YouVersion लोगो
सर्च आयकॉन

निर्गम 14:21-31

निर्गम 14:21-31 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

मग मोशेने तांबड्या समुद्रावर आपला हात उगारला, तेव्हा परमेश्वराने रात्रभर पूर्वेकडून जोराचा वारा वाहवून समुद्र मागे हटविला, असा की पाणी दुभागून मध्ये कोरडी जमीन झाली. आणि इस्राएल लोक कोरड्या वाटेवरून भर समुद्रातून पार गेले. समुद्राचे पाणी त्यांच्या उजव्या व डाव्या बाजूला भिंतीसारखे उभे राहिले. त्यानंतर तेव्हा मिसऱ्यांनी त्यांचा पाठलाग केला. फारोचे सर्व घोडे, रथ व स्वार त्यांच्या पाठोपाठ समुद्रामध्ये गेले. तेव्हा त्या दिवशी भल्या पहाटे परमेश्वराने मेघस्तंभातून व अग्निस्तंभातून खाली मिसराच्या सैन्याकडे पाहिले आणि त्यांचा गोंधळ उडवून त्यांचा पराभव केला. रथाची चाके रुतल्यामुळे रथावर ताबा ठेवणे मिसराच्या लोकांस कठीण झाले; तेव्हा ते मोठ्याने ओरडून म्हणाले, “आपण येथून लवकर निघून जाऊ या! कारण परमेश्वर इस्राएलाच्या बाजूने आम्हाविरूद्ध लढत आहे.” नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, “तुझा हात समुद्रावर उगार म्हणजे भिंतीसारखे उभे राहिलेले पाणी पूर्ववत जमून मिसऱ्यावर, त्यांच्या रथावर व स्वारांवर येईल.” मोशेने आपला हात समुद्रावर उगारला तेव्हा दिवस उजाडल्यावर पाणी पहिल्यासारखे समान पातळीवर आले; तेव्हा मिसराच्या लोकांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु परमेश्वराने त्यांना समुद्रामध्ये उलथून पाडिले. पाणी पूर्ववत झाले व त्याने घोडे, रथ व स्वारांना गडप केले आणि इस्राएल लोकांचा पाठलाग करणाऱ्या फारोच्या सर्व सैन्याचा नाश झाला, त्यांच्यातले कोणीही वाचले नाही. परंतु इस्राएली लोक कोरड्या भूमीवरून भरसमुद्र ओलांडून पार गेले. ते पाणी त्यांच्या उजव्या व डाव्या हाताला भिंतीप्रमाणे उभे राहिले. तेव्हा अशा रीतीने त्या दिवशी परमेश्वराने मिसऱ्यांच्या हातातून इस्त्राएल लोकांस सोडविले आणि मिसरी समुद्रतीरी मरून पडलेले इस्राएल लोकांनी आपल्या डोळ्यांनी पाहिले. परमेश्वराने मिसऱ्यांना आपला प्रबळ हात दाखविला तो इस्राएल लोकांनी पाहिला, तेव्हा त्यांनी परमेश्वराचे भय धरले आणि परमेश्वरावर व त्याचा सेवक मोशे याच्यावरही विश्वास ठेवला.

सामायिक करा
निर्गम 14 वाचा

निर्गम 14:21-31 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

मग मोशेने आपला हात समुद्रावर उगारला आणि याहवेहने रात्रभर पूर्वेचा वारा वाहवून समुद्राचे पाणी मागे हटवून ती कोरडी जमीन केली व पाणी दुभागले. तेव्हा इस्राएली लोक, त्यांच्या उजवी व डावीकडे पाण्याची भिंत उभी असताना, समुद्रामधून कोरड्या भूमीवरून चालत गेले. इजिप्तच्या लोकांनी इस्राएली लोकांचा पाठलाग केला आणि फारोहचे घोडे, रथ व स्वार त्यांच्यामागे समुद्राच्या मध्ये गेले. पण पहाटेच्या वेळी अग्निस्तंभामधून व मेघस्तंभामधून याहवेहने इजिप्तच्या सेनेकडे पाहिले आणि त्यांचा गोंधळ उडविला. त्यांच्या रथांची चाके गच्च केली की त्यांना पुढे जाणे कठीण होऊ लागले. तेव्हा इजिप्तची लोक म्हणू लागले, “इस्राएलच्या लोकांपासून आपण दूर जाऊ या! कारण याहवेह त्यांच्यावतीने इजिप्तविरुद्ध लढत आहेत.” मग याहवेह मोशेला म्हणाले, “आपला हात समुद्रावर लांब कर म्हणजे समुद्राचे पाणी पूर्ववत होऊन इजिप्तचे सर्व सैन्य, त्यांचे रथ व घोडेस्वार यांच्यावर येईल.” मोशेने आपला हात समुद्रावर लांब केला आणि पहाटेच्या वेळी समुद्र त्याच्या ठिकाणी परत गेला. इजिप्तचे लोक त्याच्याकडे धावत असताना याहवेहने त्यांना समुद्रात बुडवून टाकले. पाणी परत वाहू लागले व फारोहचे सर्व सैन्य, घोडेस्वार व रथ—फारोहचे संपूर्ण सैन्य, ज्यांनी इस्राएली लोकांचा समुद्रामध्ये पाठलाग केला ते पाण्याखाली गेले. त्यांच्यातील एकही जिवंत राहिला नाही. पण इस्राएली लोक कोरड्या जमिनीवरून समुद्र पार करून गेले आणि त्यांच्या उजवीकडे व डावीकडे पाणी भिंतीप्रमाणे उभे राहिले. त्या दिवशी याहवेहने इस्राएलला इजिप्तच्या हातातून सोडविले, इस्राएली लोकांनी इजिप्तचे मेलेले लोक समुद्रकिनार्‍यावर पडलेले पाहिले. जेव्हा इस्राएली लोकांनी इजिप्तच्या लोकांविरुद्ध आलेला याहवेहचा पराक्रमी हात बघितला, त्यावेळी त्यांना याहवेहचे भय वाटले आणि त्यांनी याहवेह व त्यांचा सेवक मोशे यांच्यावर विश्वास ठेवला.

सामायिक करा
निर्गम 14 वाचा

निर्गम 14:21-31 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मोशेने आपला हात समुद्रावर उगारला तेव्हा परमेश्वराने रात्रभर पूर्वेचा जोरदार वारा वाहवून समुद्र मागे हटवला, त्यामुळे पाण्याचे दोन भाग झाले व मधली जमीन कोरडी झाली. इस्राएल लोक भरसमुद्रात कोरड्या जमिनीवरून चालू लागले आणि उजवीकडील व डावीकडील पाणी त्यांच्यासाठी भिंतीसारखे झाले. तेव्हा मिसर्‍यांनी त्यांचा पाठलाग केला आणि फारोचे सर्व घोडे, रथ व स्वार त्यांच्या पाठोपाठ समुद्रामध्ये गेले. आणि रात्रीच्या शेवटच्या प्रहरी परमेश्वराने अग्नीच्या व मेघाच्या स्तंभातून मिसरी सेनेकडे पाहून त्यांची त्रेधा उडवली. त्याने त्यांच्या रथांची चाके काढून ते चालवणे कठीण केले; तेव्हा मिसरी लोक म्हणू लागले, “आपण इस्राएलांपासून पळून जाऊ, कारण परमेश्वर त्यांच्या बाजूने मिसर्‍यांशी लढत आहे.” परमेश्वर मोशेला म्हणाला, “आपला हात समुद्रावर उगार म्हणजे पाणी पूर्वीसारखे जमून मिसर्‍यांवर, त्यांच्या रथांवर व स्वारांवर येईल.” मोशेने समुद्रावर आपला हात उगारला तेव्हा दिवस उजाडल्यावर समुद्र परतून त्याचा लोट पूर्वीसारखा वाहू लागला; त्यापुढे मिसरी लोक पळू लागले. पण परमेश्वराने त्यांना समुद्रामध्ये उलथून पाडले. पाणी पूर्वीच्या जागेवर परत आले आणि रथ, घोडे आणि फारोची सर्व सेना जी त्यांच्या पाठीस लागून समुद्रामध्ये गेली होती ती सर्व त्यात गडप झाली; त्यांतला एकही वाचला नाही. पण इस्राएल लोक भरसमुद्रात कोरड्या जमिनीवरून चालून गेले; आणि उजवीकडील व डावीकडील पाणी त्यांच्यासाठी भिंतीसारखे झाले. अशा प्रकारे परमेश्वराने त्या दिवशी मिसर्‍यांच्या हातातून इस्राएल लोकांना तारले आणि मिसरी लोक समुद्रतीरी मरून पडलेले इस्राएलांनी पाहिले. परमेश्वराने मिसर्‍यांना आपला प्रबळ हात दाखवला तो इस्राएलांनी पाहिला, तेव्हा त्यांनी परमेश्वराचे भय धरले आणि परमेश्वरावर आणि त्याचा सेवक मोशे ह्याच्यावर विश्वास ठेवला.

सामायिक करा
निर्गम 14 वाचा