YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 14:8-24

उत्पत्ती 14:8-24 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

नंतर सदोमाचा राजा, गमोराचा राजा, अदमाचा राजा, सबोयिमाचा राजा आणि बेला म्हणजे सोअराचा राजा ह्यांनी लढाईची तयारी केली. एलामाचा राजा कदार्लागोमर, गोयिमाचा राजा तिदाल, शिनाराचा राजा अम्राफेल आणि एल्लासाराचा राजा अर्योक यांच्या विरूद्ध ते लढले. हे चार राजे पाच राजांविरूद्ध लढले. सिद्दीम खोऱ्यात पूर्ण डांबराने भरलेले खड्डे होते आणि सदोम व गमोराचे राजे पळून जाताना त्यामध्ये पडले, जे राहिले ते डोंगराकडे पळून गेले. अशा रीतीने शत्रूंनी सदोम व गमोरा नगराच्या सर्व वस्तू आणि त्यांचा सर्व अन्नसाठा लुटून घेऊन माघारी गेले. ते गेले तेव्हा त्यांनी अब्रामाच्या भावाचा मुलगा लोट जो सदोमात राहत होता, त्यालासुद्धा त्याच्या सर्व मालमत्तेसह नेले. तेथून पळून आलेल्या एकाने अब्राम इब्रीला हे सांगितले. तो तर अष्कोल व आनेर ह्यांचा भाऊ मम्रे अमोरी याच्या एलोन झाडांजवळ राहत होता आणि ते सर्व अब्रामाचे सहकारी होते. जेव्हा अब्रामाने ऐकले की, त्याच्या नातेवाइकांना शत्रूंनी पकडून नेले आहे तेव्हा त्याने आपल्या घरी जन्मलेली, लढाईचे शिक्षण घेतलेली तीनशे अठरा माणसे घेऊन सरळ दान नगरापर्यंत शत्रूंचा पाठलाग केला. त्याने रात्री त्याचे लोक त्यांच्याविरुद्ध विभागले आणि त्यांच्यावर हल्ला केला आणि दिमिष्काच्या डावीकडे होबापर्यंत त्यांचा पाठलाग केला. अब्रामाने सगळी मालमत्ता आणि त्याचा नातेवाइक लोट आणि त्याच्या वस्तू, त्याचप्रमाणे स्त्रिया आणि इतर लोक यांना परत आणले. मग कदार्लागोमर व त्याच्याबरोबरचे राजे यांचा पराभव केल्यावर अब्राम परत आला तेव्हा सदोमाचा राजा शावेच्या खोऱ्यात त्यास भेटायला बाहेर आला. या खोऱ्याला राजाचे खोरे असे म्हणतात. देवाचा याजक असलेला शालेमाचा राजा मलकीसदेक भाकर व द्राक्षरस घेऊन अब्रामाला भेटण्यास आला. हा परात्पर देवाचा याजक होता. त्याने अब्रामाला आशीर्वाद देऊन म्हटले, “अब्रामा, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्नकर्ता परात्पर देव तुला आशीर्वाद देवो. परात्पर देव ज्याने तुझे शत्रू तुझ्या हाती दिले तो धन्यवादित असो.” तेव्हा अब्रामाने त्यास सर्वाचा दहावा भाग दिला. सदोमाचा राजा अब्रामास म्हणाला, “मला फक्त माझे लोक द्या आणि तुमच्यासाठी वस्तू घ्या.” अब्राम सदोमाच्या राजाला म्हणाला, “आकाश व पृथ्वीचा उत्पन्नकर्ता परमेश्वर परात्पर देव याच्यासमोर आपला हात उंचावून मी वचन देतो की, तुझा दोरा, चपलेचा बंध, किंवा जे तुझे आहे त्यातून मी काहीच घेणार नाही, नाहीतर तू म्हणशील, ‘अब्रामाला मी धनवान केले.’ माझ्या या तरुणांनी जे अन्न खाल्ले आहे तेवढे पुरे. आनेर, अष्कोल व मम्रे हे जे पुरुष माझ्याबरोबर गेले त्यांना आपापला वाटा घेऊ द्या.”

सामायिक करा
उत्पत्ती 14 वाचा

उत्पत्ती 14:8-24 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

इकडे सदोमाचा राजा, गमोराचा राजा, अदमाचा राजा, सबोईमाचा राजा आणि बेला म्हणजे सोअर ह्याचा राजा हे त्यांच्याशी युद्ध करायला निघाले आणि सिद्दीम खोर्‍यात त्यांनी आपल्या सैन्याची रचना केली. एलामाचा राजा कदार्लागोमर, गोयिमाचा राजा तिदाल, शिनाराचा राजा अम्राफेल आणि एल्लासाराचा राजा अर्योक ह्यांच्याशी ते लढले; चार राजांनी पाच राजांशी सामना केला. सिद्दीम खोर्‍यात डांबराच्या खाणी पुष्कळ होत्या; सदोम व गमोरा ह्यांचे राजे पळत असता तेथे पडले व बाकीचे डोंगरात पळाले. तेव्हा सदोम व गमोरा येथील मालमत्ता व सगळी अन्नसामग्री शत्रू लुटून घेऊन गेले. अब्रामाचा पुतण्या लोट हा सदोम येथे राहत होता; त्याला त्यांनी धरून नेले आणि त्याची मालमत्ताही नेली. तेथून पळून आलेल्या एका मनुष्याने जाऊन अब्राम इब्री ह्याला हे वर्तमान सांगितले, त्या वेळी तो अष्कोल व आनेर ह्यांचा भाऊ अमोरी मम्रे ह्याच्या एलोन राईत राहत होता; हे अब्रामाच्या जुटीतले होते. आपल्या भाऊबंदांना पाडाव करून नेले हे अब्रामाने ऐकले तेव्हा आपल्या घरी जन्मलेले व लढाईच्या कामात कसलेले तीनशे अठरा दास घेऊन त्याने दानापर्यंत शत्रूंचा पाठलाग केला. त्याने आपल्या दासांच्या टोळ्या करून त्यांच्यावर रात्रीची चाल केली आणि त्यांना मार देऊन दिमिष्काच्या उत्तरेस होबापर्यंत त्यांचा पाठलाग केला. त्याने सगळी मालमत्ता माघारी आणली; त्याप्रमाणेच आपला भाऊबंद लोट, त्याची मालमत्ता, स्त्रिया व लोक माघारी आणले. कदार्लागोमर आणि त्याच्याबरोबरचे राजे ह्यांना मारून तो माघारी येत असता त्याला भेटायला सदोमाचा राजा शावेखिंड म्हणजे राजखिंड येथवर सामोरा गेला. आणि शालेमाचा राजा मलकीसदेक भाकर व द्राक्षारस घेऊन त्याला सामोरा आला; हा परात्पर देवाचा याजक होता. त्याने त्याला असा आशीर्वाद दिला : “आकाशाचा व पृथ्वीचा स्वामी जो परात्पर देव तो अब्रामाला आशीर्वाद देवो; ज्या परात्पर देवाने तुझे शत्रू तुझ्या स्वाधीन केले तो धन्य!” तेव्हा अब्रामाने त्याला अवघ्याचा दहावा भाग दिला. मग सदोमाचा राजा अब्रामाला म्हणाला, “माणसे मला द्या आणि मालमत्ता तुम्ही ठेवा.” पण अब्राम सदोमाच्या राजाला म्हणाला, “परमेश्वर परात्पर देव, आकाशाचा व पृथ्वीचा स्वामी ह्याच्यासमोर मी बाहू उभारून सांगतो की, तुमचा एक सुतळीचा तोडा किंवा वहाणेचा बंद मी घेणार नाही; मी अब्रामास संपन्न केले असे म्हणायला तुम्हांला कारण न मिळो; ह्या तरुण माणसांनी अन्न खाल्ले तेवढे पुरे; माझ्याबरोबर आलेले आनेर, अष्कोल व मम्रे ह्यांना वाटा मिळाला म्हणजे पुरे; त्यांना आपला वाटा घेऊ द्या.”

सामायिक करा
उत्पत्ती 14 वाचा