YouVersion लोगो
सर्च आयकॉन

गलतीकरांस पत्र 1:10-24

गलतीकरांस पत्र 1:10-24 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

मी आता मनुष्याची किंवा मी देवाची मनधरणी करावयास पाहत आहे? मी मनुष्यांना संतुष्ट करावयास पाहत आहे काय? मी अजूनपर्यंत मनुष्यांना संतोषवीत असतो, तर मी ख्रिस्ताचा दास नसतो. कारण, बंधूंनो, मी तुम्हास सांगतो की, मी ज्या शुभवर्तमानाची घोषणा केली ती मनुष्याच्या सांगण्याप्रमाणे नाही. कारण ती मला मनुष्याकडून मिळाली नाही तसेच ती मला कोणी शिकवलीही नाही; पण येशू ख्रिस्ताच्या प्रकटीकरणाने ती मला प्राप्त झाली. तुम्ही माझ्या, यहूदी धर्मातील, पूर्वीच्या आचरणाविषयी ऐकले आहे की, मी देवाच्या मंडळीचा अत्यंत छळ करून तिचा नाश करीत असे. आणि मी माझ्या पूर्वजांच्या प्रथांविषयी पुष्कळ अधिक आवेशी असल्यामुळे माझ्या लोकांतल्या माझ्या वयाच्या पुष्कळ लोंकापेक्षा यहूदी धर्मात मी पुढे गेलो होतो. पण ज्या देवाने मला आईच्या उदरापासून वेगळे केले व आपल्या कृपेने मला बोलावले, त्यास जेव्हा बरे वाटले की, आपल्या पुत्राला माझ्याद्वारे प्रकट करावे, म्हणजे परराष्ट्रीयांमध्ये मी त्याच्या शुभवर्तमानाची घोषणा करावी तेव्हा मी हे कोणत्याही मानवाची मसलत न घेता, आणि माझ्या पूर्वी झालेल्या प्रेषितांकडे यरूशलेमेस वर न जाता, पण मी लगेच अरबस्तान देशास निघून गेलो व तेथून दिमिष्कास पुन्हा परत आलो. पुढे, तीन वर्षांनंतर, मी केफाला भेटण्यास वर यरूशलेमास गेलो आणि पंधरा दिवस मी त्याच्याजवळ राहिलो; पण प्रभूचा भाऊ याकोब ह्याच्याशिवाय मी इतर प्रेषितांपैकी दुसरा कोणीही माझ्या दृष्टीस पडला नाही. मी जे तुम्हास लिहित आहे, ते पाहा, देवासमोर, मी खोटे बोलत नाही. त्यानंतर मी सिरीया व किलिकिया प्रांतांत आलो आणि ख्रिस्तात असलेल्या, यहूदीया प्रांतातील मंडळ्यांना मी अपरिचित होतो. त्यांच्या ऐकण्यात एवढेच येत असे की, ‘पूर्वी आमचा छळ करणारा ज्या विश्वासाचा मागे नाश करीत होता त्याची तो आता सुवार्ता सांगत आहे.’ आणि ते माझ्याविषयी देवाचे गौरव करू लागले.

गलतीकरांस पत्र 1:10-24 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

आता मी माणसांची पसंती मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे का, किंवा परमेश्वराची? किंवा मी लोकांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करीत आहे का? जर मी अजूनही लोकांना प्रसन्न करीत असतो तर मी ख्रिस्ताचा सेवक नसतो. बंधुनो आणि भगिनींनो, माझी अशी इच्छा आहे की तुम्ही हे समजून घ्यावे की, ज्या शुभवार्तेचा प्रचार मी केला ते मनुष्याकडून आलेले नाही. कोणत्याही व्यक्तिकडून मी ते स्वीकारलेले नाही किंवा मला ते शिकविण्यात आलेले नाही; तर मला ही शुभवार्ता येशू ख्रिस्ताकडून प्रकटीकरणाद्वारे मिळाली आहे. कारण तुम्ही ऐकलेच आहे की, यहूदी धर्मात असताना माझे पूर्वीचे जीवन कसे होते, कशाप्रकारे उग्र रूप धारण करून मी परमेश्वराच्या मंडळीचा छळ केला आणि त्या मंडळीचा नाश करण्याचा प्रयत्न केला. माझ्या लोकांमध्ये माझ्या वयाच्या पुष्कळांपेक्षा मी यहूदी धर्मसंप्रदायात अधिक पुढे जात होतो आणि माझ्या पूर्वजांच्या परंपरेविषयी अत्यंत आवेशी होतो. परंतु जेव्हा परमेश्वराने मला माझ्या मातेच्या उदरात असतानाच निवडले आणि त्यांच्या कृपेने मला बोलावले, त्यांना हे योग्य वाटले की त्यांच्या पुत्राला माझ्यामध्ये प्रकट करावे; यासाठी की गैरयहूदी लोकांमध्ये मी येशूच्या शुभवार्तेचा घोषणा करावी. अशी माझी त्वरित प्रतिक्रिया होती की कोणत्याही मनुष्याचा सल्ला घेऊ नये. माझ्याआधी जे प्रेषित होते त्यांना भेटण्यासाठी मी यरुशलेमपर्यंत गेलो नाही, परंतु मी अरबस्थानात गेलो. नंतर मी दमास्कस परत आलो. नंतर तीन वर्षांनंतर केफाची ओळख करून घेण्यासाठी मी यरुशलेमला गेलो आणि पंधरा दिवस मी त्याच्याबरोबर राहिलो. प्रभुचा भाऊ याकोब याच्याशिवाय दुसर्‍या प्रेषितांना मी भेटलो नाही. मी परमेश्वरासमोर तुम्हाला खात्री देतो की, मी जे तुम्हाला लिहित आहे त्यामध्ये काही खोटे नाही. नंतर मी सिरिया आणि किलिकिया येथे गेलो. ख्रिस्तामध्ये असलेल्या यहूदीया येथील मंडळ्यांना त्यावेळेस माझी वैयक्तिक ओळख नव्हती. त्यांनी फक्त एवढेच ऐकले होते की, “ज्या माणसाने पूर्वी आमचा छळ केला तो आता त्या विश्वासाचा प्रचार करीत आहे ज्याचा नाश करण्याचा त्याने प्रयत्न केला होता.” माझ्यामुळे त्यांनी परमेश्वराचे गौरव केले.

गलतीकरांस पत्र 1:10-24 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मी आता मनुष्याची किंवा देवाची मनधरणी करायला पाहत आहे? मी मनुष्यांना संतुष्ट करायला पाहत आहे काय? मी अजूनपर्यंत मनुष्यांना संतुष्ट करत राहिलो असतो तर मी ख्रिस्ताचा दास नसतो. कारण बंधूंनो, मी तुम्हांला हे कळवतो की, मी सांगितलेली सुवार्ता मनुष्याच्या सांगण्याप्रमाणे नाही. कारण ती मला मनुष्यापासून प्राप्त झाली नाही, आणि ती मला कोणी शिकवलीही नाही; तर येशू ख्रिस्ताच्या प्रकटीकरणाने ती मला प्राप्त झाली. यहूदी धर्मातल्या माझ्या पूर्वीच्या वर्तणुकीविषयी तुम्ही ऐकले आहे की, मी देवाच्या मंडळीचा पराकाष्ठेचा छळ करत असे व तिचा नाश करत असे; आणि माझ्या पूर्वजांच्या संप्रदायांविषयी मी विशेष आवेशी असल्यामुळे माझ्या लोकांतल्या माझ्या वयाच्या पुष्कळ जणांपेक्षा यहूदी धर्मात मी पुढे गेलो होतो. तरी ज्या देवाने मला माझ्या मातेच्या उदरातून जन्मल्यापासून वेगळे केले व आपल्या कृपेने बोलावले, त्याला आपल्या पुत्राला माझ्या ठायी प्रकट करणे बरे वाटले, अशासाठी की, मी परराष्ट्रीयांमध्ये त्याच्या सुवार्तेची घोषणा करावी; तेव्हा मानवांची2 मसलत न घेता, आणि माझ्यापूर्वी झालेल्या प्रेषितांकडे यरुशलेमेस वर न जाता, मी लगेच अरबस्तानात निघून गेलो; व तेथून दिमिष्कास पुन्हा परत आलो. मग तीन वर्षांनंतर मी केफाला भेटायला यरुशलेमेस वर गेलो, व त्याच्याजवळ पंधरा दिवस राहिलो. परंतु प्रेषितांतील दुसरा कोणी माझ्या दृष्टीस पडला नाही; मात्र प्रभूचा बंधू याकोब माझ्या दृष्टीस पडला. तर पाहा, तुम्हांला मी जे लिहीत आहे ते खोटे लिहीत नाही; हे मी देवासमक्ष सांगतो. मग सूरिया व किलिकिया ह्या प्रांतांत मी आलो. तेव्हा ख्रिस्तामध्ये असणार्‍या यहूदीयातील मंडळ्यांना माझी तोंडओळख नव्हती; त्यांच्या ऐकण्यात एवढेच येत असे की, “पूर्वी आपला छळ करणारा ज्या विश्वासाचा मागे नाश करत असे, त्याची तो आता घोषणा करत आहे.” आणि ते माझ्यावरून देवाचा गौरव करत असत.

गलतीकरांस पत्र 1:10-24 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

मी आता माणसाची मान्यता मिळवू पाहत आहे काय? मुळीच नाही! मला देवाची मान्यता हवी आहे. मी मनुष्यांना संतुष्ट करू पाहत आहे काय? मी अजूनपर्यंत मनुष्यांना खुश करत राहिलो असतो, तर मी ख्रिस्ताचा सेवक नसतो. बंधूंनो, मी तुम्हांला कळवू इच्छितो की, मी घोषित करीत असलेले शुभवर्तमान कुणा माणसाने सुरू केलेले नाही. कारण ते मला मनुष्याकडून प्राप्त झाले नाही आणि ते मला कोणी शिकवलेही नाही तर येशू ख्रिस्ताने स्वतः ते मला प्रकट करून दाखवले आहे. यहुदी धर्मातल्या माझ्या पूर्वीच्या वर्तणुकीविषयी तुम्ही ऐकले आहे की, मी देवाच्या ख्रिस्तमंडळीचा निष्ठुरपणे छळ करत असे व तिचा विध्वंस करत असे. माझ्या पूर्वजांच्या संप्रदायाविषयी मी फार आवेशी असल्यामुळे माझ्या समाजातल्या माझ्या वयाच्या पुष्कळ जणांपेक्षा यहुदी धर्म पाळण्याच्या बाबतीत मी अधिक प्रगती केली होती. परंतु देवाने जन्मापूर्वीपासून माझी निवड केली व आपल्या कृपेने मला त्याची सेवा करण्यासाठी बोलावले. मी यहुदीतर लोकांमध्ये त्याच्या पुत्राच्या शुभवर्तमानाची घोषणा करावी म्हणून जेव्हा त्याने मला त्याचा पुत्र प्रकट करून दाखवला, तेव्हा माणसांचा सल्‍ला न घेता आणि माझ्यापूर्वी झालेल्या प्रेषितांकडे न जाता, मी अरबस्थानात निघून गेलो व तेथून दिमिष्काला पुन्हा परत आलो. तीन वर्षांनंतर मी यरुशलेम येथे पेत्राला भेटायला गेलो व त्याच्याजवळ पंधरा दिवस राहिलो. प्रभूचा बंधू याकोब याच्याशिवाय प्रेषितांपैकी इतर कोणाची माझी भेट झाली नाही. तर पाहा, तुम्हांला मी जे लिहीत आहे, ते खोटे लिहीत नाही, हे मी देवासमक्ष सांगतो. नंतर सूरिया व किलिकिया ह्या ठिकाणी मी गेलो. त्या वेळी ख्रिस्तामध्ये असणाऱ्या यहुदियातील ख्रिस्तमंडळ्या मला व्यक्तिशः ओळखत नव्हत्या. त्यांच्या ऐकण्यात एवढेच येत असे की, पूर्वी हा मनुष्य आपला छळ करायचा आणि ज्या विश्वासाचा व प्रभूमार्गाचा तो विध्वंस करू पाहत होता, त्याच विश्वासाची व प्रभूमार्गाची तो आता घोषणा करू लागला आहे आणि माझ्यामुळे त्यांनी देवाचा गौरव केला.

गलतीकरांस पत्र 1:10-24

गलतीकरांस पत्र 1:10-24 MARVBSIगलतीकरांस पत्र 1:10-24 MARVBSIगलतीकरांस पत्र 1:10-24 MARVBSI
सामायिक करा
पूर्ण धडा वाचा