YouVersion लोगो
सर्च आयकॉन

गलतीकरांस पत्र 2:18-21

गलतीकरांस पत्र 2:18-21 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

कारण मी जे पाडले आहे ते पुन्हा उभारले तर मी स्वतःला नियमशास्त्र मोडणारा ठरवीन. कारण मी नियमशास्त्राद्वारे नियमशास्त्राला मरण पावलो आहे, ह्यासाठी की, मी देवाकरता जगावे. मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे आणि ह्यापुढे मी जगतो असे नाही तर ख्रिस्त माझ्याठायी जगतो आणि आता देहामध्ये जे माझे जगणे आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्याद्वारे आहे. त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वतःला माझ्याकरिता दिले. मी देवाची कृपा व्यर्थ करीत नाही कारण जर नीतिमत्त्व नियमशास्त्राकडून असेल तर ख्रिस्ताचे मरण विनाकारण झाले.

गलतीकरांस पत्र 2:18-21 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

जे मी उध्वस्त केले ते जर मी पुन्हा बांधतो, तर मी खरोखरच नियमशास्त्र मोडणारा असा ठरतो. “नियमांद्वारे मी नियमाला मरण पावलो यासाठी की मी परमेश्वरासाठी जगावे. मी ख्रिस्ताबरोबर क्रूसावर खिळलेला आहे आणि मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्यामध्ये जगतात. मी आता जे जीवन शरीरात जगतो ते मी परमेश्वराच्या पुत्रावर विश्वास ठेवून जगतो, ज्यांनी माझ्यावर प्रीती केली आणि स्वतःला माझ्यासाठी दिले. मी परमेश्वराच्या कृपेला वगळत नाही, कारण नियमशास्त्राचे पालन केल्याने नीतिमत्व प्राप्त होत असते, तर ख्रिस्ताचे मरण व्यर्थ झाले असते.”

गलतीकरांस पत्र 2:18-21 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

कारण जे मी पाडून टाकले ते मी पुन्हा उभारत असलो तर मी स्वत:ला उल्लंघन करणारा ठरवतो. मी नियमशास्त्राच्या द्वारे नियमशास्त्राला मेलो, ह्यासाठी की मी देवाकरता जगावे. मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे; आणि ह्यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो; आणि आता देहामध्ये जे माझे जीवित आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे; त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वत:ला माझ्याकरता दिले. मी देवाची कृपा व्यर्थ करत नाही, कारण जर नीतिमत्त्व नियमशास्त्राच्या द्वारे असले तर ख्रिस्ताचे मरण विनाकारण झाले.

गलतीकरांस पत्र 2:18-21 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

नियमशास्त्राची जी व्यवस्था मी मोडून टाकली तीच मी पुन्हा उभारीत असलो, तर मी स्वतःला उ्रंघन करणारा ठरवतो. कारण मी देवाकरिता जगावे म्हणून मी नियमशास्त्राद्वारे नियमशास्त्राला मेलो. मला ख्रिस्ताबरोबर क्रुसावर चढविण्यात आले आहे आणि त्यामुळे ह्यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्यामध्ये जगतो. आता देहामध्ये जे माझे जीवन आहे, ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे. त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वतःला माझ्याकरता अर्पण केले. देवाच्या कृपेला निरर्थक ठरविणे मला मान्य नाही; कारण जर नीतिमत्व नियमशास्त्राच्याद्वारे मिळते, तर ख्रिस्ताचे मरण अनावश्यक ठरते!