YouVersion लोगो
सर्च आयकॉन

एज्रा 9:5-15

एज्रा 9:5-15 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

उपोषण केलेला, वस्त्र व झगा फाडलेला, अशा स्थितीत मी संध्याकाळच्या अर्पणसमयी उठलो आणि गुडघे टेकून माझा देव परमेश्वर ह्याच्यापुढे आपले हात पसरून म्हणालो, “हे माझ्या देवा, मला लाज वाटते. मला तुझ्यापुढे तोंड वर करण्यास शरम वाटते, कारण आमचे अपराध वाढून आमच्या डोक्यावरून गेले आहेत व आमचे दोष वाढून गगनास जाऊन पोहचले आहेत. आमच्या पूर्वजांच्या काळापासून आजपर्यंत आम्ही अतिशय अपराधी आहोत; आणि आमच्या अधर्मामुळे आम्ही, आमचे राजे व आमचे याजक अनेक देशांच्या राजांच्या हाती सापडून तलवार, बंदिवास, लुटालूट व लोकलज्जा अशा विपत्तीत पडलो आहोत; आज आमची स्थिती अशीच आहे. सांप्रत थोडे दिवस आमचा देव परमेश्वर ह्याने आमच्यावर अनुग्रह केला आहे; आमच्यातले थोडके लोक वाचवून अवशेष ठेवले आहेत आणि आम्हांला त्याच्या पवित्रस्थानात एका खुंटीचा आधार मिळाला आहे; आमच्या देवाने आमचे डोळे सतेज केले आहेत व आमच्या दास्यात आम्हांला थोडेसे नवजीवन मिळाले आहे. आम्ही दास तर आहोत, तरी आमच्या दास्यात देवाने आमचा त्याग केला नाही; उलट त्याने पारसदेशीय राजाच्या द्वारे आमच्यावर कृपादृष्टी केली आहे, ह्यासाठी की आम्ही नवजीवन पावून आमच्या देवाचे मंदिर उभारावे, त्याच्या मोडतोडीची दुरुस्ती करावी, आणि यहूदा व यरुशलेम ह्यांत आम्हांला आश्रयस्थान मिळावे. तर आता हे आमच्या देवा, असे असता आम्ही काय बोलणार? आम्ही तुझ्या आज्ञा मोडल्या आहेत. तू आपले सेवक जे संदेष्टे त्यांच्या द्वारे दिलेल्या आज्ञा आम्ही मोडल्या आहेत; तू सांगितले होते की, ‘जो देश ताब्यात घेण्यास तुम्ही जात आहात तो देश देशोदेशींच्या लोकांच्या अशुद्धतेमुळे व अमंगळ कृतींमुळे अशुद्ध झाला आहे; त्यांनी तो देश ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत आपल्या अशुद्धतेने भरून टाकला आहे; तर तुम्ही आपल्या कन्या त्यांच्या पुत्रांना देऊ नयेत; व त्यांच्या कन्या आपल्या पुत्रांना करू नयेत, त्यांचे क्षेमकुशल कधीही चिंतू नये, म्हणजे तुम्ही मजबूत होऊन त्या देशाचे उत्तम फळ चाखाल आणि आपल्यामागे आपल्या वंशजांना तो निरंतरचे वतन ठेवून जाल.’ आमच्या दुष्कृत्यांमुळे व आमच्या मोठ्या अपराधांमुळे हे सर्व आमच्यावर ओढवले असून आमच्या अपराधास योग्य असलेल्या शिक्षेहून, हे देवा, तू आम्हांला कमी शासन केले व आमच्यातल्या इतक्या लोकांना वाचवून अवशेष ठेवले, तर आम्ही पुन्हा तुझ्या आज्ञा मोडून अमंगळ कृत्ये करणार्‍या ह्या लोकांशी सोयरीक करावी काय? अशाने तू आमच्यावर कोपायमान होऊन आम्हांला भस्म करशील आणि आमचा कोणी अवशेष उरू देणार नाहीस, असे नाही का तू करणार? हे परमेश्वरा, इस्राएलाच्या देवा, तू न्यायी आहेस, आम्ही केवळ निभावलेले अवशेष आहोत; आज तुझ्यापुढे आमची स्थिती अशीच आहे; आम्ही तुझ्यापुढे अपराधी आहोत; ह्यामुळे तुझ्यासमोर कोणाला उभे राहता येत नाही.”

सामायिक करा
एज्रा 9 वाचा

एज्रा 9:5-15 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

संध्याकाळची अर्पणांची वेळ झाली तेव्हा मी अंगावरची वस्त्रे आणि अंगरखा फाटलेला अशा अपमानीत स्थितीत मी गुडघे टेकून व माझा देव परमेश्वर याच्यापुढे हात पसरुन बसलो. मी म्हणालो, “हे देवा, तुझ्याकडे पाहण्याची मला लाज वाटत आहे; मला लाज वाटते कारण आमच्या पापांची संख्या आमच्या मस्तकावरून गेली आहे; आमचे अपराध वाढून स्वर्गापर्यंत पोहचले आहेत. आमच्या वाडवडिलांच्या वेळेपासून आतापर्यंत आम्ही महान पापांचे दोषी आहोत. आमच्या अपराधांमुळे आमचे राजे आणि याजक यांना या जगिक राजाच्या हाती तलवार व बंदीवास, लुटालुट आणि मुखलज्जेला, आज आम्ही जसे आहोत तसे दिलेत. आमच्या देवाने आमचे डोळे प्रकाशीत केले आहेत. आमच्या दास्यपणात आम्हास दिलासा दिलास. परमेश्वर आमचा देव याने आम्हावर कृपा केली आहे. तू आमच्यापैकी काहीजणांना वाचवून अवशेष ठेवले आहे. आणि त्याच्या पवित्रस्थानात आमच्या पायांना खुंटीचा आधार दिला आहे. आम्ही गुलामच आहोत. तरी आमचा देव आम्हास विसरला नाही. पण त्याने आमच्यावर कराराप्रमाणे विश्वास योग्यता दाखवली. आमच्या देवाचे उद्ध्वस्त झालेले मंदिर पुन्हा बांधण्यास त्यांना नवीन शक्ती दिली यासाठी पारसाच्या राजाची आमच्यावर कृपा होईल असे केलेस. यहूदा आणि यरूशलेमेच्या संरक्षणासाठी भिंत बांधावी म्हणून तू साह्यकारी झालास. परंतु आमच्या देवा, आता यानंतर आम्ही काय बोलावे? कारण आम्ही तुझ्या आज्ञा विसरून गेलो आहोत. त्या आज्ञा, तुझे सेवक जे संदेष्टे यांच्यामार्फत तू आम्हास दिल्यास. जेव्हा तू म्हणालास, तुम्ही ज्या देशात प्रवेश करून ताब्यात घेण्यास जात आहात तो अशुद्ध देश आहे. तो त्या देशाच्या लोकांच्या अमंगळ कृत्यांनी अशुद्ध झाला आहे. त्यांनी तो देश या टोकापासून त्या टोकापर्यंत आपल्या अशुद्धतेने भरून टाकला आहे. त्यामुळे आता तुमच्या मुली त्यांच्या मुलांना देऊ नका. त्यांच्या मुली तुमच्या मुलांना करू नका आणि कधी त्यांची शांती आणि सुस्थिती मिळवण्याचा प्रयत्न करू नका यासाठी की, तुम्ही बलशाली होऊन त्या देशाचे उत्तम फळ खावे, अशा रीतीने आपल्या मुलांबाळासाठी तो प्रदेश सर्वकाळासाठी ताब्यात घ्यावा. आमच्या वाईट कृत्यामुळे आणि महान दोषामुळे हे सर्व आम्हावर आल्यानंतर, हे आमच्या देवा आमच्या अपराधांच्या मानाने तू आम्हास केलेले शासन कमीच आहे आणि तू आम्हास वाचवून अवशेष ठेवले. आम्ही पुन्हा तुझ्या आज्ञा मोडून अमंगळ लोकांशी सोयरीक करावी काय? काहीही शिल्लक राहणार नाही, कोणीही निसटणार नाही असा आमचा संपूर्ण नाश करीपर्यंत तुझा क्रोध आमच्यावर पेटणार नाही काय? हे परमेश्वरा, इस्राएलाच्या देवा, तू न्यायी आहेस. तू आजच्याप्रमाणे आम्हास वाचवून अवशेष ठेवले आहेस. पाहा, आम्ही इथे तुझ्यापुढे आमच्या अपराधामुळे आहोत, यामुळे तुझ्यापुढे कोणालाहि उभे राहता येत नाही.”

सामायिक करा
एज्रा 9 वाचा