गलतीकरांस पत्र 2:11-16
गलतीकरांस पत्र 2:11-16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि त्यानंतर, केफा अंत्युखियास आला असता, मी त्याच्यासमोर त्यास आडवा आलो, कारण तो दोषीच होता. कारण याकोबापासून कित्येकजण येण्याअगोदर तो अन्यजाती लोकांबरोबर जेवत असे; पण ते आल्यावर तो सुंता झालेल्या लोकांस भिऊन त्याने माघार घेऊन वेगळा राहू लागला. तेव्हा तसेच दुसर्या यहूदी विश्वास ठेवणाऱ्यांनीही त्याच्याबरोबर ढोंग केले; त्यामुळे बर्णबादेखील त्यांच्या ढोंगाने ओढला गेला. पण मी जेव्हा हे बघितले की, शुभवर्तमानाच्या सत्याप्रमाणे ते नीट चालत नाहीत, तेव्हा सर्वांसमोर मी केफाला म्हटले, “तू स्वतः यहूदी असून तू जर परराष्ट्रीयाप्रमाणे राहतोस आणि यहूद्यांप्रमाणे वागत नाहीस, तर जे परराष्ट्रीयांनी यहूद्यांसारखे वागावे म्हणून तू त्याच्यावर जुलूम करितोस हे कसे?” आम्ही जन्मापासूनच यहूदी आहोत, पापी परराष्ट्रीयातले नाही. तरी मनुष्य नियमशास्त्रातील कृत्यांनी नीतिमान ठरत नाही तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्याद्वारे ठरतो, हे ओळखून आम्हीही ख्रिस्त येशूवर विश्वास ठेवला; ह्यासाठी की, विश्वासाने मनुष्य नीतिमान ठरवला जातो, म्हणून आम्हीही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला; म्हणजे आम्ही ख्रिस्तावरील विश्वासाने नीतिमान ठरावे, नियमशास्त्रातील कृत्यांनी पाळून नाही, कारण नियमशास्त्रातील कृत्यांनी मनुष्यजातीपैकी कोणीही नीतिमान ठरणार नाही.
गलतीकरांस पत्र 2:11-16 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जेव्हा केफा अंत्युखिया येथे आला, तेव्हा मी त्याच्या तोंडावर त्याला विरोध केला, कारण तो दोषी होता. याकोबाकडून काही लोक येण्यापूर्वी तो प्रथम गैरयहूदी लोकांबरोबर जेवण करीत असे. परंतु जेव्हा ते आले तेव्हा त्याने मागे सरकण्यास सुरुवात केली आणि तो स्वतःला गैरयहूदीयांपासून वेगळे करू लागला कारण सुंता झालेल्या गटातील लोकांचे त्याला भय वाटत होते. बाकीचे यहूदी त्याच्या ढोंगात त्याला सामील झाले, म्हणून त्यांच्या ढोंगीपणामुळे बर्णबासचीसुद्धा चुकीची कल्पना झाली. जेव्हा मी पाहिले की, शुभवार्तेत जे सत्य आहे त्याप्रमाणे ते चालत नाहीत, तेव्हा सर्वांसमक्ष मी केफाला म्हणालो, “तू यहूदी आहेस तरी तू गैरयहूदीयांसारखे जगत आहेस आणि यहूदीयांसारखे नाही. तर मग हे कसे आहे की, गैरयहूदी लोकांना यहूदी चालीरीती पाळण्यासाठी तू भाग पाडतोस? “जे आम्ही जन्माने यहूदी आहोत आणि गैरयहूदी लोकांसारखे पापी नाही. हे जाणून घ्या, नियमशास्त्राच्या कार्याद्वारे मनुष्य नीतिमान ठरत नाही, परंतु येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यानेच आपण नीतिमान ठरतो. म्हणून आम्हीसुद्धा ख्रिस्त येशूंवर विश्वास ठेवला आहे, यासाठी की आम्हीसुद्धा ख्रिस्तामधील विश्वासाने नीतिमान ठरावे आणि नियमशास्त्र पाळल्याने नव्हे. कारण नियमशास्त्राचे पालन केल्याने कोणी नीतिमान ठरत नाही.
गलतीकरांस पत्र 2:11-16 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
पुढे केफा अंत्युखियास आला तेव्हा तो दोषी असल्यामुळे मी त्याला तोंडावर अडवले. कारण याकोबाकडील कित्येक जण येण्यापूर्वी तो परराष्ट्रीयांच्या पंक्तीस बसत असे; परंतु ते आल्यावर तो सुंता झालेल्या लोकांना भिऊन माघार घेऊन वेगळा राहू लागला. त्याच्याबरोबर बाकीच्या यहूद्यांनीही ढोंग केले; ते इतके की बर्णबाही त्यांच्या ढोंगाने तिकडे ओढला गेला. परंतु सुवार्तेच्या सत्याप्रमाणे ते नीट चालत नाहीत, असे मी पाहिले तेव्हा सर्वांसमक्ष मी केफाला म्हटले, “तू यहूदी असताही परराष्ट्रीयांसारखा वागतोस, यहूद्यांसारखा वागत नाहीस, तर परराष्ट्रीयांनी यहूद्यांसारखे वागावे म्हणून तू त्यांच्यावर जुलूम करतोस हे कसे?” आम्ही जन्मतः यहूदी आहोत, पापिष्ट परराष्ट्रीयांतले नाही; तरी मनुष्य नियमशास्त्रातील कृत्यांनी नीतिमान ठरत नाही, तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे ठरतो, हे जाणून आम्हीही ख्रिस्त येशूवर विश्वास ठेवला; ह्यासाठी की, आम्ही ख्रिस्तावरील विश्वासाने नीतिमान ठरावे, नियमशास्त्रातील कृत्यांनी नव्हे; कारण नियमशास्त्रातील कृत्यांनी ‘मनुष्यजातीपैकी कोणीही नीतिमान ठरणार नाही.’
गलतीकरांस पत्र 2:11-16 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
पुढे पेत्र अंत्युखिया येथे आला तेव्हा तो खरोखर चुकत होता म्हणून मी त्याला उघडपणे विरोध केला. कारण याकोबकडील कित्येक जण येण्यापूर्वी तो यहुदीतर लोकांच्या पंक्तीत बसत असे, परंतु ते आल्यावर तो सुंता झालेल्या लोकांना भिऊन माघार घेऊन वेगळा राहू लागला. त्याच्याबरोबर बाकीच्या यहुदी लोकांनीदेखील डरपोकपणा दाखवला. हे पाहून बर्णबाही त्यांच्याकडे ओढला गेला. शुभवर्तमानाच्या सत्याप्रमाणे ते नीट चालत नाहीत, असे जेव्हा मी पाहिले, तेव्हा सर्वांसमक्ष मी पेत्राला म्हटले, “तू यहुदी असताही यहुदीतर लोकांसारखा वागतोस, यहुदी लोकांसारखा वागत नाहीस, तर यहुदीतर लोकांनी यहुदी लोकांसारखे वागावे म्हणून तू त्यांना भाग पाडतोस, हे कसे?” आम्ही जन्मतः यहुदी आहोत. ज्यांना पापी यहुदीतर लोक म्हटले जाते, असे आम्ही नाही. तरीही मनुष्य नियमशास्त्रातील कृत्यांनी देवाबरोबर यथोचित संबंध प्रस्थापित करू शकत नाही, तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे ते होत असते, हे जाणून आम्हीही ख्रिस्त येशूवर विश्वास ठेवला आहे, ह्यासाठी की, आम्ही ख्रिस्तावरील विश्वासाने देवाबरोबर यथोचित संबंध प्रस्थापित करावेत. नियमशास्त्रातील कृत्यांनी मनुष्यमात्रापैकी कोणीही हे करू शकत नाही.