निर्गम 33:12-16
निर्गम 33:12-16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मोशे परमेश्वरास म्हणाला, “पाहा या लोकांस घेऊन जाण्यास तू मला सांगितलेस, परंतु तू माझ्याबरोबर कोणाला पाठविणार ते तू सांगितले नाहीस; तू मला म्हणालास, मी तुला तुझ्या नावाने ओळखतो आणि तुझ्यावर माझी कृपादृष्टी आहे. आता माझ्यावर तुझी कृपादृष्टी असल्यास तुझे मार्ग मला दाखव म्हणजे मला तुझी ओळख पटेल आणि त्यामुळे तुझी कृपादृष्टी माझ्यावर होईल. पाहा, हे राष्ट्र तुझी प्रजा आहे.” परमेश्वराने उत्तर दिले, “मी स्वत: तुझ्याबरोबर येईन व तुला विसावा देईन.” मग मोशे परमेश्वरास म्हणाला, “जर तू स्वतः येणार नाहीस तर मग आम्हांला या येथून पुढे नेऊ नकोस. तसेच तुझी कृपादृष्टी माझ्यावर व तुझ्या लोकांवर झाली आहे हे कशावरून समजावे? जर तू आमच्याबरोबर आल्याने मी व हे तुझे लोक पृथ्वीवरील इतर सर्व लोकांहून वेगळे झालो आहो यावरूनच ते समजायचे ना?”
निर्गम 33:12-16 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मग मोशे याहवेहशी बोलला, “तुम्ही मला सांगत आला, ‘या लोकांना चालव,’ परंतु माझ्याबरोबर तुम्ही कोणाला पाठविणार हे तुम्ही मला सांगितले नाही. तुम्ही म्हणाला, ‘मी तुला नावाने ओळखतो आणि तू माझ्या दृष्टीने कृपा पावला आहेस.’ जर तुम्ही माझ्यावर संतुष्ट असाल, तर मला तुमचे मार्ग शिकवा, यासाठी की मी तुम्हाला जाणून तुमच्या दृष्टीत कृपा पावावी. हे स्मरणात असू द्या की हे राष्ट्र तुमचे लोक आहेत.” यावर याहवेहने उत्तर दिले, “माझी समक्षता तुझ्याबरोबर जाईल आणि मी तुला विसावा देईन.” मग मोशे याहवेहला म्हणाला, “जर तुमची समक्षता आमच्याबरोबर गेली नाही, तर आम्हाला येथून पुढे पाठवू नका. तुम्ही आम्हाबरोबर आला नाही, तर माझ्यावर आणि आपल्या लोकांवर तुमची कृपादृष्टी झाली आहे की नाही हे कसे कळणार? मी व तुमचे लोक पृथ्वीवरील इतर सर्व लोकांपासून वेगळे आहोत हे कसे समजणार?”
निर्गम 33:12-16 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मोशे परमेश्वराला म्हणाला, “पाहा, तू मला म्हणतोस की, ‘ह्या लोकांना घेऊन जा’; पण तू माझ्याबरोबर कोणाला पाठवणार हे मला अजून कळवले नाहीस. तरी तू म्हटले आहेस की, ‘मी तुला व्यक्तिश: नावाने ओळखतो, आणि तुझ्यावर माझी कृपादृष्टी आहे.’ आता माझ्यावर तुझी कृपादृष्टी असल्यास, तुझे मार्ग मला दाखव, म्हणजे मला तुझी ओळख पटेल आणि त्यामुळे तुझी कृपादृष्टी माझ्यावर होईल. हे राष्ट्र तुझी प्रजा आहे हे लक्षात घे.” परमेश्वर म्हणाला, “मी स्वत: येईन आणि तुला विसावा देईन.” तो त्याला म्हणाला, “तू स्वत: येत नसलास तर आम्हांला येथून पुढे नेऊ नकोस. तुझी कृपादृष्टी माझ्यावर व तुझ्या प्रजेवर झाली आहे हे कशावरून समजावे? तू आमच्याबरोबर आल्याने मी व तुझे प्रजाजन पृथ्वीवरील इतर सर्व लोकांपेक्षा वेगळे झालो आहोत ह्यावरूनच ते समजायचे ना?”