YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यहेज्केल 40:1-6

यहेज्केल 40:1-6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

आमच्या बाबेलच्या बंदिवासाच्या पंचविसाव्या वर्षात, वर्षाच्या आरंभी, महिन्याच्या दहाव्या दिवशी, यरूशलेम नगर काबीज झाल्यानंतर साधारण चौदाव्या वर्षी, परमेश्वराचा हात माझ्यावर होता आणि त्याने मला तेथे नेले. दृष्टांतात देवाने मला इस्राएल देशात नेले. मला त्याने खूप उंच पर्वताजवळ ठेवले. त्यावर दक्षिणेकडे नगराची इमारतीसारखे काही होते. मग त्याने मला तेथे आणले. पाहा तेथे पितळेच्या रूपासारखा असा एक मनुष्य होता. त्याच्या हातात मोजमापाची सुती पट्टी व मापण्याची काठी होती. व तो वेशीजवळ उभा होता. तो मनुष्य मला म्हणाला, “मानवाच्या मुला, तू आपल्या डोळ्यांनी पाहा व कानांनी ऐक. आणि मी तुला जे काही दाखवितो त्या सर्वाकडे आपले चित्त लाव, कारण मी ते तुला दाखवावे म्हणून तुला इकडे आणले आहे; जे काही तू पाहतोस ते इस्राएलाच्या घराण्याला प्रगट कर.” मंदिरच्या सभोवतीची भिंत मी पाहिली. त्या मनुष्याच्या हातात मोजपट्टी होती. ती सहा हात लांब होती. हे माप एक हात व चार अंगुले होते. मग त्याने त्या भिंतीची जाडी मोजली. ती एक काठी भरली. मग त्या मनुष्याने भिंतीची उंची मोजली. ती एक काठी भरली. मग तो मनुष्य पूर्वेच्या दाराजवळ गेला. तो पायऱ्या चढला व त्याने दाराचा उंबरठा मोजला. तो एक काठी रुंद होता. दुसरा उंबरठाही तेवढाच रुंद होता.

सामायिक करा
यहेज्केल 40 वाचा

यहेज्केल 40:1-6 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

आमच्या बंदिवासाच्या पंचविसाव्या वर्षी, वर्षाच्या सुरुवातीला, महिन्याच्या दहाव्या दिवशी, शहराचे पतन झाल्यानंतर चौदाव्या वर्षी; त्याच दिवशी याहवेहचा हात माझ्यावर होता आणि त्यांनी मला तिथे नेले. परमेश्वराच्या दृष्टान्तांमध्ये याहवेहनी मला इस्राएल देशात नेले आणि एका अत्यंत उंच पर्वतावर ठेवले. त्याच्या दक्षिणेकडे काही इमारती होत्या, ज्या शहरासारख्या दिसत होत्या. याहवेहने मला तिथे नेले आणि मी एक मनुष्य पाहिला जो कास्यासारखा दिसत होता; तो तागाची एक दोरी व मापन-दंड हातात घेऊन वेशीवर उभा होता. तो मनुष्य मला म्हणाला, “मानवपुत्रा, काळजीपूर्वक पाहा आणि जवळ येऊन ऐक आणि जे काही मी तुला दाखविणार आहे त्याकडे लक्ष दे, त्यासाठीच तुला येथे आणले गेले आहे. तू जे काही बघतो ते इस्राएली लोकांना सांग.” मंदिराच्या क्षेत्राच्या सभोवती असलेली भिंत मी पाहिली. त्या मनुष्याच्या हातात असलेला मापन-दंड सहा हात लांब होता, ते प्रत्येक माप एक हात आणि एक वीत होते. त्याने भिंतीचे माप घेतले; ते एक काठी जाडी व एक काठी उंच होती. मग तो पूर्वेकडील द्वाराकडे गेला. त्याने त्याच्या पायर्‍या चढून जाऊन द्वाराच्या उंबरठ्याचे माप घेतले; तो एक मापन-दंड होता.

सामायिक करा
यहेज्केल 40 वाचा

यहेज्केल 40:1-6 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

आमच्या बंदिवासाच्या पंचविसाव्या वर्षी, म्हणजे नगराचा विध्वंस झाल्यावर चौदाव्या वर्षी, वर्षारंभाच्या महिन्याच्या दशमीसच परमेश्वराचा वरदहस्त माझ्यावर आला व त्याने मला तेथे नेले. त्याने दिव्य दृष्टान्ताच्या द्वारे मला इस्राएल देशात नेऊन एका अतिशय उंच पर्वतावर ठेवले; त्यावर दक्षिणेस नगराच्या आकारासारखे काही होते. त्याने मला त्या जागी नेले तेव्हा एक पुरुष दिसला; त्याचे स्वरूप पितळेसारखे होते; त्याच्या हातात तागाची एक दोरी व मापण्याची काठी होती; तो वेशीनजीक उभा होता. तो पुरुष मला म्हणाला, “मानवपुत्रा, आपल्या डोळ्यांनी पाहा, आपल्या कानांनी ऐक, व मी तुला जे काही दाखवतो त्या सर्वांकडे चित्त लाव; हे तुला दाखवावे म्हणून मी तुला इकडे आणले आहे; तू जे पाहशील ते सर्व इस्राएल घराण्यास सांग.” मी पाहिले तर त्या मंदिराभोवती एक तट होता; त्या पुरुषाच्या हातात मापण्याची एक काठी होती; ती सहा हात लांबीची होती; हे माप एक हात व चार अंगुळे होते. त्याने त्या इमारतीच्या भिंतीची जाडी एक काठी व उंची एक काठी मापली. तो पूर्वाभिमुख असलेल्या द्वाराकडे जाऊन पायर्‍या चढून वर गेला; त्याने द्वाराचा उंबरठा एक काठी रुंद मापला; हा पहिला उंबरठा एक काठी भरला.

सामायिक करा
यहेज्केल 40 वाचा