला आहेस.” मग अब्राहाम आपल्या तरुण सेवकाकडे परत आला आणि अब्राहाम, इसहाक व त्याचे सेवक असे सर्व मिळून बैर-शेबाला गेले, आणि तो बैर-शेबा येथे राहिला. या सर्व गोष्टी घडल्यानंतर अब्राहामाला असा निरोप आला, “पाहा तुझा भाऊ नाहोर व त्याची पत्नी मिल्का यांनाही आता मुले झाली आहेत.” त्याच्या पहिल्या मुलाचे नाव ऊस, त्याचा भाऊ बूज, अरामाचा बाप कमुवेल, त्यानंतर केसेद, हजो, पिलदाश, यिदलाप आणि बथुवेल अशी त्यांची नावे आहेत. बथुवेल रिबकाचा बाप होता. अब्राहामाचा भाऊ नाहोर याजपासून मिल्केला हे आठ पुत्र झाले; त्याची उपपत्नी रेऊमा हिलाही त्याच्यापासून तेबाह, गहाम, तहश व माका हे चार पुत्र झाले.

सामायिक करा
उत्पत्ती 22 वाचा

उत्पत्ती 22:1-24 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

काही वेळेनंतर परमेश्वराने अब्राहामाची परीक्षा घेतली. परमेश्वराने त्यास म्हटले, “अब्राहामा!” “हा, मी इथे आहे,” तो उत्तरला. मग परमेश्वर म्हणाले, “तुझा पुत्र, ज्याच्यावर तू प्रीती करतोस तो तुझा एकुलता एक पुत्र इसहाकाला बरोबर घे आणि मोरिया प्रदेशात जा आणि त्या ठिकाणी मी तुला जो डोंगर दाखवेन त्या डोंगरावर त्याचे होमार्पण कर.” अब्राहामाने दुसर्‍या दिवशी पहाटेस उठून गाढवावर खोगीर लादले आणि आपला पुत्र इसहाक व दोन सेवकांना व होमार्पणासाठी पुरेशी लाकडे बरोबर घेऊन तो परमेश्वराने सांगितलेल्या ठिकाणी जावयास निघाला. तिसर्‍या दिवशी अब्राहामाने आपली दृष्टी वर करून ते ठिकाण दुरून पाहिले. तेव्हा अब्राहाम सेवकांना म्हणाला, “तुम्ही येथे गाढवाजवळ थांबा, मी आणि माझा पुत्र पलीकडे जातो. परमेश्वराची उपासना करून तुमच्याकडे परत येतो.” अब्राहामाने होमार्पणासाठी घेतलेले लाकूड इसहाकाच्या खांद्यावर ठेवले आणि स्वतः सुरा व विस्तव घेतला. जसे ते चालत पुढे गेले, इसहाकाने अब्राहामाला विचारले, “बाबा?” “काय माझ्या मुला?” अब्राहामाने उत्तर दिले. “आपण लाकडे व विस्तव घेतले,” इसहाक म्हणाला, “पण होमार्पणासाठी कोकरू कुठे आहे?” अब्राहामाने उत्तर दिले, “परमेश्वर होमार्पणासाठी कोकरू पुरवतील, माझ्या मुला.” आणि ते दोघे एकत्र पुढे गेले. परमेश्वराने ज्या ठिकाणी जाण्यास सांगितले होते त्या जागी आल्यावर अब्राहामाने एक वेदी बांधली आणि त्यावर त्याने लाकडे रचून ठेवली. त्याने आपला पुत्र इसहाकाला बांधले आणि वेदीवरील लाकडांवर ठेवले; मग अब्राहामाने आपल्या मुलाचा बळी देण्याकरिता आपल्या हातातील सुरा उंचाविला. त्याच क्षणाला याहवेहचा दूत स्वर्गातून ओरडून म्हणाला, “अब्राहामा, अब्राहामा!” “हा मी इथे आहे,” तो उत्तरला. “मुलावर आपला हात उगारू नको.” तो म्हणाला, “त्याला काहीही करू नकोस. तुला परमेश्वराचे भय आहे हे मला समजले आहे, कारण तुझा पुत्र, एकुलता एक पुत्र मला अर्पिण्याचे तू नाकारले नाहीस.” अब्राहामाची नजर झुडूपात शिंगे अडकलेल्या एका एडक्याकडे गेली. त्याने तो एडका धरला आणि आपल्या पुत्राच्या जागी त्याने त्या एडक्याचा होमार्पण म्हणून बळी दिला. म्हणून अब्राहामाने त्या जागेचे नाव “याहवेह यिरेह” आजपर्यंत “याहवेहच्या डोंगरावर पुरवठा केला जाईल,” असे बोलले जाते. नंतर याहवेहच्या दूताने अब्राहामाला स्वर्गातून दुसर्‍यांदा हाक मारली. ते म्हणाले, “मी याहवेह, स्वतःचीच शपथ घेऊन तुला सांगतो की, कारण तू हे केलेस आणि स्वतःच्या पुत्राला, एकुलत्या एक पुत्राला अर्पण करण्यास तू नाकारले नाहीस, म्हणून मी तुला निश्चितच आशीर्वादित करेन आणि वृद्धिंगत करून तुझी संतती आकाशातील तार्‍यांइतकी आणि समुद्रतीरावरील वाळू इतकी करेन. तुझी संतती आपल्या सर्व शत्रूंची शहरे हस्तगत करेल, आणि तू माझ्या आज्ञा पाळल्या आहेस, म्हणून पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे तुझ्या वंशजापासून आशीर्वादित होतील.” यानंतर अब्राहाम आपल्या सेवकांकडे परत आला आणि ते सर्वजण बेअर-शेबा येथे आपल्या घरी परतले आणि अब्राहाम बेअर-शेबा येथे राहिला. काही वेळेनंतर अब्राहामाला सांगण्यात आले, “त्याचा भाऊ नाहोर याची पत्नी मिल्का हिलाही मुले झाली आहेत: ऊस हा त्याचा प्रथमपुत्र, त्याचा भाऊ बूज व कमुवेल (अरामचा पिता) आणि केसद, हजो, पिलदाश, यिदलाप व बेथुएल.” बेथुएल रिबेकाहचा पिता झाला. अब्राहामाचा भाऊ नाहोराची पत्नी मिल्का हिला हे आठ पुत्र झाले. नाहोराची उपपत्नी रेऊमा हिलाही पुत्र झाले: तेबाह, गहाम, तहश व माकाह.

सामायिक करा
उत्पत्ती 22 वाचा

उत्पत्ती 22:1-24 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

ह्या गोष्टी घडल्यावर असे झाले की देवाने अब्राहामाला कसोटीस लावले; त्याने ‘अब्राहामा’, अशी हाक मारली, तेव्हा अब्राहाम म्हणाला, “काय आज्ञा?” देव म्हणाला, “तुझा पुत्र, तुझा एकुलता एक प्रिय इसहाक ह्याला घेऊन मोरिया देशात जा आणि मी तुला सांगेन त्या डोंगरावर त्याचे होमार्पण कर.” तेव्हा अब्राहामाने मोठ्या पहाटेस उठून आपल्या गाढवावर खोगीर घातले, आपल्याबरोबर दोघे सेवक व आपला मुलगा इसहाक ह्यांना घेतले, आणि होमार्पणासाठी लाकडे फोडून घेतली. मग देवाने सांगितलेल्या ठिकाणाकडे तो निघाला. तिसर्‍या दिवशी अब्राहामाने दृष्टी वर करून ती जागा दुरून पाहिली. अब्राहाम आपल्या सेवकांना म्हणाला, “इथे गाढवाजवळ थांबा, मुलगा व मी पलीकडे जातो आणि देवाची उपासना करून तुमच्याकडे परत येतो.” तेव्हा अब्राहामाने होमार्पणासाठी लाकडे घेऊन आपला पुत्र इसहाक ह्याच्या पाठीवर ठेवली आणि आपल्या हाती विस्तव व सुरा घेतला, आणि ते दोघे बरोबर चालले. तेव्हा इसहाकाने आपला बाप अब्राहाम ह्याला म्हटले, “बाबा!” तो म्हणाला, “काय म्हणतोस बाळा?” त्याने म्हटले, “पाहा, विस्तव व लाकडे आहेत, पण होमार्पणासाठी कोकरू कोठे आहे?” अब्राहाम म्हणाला, “बाळा, देव स्वत: होमार्पणासाठी कोकरू पाहून देईल.” आणि ते दोघे बरोबर चालले. देवाने त्याला सांगितलेल्या ठिकाणी ते आले तेव्हा अब्राहामाने तेथे वेदी उभारली, तिच्यावर लाकडे रचली आणि आपला पुत्र इसहाक ह्याला बांधून वेदीवरच्या लाकडांवर ठेवले. मग अब्राहामाने आपला मुलगा वधण्यासाठी हात पुढे करून सुरा घेतला. तेव्हा परमेश्वराच्या दूताने त्याला आकाशातून हाक मारून म्हटले, “अब्राहामा! अब्राहामा!” तो म्हणाला, “काय आज्ञा?” मग तो बोलला, “तू मुलावर आपला हात चालवू नकोस, त्याला काही करू नकोस; कारण तू आपल्या मुलाला, आपल्या एकुलत्या एका मुलालाही माझ्यापासून राखून ठेवले नाहीस, ह्यावरून तू देवाला भिऊन चालणारा आहेस हे मला कळले.” तेव्हा अब्राहामाने दृष्टी वर करून पाहिले तेव्हा आपल्यामागे झुडपात शिंगे गुंतलेला एक एडका त्याला दिसला. मग अब्राहामाने तो एडका घेऊन आपल्या पुत्राच्या ऐवजी अर्पण केला. म्हणून अब्राहामाने त्या ठिकाणाचे नाव याव्हे-यिरे (परमेश्वर पाहून देईल) असे ठेवले; त्यावरून परमेश्वराच्या गिरीवर पाहून देण्यात येईल असे आजवर बोलतात. परमेश्वराच्या दूताने आकाशातून अब्राहामाला दुसर्‍यांदा हाक मारून म्हटले, “परमेश्वर म्हणतो, मी स्वत:ची शपथ घेऊन सांगतो की तू हे कृत्य केलेस; आपल्या मुलाला, आपल्या एकुलत्या एका मुलाला माझ्यापासून राखून ठेवले नाहीस; ह्यास्तव मी तुला आशीर्वादित करीन व वृद्धीच वृद्धी करून तुझी संतती आकाशातील तार्‍यांइतकी, समुद्रतीरीच्या वाळूइतकी होईल असे करीन. तुझी संतती आपल्या शत्रूंची नगरे हस्तगत करील. तू माझा शब्द ऐकला म्हणून पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्या द्वारे आशीवार्र्दित होतील.” मग अब्राहाम आपल्या सेवकांकडे परत आला, आणि ते उठून त्याच्याबरोबर बैर-शेबा येथे गेले; आणि अब्राहाम बैर-शेबा येथे राहिला. ह्या गोष्टी घडल्यानंतर कोणी अब्राहामास सांगितले, “पाहा, तुझा भाऊ नाहोर ह्याच्यापासून मिल्केलाही पुत्रसंतती झाली आहे. ऊस हा त्याचा ज्येष्ठ पुत्र, त्याचा भाऊ बूज व अरामाचा पूर्वज कमुवेल, आणि केसद, हजो, पिलदाश, यिदलाप व बथुवेल. बथुवेलास रिबका झाली; अब्राहामाचा भाऊ नाहोर ह्याच्यापासून मिल्केला हे आठ मुलगे झाले; आणि त्याची उपपत्नी रेऊमा हिलाही तेबाह, गहाम, तहश व माका हे झाले.

सामायिक करा
उत्पत्ती 22 वाचा