उत्पत्ती 21:8-20
उत्पत्ती 21:8-20 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग बालक वाढत गेला आणि त्याचे स्तनपान तोडले, आणि इसहाकाच्या स्तनपान तोडण्याच्या दिवशी अब्राहामाने मोठी मेजवानी दिली. मग साराची मिसरी दासी हागार हिचा मुलगा इश्माएल जो तिला अब्राहामापासून झाला होता, तो चेष्टा करीत आहे असे सारेने पाहिले. म्हणून सारा अब्राहामाला म्हणाली, “या दासीला व तिच्या मुलाला येथून बाहेर घालवून द्या. या दासीचा मुलगा, माझा मुलगा इसहाक याच्याबरोबर वारस होणार नाही.” त्याच्या मुलामुळे या गोष्टीचे अब्राहामाला फार दुःख झाले. परंतु देव अब्राहामाला म्हणाला, “मुलाकरता व तुझ्या दासी करता दुःखी होऊ नकोस. तुला ती या बाबतीत जे काही सांगते, ते तिचे सर्व म्हणणे ऐक. कारण इसहाकाद्वारेच तुझ्या वंशाला नाव देण्यात येईल. मी त्या दासीच्या मुलाचेही राष्ट्र करीन, कारण तो तुझा वंशज आहे.” अब्राहाम सकाळीच लवकर उठला, भाकरी व पाण्याची कातडी पिशवी घेतली आणि हागारेला देऊन तिच्या खांद्यावर ठेवली. त्याने तिचा मुलगा तिला दिला आणि तिला पाठवून दिले. ती गेली आणि बैर-शेबाच्या रानामध्ये भटकत राहिली. कातडी पिशवीतील पाणी संपले, तेव्हा हागारेने आपल्या मुलाला एका झुडपाखाली टाकले. नंतर ती बरीच दूर म्हणजे बाणाच्या टप्प्याइतकी दूर जाऊन बसली, कारण तिने म्हटले “मला माझ्या मुलाचे मरण पाहायला नको.” ती त्याच्या समोर बसून मोठमोठ्याने हंबरडा फोडून रडू लागली. देवाने मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकला आणि देवाचा दूत स्वर्गातून हागारेला हाक मारून म्हणाला, “हागारे, तुला काय झाले? भिऊ नकोस, तुझा मुलगा जेथे आहे तेथून त्याचा आवाज देवाने ऐकला आहे ऊठ, मुलाला उचलून घे. आणि त्यास धैर्य दे, मी त्याच्यापासून एक मोठे राष्ट्र करीन.” मग देवाने हागारेचे डोळे उघडले आणि तिने पाण्याची विहीर पाहिली. ती गेली आणि पाण्याची कातडी पिशवी भरून घेतली आणि मुलाला पाणी प्यायला दिले. देव त्या मुलाबरोबर होता आणि तो वाढला. तो रानात राहिला आणि तिरंदाज बनला.
उत्पत्ती 21:8-20 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तो बाळ मोठा झाला तेव्हा त्याचे दूध तोडले; इसहाकाचे दूध तोडले त्या दिवशी अब्राहामाने मोठी मेजवानी दिली. हागार मिसरिणीस अब्राहामापासून झालेल्या मुलाला खिदळताना सारेने पाहिले. तेव्हा ती अब्राहामाला म्हणाली, “ह्या दासीला व हिच्या मुलाला घालवून द्या; माझा मुलगा इसहाक ह्याच्याबरोबर ह्या दासीचा मुलगा वारस नसावा.” अब्राहामाला आपल्या मुलासंबंधी ही गोष्ट फार वाईट वाटली. तेव्हा देव अब्राहामाला म्हणाला, “हा मुलगा व तुझी दासी ह्यांच्यासंबंधी तू वाईट वाटून घेऊ नकोस; सारा तुला जे काही सांगते ते सगळे ऐक; कारण तुझ्या वंशाचे नाव इसहाकच चालवणार. ह्या दासीच्या मुलापासूनही मी एक राष्ट्र निर्माण करीन; कारण तो तुझे बीज आहे.” नंतर अब्राहामाने मोठ्या पहाटेस उठून भाकरी व पाण्याची मसक आणून हागारेच्या खांद्यावर ठेवली आणि तिचा मुलगा तिच्या हवाली करून तिला रवाना केले; ती निघून बैर-शेबाच्या रानात भटकत राहिली. मसकेतील पाणी संपल्यावर तिने त्या मुलाला एका झुडपाखाली टाकले, आणि ती बाणाच्या टप्प्याइतकी दूर जाऊन त्याच्यासमोर बसली; ती म्हणाली, “आपण आपल्या मुलाचा मृत्यू पाहू नये;” आणि ती त्याच्यासमोर बसून हंबरडा फोडून रडू लागली. देवाने मुलाची वाणी ऐकली व देवाच्या दूताने आकाशातून हाक मारून हागारेला म्हटले, “हागारे, तू कष्टी का? भिऊ नकोस, कारण मुलगा आहे तेथून देवाने त्याची वाणी ऐकली आहे. ऊठ, मुलाला उचलून आपल्या हाती घट्ट धर; त्याच्यापासून मी एक मोठे राष्ट्र निर्माण करीन.” मग देवाने तिचे डोळे उघडले. पाण्याचा झरा तिच्या दृष्टीस पडला; तेव्हा तिने जाऊन मसकेत पाणी भरले व मुलाला पाजले. देव त्या मुलाचा पाठीराखा झाला व तो रानात लहानाचा मोठा होऊन तिरंदाज झाला.