YouVersion लोगो
सर्च आयकॉन

निर्गम 3:1-12

निर्गम 3:1-12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

तेव्हा मोशे आपला सासरा इथ्रो जो मिद्यानी याजक याचा कळप चारत होता. मोशे रानाच्या मागे, देवाचा डोंगर होरेब येथवर आपला कळप घेऊन गेला. तेव्हा परमेश्वराच्या दूताने त्यास एका झुडपातून निघणाऱ्या अग्नीच्या ज्वालेत दर्शन दिले. मोशेने पाहिले की, झुडूप अग्नीने जळत होते, परंतु ते जळून भस्म होत नव्हते. मोशे म्हणाला, “मी त्या बाजूला वळतो आणि हे मोठे आश्चर्य जाऊन पाहतो की, हे झुडूप जळून नष्ट का होत नाही.” मोशे झुडूपाजवळ येत आहे हे परमेश्वराने पाहिले. तेव्हा झुडपातून देवाने त्यास हाक मारून म्हटले, “मोशे! मोशे!” आणि मोशे म्हणाला, “हा मी इथे आहे.” देव म्हणाला, “तू इकडे जवळ येऊ नकोस, तर तुझ्या पायातल्या चपला काढ; कारण ज्या जागी तू उभा आहेस ती भूमी पवित्र आहे. तो आणखी म्हणाला, मी तुझ्या पित्याचा देव-अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव आहे.” तेव्हा मोशेने आपले तोंड झाकून घेतले. कारण देवाकडे पाहायला तो घाबरला. परमेश्वर म्हणाला, “मिसरामध्ये माझ्या लोकांचा जाच मी खरोखर पाहिला आहे; आणि मुकादमांच्या त्रासामुळे त्यांनी केलेला आकांत मी ऐकला आहे; त्यांचे दु:ख मी जाणून आहे. त्यांना मिसऱ्यांच्या हातून सोडवून त्यांना त्या देशातून चांगल्या व मोठ्या देशात, दुधामधाचे प्रवाह ज्यात वाहत आहेत, कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी व यबूसी यांच्या प्रदेशात घेऊन जावे म्हणून मी उतरलो आहे. तर आता पाहा, मी इस्राएली लोकांचा आक्रोश ऐकला आहे आणि मिसरी ज्या जुलूमाने त्यांना जाचत आहेत तेही मी पाहिले आहे. तर आता, माझ्या इस्राएली लोकांस मिसर देशामधून बाहेर काढण्यासाठी मी तुला फारोकडे पाठवत आहे.” परंतु मोशे देवाला म्हणाला, “फारोकडे जाऊन इस्राएली लोकांस मिसर देशामधून काढून आणणारा असा मी कोण आहे?” देवाने उत्तर दिले, “खचीत, मी तुझ्याबरोबर असेन, मी तुला पाठवत आहे याची खूण हीच असेल; तू इस्राएली लोकांस मिसरमधून बाहेर आणल्यावर याच डोंगरावर तुम्ही देवाची उपासना कराल.”

सामायिक करा
निर्गम 3 वाचा

निर्गम 3:1-12 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मोशे आपला सासरा मिद्यानी याजक इथ्रो ह्याची शेरडेमेंढरे चारत होता आणि तो आपला कळप रानाच्या पिछाडीस देवाचा डोंगर होरेब येथवर घेऊन गेला. तेव्हा परमेश्वराच्या दूताने एका झुडपातून अग्निज्वालेत त्याला दर्शन दिले; त्याने दृष्टी लावली तर झुडूप अग्नीने जळत असून ते भस्म झाले नाही असे त्याला दिसले. तेव्हा मोशे म्हणाला, “मी आता तिकडे जाऊन हा काय चमत्कार आहे, ते झुडूप का भस्म होत नाही ते पाहतो.” ते पाहण्यास मोशे तिकडे वळला असे परमेश्वराने पाहिले, आणि झुडपातून देवाने त्याला हाक मारून म्हटले, “मोशे, मोशे.” तेव्हा तो म्हणाला, “काय आज्ञा?” देव त्याला म्हणाला, “इकडे जवळ येऊ नकोस; तू आपल्या पायांतले जोडे काढ, कारण ज्या जागी तू उभा आहेस ती भूमी पवित्र आहे.” तो आणखी म्हणाला, “मी तुझ्या पित्याचा देव, अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव, याकोबाचा देव आहे.” तेव्हा मोशेने आपले तोंड झाकले; कारण देवाकडे पाहण्यास तो भ्याला. परमेश्वर म्हणाला, “मिसर देशात असलेल्या माझ्या लोकांची विपत्ती मी खरोखर पाहिली आहे, त्यांच्या मुकादमांच्या जाचामुळे त्यांनी केलेला आक्रोश मी ऐकला आहे; त्यांचे क्लेश मी जाणून आहे; त्यांना मिसरी लोकांच्या हातातून सोडवावे, आणि त्या देशातून चांगल्या व मोठ्या देशात, दुधामधाचे प्रवाह जेथे वाहत आहेत अशा देशात, म्हणजे कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी व यबूसी ह्यांच्या देशात त्यांना घेऊन जावे म्हणून मी उतरलो आहे. पाहा, इस्राएलवंशजांचा आक्रोश माझ्यापर्यंत आला आहे; मिसरी लोक त्यांच्यावर कसा जाचजुलूम करीत आहेत हेही मी प्रत्यक्ष पाहिले आहे. तर आता चल, तू मिसर देशातून माझे लोक इस्राएलवंशज ह्यांना बाहेर काढावे म्हणून मी तुला फारोकडे पाठवतो.” तेव्हा मोशे देवाला म्हणाला, “फारोकडे जाऊन इस्राएलवंशजांना मिसरातून काढून आणणारा असा मी कोण?” देव म्हणाला, “खचीत मी तुझ्याबरोबर असेन; मी तुला पाठवले ह्याची खूण हीच : तू लोकांना मिसरातून काढून आणल्यावर ह्याच डोंगरावर तुम्ही देवाची सेवा कराल.”

सामायिक करा
निर्गम 3 वाचा