यहेज्केल 5:1-17
यहेज्केल 5:1-17 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
“मग मानवाच्या मुला, स्वतःसाठी न्हाव्याच्या वस्तऱ्यासारखे धारधार अवजार घे व आपल्या डोक्याच्या केसांचे, दाढीचे मुंडन कर, केस तागडीत मोजून त्याचे वाटप कर वेढा दिलेला समय समाप्त झाल्यावर त्यातील तिसरा भाग शहराच्या मध्य भागी जाळून टाक. आणि तिसरा भाग तलवारीने कापून टाक व तिसरा भाग वाऱ्यावर उडवून टाक आणि या प्रकारे त्या लोकांचा पाठलाग तलवार करेल. थोडेसे केस कापून आपल्या कपड्याला बांधून टाक. काही अजून केस घेऊन आगीत टाकून दे, आणि त्यास जाळून टाक, म्हणजे इस्राएलाच्या घराण्यावर आग त्यांच्या मागे बाहेर जाईल. परमेश्वर देव म्हणतो, ही यरूशलेम नगरी, जी इतर राष्ट्रांमध्ये आहे, जेथे मी तिला स्थापीले, आणि मी तिला इतर देशांनी आजूबाजुने वेढीले आहे. पण तिने वाईट आचरण करून इतर देशांहून माझा धिक्कार केला आहे, आणि त्यांनी माझ्या न्यायीपणाचा व आज्ञाचा विरोध केला आहे. म्हणून परमेश्वर देव असे सांगतो; तुम्ही आजूबाजुच्या देशांपेक्षा अधिक त्रासदायक आहात. तुम्ही सभोवतालच्या देशाहून अधिक माझ्या फर्मानाचे पालन केले नाही. म्हणूनच परमेश्वर देव म्हणतो; पहा! मीच तुमच्या विरोधात काम करेन! तुम्हास केलेले शासन हे आजूबाजुच्या देशाच्या डोळ्यादेखत तुम्हावर होईल. तुझ्या किळस आणणाऱ्या कार्यामुळे, मी आजवर केले नाही, आणि करणार नाही, असे मी तुझ्यासोबत करेल. तथापि बाप मुलांना, आणि मुले बापाला खाऊन टाकतील, कारण मी तुझ्यावर न्याय आणला आहे. तुमच्या उरलेल्या अंशाला चारही भागात फेकून देईल. म्हणून जसा मी राहलो, परमेश्वर देव म्हणतो, निश्चितच तुम्ही किळस राग आणणाऱ्या गोष्टी केल्या आहेत. म्हणून तुमची संख्या कमी करून तुमच्यावर दया करणार नाही. घातक साथीच्या रोगाने तुम्हातील तिसरा भाग तुमच्या संख्येतून मी नाहीसा करेन, तुम्हामध्ये भयंकर दुष्काळ भुकमरी, सभोवताली तलवारीने तुझे लोक नाश पावतील. सर्व दिशांनी तलवार येऊन तुझा पिच्छा करील. तेव्हा राग पूर्ण होऊन समाधान पावेल, व माझा क्रोध शांत होईल असे त्यांना कळून येईल, परमेश्वर देव हे सर्व त्याच्या विरोधात आवेशाने म्हणाला. तुझ्या आजूबाजुच्या देशांमध्ये तुझा नाश व तुझी खरडपट्टी काढेन, जे तुझ्या आजूबाजूने येणारे जाणारे ते पहातील. यरुशलेच्या बाबतीत इतर शेजारी लोकांसाठी चेतावनीचा इशारा असेल. त्यांना निंदा करण्याचे व अपमान करण्याचे कारण मिळेल. त्यांच्यावर शासन करून त्यांचा नाश केला असे परमेश्वर देव म्हणतो. तुमच्यात कडूपणाचे बाण पाठवेन, त्याचा अर्थ असा होईल मी तुमचा विध्वंस होईल, त्यांच्या वरचा दुष्काळ अजून कठोर करून तुमच्या भाकरीचा आधार काढून टाकेन; दुष्काळ, रोगराई तुमच्यावर पाठवीन, तुम्ही आपत्यहीन व्हाल, साथीचा रोग, रक्तस्राव आणि तुम्हावर तलवार चालवीन. असे परमेश्वर देव म्हणतो.”
यहेज्केल 5:1-17 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
“हे मानवपुत्रा, तू एक तीक्ष्ण तलवार घे; ती न्हाव्याच्या वस्तर्याप्रमाणे वापरून आपल्या डोक्यावर व दाढीवर चालव. मग तराजू घे आणि केस तोलून त्यांची वाटणी कर. नगराच्या वेढ्याचे दिवस संपले म्हणजे ह्या केसांचा एक तृतीयांश नगराच्या मध्यभागी अग्नीने जाळून टाक; एक तृतीयांश केस घेऊन त्यांवर चोहोकडून तलवार चालव आणि उरलेला एक तृतीयांश वार्यावर उडव; ह्या प्रकारे मी तलवार उपसून त्या लोकांची पाठ पुरवीन. त्यांतले थोडेसे केस घेऊन आपल्या वस्त्राच्या पदरी बांध. त्यांतून पुन्हा थोडके घेऊन अग्नीत टाकून जाळ, म्हणजे त्यांमधून अग्नी निघून इस्राएलाच्या सर्व घराण्यास व्यापील. प्रभू परमेश्वर म्हणतो : पाहा, ही यरुशलेम; ही राष्ट्रांमध्ये स्थापली आहे व हिच्याभोवती देश वसवले आहेत. तरी तिने दुष्ट आचरण करून माझ्या निर्णयांना इतर राष्ट्रांपेक्षाही अधिक विरोध केला, तिने सभोवतालच्या प्रदेशांपेक्षाही माझ्या नियमांचा अधिक विरोध केला; कारण त्यांनी माझ्या निर्णयांचा अव्हेर केला व माझ्या नियमाप्रमाणे ते चालले नाहीत. ह्यामुळे प्रभू परमेश्वर म्हणतो, ज्या अर्थी तुम्ही आपल्या सभोवतालच्या राष्ट्रांपेक्षा अधिक बंडाळी माजवली व माझ्या नियमांप्रमाणे चालला नाहीत, माझे निर्णय पाळले नाहीत, आणि आसपास राष्ट्रे आहेत त्यांच्या निर्णयाप्रमाणेदेखील वागला नाहीत, त्या अर्थी प्रभू परमेश्वर म्हणतो, पाहा, मी, मीच तुझ्या विरुद्ध होईन आणि राष्ट्रांदेखत तुझ्यामध्ये न्यायशासन करीन. तुझ्या सर्व अमंगळ कृत्यांमुळे, आजवर मी केले नाही व पुन्हा त्याप्रमाणे करणार नाही, असे मी तुझ्या ठायी करीन. तुझ्यामध्ये बाप आपल्या मुलांना खातील व मुले आपल्या बापांना खातील; मी तुझ्या ठायी न्यायशासन करीन व तुझे सगळे उरलेले लोक सर्व दिशांना विखरून टाकीन. प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, तू माझे पवित्रस्थान आपल्या सर्व तिरस्करणीय वस्तूंनी व अमंगळ कर्मांनी भ्रष्ट केले, म्हणून खातरीने मी तुझ्यावरची कृपादृष्टी काढून घेईन; गय करणार नाही, दया करणार नाही. तुझ्या वस्तीचा तिसरा हिस्सा पटकीने मरेल व तुझ्यामध्ये लोक उपासमारीने नाश पावतील; तिसरा हिस्सा तुझ्याभोवती तलवारीने पडेल; व तिसरा हिस्सा मी सर्व दिशांना विखरीन; मी तलवारीने त्यांची पाठ पुरवीन. अशी माझ्या रागाची पूर्तता होईल आणि त्यांच्यावरच्या माझ्या क्रोधाची तृप्ती होऊन माझे समाधान होईल. मी त्यांच्यावरच्या माझ्या क्रोधाचा शेवट केला म्हणजे ते समजतील, की मी परमेश्वर हे आवेशाने बोललो आहे. आणखी तुझ्याभोवतालच्या सर्व राष्ट्रांमध्ये मी तुला उजाड करीन, अपशब्दाचा विषय करीन; आणि येणारेजाणारे हे पाहतील. मी क्रोधाने, संतापाने व तीव्र निषेधवाणीने तुझे न्यायशासन करीन. तेव्हा तुझ्याभोवतालच्या राष्ट्रांना तू अपशब्द, निंदा, ताकीद व विस्मय ह्यांचा विषय होशील; मी परमेश्वर हे म्हणालो आहे; मी तुमचा नाश करण्यासाठी उपासमारीचे नाशकारक तीक्ष्ण बाण सोडीन, तेव्हा तुमच्यावर मी दुष्काळाचा कहर करीन व तुमचा भाकरीचा आधार तोडीन. मी तुमच्यावर दुष्काळ व हिंस्र पशू पाठवीन; ते तुम्हांला नि:संतान करतील; मरी व रक्तपात तुमच्यावर येतील; मी तुमच्यावर तलवार आणीन; मी परमेश्वर हे म्हणालो आहे.”