उत्पत्ती 20:1-18
उत्पत्ती 20:1-18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
अब्राहाम तेथून नेगेबकडे प्रवास करीत आणि कादेश व शूर यांच्यामध्ये राहिला. तो गरारात परदेशी मनुष्य म्हणून राहिला होता. अब्राहाम आपली पत्नी सारा हिच्याविषयी म्हणाला, “ती माझी बहीण आहे.” गराराचा राजा अबीमलेखाने आपली माणसे पाठवली आणि ते सारेला घेऊन गेले. परंतु देव रात्री अबीमलेखाच्या स्वप्नात येऊन म्हणाला, “पाहा जी स्त्री तू घेऊन आलास तिच्यामुळे तू मेलाच म्हणून असे समज, कारण ती एका मनुष्याची पत्नी आहे.” परंतु अबीमलेख तिच्याजवळ गेला नव्हता. तो म्हणाला, “प्रभू, तू नीतिमान राष्ट्राचाही नाश करणार काय? ‘ती माझी बहीण आहे,’ असे तो स्वतःच मला म्हणाला नाही काय? आणि ‘तो माझा भाऊ आहे,’ असे तिनेही म्हटले. मी आपल्या अंतःकरणाच्या शुद्धपणाने आणि आपल्या हाताच्या निर्दोषतेने हे केले आहे.” मग देव त्यास स्वप्नात म्हणाला, “होय! तू आपल्या अंतःकरणाच्या शुद्धतेने हे केले आहेस हे मला माहीत आहे, आणि तू माझ्याविरूद्ध पाप करू नये म्हणून मी तुला आवरले. मीच तुला तिला स्पर्श करू दिला नाही. म्हणून आता तू अब्राहामाची पत्नी सारा ही त्यास परत दे; कारण तो संदेष्टा आहे; तो तुझ्यासाठी प्रार्थना करील व तू वाचशील. परंतु तू तिला त्याच्याकडे परत पाठवले नाहीस, तर तू आणि तुझ्या बरोबर जे सर्व तुझे आहेत ते खात्रीने मरतील, हे लक्षात ठेव.” अबीमलेख सकाळीच लवकर उठला आणि त्याने आपल्या सर्व सेवकांना स्वतःकडे बोलावले. त्याने सगळ्या गोष्टी त्यांना सांगितल्या तेव्हा ती माणसे फारच घाबरली. मग अबीमलेखाने अब्राहामास बोलावून त्यास म्हटले, “तू हे आम्हांला काय केले? मी तुझ्याविरूद्ध काय पाप केले की तू माझ्यावर आणि माझ्या राष्ट्रावर असे मोठे पाप आणले? तू माझ्याशी करू नये ते केले आहे अशा गोष्टी तू करायच्या नव्हत्या.” अबीमलेख अब्राहामाला म्हणाला, “तुला हे करण्यास कोणी सुचवले?” अब्राहाम म्हणाला, “या ठिकाणी देवाचे भय खात्रीने नाही, म्हणून ते माझ्या पत्नीकरीता मला ठार मारतील, असा विचार मी केला. शिवाय ती खरोखर माझी बहीण आहे. ती माझ्या बापाची मुलगी आहे, पण माझ्या आईची ती मुलगी नाही आणि म्हणून ती माझी पत्नी झाली आहे. देवाने मला माझ्या बापाचे घर सोडून देऊन जागोजागी प्रवास करायला लावले, तेव्हा मी तिला म्हणालो, तू माझी पत्नी म्हणून मला एवढा विश्वासूपणा दाखव; जेथे जेथे आपण जाऊ तेथे तेथे माझ्याविषयी हा, ‘माझा भाऊ आहे असे सांग.’” अबीमलेखाने अब्राहामाला सारा परत दिली; तसेच त्याने त्यास मेंढरे, बैल व दास-दासीही दिल्या. अबीमलेख म्हणाला, “पाहा, माझा हा सर्व देश तुझ्यासमोर आहे; तुला बरे वाटेल तेथे तू राहा.” तो सारेला म्हणाला, “तुझा भाऊ अब्राहाम याला मी चांदीची एक हजार नाणी दिली आहेत. तुझ्यासोबत असलेल्या सर्व लोकांसमोर तुझी भरपाई करण्यासाठी ते आहेत, आणि या प्रकारे तू सर्वांसमोर पूर्णपणे निर्दोष ठरली आहेस.” अब्राहामाने देवाची प्रार्थना केली आणि देवाने अबीमलेख, त्याची पत्नी आणि त्याच्या दासी यांना बरे केले. मग त्यांना मुले होऊ लागली. कारण परमेश्वराने अब्राहामाची पत्नी सारा हिच्यामुळे अबीमलेखाच्या घराण्यातल्या सर्व स्त्रियांची गर्भाशये अगदी बंद केली होती.
उत्पत्ती 20:1-18 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
अब्राहामाने तेथून नेगेबकडे प्रवास करून कादेश व शूर ह्यांच्या दरम्यान मुक्काम केला आणि काही दिवस गरार येथे वस्ती केली. आपली बायको सारा हिच्याविषयी अब्राहामाने सांगितले की, “ही माझी बहीण आहे,’ तेव्हा गरारचा राजा अबीमलेख ह्याने माणसे पाठवून सारेला आणले. देव रात्री स्वप्नात येऊन अबीमलेखाला म्हणाला, “तू जी ही स्त्री आणली आहेस तिच्यामुळे तुझा अंत झालाच म्हणून समज, कारण ती नवर्याची बायको आहे.” अबीमलेख काही तिच्यापाशी गेला नव्हता, म्हणून तो म्हणाला, “प्रभू, तू नीतिमान राष्ट्राचाही संहार करणार काय? ‘ती माझी बहीण आहे’ असे तो म्हणाला नाही काय? तसेच ‘तो माझा भाऊ आहे’ असे तीही म्हणाली नाही काय? मी सात्त्विक मनाने व स्वच्छ हातांनी हे केले आहे.” देवाने त्याला स्वप्नात म्हटले, “तू सात्त्विक मनाने हे केले हे मलाही ठाऊक आहे, आणि माझ्याविरुद्ध तुझ्याकडून पाप घडू नये म्हणून मी तुला आवरलेही; म्हणून मी तुला तिला स्पर्श करू दिला नाही. आता त्या मनुष्याची बायको त्याला परत दे, कारण तो संदेष्टा आहे; तो तुझ्यासाठी प्रार्थना करील आणि तू वाचशील. पण जर तू तिला परत दिले नाहीस, तर तू व तुझे जे आहेत ते सगळे खचीत मरतील.” मग अबीमलेखाने मोठ्या पहाटेस उठून आपल्या सर्व सेवकांना बोलावून ह्या सर्व गोष्टी त्यांच्या कानी घातल्या; तेव्हा ती माणसे फार घाबरली. अबीमलेखाने अब्राहामाला बोलावून आणून म्हटले, “तू हे काय केलेस? मी तुझा असा कोणता अपराध केला की तू माझ्यावर व माझ्या राज्यावर असे महापातक आणलेस? करू नये असे वर्तन तू माझ्याशी केलेस.” अबीमलेख अब्राहामाला आणखी म्हणाला, “ही गोष्ट करण्यात तुझ्या मनात होते तरी होते?” अब्राहाम म्हणाला, “ह्या ठिकाणी देवाचे भय अगदी नाही, म्हणून हे लोक माझ्या बायकोसाठी माझा घात करतील असे मला वाटले. शिवाय ती खरोखर माझी बहीण लागते, म्हणजे ती माझ्या बापाची मुलगी; पण माझ्या आईची ती मुलगी नाही म्हणून ती माझी बायको झाली. देवाने मला माझ्या बापाचे घर सोडून भ्रमण करायला लावले तेव्हा मी तिला म्हणालो, ‘माझ्यावर एवढी कृपा कर की आपण जिकडे जाऊ तिकडे, हा माझा भाऊ आहे असे माझ्याविषयी सांग.”’ मग अबीमलेखाने मेंढरे, बैल, दास व दासी आणून अब्राहामाला दिली आणि त्याची बायको साराही त्याला परत दिली. अबीमलेख म्हणाला, “पाहा, माझा देश तुला मोकळा आहे; तुला वाटेल तेथे राहा.” तो सारेला म्हणाला, “पाहा, मी तुझ्या भावाला रुप्याची एक हजार नाणी देत आहे; त्यांच्या योगे तुझ्याबरोबरच्या सगळ्या लोकांसमोर तुझी भरपाई होईल. ह्या प्रकारे सर्वांसमक्ष तुझा निर्दोषीपणा सिद्ध झाला आहे.” मग अब्राहामाने देवाची प्रार्थना केली, तेव्हा देवाने अबीमलेख, त्याची बायको व त्याच्या दासी ह्यांना बरे केले, आणि त्यांना मुले होऊ लागली. कारण अब्राहामाची बायको सारा हिच्यामुळे परमेश्वराने अबीमलेखाच्या घराण्यातल्या सर्व स्त्रियांची गर्भाशये अगदी बंद केली होती.