YouVersion लोगो
सर्च आयकॉन

निर्गम 35:4-29

निर्गम 35:4-29 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

मोशे सर्व इस्राएल लोकांच्या मंडळीला म्हणाला, परमेश्वराने जे करण्याची आज्ञा दिली आहे ते हे; परमेश्वरासाठी तुम्ही अर्पणे आणावी. ज्याची मनापासून इच्छा असेल त्याने परमेश्वराकरता सोने, चांदी, पितळ; निळे, जांभळे व किरमिज रंगाचे सूत, व तलम सणाचे कापड, बकऱ्याचे केस; लाल रंगवलेली मेंढ्याची कातडी व तहशाची कातडी, बाभळीचे लाकूड; दिव्यासाठी तेल, अभिषेकाच्या तेलासाठी आणि सुगंधी धुपासाठी मसाले; तसेच एफोद व ऊरपट ह्यात खोचण्यासाठी गोमेदमणी आणि इतर रत्ने आणावी. “तुमच्यापैकी जे कोणी कुशल कारागीर आहेत त्या सर्वांनी येऊन परमेश्वराने जे काही करण्याची आज्ञा दिली आहे ते सर्व करावे, म्हणजे निवासमंडप, त्याचा बाहेरील तंबू व त्यावरील आच्छादान, त्याचे आकडे, फळ्या, अडसर, खांब, व उथळ्या; कोश, त्याचे दांडे, दयासन व अंतरपाट, मेज व त्याचे दांडे, त्यावरील सर्व पात्रे व समक्षतेची भाकर; प्रकाशासाठी दीपवृक्ष, त्याची उपकरणे व दिवे, आणि दिव्यासाठी तेल; धूपवेदी व तिचे दांडे, अभिषेकासाठी तेल, सुगंधी द्रव्ययुक्त धूप, निवासमंडपाच्या दारासाठी पडदा; होमवेदी व तिची पितळेची जाळी, दांडे व तिचे इतर साहित्य, गंगाळ व त्याची बैठक; अंगणाचे पडदे, त्यांचे खांब व त्यांच्या उथळ्या, आणि अंगणाच्या फाटकासाठी पडदा; निवासमंडप व अंगण ह्याच्यासाठी मेखा व तणावे, पवित्रस्थानात सेवा करण्यासाठी कुशलतेने विणलेली वस्रे आणि याजक या नात्याने सेवा करण्यासाठी अहरोन याजकाची व त्याच्या पुत्रांची पवित्र वस्रे.” मग इस्राएल लोकांची सर्व मंडळी मोशेपुढून निघून गेली. नंतर ज्यांच्या अंतःकरणांत स्फूर्ती झाली, त्या सर्वांनी दर्शनमंडपाच्या कामासाठी, त्यातील सगळ्या सेवेसाठी आणि पवित्र वस्रांसाठी परमेश्वरास अर्पणे आणली. ज्यांना मनापासून देण्याची इच्छा झाली त्या सगळ्या स्त्रीपुरुषांनी नथा, कुंडले, अंगठ्या, बांगड्या असे सर्व प्रकारचे सोन्याचे दागिने आणले; ही सोन्याची पवित्र अर्पणे परमेश्वरासाठी आणली. ज्या ज्या पुरुषांच्याकडे निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सूत व तलम सणाचे कापड, बकऱ्याचे केस, लाल रंगवलेली मेंढ्याची कातडी व तहशाची कातडी होती त्यांनी ते ते आणले. चांदी व पितळ यांचे अर्पण करणाऱ्या प्रत्येकाने ती अर्पणे परमेश्वरासाठी आणली आणि ज्यांच्याकडे बाभळीचे लाकूड होते त्यांनी ते परमेश्वरास अर्पण केले. ज्या स्रिया शिवणकाम व विणकाम ह्यात तरबेज होत्या त्या सर्वांनी निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सूत व तलम सणाचे कापड आपल्या हातांनी विणून आणले. आणि ज्या स्त्रियांच्या अंतःकरणात स्फूर्ती होऊन त्यांना बुध्दी झाली, त्या सर्वांनी बकऱ्याचे केस कातले. अधिकाऱ्यांनी याजकाचे एफोद व ऊरपट ह्यात जडवण्यासाठी गोमेदमणी व इतर रत्ने आणली. दिव्याचे तेल व अभिषेकाचे तेल व सुगंधी धुपासाठी मसाला आणला. परमेश्वराने मोशेला जे करण्याची आज्ञा दिली होती त्या सर्वांसाठी इस्राएल लोकांनी स्वखुशीने परमेश्वरासाठी अर्पणे आणली, ज्या ज्या स्त्रीपुरुषांच्या अंतःकरणांत स्फूर्ती झाली त्यांनीही अर्पणे आणली.

सामायिक करा
निर्गम 35 वाचा

निर्गम 35:4-29 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मोशे इस्राएल लोकांच्या सर्व मंडळीला म्हणाला, “परमेश्वराने जे करण्याची आज्ञा दिली आहे ते हे : तुम्ही आपले अर्पण परमेश्वराप्रीत्यर्थ आणावे; ज्याची मनापासून इच्छा असेल त्याने परमेश्वरासाठी अर्पण आणावे, म्हणजे सोने, रुपे, पितळ; निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सूत व तलम सणाचे कापड, बकर्‍यांचे केस; लाल रंगवलेली मेंढ्यांची कातडी, तहशांची कातडी, बाभळीचे लाकूड, दिव्यासाठी तेल, अभिषेकाच्या तेलासाठी आणि सुगंधी धूपासाठी मसाले, एफोद व ऊरपट ह्यांत जडवण्यासाठी गोमेदमणी आणि इतर रत्ने आणावीत. तुमच्यापैकी जे कोणी सुबुद्ध ह्रदयाचे असतील त्या सर्वांनी येऊन परमेश्वराने जे काही करण्याची आज्ञा दिली आहे ते सर्व करावे, म्हणजे निवासमंडप, त्याचा तंबू व त्यावरील आच्छादन, त्याचे आकडे, फळ्या, अडसर, खांब व उथळ्या; कोश व त्याचे दांडे, दयासन व अंतरपट; मेज व त्याचे दांडे, त्यावरील सर्व पात्रे व समक्षतेची भाकर; प्रकाशासाठी दीपवृक्ष, त्याची उपकरणे व दिवे, आणि दिव्यासाठी तेल; धूपवेदी, तिचे दांडे, अभिषेकासाठी तेल, सुगंधी द्रव्ययुक्त धूप, व निवासमंडपाच्या दारासाठी पडदा; होमवेदी व तिची पितळेची जाळी, दांडे व तिचे इतर साहित्य, गंगाळ व त्याची बैठक; अंगणाचे पडदे, त्याचे खांब, उथळ्या व अंगणाच्या फाटकासाठी पडदा; निवासमंडप व अंगण ह्यांच्यासाठी मेखा व तणावे; पवित्रस्थानात सेवा करण्यासाठी कुशलतेने विणलेली वस्त्रे आणि याजक ह्या नात्याने सेवा करण्यासाठी अहरोन याजकाची पवित्र वस्त्रे आणि त्याच्या मुलांची वस्त्रे. मग इस्राएल लोकांची सर्व मंडळी मोशेपुढून निघून गेली. नंतर ज्यांच्या अंतःकरणात स्फूर्ती झाली व ज्या कोणाला मनापासून इच्छा झाली, त्याने दर्शनमंडपाच्या कामासाठी, त्यातील सगळ्या सेवेसाठी आणि पवित्र वस्त्रांसाठी परमेश्वराला अर्पण आणले. ज्यांना मनापासून इच्छा झाली ते सगळे स्त्रीपुरुष आले आणि त्यांनी नथी, कुंडले, मुद्रिका, कंकणे असे सोन्याचे सर्व प्रकारचे दागिने आणले. ह्या प्रकारे प्रत्येक मनुष्याने परमेश्वरासाठी सोन्याचे अर्पण आणले. ज्या ज्या पुरुषाजवळ निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सूत, तलम सणाचे कापड, बकर्‍यांचे केस, लाल रंगवलेली मेंढ्यांची कातडी व तहशांची कातडी होती त्याने ते ते आणले. चांदी व पितळ ह्यांचे अर्पण करणार्‍या प्रत्येकाने ती अर्पणे परमेश्वरासाठी आणली आणि ज्या कोणाकडे सेवेच्या कामासाठी उपयोगी पडणारे बाभळीचे लाकूड होते ते तो घेऊन आला. ज्या स्त्रिया सुबुद्ध ह्रदयाच्या होत्या त्या सर्वांनी निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सूत कातले आणि ते कातलेले सूत व आपल्या हातांनी विणलेले तलम सणाचे कापड त्यांनी आणले; आणि ज्या स्त्रियांच्या अंत:करणात स्फूर्ती होऊन त्यांना बुद्धी झाली, त्या सर्वांनी बकर्‍यांचे केस कातले. सरदारांनी एफोद व ऊरपट ह्यांत जडवण्यासाठी गोमेदमणी व इतर रत्ने, आणि दिव्यासाठी व अभिषेकासाठी तेल व सुगंधी धूपासाठी मसाला आणला. जे करण्याविषयी परमेश्वराने मोशेच्या द्वारे आज्ञा दिली होती त्या सर्वांसाठी इस्राएल लोकांनी स्वेच्छेने परमेश्वराप्रीत्यर्थ अर्पणे आणली, ज्या ज्या स्त्रीपुरुषांच्या अंत:करणात स्फूर्ती झाली त्यांनी त्यांनी ही अर्पणे आणली.

सामायिक करा
निर्गम 35 वाचा