YouVersion लोगो
सर्च आयकॉन

निर्गम 2:11-22

निर्गम 2:11-22 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

काही दिवसांनी असे झाले की मोशे मोठा झाल्यावर त्याने आपल्या भाऊबंदांकडे जाऊन त्यांचे काबाडकष्ट पाहिले; त्या प्रसंगी आपल्या भाऊबंदांपैकी एका इब्र्याला कोणी मिसरी मारत असलेला त्याला दिसला. तेव्हा त्याने इकडेतिकडे सभोवार नजर फेकली व कोणी नाही असे पाहून त्या मिसर्‍यास ठार करून त्याला वाळूत लपवले. तो पुन्हा दुसर्‍या दिवशी बाहेर गेला तेव्हा दोघा इब्री मनुष्यांना एकमेकांशी मारामारी करताना त्याने पाहिले; तेव्हा ज्याचा अपराध होता त्याला तो म्हणाला, “तू आपल्या सोबत्याला का मारत आहेस?” तो त्याला म्हणाला, “तुला आमच्यावर अधिकारी व न्यायाधीश कोणी नेमले? तू त्या मिसर्‍यास जिवे मारले तसे मलाही मारायला पाहतोस काय?” तेव्हा मोशेला भीती वाटली; तो म्हणाला, “खरोखर ती गोष्ट फुटली.” फारोच्या कानी ती गोष्ट गेली तेव्हा मोशेला मारून टाकण्याचे त्याने योजले; पण मोशे फारोपुढून पळून मिद्यान देशात जाऊन पोहचला आणि तेथे एका विहिरीजवळ बसला. तेथील मिद्यानी याजकाला सात मुली होत्या; त्या येऊन पाणी काढून आपल्या बापाच्या शेरडामेंढरांना पाजण्याकरता ते डोणीत भरत होत्या. इतक्यात धनगरांनी येऊन त्यांना हाकून लावले; तेव्हा मोशेने उठून त्या मुलींना मदत करून त्यांच्या कळपास पाणी पाजले. त्या आपला बाप रगुवेल ह्याच्याकडे आल्या तेव्हा तो म्हणाला, “आज तुम्ही लवकर कशा आलात?” त्या म्हणाल्या, “धनगरांच्या हातून एका मिसरी मनुष्याने आमची सुटका केली, आणि आमच्यासाठी पाणीदेखील काढून कळपास पाजले.” तो आपल्या मुलींना म्हणाला, “तो कोठे आहे? त्या माणसाला तुम्ही तेथे का सोडले? त्याला जेवायला बोलावून आणा.” आणि मोशे त्या मनुष्याजवळ राहण्यास कबूल झाला; त्याने मोशेला आपली मुलगी सिप्पोरा दिली. तिला मुलगा झाला, त्याने त्याचे नाव गेर्षोम ठेवले; तो म्हणाला, “कारण मी परदेशात उपरा आहे.”

सामायिक करा
निर्गम 2 वाचा

निर्गम 2:11-22 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

काही दिवसानी असे झाले की, मोशे मोठा झाल्यावर आपल्या लोकांकडे गेला आणि त्याने त्यांची कष्टाची कामे पहिली. कोणी एक मिसरी आपल्या इब्री मनुष्यास मारत असताना त्याने पाहिले. तेव्हा आपल्याकडे पाहणारा आजूबाजूला कोणीही नाही हे जाणून मोशेने त्या मिसराच्या मनुष्यास जिवे मारले व वाळूत पुरून टाकले. दुसऱ्या दिवशी तो बाहेर गेला, तेव्हा पाहा दोन इब्री माणसे मारामारी करत होती. त्यांच्यामध्ये जो दोषी होता त्यास तो म्हणाला, “तू आपल्या सोबत्याला का मारत आहेस?” पण त्या मनुष्याने उत्तर दिले, “तुला आम्हांवर अधिकारी व न्यायाधीश कोणी नेमले? तू काल जसे त्या मिसऱ्यास जिवे मारलेस, तसे मला मारायला पाहतोस का?” तेव्हा मोशे घाबरला. तो विचार करीत स्वत:शीच म्हणाला, “मी काय केले ते आता खचीत सर्वांना माहीत झाले आहे.” आणि फारोने याविषयी ऐकले तेव्हा त्याने मोशेला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. परंतु मोशे फारोपासून दूर पळून गेला. तो मिद्यान देशात गेला आणि तेथे एका विहिरीजवळ बसला. मिद्यानी याजकाला सात मुली होत्या; आपल्या वडिलाच्या कळपाला पाणी पाजण्यासाठी त्या विहिरीवर आल्या. त्या हौदात पाणी भरत होत्या; परंतु काही मेंढपाळांनी त्यांना पाणी भरू न देता हुसकून लावण्याचा प्रयत्न केला. पण मोशेने उठून त्यांना मदत केली. त्याने त्यांच्या कळपाला पाणी पाजले. मग त्या मुली आपला बाप रगुवेल याच्याकडे गेल्या; तेव्हा त्यांचा बाप त्यांना म्हणाला, “तुम्ही आज इतक्या लवकर घरी कशा आला आहात?” त्या म्हणाल्या, “एका मिसरी मनुष्याने आम्हांला मेंढपाळाच्या हातून सोडवले. त्याने आम्हांसाठी पाणी देखील काढून कळपाला पाजले.” तेव्हा तो आपल्या मुलींना म्हणाला, “तो कोठे आहे? तुम्ही त्या मनुष्यास का सोडले? त्यास बोलावून आणा म्हणजे तो आपल्याबरोबर भोजन करेल.” त्या मनुष्यापाशी राहायला मोशे कबूल झाला. त्याने आपली मुलगी सिप्पोरा हिचा विवाह देखील त्याच्याशी करून दिला. तिला एक मुलगा झाला. मोशेने त्याचे नाव गेर्षोम ठेवले, तो म्हणाला, “मी परदेशात वस्ती करून आहे.”

सामायिक करा
निर्गम 2 वाचा