निर्गम 14:1-14 - Compare All Versions
निर्गम 14:1-14 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परमेश्वर मोशेला म्हणाला, “इस्राएल लोकांस असे सांग की, तुम्ही मागे फिरून मिग्दोल व समुद्र यांच्यामध्ये व बआल-सफोन जवळ असलेल्या पीहहीरोथ येथे तळ देऊन रात्री मुक्काम करावा. इस्राएली लोकांविषयी फारो म्हणेल, ते रानात भटकत आहेत. रानात त्यांचा कोंडमारा झाला आहे. मी फारोचे मन कठीण करीन व तो त्यांचा पाठलाग करीन. मी फारो व त्याची सेना यांचा पराभव करून गौरवशाली होईन, मग मिसराच्या लोकांस समजेल की मी परमेश्वर आहे.” त्याप्रमाणे इस्राएल लोकांनी केले. इस्राएल लोक निसटून गेल्याचे मिसराच्या राजाला समजले तेव्हा तो व त्याचे अधिकारी यांचे विचार बदलले व आपण हे काय केले असे त्यांना वाटले. फारो म्हणाला, “आपण इस्राएली लोकांस आपल्या दास्यातून पळून का जाऊ दिले?” तेव्हा फारोने आपला रथ तयार करण्यास सांगितले आणि आपल्या लोकांस घेऊन तो निघाला. त्याने सहाशे उत्तम योद्धे व मिसरातील सर्व रथ त्यांवरील सरदारांसोबत आपल्याबरोबर घेतले. इस्राएल लोक तर मिसरहून मोठ्या अवसानाने चालले होते, परंतु परमेश्वराने फारो राजाचे मन कठीण केले. फारोच्या लष्करात पुष्कळ घोडेस्वार व रथ होते. मिसरी सैन्याने त्यांचा पाठलाग केला व इस्त्राएल लोकांनी लाल समुद्र व बआल-सफोनाच्या दरम्यान पीहहीरोथ येथे तळ दिला होता तेथे त्यांना गाठले. फारो व मिसरी सैन्य आपणाकडे येताना इस्राएल लोकांनी पाहिले, तेव्हा ते अतिशय घाबरले; आणि मदतीसाठी ते परमेश्वराचा धावा करू लागले. ते मोशेला म्हणाले, “आम्हांला मिसरात काय कबरा नव्हत्या म्हणून येथे रानात मरावयास आणले? आम्हांला तू मिसरातून बाहेर का काढले? मिसरमध्ये आम्ही तुला नव्हतो का म्हणत की आम्ही आहो ते ठीक आहो, आम्ही मिसरामध्ये गुलाम म्हणून राहिलो असतो तर बरे झाले असते. येथे रानात मरून जावे त्यापेक्षा मिसऱ्यांचे दास्य पत्करले.” परंतु मोशेने उत्तर दिले, “भिऊ नका! स्थिर उभे राहा आणि परमेश्वर आज तुमचे तारण करील ते पाहा. आजच्या दिवसानंतर हे मिसराचे लोक तुम्हास पुन्हा कधीही दिसणार नाहीत. परमेश्वर तुमच्याकरता त्यांच्याशी लढेल, तुम्ही शांत उभे राहा.”
निर्गम 14:1-14 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग याहवेह मोशेला म्हणाले, “इस्राएली लोकांस सांग मागे फिरा आणि पी-हाहीरोथ जवळ, मिग्दोल व समुद्र यांच्यामध्ये, समुद्राजवळ तळ द्या, जो थेट बआल-सफोनासमोर आहे. यामुळे फारोहला वाटेल की, इस्राएली लोक देशाभोवती गोंधळून भटकत आहेत, वाळवंटात अडकले आहेत. मी फारोहचे मन कठीण करेन, म्हणजे तो त्यांचा पाठलाग करेल. पण फारोह व त्याच्या सैन्याकडून मी माझे गौरव करून घेईन आणि इजिप्तच्या प्रजेला समजेल की, मी याहवेह आहे.” मग इस्राएली लोकांनी तसे केले. जेव्हा इजिप्तच्या राजाला सांगितले गेले की ते लोक पळून गेले, फारोहने व त्याच्या अधिकार्यांनी त्यांच्याविषयी आपले मन बदलले व ते म्हणाले, “आपण हे काय केले? आपण इस्राएली लोकांना जाऊ दिले व त्यांची सेवा गमावली!” मग त्याने ताबडतोब आपला रथ जोडून आपले सैन्य सोबत घेतले. सहाशे सर्वात उत्तम असे रथ व त्याबरोबर इजिप्तचे बाकी सर्व रथ व त्यावरील अधिकारी त्याने घेतले. याहवेहने इजिप्तचा राजा फारोह याचे हृदय कठीण केले म्हणून इस्राएली लोक जे मोठ्या धैर्याने इजिप्तमधून जात होते, त्यांचा त्याने पाठलाग केला. इजिप्तच्या लोकांनी—फारोहचे सर्व घोडे व रथ, घोडेस्वार व सैन्य यांच्यासह—इस्राएली लोकांचा पाठलाग केला आणि बआल-सफोनासमोर असलेल्या पी-हाहीरोथ, जिथे ते तळ देऊन होते तिथे त्यांना गाठले. फारोह जसा जवळ आला, इस्राएली लोकांनी पाहिले की इजिप्तचे सैन्य त्यांच्यावर चालून येत आहे. ते फार घाबरले व मोठ्याने याहवेहकडे आरोळी मारली. ते मोशेला म्हणाले, “इजिप्त देशात कबरा नव्हत्या म्हणून तू आम्हाला या रानात मरायला आणले काय? इजिप्तमधून आम्हास बाहेर आणून तू हे काय केले? आम्हाला असेच राहू दे; आम्हाला इजिप्त लोकांची सेवा करू दे, असे आम्ही तुला इजिप्तमध्ये असताना म्हणालो नव्हतो काय? या रानात मरण्याऐवजी इजिप्त लोकांची गुलामी करणे आम्हाला बरे होते!” मोशे लोकांना म्हणाला, “घाबरू नका. स्तब्ध राहा व आज याहवेह तुम्हाला अद्भुतरित्या कसे सोडविणार आहे ते पाहा. हे इजिप्तचे लोक जे तुम्हाला आज दिसतात ते पुन्हा दिसणार नाहीत. याहवेह तुमच्यासाठी लढतील; तुम्ही केवळ स्तब्ध राहा.”
निर्गम 14:1-14 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परमेश्वराने मोशेला म्हटले, “इस्राएल लोकांना असे सांग की, तुम्ही मागे फिरून मिग्दोल आणि समुद्र ह्यांच्यामध्ये असलेल्या पी-हहिरोथापुढे बाल-सफोनासमोर तळ द्यावा; त्यासमोर समुद्राजवळ आपले डेरे उभारावेत. मग फारो इस्राएल लोकांसंबंधाने म्हणेल की, ‘ते देशात गोंधळले आहेत; त्यांचा रानात कोंडमारा झाला आहे.’ मी फारोचे मन कठीण करीन आणि तो त्यांचा पाठलाग करील; ह्या प्रकारे फारो व त्याची सर्व सेना ह्यांच्या पराभवाकडून मला गौरव मिळेल, आणि मी परमेश्वर आहे हे मिसरी लोक ओळखतील.” मग त्याप्रमाणे त्यांनी केले. इस्राएल लोक पळून गेले आहेत हे वर्तमान मिसराच्या राजाला कळले तेव्हा फारोचे व त्याच्या सेवकांचे मन त्या लोकांसंबंधाने बदलले, आणि ते म्हणू लागले की, “इस्राएल लोकांना आपल्या गुलामगिरीतून सुटून जाऊ दिले हे आम्ही काय केले?” तेव्हा त्याने आपला रथ तयार करून आपले लोक आपल्याबरोबर घेतले. त्याने सहाशे निवडक रथ व मिसरातले सर्व रथ त्यांवरील सरदारांसह बरोबर घेतले. परमेश्वराने मिसराचा राजा फारो ह्याचे मन कठीण केले आणि तो इस्राएल लोकांच्या पाठीस लागला; इस्राएल लोक तर मोठ्या धैर्याने चालले होते. मग फारोचे सर्व घोडे, रथ व स्वार ह्यांसह मिसरी सैन्याने त्यांचा पाठलाग करून पी-हहिरोथानजीक व बाल-सफोना-समोर समुद्रतीरी त्यांनी तळ दिला होता तेथे त्यांना गाठले. फारो नजीक येऊन ठेपला; इस्राएल लोकांनी टेहळणी करून पाहिले तर मिसरी लोक आपल्या पाठोपाठ येत आहेत असे त्यांना दिसले; तेव्हा त्यांना फार भीती वाटली. ते परमेश्वराचा धावा करू लागले. ते मोशेला म्हणाले, “मिसरात काय कबरा नव्हत्या म्हणून तू आम्हांला येथे रानात मरायला आणले? आम्हांला तू मिसरातून बाहेर आणले ते काय म्हणून? आम्ही तुला मिसरात नव्हतो का म्हणत की आम्ही आहोत ते ठीक आहोत. आम्हांला मिसरी लोकांची गुलामगिरी करीत राहू दे? येथे रानात मरून जावे त्यापेक्षा मिसरी लोकांच्या गुलामगिरीत राहणे परवडले असते.” मोशे लोकांना म्हणाला, “भिऊ नका. स्थिर उभे राहा आणि परमेश्वर आज तुमचे जे तारण करील ते पाहा, कारण ज्या मिसरी लोकांना तुम्ही आज पाहत आहात ते पुन्हा कधीही तुमच्या नजरेस पडणार नाहीत. परमेश्वर तुमच्यासाठी लढेल; तुम्ही शांत राहा.”