उत्पत्ती 16:1-16
उत्पत्ती 16:1-16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
अब्रामाला आपली पत्नी साराय हिच्यापासून मूल झाले नाही, परंतु तिची एक मिसरी दासी होती, जिचे नाव हागार होते. साराय अब्रामाला म्हणाली, “परमेश्वराने मला मुले होण्यापासून वंचित ठेवले आहे. तेव्हा तुम्ही माझ्या दासीपाशी जा. कदाचित तिच्यापासून मला मुले मिळतील.” अब्रामाने आपली पत्नी साराय हिचे म्हणणे मान्य केले. अब्राम कनान देशात दहा वर्षे राहिल्यानंतर, अब्रामाची पत्नी साराय हिने आपली मिसरी दासी हागार ही, आपला पती अब्राम याला पत्नी म्हणून दिली. त्याने हागार सोबत शरीरसंबंध केले, आणि अब्रामापासून ती गरोदर राहिली. आणि जेव्हा तिने पाहिले की आपण गरोदर आहोत, तेव्हा ती आपल्या मालकीणीकडे तिरस्काराने पाहू लागली. नंतर साराय अब्रामाला म्हणाली, “माझ्यावरचा अन्याय तुमच्यावर असो. मी आपली दासी तुम्हास दिली, आणि आपण गरोदर आहो हे लक्षात आल्यावर, मी तिच्या दृष्टीने तुच्छ झाले. परमेश्वर तुमच्यामध्ये व माझ्यामध्ये न्याय करो.” परंतु अब्राम सारायला म्हणाला, “तू हागारेची मालकीण आहेस, तुला काय पाहिजे तसे तू तिचे कर.” तेव्हा साराय तिच्याबरोबर निष्ठुरपणे वागू लागली म्हणून हागार तिला सोडून पळून गेली. शूर गावाच्या वाटेवर वाळवंटातील एका पाण्याच्या झऱ्याजवळ हागार परमेश्वराच्या एका देवदूताला आढळली. देवदूत तिला म्हणाला, “सारायचे दासी हागारे, तू येथे का आलीस? तू कोठे जात आहेस?” हागार म्हणाली, “माझी मालकीण साराय हिच्यापासून मी पळून जात आहे.” परमेश्वराचा दूत तिला म्हणाला, “तू आपल्या मालकिणीकडे परत जा आणि तिच्या अधिकारात तिच्या अधीनतेत राहा.” परमेश्वराचा दूत तिला आणखी म्हणाला, “तुझी संतती मी इतकी बहुगुणित करीन, की ती मोजणे शक्य होणार नाही.” परमेश्वराचा दूत तिला असे सुद्धा म्हणाला, “तू आता गरोदर आहेस आणि तुला मुलगा होईल त्याचे नाव तू इश्माएल म्हणजे परमेश्वर ऐकतो असे ठेव, कारण प्रभूने तुझ्या दुःखाविषयी ऐकले आहे. इश्माएल जंगली गाढवासारखा मनुष्य असेल. तो सर्वांविरूद्ध असेल आणि सर्व लोक त्याच्या विरूद्ध असतील, आणि तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपल्या भावांच्यापासून वेगळा राहील.” नंतर तिच्याशी बोलणारा जो परमेश्वर त्याचे नाव, “तू पाहणारा देव आहेस,” असे तिने ठेवले, कारण ती म्हणाली, “जो मला पाहतो त्यास मी येथेही मागून पाहिले काय?” तेव्हा तेथील विहिरीला बैर-लहाय-रोई असे नाव पडले; पाहा, ती कादेश व बेरेद यांच्या दरम्यान आहे. हागारेने अब्रामाच्या पुत्राला जन्म दिला, आणि ज्याला हगारेने जन्म दिला त्या त्याच्या पुत्राचे नाव अब्रामाने इश्माएल ठेवले. हागारेला अब्रामापासून इश्माएल झाला तेव्हा अब्राम शहाऐंशी वर्षांचा होता.
उत्पत्ती 16:1-16 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
अब्रामाला साराय आपली पत्नी हिच्यापासून मूलबाळ नव्हते. पण सारायला हागार नावाची इजिप्तची एक दासी होती; सारायने अब्रामाला म्हटले, “याहवेहने मला मूलबाळ दिले नाही, म्हणून तू माझ्या दासीचा स्वीकार कर; म्हणजे तिच्यापासून माझी मुले होतील.” आणि अब्रामाने तिचा शब्द मानला. अब्राम कनान देशात राहून दहा वर्षे झाली होती. अब्रामाची पत्नी साराय हिने आपली इजिप्तची दासी हागार हिला अब्रामाची पत्नी होण्यासाठी त्याच्याकडे सोपविले. तो हागारसोबत निजला आणि ती गर्भवती झाली. जेव्हा तिला आपण गर्भवती झाल्याचे लक्षात आले, तेव्हा ती तिच्या मालकिणीचा तिरस्कार करू लागली. मग साराय अब्रामाला म्हणाली, “माझ्याशी होत असलेल्या अन्यायास तुम्ही जबाबदार आहात. वास्तविक, मी तिला तुमच्या हातात दिले आणि आता जेव्हा तिला कळले की ती गर्भवती आहे, ती मला तुच्छ मानू लागली आहे. याहवेह माझ्या व तुमच्यामध्ये न्याय करो.” यावर अब्रामाने सारायला उत्तर दिले, “तुझ्या दासीवर तुझा पूर्ण अधिकार आहे. तुला जे योग्य वाटेल ते तिच्याशी कर.” तेव्हा सारायने हागारची छळणूक केली; आणि हागार तिच्यापासून पळून गेली. शूर गावाच्या वाटेवर रानातील एका झर्याजवळ ती याहवेहच्या एका दूताला आढळली. तो तिला म्हणाला, “अगे हागारे, सारायची दासी, तू कुठून आलीस आणि कुठे चाललीस?” हागारेने उत्तर दिले, “मी माझी मालकीण साराय हिच्यापासून पळून जात आहे.” तेव्हा याहवेहचा दूत तिला म्हणाला, “तू तुझ्या मालकिणीकडे परत जा आणि तिच्या अधीनतेत राहा.” दूत पुढे म्हणाला, “मी तुझा वंश इतका वाढवेन की त्यांची मोजणी करता येणार नाही.” याहवेहच्या दूताने तिला आणखी म्हटले, “आता तू गर्भवती आहेस आणि तुला एक पुत्र होईल. तू त्याचे नाव इश्माएल असे ठेव, कारण याहवेहने तुझे दुःख ऐकले आहे. तो रानगाढवासारखा एक मनुष्य होईल; त्याचा हात प्रत्येकाच्या विरुद्ध असेल व प्रत्येकाचा हात त्याच्याविरुद्ध होईल; आणि तो आपल्या सर्व भाऊबंदांमध्ये शत्रुतापूर्ण वातावरणात वस्ती करून राहील.” तिच्याशी बोलणार्या याहवेहला तिने हे नाव दिले: “मला पाहणारे परमेश्वर तुम्हीच आहात,” कारण ती म्हणाली, “जे मला पाहात आहेत, त्यांना मी आता पाहिले आहे.” म्हणूनच त्या विहिरीला बएर-लहाई-रोई असे नाव पडले. जी कादेश व बेरेद यांच्या दरम्यान आहे. मग अब्रामाला हागारेपासून एक पुत्र झाला आणि तिच्यापासून झालेल्या पुत्राचे नाव अब्रामाने इश्माएल असे ठेवले. हागारेला अब्रामापासून इश्माएल झाला त्यावेळी अब्राम शहाऐंशी वर्षांचा होता.
उत्पत्ती 16:1-16 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
अब्रामाला आपली बायको साराय हिच्यापासून काही मूलबाळ झाले नव्हते; तिला हागार नावाची एक मिसरी दासी होती. साराय अब्रामाला म्हणाली, “पाहा, परमेश्वराने माझी कूस बंद ठेवली आहे; तर माझ्या दासीपाशी जा; कदाचित तिच्याकडून माझे घर नांदते होईल,” तेव्हा अब्रामाने साराय हिचा शब्द मान्य केला. अब्रामाला कनान देशात राहून दहा वर्षे झाल्यावर त्याची बायको साराय हिने आपला नवरा अब्राम ह्याला आपली मिसरी दासी हागार ही बायको म्हणून नेऊन दिली. तो हागारेपाशी गेला व ती गर्भवती झाली; आपण गर्भवती झालो हे पाहून तिला आपली धनीण तुच्छ वाटू लागली. तेव्हा साराय अब्रामाला म्हणाली, “माझ्या अपमानाचा दोष तुमच्या माथी; मी माझी दासी तुमच्या मिठीत दिली, पण आपण गर्भवती आहो असे पाहून ती मला तुच्छ लेखू लागली आहे, परमेश्वर आपल्या दोघांचा न्याय करो.” अब्राम सारायला म्हणाला, “पाहा, तुझी दासी तुझ्या हाती आहे, तुला बरे दिसेल ते तिचे कर.” मग साराय तिचा जाच करू लागली, तेव्हा ती तिला सोडून पळून गेली. रानात शूरच्या वाटेवर एक झरा लागतो, त्या झर्याजवळ परमेश्वराच्या दूताला ती आढळली. तो म्हणाला, “हे सारायच्या दासी हागारे, तू आलीस कोठून व जातेस कोठे?” ती म्हणाली, “माझी धनीण साराय हिच्यापासून मी पळून जात आहे.” परमेश्वराचा दूत तिला म्हणाला, “तू आपल्या धनीणीकडे परत जा आणि तिच्या हाताखाली तिचे सोशीत राहा.” परमेश्वराचा दूत तिला म्हणाला, “तुझी संतती मी वाढवीनच वाढवीन, एवढी की तिची गणती करता येणार नाही.” परमेश्वराचा दूत तिला आणखी म्हणाला, “पाहा, तू गर्भवती आहेस, तुला मुलगा होईल, त्याचे नाव इश्माएल ठेव; कारण परमेश्वराने तुझा आक्रोश ऐकला आहे. तो रानगाढवासारखा मनुष्य होईल, त्याचा हात सर्वांवर चालेल, व सर्वांचा हात त्याच्यावर चालेल; तो आपल्या सर्व भाऊबंदांच्या देखत पूर्वेस वस्ती करील.” तिच्याशी बोलणार्या परमेश्वराचे नाव तिने आत्ता-एल-रोई (तू पाहणारा देव) असे ठेवले; ती म्हणाली, “मला पाहणार्याला मी ह्याही ठिकाणी मागून पाहिले काय?” ह्यावरून त्या विहिरीचे नाव बैर-लहाय-रोई (मला पाहणार्या जिवंताची विहीर) असे पडले; कादेश व बेरेद ह्यांच्या दरम्यान ही विहीर आहे. हागारेला अब्रामापासून मुलगा झाला; हागारेपासून झालेल्या आपल्या मुलाचे नाव अब्रामाने इश्माएल ठेवले. हागारेला अब्रामापासून इश्माएल झाला तेव्हा अब्राम शहाऐंशी वर्षांचा होता.