गलतीकरांस पत्र 4:21-31
गलतीकरांस पत्र 4:21-31 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
जे तुम्ही नियमशास्त्राधीन व्हायला पाहता ते तुम्ही नियमशास्त्र ऐकत नाही काय, हे मला सांगा. कारण शास्त्रात असे लिहिले आहे की, अब्राहामाला दोन मुलगे होते, एक दासीपासून झालेला व एक स्वतंत्र स्त्रीपासून झालेला. तरी दासीपासून झालेला देहस्वभावानुसार जन्मला आणि स्वतंत्र स्त्रीपासून झालेला वचनामुळे जन्मला. ह्या गोष्टी दृष्टान्तरूप आहेत. त्या स्त्रिया म्हणजे दोन करार होत; एक तर सीनाय पर्वतावरून केलेला; तो गुलामगिरीसाठी मुलांना जन्म देणारा करार, म्हणजे हागार आहे. हागार ही अरबस्तानातील सीनाय पर्वत होय, आणि ती हल्लीच्या यरुशलेमेच्या जोडीची आहे; ती आपल्या मुलाबाळांसह गुलामगिरीत आहे. वर असलेली यरुशलेम स्वतंत्र असून ती आपली माता आहे. शास्त्रात असे लिहिले आहे, “अगे वंध्ये, तुला मूल होत नसले तरी आनंदित हो! ज्या तुला प्रसूतिवेदना होत नाही ती तू आनंदाने जयघोष कर! आनंदाची आरोळी मार! कारण जिला पती आहे तिच्या मुलांपेक्षा अशा सोडलेल्या स्त्रीची मुले पुष्कळ आहेत.” बंधुजनहो, इसहाकाप्रमाणे तुम्ही अभिवचनाची संतती आहात. परंतु त्या वेळेस देहस्वभावानुसार जन्मलेल्या मुलाने आत्म्यानुसार जन्मलेल्या मुलाचा छळ केला, तसा आताही होत आहे. पण शास्त्रलेख काय म्हणतो? “त्या दासीला व तिच्या मुलाला घालवून दे; कारण दासीचा पुत्र स्वतंत्र स्त्रीच्या पुत्राबरोबर वारस होणारच नाही.” म्हणून बंधुजनहो, आपण दासीची मुले नाही तर स्वतंत्र स्त्रीची मुले आहोत.
गलतीकरांस पत्र 4:21-31 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जे तुम्ही नियमशास्त्राधीन व्हावयास पाहता ते तुम्ही नियमशास्त्र ऐकत नाही काय? हे मला सांगा. कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, अब्राहामाला दोन पुत्र होतेः एक दासीपासून व एक स्वतंत्र स्त्रीपासून झालेला. पण दासीपासून झालेला देहस्वभावानुसार जन्माला आला होता; तर स्वतंत्र स्त्रीपासून झालेला वचनामुळे जन्मला. या गोष्टी दृष्टांतरूपाने समजावल्या जावू शकतात. त्या स्त्रिया दोन करारासारख्या आहेत एक सीनाय पर्वतावरून केलेला व दास्यासाठी मुलांना जन्म देणारा करार म्हणजे हागार होय. कारण ही हागार अरबस्तानातील सीनाय पर्वत आहे आणि ती आत्ताच्या यरूशलेमेच्या जोडीची आहे. आपल्या मुलांबाळांसह दास्यात आहे. नवीन वरील यरूशलेम स्वतंत्र आहे; ही आपल्या सर्वांची आई आहे. पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, “अगे वंध्ये, तुला मूल होत नसले तरी, तू आनंदित हो! ज्या तुला प्रसूतिवेदना होत नाही, ती तू आनंदाने जयघोष कर! आनंदाची आरोळी मार! कारण जिला पती आहे तिच्या मुलांपेक्षा, आशा सोडलेल्या स्त्रीची मुले अधिक आहेत.” आता बंधूनो, इसहाकासारखे तुम्ही अभिवचनाची संतती आहात. परंतु त्यावेळेस देहस्वभावानुसार जो जन्मला होता, त्याने जो आत्म्यानुसार जन्मलेल्या मुलाचा छळ केला, तसा आताही होत आहे. पण शास्त्रलेख काय सांगतो? ‘तू त्या दासीला व तिच्या मुलाला घालवून दे; कारण दासीचा मुलगा स्वतंत्र स्त्रीच्या मुलाबरोबर वारीस होणारच नाही.’ तर मग, बंधूंनो, आपण दासीची मुले नाही, पण स्वतंत्र स्त्रीची मुले आहोत.
गलतीकरांस पत्र 4:21-31 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मला सांगा, तुम्ही जे नियमांच्या अधीन राहू इच्छिता, त्या तुम्हाला नियम काय म्हणतात याची जाणीव नाही का? असे लिहिले आहे की अब्राहामाला दोन पुत्र होते एक दासीपासून झालेला, तर दुसरा स्वतंत्र स्त्रीपासून झालेला. त्या दासीपासून झालेला पुत्र दैहिकरितीने जन्मला, परंतु स्वतंत्र स्त्रीपासून झालेला पुत्र दैवी अभिवचनाचा परिणाम म्हणून जन्मला. अलंकारिक रुपात या गोष्टी घेतल्या आहेत पाहा: या स्त्रिया दोन करार आहेत. त्यापैकी एक करार आहे सीनाय पर्वतावर केलेला करार ज्यामुळे दास्यत्वाच्या संतानाचा जन्म होतो: ही हागार आहे. आता हागार ही अरबस्थानातील सीनाय पर्वत असा आहे आणि आता अस्तित्वात असलेल्या यरुशलेम शहराचे प्रतीक आहे, कारण ती तिच्या संतानाबरोबर दास्यात आहे. परंतु यरुशलेम जी वर आहे ती स्वतंत्र आहे आणि ती आपली मातृनगरी आहे. जसे यशयाने भविष्य वर्तविले: “हे वांझ स्त्रिये, आता तू आनंदोत्सव कर; तुला कधी मूल झाले नाही, तर आता आनंदाने जयघोष कर आणि विलाप कर, कारण तुला प्रसूती वेदना झाल्या नाहीत; कारण निर्जन स्त्रीची मुले जिला पती आहे त्यापेक्षाही अधिक आहेत.” आता बंधू व भगिनींनो, आपण इसहाकासारखे अभिवचनाची मुले आहोत. त्यावेळेस दैहिकरित्या जन्मलेल्या पुत्राने आत्म्याच्या शक्तीने जन्मलेल्या पुत्राचा छळ केला तसेच आताही होत आहे. पण शास्त्रलेखात काय लिहिले आहे? “दासी आणि तिचा पुत्र यांना हाकलून दे, कारण स्वतंत्र स्त्रीच्या पुत्राबरोबर दासीपुत्राला कधीही वतन प्राप्त होणार नाही.” प्रिय बंधू व भगिनींनो, आपण दासीपुत्र नाही, तर आपण स्वतंत्र स्त्रीची मुले आहोत.
गलतीकरांस पत्र 4:21-31 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
जे तुम्ही नियमशास्त्राधीन व्हावयास पाहता ते तुम्ही नियमशास्त्र ऐकत नाही काय, हे मला सांगा. धर्मशास्त्रात असे लिहिले आहे की, अब्राहामला दोन मुलगे होते, एक दासीपासून झालेला व एक स्वतंत्र स्त्रीपासून झालेला. दासीपासून झालेला देहस्वभावानुसार जन्मला परंतु स्वतंत्र स्त्रीपासून झालेला देवाच्या वचनामुळे जन्मला. ह्या गोष्टी दृष्टान्तरूप आहेत, त्या दोन स्त्रिया म्हणजे दोन करार होत, एक स्त्री म्हणजे हागार. हिची मुले गुलामगिरीत जन्मला आली. सीनाय पर्वतावर केलेल्या कराराची ती प्रतिनिधी आहे. हागार ही अरबस्तानातील सीनाय पर्वताचा निर्देश करते आणि ह्रीची यरुशलेम नगरी तिच्यासारखी आहे. ती आपल्या मुलांबाळासह गुलामगिरीत आहे. परंतु स्वर्गीय यरुशलेम नगरी स्वतंत्र असून ती आपली माता आहे. धर्मशास्त्रात असे लिहिले आहे, अगे वंध्ये, तुला मूल होत नसले तरी आनंदित हो! ज्या तुला कधीच प्रसूतिवेदना झाल्या नाहीत, ती तू आनंदाने आरोळी मार! कारण जिला पती आहे तिच्या मुलांपेक्षा परित्यक्त अशा स्त्रीची मुले पुष्कळ आहेत. बंधुजनहो, इसहाकप्रमाणे तुम्ही अभिवचनाची संतती आहात. त्या वेळेस देहस्वभावानुसार जन्मलेल्या मुलाने आत्म्यानुसार जन्मलेल्या मुलाचा छळ केला आणि आत्ताही तसा होत आहे. पण धर्मशास्रलेख काय म्हणतो? ‘त्या दासीला व तिच्या मुलाला घालवून दे, कारण दासीचा पुत्र स्वतंत्र स्त्रीच्या पुत्राबरोबर वारस होणार नाही.’ म्हणून बंधुजनहो, आपण दासीची मुले नाही, तर स्वतंत्र स्त्रीची मुले आहोत.