YouVersion लोगो
सर्च आयकॉन

निर्गम 37:17-29

निर्गम 37:17-29 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

त्याने शुद्ध सोन्याचा एक दीपवृक्ष बनवला. हा दीपवृक्ष, त्याची बैठक, त्याचा दांडा, त्याच्या वाट्या, त्याची बोंडे व त्याची फुले ही सर्व एकाच अखंड तुकड्याची घडवली. ह्या दीपवृक्षाला सहा शाखा होत्या; एका बाजूला तीन शाखा व दुसर्‍या बाजूला तीन शाखा; प्रत्येक शाखेला बदामाच्या फुलांसारख्या तीन-तीन वाट्या बोंडाफुलांसह केल्या. आणि दुसर्‍या बाजूच्या त्याच्या जोडीच्या प्रत्येक शाखेलाही बदामाच्या फुलांसारख्या तीन-तीन वाट्या बोंडाफुलांसह केल्या; दीपवृक्षामधून निघालेल्या सहा शाखांची रचना अशीच होती. दीपवृक्षाच्या दांड्याला बदामाच्या फुलांसारख्या बोंडाफुलांसह चार वाट्या होत्या. दीपवृक्षामधून निघणार्‍या सहा शाखांपैकी दोन-दोन शाखा आणि त्याच्या खाली असलेले एकेक बोंड ही एकाच अखंड तुकड्यांची होती. बोंडे व शाखा ही सर्व अखंड असून तो सबंध दीपवृक्ष शुद्ध सोन्याचा एकच घडीव तुकडा केला. त्याने त्या दीपवृक्षाचे सात दिवे, त्याचे चिमटे व ताटल्या शुद्ध सोन्याच्या केल्या. त्याने तो दीपवृक्ष व त्याची सर्व उपकरणे एक किक्कार शुद्ध सोन्याची केली. मग त्याने बाभळीच्या लाकडांची धूपवेदी केली; तिची लांबी एक हात व रुंदी एक हात अशी ती चौरस होती. तिची उंची दोन हात होती व तिची शिंगे अंगचीच होती. त्याने त्या वेदीचा वरचा भाग, तिच्या चार्‍ही बाजू व तिची शिंगे शुद्ध सोन्याने मढवली आणि तिला सभोवती सोन्याचा कंगोरा केला. वेदी उचलून नेण्याचे दांडे घालता येण्यासाठी त्याने सोन्याच्या कड्या करून त्या कंगोर्‍याच्या खाली तिच्या दोन्ही अंगांना, दोन कोनांस दोन-दोन अशा लावल्या. त्याने बाभळीच्या लाकडाचे दांडे करून ते सोन्याने मढवले. त्याने अभिषेकाचे पवित्र तेल आणि सुगंधी द्रव्ययुक्त शुद्ध धूप गांधी बनवतात तसा बनवला.

सामायिक करा
निर्गम 37 वाचा

निर्गम 37:17-29 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

त्याने शुद्ध सोन्याचा एक दीपवृक्ष बनविला; हा दीपवृक्ष, त्याची बैठक, त्याचा दांडा, त्याच्या वाट्या, त्याची बोंडे व त्याची फुले ही सर्व एकाच अखंड तुकड्याची घडवली. या दीपवृक्षाला एका बाजूला तीन व दुसऱ्या बाजूला तीन अशा सहा शाखा होत्या. प्रत्येक शाखेला बदामाच्या फुलासारख्या तीन तीन वाट्या, बोंडाफुलासह केल्या आणि दुसऱ्या बाजूच्या त्याच्या जोडीच्या प्रत्येक शाखेलाही बदामाच्या फुलांसारख्या तीन तीन वाट्या बोंडाफुलासारख्या केल्या. दीपवृक्षामधून निघालेल्या सहा शाखांची रचना अशीच होती. दीपवृक्षाच्या दांड्याला बदामाच्या फुलांसारख्या बोडांफुलांसह चार वाट्या होत्या. या दीपवृक्षामधून निघणाऱ्या सहा शाखांपैकी दोन दोन शाखा आणि त्यांच्याखाली असलेले प्रत्येकी एक बोंड ही एकाच अखंड तुकड्याची होती. शाखा व फुले असलेला हा संपूर्ण दीपवृक्ष शुद्ध सोन्याच्या एकाच अखंड तुकड्यातून घडवलेला होता. त्याने त्या दीपावृक्षाचे सात दिवे, त्याचे चिमटे व ताटल्या शुद्ध सोन्याच्या केल्या. त्याने तो दीपवृक्ष व त्याचे बरोबरची सर्व उपकरणे एक किक्कार शुद्ध सोन्याची बनवली. मग त्याने बाभळीच्या लाकडाची धूपवेदी केली; ती एक हात लांब, एक हात रुंद व दोन हात उंच अशी चौरस होती; तिची शिंगे अंगचीच होती. त्याने त्या वेदीचा वरचा भाग, तिच्या चाऱ्ही बाजू व तिची शिंगे शुद्ध सोन्याने मढविली व तिला सभोवती सोन्याचा कंगोरा केला; वेदी वाहून नेण्यासाठी दांडे घालण्याकरता त्याने सोन्याच्या दोन दोन गोल कड्या करून त्या कंगोऱ्यांच्या खाली तिच्या दोन्ही अंगांना लावल्या. त्याने बाभळीच्या लाकडाचे दांडे केले व ते सोन्याने मढविले. नंतर त्याने अभिषेकाचे पवित्र तेल आणि सुगंधी द्रव्ययुक्त शुद्ध धूप गांध्याच्या कृतीप्रमाणे केला.

सामायिक करा
निर्गम 37 वाचा