निर्गम 6:1-13
निर्गम 6:1-13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, “मी आता फारोला काय करतो ते तू बघशील; मी माझे बाहुबल त्यास दाखवले म्हणजे मग तो माझ्या लोकांस जाऊ देईल. कारण माझ्या बाहुबलामुळे तो त्यांना आपल्या देशातून बाहेर घालवून देईल.” मग देव मोशेला म्हणाला, “मी परमेश्वर आहे मी अब्राहाम, इसहाक व याकोब यांना सर्वसमर्थ देव म्हणून प्रगट झालो; परंतु मी त्यांना परमेश्वर या माझ्या नावाने त्यांना माहीत नव्हतो. ज्या कनान देशात ते उपरी होते तो परदेश त्यांना वतन देण्याविषयीचा करार मी त्यांच्याशी केला आहे. ज्या इस्राएलाला मिसऱ्यांनी दास करून ठेवले आहे त्यांचे कण्हणे ऐकून मी आपल्या कराराची आठवण केली आहे. तेव्हा इस्राएलाला सांग, मी तुमचा परमेश्वर आहे; मी तुम्हास मिसऱ्यांच्या दास्यातून सोडवीन आणि मी तुम्हास त्यांच्या अधिकारातून मुक्त करीन, आणि मी आपले सामर्थ्य दाखवून व सामर्थ्यशाली निवाड्याची कृती करून तुम्हास सोडवीन. मी तुम्हास आपले लोक करून घेईन आणि मी तुमचा देव होईन. मी तुम्हास मिसऱ्यांच्या दास्यातून काढून आणतो तो मी तुमचा देव परमेश्वर आहे हे तुम्हास समजेल. जो देश मी अब्राहाम, इसहाक व याकोबास देण्याची मी हात वर करून शपथ वाहिली होती त्यामध्ये मी तुम्हास नेईन; व तो मी तुम्हास वतन करून देईन. मी परमेश्वर आहे.” तेव्हा मोशेने हे सर्व इस्राएल लोकांस सांगितले. परंतु त्यांच्या बिकट दास्यामुळे ते नाउमेद झाल्यामुळे ते त्याचे म्हणणे ऐकेनात. मग परमेश्वर मोशेशी बोलला व म्हणाला, “तू जाऊन मिसराचा राजा फारो याला सांग की इस्राएली लोकांस तुझ्या देशातून जाऊ दे” तेव्हा मोशे परमेश्वरास म्हणाला, “इस्राएली लोकांनी माझे ऐकले नाही, तर फारो माझे कसे ऐकेल? कारण मी अजिबात चांगला वक्ता नाही.” परमेश्वराने मोशे व अहरोन यांना इस्राएल लोकांस मिसर देशातून बाहेर नेण्याविषयी आज्ञा देऊन इस्राएल लोकांकडे आणि तसेच मिसरी राजा फारो याच्याकडे पाठवले.
निर्गम 6:1-13 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तेव्हा याहवेह मोशेला म्हणाले, “आता मी फारोहला काय करतो, ते तू पाहशील: कारण माझ्या पराक्रमी हातामुळे तो लोकांना जाऊ देईल; कारण माझ्या बलवान हातामुळे तो त्यांना आपल्या देशाबाहेर घालवून देईल.” परमेश्वर मोशेला म्हणाले, मी याहवेह आहे. मी सर्वसमर्थ परमेश्वर म्हणून अब्राहाम, इसहाक व याकोब यांना प्रकट झालो होतो, परंतु माझ्या याहवेह या नावाने मी स्वतःची त्यांना ओळख करून दिली नव्हती. ज्या कनान देशात ते पूर्वी परदेशी म्हणून राहत होते, तो देश मी त्यांना देईन, असा मी त्यांच्याशी करार स्थापित केला. आता इस्राएली लोकांचे इजिप्तच्या दास्यातील विव्हळणे मी ऐकले आणि माझ्या कराराची मला आठवण झाली आहे. म्हणून इस्राएली लोकांना सांग, “मी याहवेह आहे आणि मी तुम्हाला इजिप्तच्या लोकांच्या ओझ्याखालून बाहेर आणेन, त्यांच्या कष्टप्रद गुलामगिरीतून मी तुम्हाला मुक्त करेन आणि माझ्या लांब केलेल्या बाहूने व न्यायाच्या महान कृत्यांनी तुमची सुटका करेन. मी तुम्हाला माझे लोक म्हणून स्वीकारेन आणि मी तुमचा परमेश्वर होईन, मग तुम्हाला कळून येईल की, तुम्हाला इजिप्तच्या ओझ्याखालून सोडविणारा परमेश्वर याहवेह मीच आहे. आणि जो देश अब्राहाम, इसहाक व याकोब यांना देण्यास मी हात उंच करून शपथ वाहिली, त्यात मी तुम्हाला आणेन आणि तो तुम्हाला वतन म्हणून देईन. मीच याहवेह आहे.” तेव्हा मोशेने हे सर्व इस्राएली लोकांना सांगितले, परंतु त्यांची निराशा व कठोर परिश्रम यामुळे त्यांनी त्याचे ऐकले नाही. तेव्हा याहवेह मोशेला म्हणाले, “जा, इजिप्तचा राजा फारोह याला सांग की, इस्राएल लोकांस त्याच्या देशातून त्याने जाऊ द्यावे.” परंतु मोशे याहवेहला म्हणाला, “मी बोबड्या ओठांचा आहे म्हणून जर इस्राएल लोकच माझे ऐकत नाहीत, तर फारोह माझे का ऐकेल?” आता याहवेह मोशे व अहरोनाशी इस्राएली लोक व इजिप्तचा राजा फारोह याविषयी बोलले आणि इस्राएली लोकांना इजिप्तमधून बाहेर आणावे याविषयी आज्ञा केली.
निर्गम 6:1-13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “मी आता फारोला काय करतो ते तू पाहशील. मी त्याला भुजप्रताप दाखवला म्हणजे तो ह्या लोकांना जाऊ देईल; मी त्याला भुजप्रताप दाखवला म्हणजे तो ह्यांना आपल्या देशातून बाहेर घालवून देईल.” मोशेला दुसर्यांदा झालेले पाचारण देव मोशेशी बोलला; तो म्हणाला, “मी परमेश्वर आहे. मी अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांना सर्वसमर्थ1 देव म्हणून प्रकट झालो तथापि परमेश्वर2 ह्या माझ्या नावाने मी त्यांना ज्ञात नव्हतो. ज्या कनान देशात ते उपरे होते तो परदेश त्यांना वतन देण्याविषयीचा करार मी त्यांच्याशी केला आहे; शिवाय ह्या इस्राएल लोकांना मिसर्यांनी दास करून ठेवले आहे. त्यांचा आक्रोश ऐकून मी आपल्या कराराचे स्मरण केले आहे. म्हणून इस्राएल लोकांना सांग, ‘मी परमेश्वर आहे; मी तुम्हांला मिसरी लोकांच्या बिगारीच्या ओझ्याखालून काढीन, त्यांच्या दास्यातून तुम्हांला मुक्त करीन आणि हात पुढे केलेल्या बाहूने व मोठ्या शिक्षा करून तुमचा उद्धार करीन; मी तुम्हांला आपली प्रजा करून घेईन आणि मी तुमचा देव होईन; म्हणजे तुम्हांला मिसरी लोकांच्या ओझ्याखालून काढणारा मी तुमचा देव परमेश्वर आहे हे तुम्हांला कळेल. आणि जो देश अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांना देण्याची शपथ हात उभारून मी वाहिली होती त्यात मी तुम्हांला नेईन आणि तो तुम्हांला वतन करून देईन; मी परमेश्वर आहे.”’ मोशेने हे सारे इस्राएल लोकांना सांगितले; पण ते आपल्या मनाच्या संतापामुळे आणि बिकट दास्यामुळे मोशेचे ऐकेनात. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू जाऊन मिसराचा राजा फारो ह्याला सांग की, ‘इस्राएल लोकांना तुझ्या देशातून जाऊ द्यावे.”’ तेव्हा मोशे परमेश्वरासमोर म्हणाला, “पाहा, इस्राएल लोकांनी माझे ऐकले नाही, तर फारो माझे कसे ऐकेल? मी बेसुनत ओठांचा3 आहे.” ह्या प्रकारे परमेश्वर मोशे व अहरोन ह्यांच्याशी बोलला; मिसर देशातून इस्राएल लोकांना बाहेर नेण्यासाठी त्याने त्यांना इस्राएल लोकांसंबंधी आणि मिसराचा राजा फारो ह्यांच्यासंबंधी आज्ञा केली.