निर्गम 14:13-18
निर्गम 14:13-18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परंतु मोशेने उत्तर दिले, “भिऊ नका! स्थिर उभे राहा आणि परमेश्वर आज तुमचे तारण करील ते पाहा. आजच्या दिवसानंतर हे मिसराचे लोक तुम्हास पुन्हा कधीही दिसणार नाहीत. परमेश्वर तुमच्याकरता त्यांच्याशी लढेल, तुम्ही शांत उभे राहा.” मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “माझा धावा करीत काय बसलास? इस्राएल लोकांस सांग की पुढे चला. तू आपली काठी उचल आणि आपला हात समुद्रावर उगारून तो दुभाग म्हणजे इस्राएल लोक भर समुद्रात कोरड्या भूमीवरून चालतील. आणि पाहा, मी स्वतः मिसऱ्यांची मने कठीण करीन आणि ते तुमचा पाठलाग करतील. आणि फारो व त्याचे सर्व सैन्य, स्वार व रथ यांचा पराभव केल्याने माझा महिमा प्रगट होईल. फारो व त्याचे रथ व त्यांचे स्वार यांचा पराभव केल्याने माझा महिमा प्रगट झाला म्हणजे मी परमेश्वर आहे हे मिसरी लोकांस कळेल.”
निर्गम 14:13-18 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मोशे लोकांना म्हणाला, “घाबरू नका. स्तब्ध राहा व आज याहवेह तुम्हाला अद्भुतरित्या कसे सोडविणार आहे ते पाहा. हे इजिप्तचे लोक जे तुम्हाला आज दिसतात ते पुन्हा दिसणार नाहीत. याहवेह तुमच्यासाठी लढतील; तुम्ही केवळ स्तब्ध राहा.” मग याहवेह मोशेला म्हणाले, “माझ्याकडे का रडतोस? इस्राएली लोकांना पुढे जायला सांग. समुद्रातील पाणी दुभागावे म्हणून तुझ्या हातातील काठी समुद्रावर उगार म्हणजे इस्राएली लोक समुद्रामधून कोरड्या जमिनीवरून जातील. मी इजिप्तच्या लोकांची मने कठीण करेन आणि ते त्यांच्यामागे समुद्राच्या आत येतील. मग फारोह, त्याचे सर्व सैनिक, रथ व घोडेस्वार यांच्याकडून मी माझे गौरव करून घेईन. आणि जेव्हा फारोह, त्याचे रथ व त्याचे घोडेस्वार यांच्याकडून मला गौरव मिळेल, तेव्हा इजिप्तचे लोक जाणतील की मी याहवेह आहे.”
निर्गम 14:13-18 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मोशे लोकांना म्हणाला, “भिऊ नका. स्थिर उभे राहा आणि परमेश्वर आज तुमचे जे तारण करील ते पाहा, कारण ज्या मिसरी लोकांना तुम्ही आज पाहत आहात ते पुन्हा कधीही तुमच्या नजरेस पडणार नाहीत. परमेश्वर तुमच्यासाठी लढेल; तुम्ही शांत राहा.” मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “माझा धावा करीत काय बसलास? इस्राएल लोकांना सांग की, पुढे चला. तू आपली काठी उचलून आपला हात समुद्रावर उगार व त्याचे दोन भाग कर म्हणजे इस्राएल लोक भर समुद्रातून कोरड्या भूमीवर चालतील; आणि पाहा, मी स्वतः मिसर्यांची मने कठीण करीन. ते त्यांच्या पाठीस लागतील; आणि फारो, त्याची सर्व सेना, त्याचे रथ व त्याचे स्वार ह्यांच्याकडून मी आपला सन्मान पावेन. फारो, त्याचे रथ व त्याचे स्वार ह्यांच्या (पराभवा) कडून माझे गौरव झाल्याने मी परमेश्वर आहे हे मिसरी लोक ओळखतील.”