निर्गम 4:1-7
निर्गम 4:1-7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग मोशेने उत्तर दिले, “ते माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत व माझे म्हणणे ऐकणार नाहीत; ते म्हणतील, परमेश्वराने तुला दर्शन दिलेलेच नाही.” परंतु परमेश्वर मोशेला म्हणाला, “तुझ्या हातात ते काय आहे?” मोशेने उत्तर दिले, “काठी आहे.” मग देव म्हणाला, “ती जमिनीवर टाक.” तेव्हा मोशेने तसे केले; आणि त्या काठीचा साप झाला. तेव्हा मोशे घाबरला व त्यापासून पळाला. परंतु परमेश्वर मोशेला म्हणाला, “तुझा हात पुढे कर व त्याचे शेपूट धर.” तेव्हा त्याने तसे केले, आपला हात पुढे करून त्यास धरले. तेव्हा त्याच्या हातात तो पुन्हा काठी झाला. “म्हणजे ह्यावरून ते विश्वास धरतील, त्यांचा पूर्वजांचा-अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव परमेश्वर याने तुला दर्शन दिले आहे.” मग परमेश्वर त्यास आणखी म्हणाला, “तू तुझा हात तुझ्या छातीवर ठेव,” तेव्हा मोशेने आपला हात आपल्या छातीवर ठेवला; मग त्याने आपला हात बाहेर काढला तेव्हा तो कोडाने बर्फासारखा पांढरा झाला; मग देव म्हणाला, “आता पुन्हा तुझा हात तुझ्या छातीवर ठेव.” तेव्हा मोशेने तसे केले. मग त्याने आपला हात छातीवरून काढला तेव्हा तो शरीराच्या इतर भागांप्रमाणे होऊन तो पुन्हा पूर्वीसारखा झाला.
निर्गम 4:1-7 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तेव्हा मोशेने उत्तर दिले, “पण ते माझा विश्वास धरणार नाहीत. माझे म्हणणे ऐकणार नाहीत; ते म्हणतील, परमेश्वराने तुला दर्शन दिलेच नाही.” तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, “तुझ्या हातात ते काय आहे?” तो म्हणाला, “काठी आहे.” त्याने म्हटले, “ती जमिनीवर टाक.” ती त्याने टाकताच तिचा साप झाला; त्याला पाहून मोशे पळाला, परमेश्वराने मोशेला सांगितले, “आपला हात पुढे करून त्याचे शेपूट धर - त्याने हात पुढे करून ते धरले, तेव्हा त्या सापाची त्याच्या हातात काठी झाली; “ह्यावरून ते विश्वास धरतील की त्यांच्या पूर्वजांचा देव, अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव परमेश्वर ह्याचे तुला दर्शन झाले आहे.” परमेश्वराने त्याला आणखी सांगितले, “आता आपला हात छातीवर ठेव.” त्याने हात छातीवर ठेवून बाजूला काढला तेव्हा तो कोडाने बर्फासारखा पांढरा झाला. मग त्याने त्याला सांगितले, “पुन्हा आपला हात छातीवर ठेव ” तेव्हा त्याने पुन्हा छातीवर हात ठेवला, आणि छातीवरून बाजूला काढला तेव्हा पूर्ववत तो त्याच्या शरीराच्या इतर भागांसारखा झाला.