एस्तेर 7:1-4
एस्तेर 7:1-4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तेव्हा राजा आणि हामान राणी एस्तेरकडे मेजवानीला गेले. मेजवानीच्या या दुसऱ्या दिवशी, ते द्राक्षरस घेत असताना, राजाने पुन्हा एस्तेरला विचारले, एस्तेर राणी, “तुझी विनंती काय आहे? ती मान्य केली जाईल. तुझी मागणी काय आहे? ती अर्ध्या राज्याएवढी असली तरी ती मान्य करण्यांत येईल.” तेव्हा एस्तेर राणी म्हणाली, “राजा, माझ्यावर आपली कृपादृष्टी झाली असून आपली मर्जी असेल तर मला व माझ्या लोकांसही जिवदान द्यावे. एवढेच माझे मागणे आहे. कारण, आमचा नाश होण्यासाठी, मारले जाण्यासाठी व नाहीसे व्हावे यासाठी मी आणि माझे लोक विकले गेलो आहोत. आमची नुसती गुलाम म्हणून विक्री झाली असती तरी मी गप्प राहिले असते. तरी त्या शत्रूला राजाची हानी भरून देऊ शकले नसते.”
एस्तेर 7:1-4 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ठरल्याप्रमाणे राजा व हामान एस्तेर राणीच्या मेजवानीस गेले. दुसर्या दिवशी भोजनसमयी द्राक्षारस पिण्याचे वेळी राजाने एस्तेरला पुन्हा विचारले, “एस्तेर राणी, तुझा काय अर्ज आहे? तो मान्य करण्यात येईल. तुझी मागणी काय आहे? ती अर्ध्या राज्याएवढी असली तरी तिच्याप्रमाणे करण्यात येईल.” मग एस्तेर राणी म्हणाली, “महाराज, माझ्यावर आपली कृपादृष्टी झाली असून आपल्या मर्जीस आल्यास मला व माझ्या लोकांना प्राणदान द्यावे हाच माझा अर्ज व विनंती आहे. माझा व माझ्या लोकांचा विध्वंस, संहार व नायनाट व्हावा ह्या हेतूने आमची विक्री होऊन चुकली आहे; आम्ही केवळ दासदासी व्हावे ह्या हेतूने आमची विक्री झाली असती तर मी गप्प राहिले असते; तरी त्या स्थितीतही त्या वैर्याला राजाच्या नुकसानीची भरपाई करता आली नसती.”