यहेज्केल 47:7-12
यहेज्केल 47:7-12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जसा मी परत आलो तेव्हा पाहा, नदीच्या तीरांवर एका बाजूस व दुसऱ्या बाजूसही पुष्कळ झाडी असलेली पाहिली. तो मनुष्य मला म्हणाला, “हे पाणी पूर्वप्रदेशाकडे वाहत जाते. आणि तेथून अराबात उतरून क्षारसमुद्राला मिळते, ही नदी समुद्रास मिळून त्याचे पाणी ताजे करते. मग असे होईल की, जेथे ही महानदी जाईल तेथे तेथे जो प्रत्येक जिवंत प्राणी राहत असेल तो जगेल, कारण तेथील पाणी क्षारसमुद्रास मिळते त्यामुळे ते ताजे होते आणि तेथे विपुल मासे मिळतात, हे पाणी जेथे जाईल तेथे सर्वकाही निरोगी होईल; जेथे कोठे ही नदी जाते प्रत्येकगोष्ट जिवंत राहते. तिच्या तीरी कोळी उभे राहून एन-गेदीपासून एन-इग्लाइमपर्यंत जाळी टाकतील. मोठ्या समुद्रातल्या माशांसारखे त्या क्षारसमुद्रात अनेक प्रकारांप्रमाणे विपुल मासे होतील. पण दलदल आणि पाणथळीच्या जागा निर्दोष होणार नाहीत. त्या मिठासारख्या होतील. नदीच्या दोन्ही काठावर सर्व प्रकाराची खाण्याजोगी फळे देणारे सर्व प्रकारची झाडे वाढतीत. त्यांची पाने कधीच सुकून जाणार नाहीत. त्याचे फळ कधीच थांबणार नाही. ती प्रत्येक महिन्याला फळ देईल, कारण त्या नदीचे पाणी पवित्रस्थानातून निघाले आहे. त्यांची फळे खाण्यासाठी व त्यातील पाने औषधी होतील.”
यहेज्केल 47:7-12 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जेव्हा मी तिथे गेलो, तेव्हा नदीच्या दोन्ही बाजूंना मी पुष्कळ झाडे पाहिली. तो मला म्हणाला, “हे पाणी पूर्वेच्या प्रदेशाकडे वाहत जाऊन खाली अराबाहमध्ये जाते, तिथे ते मृत समुद्रात जाऊन मिळते. जेव्हा ते समुद्रात जाते, तेव्हा खारट पाणी गोड होते. जिथे पाणी वाहील, तिथे जिवंत प्राण्यांचे थवे राहतील. तिथे पुष्कळ मासे असतील, कारण ते पाणी तिथे वाहत जाऊन खारट पाणी गोड करते; म्हणून जिथे नदी वाहते तिथे सर्वकाही जिवंत राहेल. तिच्या किनारी मासेमारी करणारे उभे राहतील; एन-गेदीपासून एन-एग्लाइमपर्यंत जाळे पसरविण्यासाठी जागा असेल. भूमध्य समुद्रातील माशांप्रमाणे तिथे पुष्कळ प्रकारचे मासे असतील. परंतु पानथळ आणि दलदल शुद्ध होणार नाही; ते खारटच राहतील. नदीच्या दोन्ही बाजूंना सर्वप्रकारच्या फळांची झाडे वाढतील. त्यांची पाने वाळणार नाहीत, ना त्यांची फळे संपतील. प्रत्येक महिन्यात ते फळे देतील, कारण त्यांच्याकडे पवित्रस्थानातून पाणी वाहते. त्यांची फळे खाण्यासाठी व त्यांची पाने आरोग्यासाठी वापरली जातील.”
यहेज्केल 47:7-12 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
परत येत असता नदीच्या दोन्ही तीरांवर बहुत झाडे असलेली मी पाहिली. तो मला म्हणाला, “हे पाणी पूर्वप्रदेशांकडे वाहत जाते आणि तेथून अराबात उतरून समुद्राकडे जाते; ही नदी समुद्रास मिळून त्याचे पाणी निर्दोष होते. ही महानदी जाईल तेथे तेथे तिच्यात जे जीवजंतू भरलेले असतील ते जगतील व तिच्यात मासे विपुल होतील, कारण जेथे जेथे हे पाणी जाईल तेथे तेथे सर्वकाही निरोगी होईल; जेथे जेथे ही नदी जाईल तेथे तेथे सर्व प्राणी जिवंत राहतील. तिच्या तीरी धीवर उभे राहून एन-गेदीपासून एन-इग्लाइमापर्यंत पाग टाकतील; महासागरातल्या माशांप्रमाणे त्या नदीत भिन्नभिन्न जातींचे विपुल मासे सापडतील. त्यातील पाणथळे व दलदली ह्यांचे पाणी निर्दोष होणार नाही; ती खारटाणेच राहतील. नदीच्या उभय तीरांनी खाण्याजोगी फळे देणारी हरतर्हेची झाडे वाढतील; त्यांची पाने वाळणार नाहीत; त्यांच्या फळांचा लाग खुंटणार नाही; प्रतिमासी ती पक्व फळे देतील, कारण त्या नदीचे पाणी पवित्रस्थानातून निघाले आहे; त्या वृक्षांची फळे खाण्याजोगी व त्यांची पाने औषधी होतील.”